राजा रामण्णा - डॉ.सुबोध महंती
जन्मः २८ जानेवारी १९२५
मृत्यूः २४ सप्टेंबर २००४
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०६२८
“सर्व इतिहास, काही कणखर
आणि प्रांजळ व्यक्तींच्या चरित्रांभोवती सहजपणे फिरत राहतो.”
- राल्फ
वाल्डो इमर्सन
“सर्व थोर व्यक्तींची चरित्रे आपल्याला आठवण करून देतात
की
आपणही आपली आयुष्ये उजळून टाकू शकतो
आणि आपल्या पश्चातही, आपल्या मागे
काळाच्या वाळूवर आपली पदचिन्हे सोडून जाऊ शकतो.” - हेन्री
वड्सवर्थ लाँगफेलो
“डॉ. रामण्णांसारखे उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तीमत्व,
प्रत्येक भूमिकेतून अभियानाच्या उद्दिष्टाप्रत प्रेरित होऊन, राष्ट्रीय विकासात सहभागी
होण्याकरता सदैवच सज्ज असे. केंद्रीय मंत्री आणि खासदार ह्या त्यांच्या भूमिकांतूनही
हेच स्पष्ट होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आम्हा लोकांना, डॉ. रामण्णा हे
नेहमीच एक प्रेरणास्त्रोत आणि मार्गदर्शक ठरलेले आहेत.”
- ए.पी.जे. अब्दुल कलाम, भारताचे राष्ट्रपती
“१९५० सालच्या अनिश्चित सुरूवातीपासून, आज
जर आपण आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानात ’विकसित राष्ट्र’ ह्या अवस्थेप्रत पोहोचलेलो
असू तर, मोठ्या प्रमाणात ते डॉ. रामण्णांचे आदर्श, त्यांची धोरणे आणि त्यांचे प्रयास
ह्यांमुळेच घडून आलेले आहे. विशेषतः देशाच्या ऊर्जा आणि
राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील, भव्य-दिव्य (मॅग्निफिशिअंट) विज्ञान आणि तंत्रज्ञान
इमारतीच्या साध्य केलेल्या उद्दिष्टांचा, अभिमानास्पद वारसा त्यांनी मागे ठेवलेला
आहे.”
- पी.के.अयंगार, माजी अध्यक्ष, अणुऊर्जा आयोग, भारत
सरकार
राजा रामण्णा एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. एक विख्यात
अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ होते. एक अतिशय परिपूर्ण तंत्रशास्त्री (टेक्नॉलॉजिस्ट),
समर्थ प्रशासक, प्रेरक पुढारी, उपजत संगीतकार, संस्कृत पंडित
आणि तत्त्वज्ञ
होते. तसेच सर्वोपरी ते एक परिपूर्ण मनुष्यमात्र होते. सैद्धांतिक आणि प्रायोगिक भौतिकीच्या
निरनिराळ्या क्षेत्रांतील त्यांचा सहभाग मोलाचा आहे. ते काही तथाकथित हस्तिदंती मनोर्यांत
राहणारे वैज्ञानिक नव्हते. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील; होमी भाभा आणि विक्रम
साराभाई ह्यांच्यासारख्या त्यांच्या उद्यमी (इलस्ट्रिअस) पूर्वसुरींच्या आदर्शांवर
मार्ग चालत; रामण्णांनी, भारताच्या स्वदेशी अणुसामर्थ्यास दृढ पायावर उभे करण्यात लक्षणीय
भूमिका बजावली. भारताचे ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रम घडवण्यात त्यांचा सहभाग
मोलाचा होता. वस्तुतः भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्जकांत, रामण्णा सर्वात
यशस्वी मानले जातात. त्यांचा भारताच्या शांततामय अणुस्फोटांतील सहभाग तर सर्वश्रुतच
आहे. भारतातील पहिला शांततामय अणुप्रयोग, १८ मे १९७४ रोजी, राजस्थानातील वाळवंटात करण्यात
आला होता. पुढे रामण्णांनी वर्णन केले त्यानुसार, “भारतातील अणुसंशोधनाच्या इतिहासात
पोखरणमधील प्रयोग ही एक लक्षवेधी घटना होती. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने ज्या क्षेत्रातील
प्रगतीस पूर्णत्वास नेण्याचा निर्धार केला, त्या तंत्रशास्त्रीय प्रगतीची ती सिद्धता
होती.”
रामण्णा एक कट्टर देशभक्त होते. ते सहजच परदेशात स्थायिक
होऊ शकले असते, पण विकसित देशात राहण्याच्या सुखसोयींचा त्यांनी त्याग केला आणि होमी
भाभांच्या हाकेला ओ देऊन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सशक्त स्वदेशी पाया विकसित करण्याच्या
भारतीय प्रयासात ते सहभागी झाले. देशात कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यास त्यांनी
हातभार लावला. रामण्णांना संगीतात सखोल अभिरुची होती. ते स्वतःही एक परिपूर्ण संगीतज्ञ
होते. त्यांनी संगीतावर “द स्ट्रक्चर ऑफ रागा अँड वेस्टर्न म्युझिक” ह्या नावाचे एक
पुस्तकही लिहिले आहे. बंगलोर स्कूल ऑफ म्युझिकच्या स्थापनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
त्यांना तत्त्वज्ञानातही रुची होती. योगातही स्वारस्य होते. त्यांना तरल आणि आस्वाद्य
विनोदाची जाण होती. ते अत्यंत साधे आणि सर्वांना सहज पोहोचता येण्यायोग्य व्यक्ती होते.
राजा रामण्णा एक समर्थ प्रशासक होते. त्यांनी अनेक प्रतिष्ठेची
पदे भूषवली होती. ते भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होते (१९७२-७८ आणि १९८१-८३).
ते संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार होते; डी.आर.डी.ओ. चे प्रमुख संचालक आणि
भारत सरकारचे संरक्षण संशोधन सचीवही होते (१९७८-८१). ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते
(१९८४-८७). जे.आर.डी. टाटांनी निर्माण केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड
स्टडीज, बंगलोर चे ते पहिले संचालक होते. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही
त्यांनी काम केलेले होते (जानेवारी ते नोव्हेंबर १९९०). रामण्णा राज्यसभेचे नामनिर्देशित
सदस्य होते (ऑगस्ट १९९७-ऑगस्ट २००३). पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे ते
सदस्य होते. ज्या ज्या अधिकारात त्यांनी कार्य केले, त्या त्या अधिकारात त्यांनी अभियानांच्या
उत्साहाने काम केले.
रामण्णांचा जन्म २८ जानेवारी १९२५ रोजी कर्नाटकातील
टुमकूर येथे झाला. बी.रामणा आणि रुक्मिणीअम्मा ह्या त्यांच्या पालकांबद्दल त्यांच्या
आत्मचरित्रात ते लिहितात, “माझ्या आईचा जन्म प्रभावी आणि श्रीमंत घराण्यात झाला. आठ
मुलांच्या घरातील ती सर्वात लहान मुलगी होती. तिचे वडील डिस्ट्रिक्ट जज्ज होते. त्या
काळात हे पद काही कमी महत्त्वाचे नव्हते. माझी आई एक बुद्धीमान स्त्री होती. अधाशी
वाचक होती. तिने सर्वच शेक्सपिअर आणि डिकन्सही वाचून काढलेले होते. मात्र तिचे आवडते
लेखक सर वाल्टर स्कॉट हे होते. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे तिला साहित्यात सखोल
बुडी घेणे संभव झाले होते. इंग्रजी डिक्शनरीत तिला माहीत नाही असा एकही शब्द नसावा
असेच मला वाटत असे. तिला कन्नडमध्येही तेवढीच गती होती. ती
स्वतः काव्ये रचत असे, भाषणेही देत असे, मात्र तिला कन्नड भाषेच्या मागासलेपणाविषयी
वैषम्य वाटत असे. हे सारे विचारात घेता, नेमके वर्णन करायचे तर ती अगदीच काही आधुनिक विचारांची नव्हती, ती पारंपारिक
वस्त्रे नेसत असे, ती धार्मिक होती आणि जरी ती लैंगिक संबंधांबद्दल माझ्या वडील भावंडांसोबत
बोलतही असे, तरी तिचे विचार व्हिक्टोरिअन वळणाचे असत. ती अंधश्रद्ध होती. असे असणे
हे खरे तर पूर्णतः तिच्या स्वभावाविरुद्ध होते. मात्र तिच्या परंपरांना चिकटून राहण्याच्या
वृत्तीशी ते सुसंगतच होते. नवीन प्रथा तिला अजूनही अनोळखी वाटत असत. तिला आधुनिक उपकरणांची
ओढ होती आणि ती समजतही असत. तिला विद्युत् उपकरणे दुरूस्त करता येत. घरगुती उद्दिष्टांकरता
विजेचा वापर करणारी ती म्हैसुरातील पहिली स्त्री होती. घराच्या पुनरभिकल्पनांत व मलनिस्सारण-अपवाह-प्रणालीच्या
पुनर्रचनेतही ती खुपसा वेळ घालवत असे.”
त्यांच्या वडिलांबद्दल ते लिहितात, “माझे वडील बी.रामण्णा
म्हैसूर राज्याच्या कायदासेवांत कार्यरत होते आणि त्यांनी सहृदय न्यायाधीश म्हणून नावलौकिकही
मिळवलेला होता. ते काहीसे अंतर्मुख असले तरीही समाजत मिसळत असत. खेळांबद्दल उत्साही
असत. त्यांना टेनिस खेळायला आवडे. ते चांगल्या प्रकारे बिलिअर्डस खेळत. त्यांना ब्रिजची
विशेष आवड होती. ब्रिज ते अखेरपर्यंत खेळत असत. माझी आई त्यांचेकडूनच ब्रिज खेळायला
शिकली होती. मात्र तिला त्यातील बारकावे कधीच कळले नाहीत. अनेकदा, प्रत्येक रबर नंतर
ते परस्परांवर टीकाटिप्पणीही करत असत. त्यांच्या स्वभावांतील भेदांनिरपेक्षपणे ते उत्तम
आयुष्य जगले आणि त्यांच्या मुलांच्या वाढींवरही त्यांचाच प्रभाव प्रमुख राहिला.”
पालकांव्यतिरिक्त, रामण्णा त्यांच्या एका मावशीकडूनही
फारच प्रभावित झालेले होते. त्यांच्या मावशीबद्दल ते लिहितात, “आमच्या कुटुंबात माझ्या
आयुष्यास प्रभावित करणारी आणखी एक व्यक्ती होती, माझी मावशी राजम्मा. ती तरूण वयात
विधवा झालेली होती. ती एक सुंदर युवती म्हणून ओळखली जात असे. तिचे यजमान वारल्यानंतर,
माझ्या प्रगतीशील आज्जी-आजोबांनी तिला शाळा मास्तर होण्याकरता प्रशिक्षित केले होते.
राजम्मा पुढे एका शासकीय माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक झाली. तिला तेव्हा दरमहा ५० रुपये
वेतन मिळत असे. ती एक अलौकिक कथा-कथनकार होती. मला ती अनेकदा पुराणातील आणि महाग्रंथांतील
कहाण्या सांगत असे. मागे वळून पाहता, तेच माझे सर्वोत्तम प्रशिक्षण होते असे मला वाटते.
मला माझे सर्वच मित्र राजा म्हणून ओळखतात. मावशीच्या राजम्मा ह्या नावावरूनच माझे नाव
राजा हे घेतले गेले होते, ह्याचा मला फार अभिमान वाटतो.”
राजा रामण्णा ह्यांचे सुरूवातीचे शिक्षण म्हैसूर
आणि बंगलोरमध्ये झाले. त्यांचे कुटुंब बंगलोरमध्ये स्थलांतरित झाले तेव्हा ते
बिशॉप कॉटन स्कूलमध्ये रुजू झाले. शाळा, इंग्लिश पब्लिक स्कूल सिस्टिमचा एक भाग होती.
मुळात अँग्लो-इंडियन मुलांकरताचे अनाथालय ह्या स्वरूपात ही शाळा स्थापन झालेली
होती. मात्र रामण्णा रुजू झाले तोपर्यंत ती संपूर्णपणे बदलून गेलेली होती. ती सांस्कृतिकदृष्ट्या
सर्वात वरच्या दर्जाची शाळा झाली होती. त्यांच्या शालेय जीवनाबद्दल रामण्णा
लिहितात, “ शाळेत असतांना मी अभ्यासात व्यवस्थित व्यवस्थापन करू शकलो होतो तरी, मला
मी तिथे चुकून गेल्यासारखे वाटत राही. ब्रिटिश क्रीडा विभागाने निर्धारित केलेल्या
अभ्यासक्रमातील बहुतेक अभ्यासांत मी अपेक्षित नैपूण्य गाठू शकलो नाही. मात्र,
त्यामुळे काही विशेष समस्या उभी राहिली नाही कारण, माझ्यापाशी आणखी एक आधार प्रणाली
होती - संगीत. आज हे स्पष्टपणे जाणवते की, माझ्या शालेय दिवसांतील अभिजात संगीत
अनेकांना आवडत नाही; पण त्याकरताचा माझा उत्साह मात्र मुळीच कमी झाला नाही. कारण
शाळेचे वॉर्डन कॅनॉन एल्फिक हे एक संगीतप्रेमी होते आणि माझी त्यांच्याशी मैत्री
झालेली होती. शाळेत असतांनाचे आणखीही एक शिक्षक मला आवडत होते. ते म्हणजे मॉरीस
लॅन्यॉन. अतिशय तरूण वयात भारतात आलेले ते एक मिशनरी होते. स्वार्थत्यागाच्या
भावनेने ते झपाटलेले होते. लॅन्यॉन एक उत्तम संगीतज्ञ होते. चांगले पियानोवादक
होते. सुरेख खर्जात गाणारे गायक होते. मला ह्याचे आश्चर्य वाटे की, एवढी नैपुण्ये
असूनही ते भारतात का आले? आणि मिशनरी सेवांत त्यांनी स्वतःला का झोकून दिले. मी
त्यांच्याकडे आकर्षिला गेलो. अनेक तास एकत्र पिआनो वाजवत राहिल्याचे, आणि
संगीतशास्त्रावरील त्यांची व्याख्याने ऐकत राहिल्याचे मला आठवते. बिशॉप कॉटन स्कूल
तिच्या शिस्तीकरता विख्यात होते आणि मला त्याचा खूपच लाभ झाला. बदलाच्या समस्यांना
तोंड देत असता, माझ्या शाळेने आपला उच्च दर्जा सांभाळला आणि त्याकाळच्या
निकषांनुरूप ती एक ’चांगली’ शाळा राहिली.” बिशॉप कॉटन शाळेतून माध्यमिक
अभ्यासाकरता ते सेंट जोसेफ स्कूलमध्ये गेले.
सेंट जोसेफ स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण
केल्यावर, ते तांबरम् मधील मद्रास ख्रिश्चन कॉलेजात रुजू झाले. माध्यमिक परीक्षेत
ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले. भौतिकशास्त्रातील बी.एस.सी. (ऑनर्स) पदवीकरता
निवडल्या गेलेल्या सहा मुलांत त्यांचा समावेश होत होता. तांबरम् मधील मद्रास
ख्रिश्चन कॉलेजातून भौतिकशास्त्रातील बी.एस.सी. (ऑनर्स) पदवी प्राप्त केल्यावर ते
टाटा स्कॉलर म्हणून, आण्विक भौतिकशास्त्रातील पी.एच.डी.च्या कामासाठी लंडनमधील
किंग्ज कॉलेजात गेले. १९४८ मध्ये त्यांना पी.एच.डी.ची पदवी प्राप्त झाली.
होमी जहांगीर भाभा ह्यांच्यामुळे रामण्णा खूप
प्रभावित झाले होते. १९४४ मध्ये ते पहिल्यांदा भाभा ह्यांना भेटले होते. डॉ.
अल्फ्रेड मिस्टोवस्की ह्यांनी त्यांची ओळख करून दिलेली होती. ते ट्रिनिटी
कॉलेजातील संगीत परीक्षक होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्यांना भारतातच
राहावे लागलेले होते. भाभांसोबतची पहिली भेट आठवत असता रामण्णा लिहितात, “१९४४
मध्ये एक दिवस, डॉ. मिस्टोवस्की मला म्हणाले की, एक प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक आणि
त्यांची आई हे सध्या राज्याच्या अतिथीगृहात सुट्ट्यांकरता आलेले आहेत. मी एक
विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून त्यांची भेट घेण्यास उत्सुक आहे का? ते असेही
म्हणाले की ते वैज्ञानिक संगीतातही विशेषतः मोझार्टमध्ये रुची राखतात. दररोज
संध्याकाळी ते त्यांच्या खोलीतून औपचारिक पोशाखांत ग्रामोफोन रेकॉर्डसवर संगीत
ऐकण्यासाठी बाहेर पडतात. डॉ. मिस्टोवस्की म्हणाले की, अर्थात तुम्ही त्यांना ओळखतच
असाल, त्यांचे नाव होमी भाभा आहे. भाभांसोबतची माझी भेट त्यापुढल्या माझ्या काही
वर्षांचा प्रवास निर्धारित करणार होती. भवितव्याचा विचार करत असता, माझे बालपण आणि
तारुण्य आता भूतकाळात जमा होत असल्याचे मला माहीत होते.” ही काही भाभांसोबतची
पहिली आणि अखेरची भेट ठरणार नव्हती. १९४७ मधील लंडन येथील एका भेटीत, भाभा ह्यांनी
रामण्णांना, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टी.आय.एफ.आर.) मध्ये नोकरी
देऊ केली. ही संस्था, जणू भारतातील अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाळणाच होती. भाभांनी
रामण्णांची पी.एच.डी. पूर्ण होऊ दिली. मग १ डिसेंबर १९४९ पासून रामण्णा
टी.आय.एफ.आर.मध्ये रुजू झाले. त्या दिवसांत टी.आय.एफ.आर. विकसित केली जात होती. तेथील
रामण्णांचे एक सहकारी असलेल्या बी.व्ही. श्रीकान्तन ह्यांच्या शब्दांत, “जेव्हा
रामण्णा टी.आय.एफ.आर.मध्ये रुजू झाले तेव्हा संस्था नुकतीच तिच्या ५४ केनिलवर्थ,
पेडररोड, कंबाला हिल, मुंबई ह्या पहिल्या जागेतून; याच क्लब आवारात स्थलांतरित
झालेली होती आणि इमारतीच्या बदलांची कामे पूर्ण वेगात सुरू होती. याच क्लब
आवारातील सर्व्हंटस क्वार्टर्स टी.आय.एफ.आर.मध्ये रुजू होणार्या अविवाहित
शास्त्रज्ञांकरताचे रहिवास म्हणून बदलवली जात होती. भाभांना रामण्णांची स्वारस्ये
आणि सांगीतिक सामर्थ्ये माहीत असल्यामुळे, त्या वसतीगृहातील सर्वात वरच्या म्हणजे चौथ्या
मजल्यावरील लगतच्या दोन खोल्या, त्यांनी रामण्णांना देऊ केल्या. एक स्वतः
रामण्णांकरता आणि दुसरी त्यांच्या पियानोकरता. तळ मजल्यावर रामण्णांची आण्विक
भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा झाली, जिथे त्यांनी आण्विक विदलन आणि विखुरणावर अभ्यास
सुरू केला.”
रूजू होत असतांना टी.आय.एफ.आर. बद्दलचे मत व्यक्त
करतांना रामण्णा अपल्या आत्मचरीत्रात असे लिहितात की, “संस्था पाचव्या वर्षांत वाट
चालत असतांना मी तिथे रुजू झालो आणि सुरूवातीच्या प्रशासकीय आणि आर्थिक समस्या
सोडवल्या. प्रथमतः ही प्रयोगशाळा प्रामुख्याने भाभांच्या स्वारस्याच्या वैज्ञानिक
पैलूंवरच काम करत होती. मात्र मी येईपर्यंत संस्थेचा विस्तार झालेला होता. आता
तिच्यात एका गणितीय शाळेचाही समावेश होत होता. ज्यामुळे तिला अभ्यासाचे एक प्रमुख
केंद्र म्हणून पाया सशक्त करण्यात मदत झाली. इतरांसोबतच ह्या शाळेस
डॉ.डी.डी.कोसंबी हे शिक्षक म्हणून लाभले होते, त्याचा अभिमान वाटत असे. ते केवळ विकलक
भूमितीतील तज्ञच नव्हते तर, चलनशास्त्रज्ञ (नुमिस्मॅटिस्ट), इतिहासकार,
भाषाभ्यासी, संस्कृत पंडित आणि एक प्रसन्न व्यक्तिमत्व, तसेच खवय्येही होते.
त्यांनी जर मला रस्त्यापलीकडच्या नानकिंग रेस्तरॉमध्ये नेले नसते तर, मी चीनी
अन्नपदार्थांचा, विशेषतः खेकड्यांचा आस्वाद घेण्यास कधीच शिकलो नसतो. दुसर्या
महायुद्धास तोंड फुटण्यापूर्वी भाभा भारतात परतले त्याच्या आधीपासूनच, भाभांचा
विश्वकिरण भौतिकीवरील अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात होता तरी, वैज्ञानिक
प्रशिक्षण संस्था म्हणून टी.आय.एफ.आर. ने आपला ठसा उमटवलेला नव्हता. सैद्धांतिक
भौतिकशास्त्रातील तिचे काम, भाभा व त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामामुळेच
ओळखले जात होते. इतर विषयशाखांना अजून बराच पल्ला गाठायचा बाकी होता. भाभांनी सुरू
केलेल्या प्रयोग गटाचा विशेष उल्लेख केला पाहिजे, कारण देशातील सर्वच स्वदेशी
तंत्रशास्त्रीय कामांचा तो पाया होता. ह्यातूनच पुढे भारताच्या विस्तृत अणुऊर्जा
कार्यक्रमाचा उदय झाला. ह्या कार्यांची सुरूवात अंशतः विजकविद्याशास्त्राचे प्रमुख
असलेल्या ए.एस.राव ह्यांच्यामुळे झाली, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत ह्या
कार्यक्रमाची सुरूवात केलेली होती.”
विरक्तक, अणुकेंद्रकीय आणि अणुभट्टी भौतिकशास्त्र
ह्यांसंबंधित अनेक विषयांत रामण्णांनी महत्त्वाचे योगदान दिले. ट्रॉम्बे येथील
भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर च्या भौतिकशास्त्र आणि अणुभट्टी-भौतिकशास्त्र संघटना
संघटित करण्यात रामण्णांनी प्रमुख भूमिका बजावली. भारतातील पहिली अणुसंशोधन भट्टी
अप्सरा उभारली जात असतांना; रामण्णा हे, भाभांच्या चमूतील, तरूण
अणुभट्टी-भौतिकशास्त्रज्ञ होते. ४ ऑगस्ट १९५६ रोजी ती कार्यान्वित झाली. त्याबद्दल
अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम.आर.श्रीनिवासन लिहितात की, “अणुभट्टीच्या
निरनिराळ्या पैलूंबाबत, चमूतील निरनिराळ्या कौशल्याच्या व्यक्तींनी ताबा घेतला.
लंडनमधील इंपिरिअल कॉलेज ऑफ सायन्सच्या राजा रामण्णांनी, विरक्तक प्रयोगांकरताच्या
आवश्यकता तयार केल्या. सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ असलेले के.एस.सिंघवी, हे
अणुभट्टीच्या भौतिकशास्त्रावर काम करणार्या चमूचे प्रमुख झाले. भाभांचे एक सहकारी
ए.एस.राव हे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे उभारल्या जात असलेल्या,
फुग्यांच्या साहाय्याने होत असलेल्या विश्वकिरण अभ्यासांतील विजकीय तज्ञ होते. राव
हे नियंत्रण आणि उपकरणन ह्यांच्या कामांस जबाबदार होते. एन.भानुप्रसाद हे एकूण
अणुभट्टी अभिकल्पनास, तसेच साहाय्यक उपस्करांस जबाबदार होते. रासायनिक अभियंता
असलेले होमी सेठना हे इंडियन रेअर अर्थस प्लँटसचे व्यवस्थापक होते; हे
संयंत्र तरणतलाव-अणुभट्टीच्या बांधकामास पुरवठासाखळी म्हणून काम करत असे. चमूचे एक
महत्त्वाचे सदस्य होते व्ही.टी.कृष्णन. एक जुने जाणते यांत्रिकी अभियंते, जे
महाराष्ट्रातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवत असत. त्यांनाच अणुभट्टी
इमारतीच्या बांधकामास, तसेच अणुभट्टी-हौदाच्या बांधकामास जबाबदार नेमण्यात आले.”
अप्सरा ही भारताची
पहिली अणुभट्टी. अप्सराच्या अभिकल्पन आणि बांधकामासंबंधित अभ्यासाचा एक भाग
म्हणून, रामण्णांनी विरक्तकांच्या
औष्णिकीकरण प्रक्रियेचा, अनेक विमंदक
जोडण्यांचा वापर करून (असेंबलीजमध्ये) अभ्यास केला. रामण्णा आणि त्यांच्या गटाने,
फटक्यांचा (पल्स्ड) विरक्तक स्त्रोत
वापरून, विरक्तक विसरण आणि पाणी व बेरेलियम ऑक्साईड ह्या पदार्थांतील मंदन
स्थिरांक निर्धारित केले. ह्या विमंदक जोडण्यांतून बाहेर पडणारे विरक्तक वर्णपटही (स्पेक्ट्रा)
अभ्यासले गेले. अप्सरा कार्यान्वित झाल्यावर तिच्याद्वारे, मूलभूत संशोधनाकरता प्रखर
औष्णिक विरक्तक शलाका उपलब्ध झाल्या. ह्यामुळे रामण्णांना, युरेनियम-२३५ च्या, औष्णिक-विरक्तक-प्रेरित
विदलनात उत्सर्जित होणार्या दुय्यम प्रारणांच्या प्रायोगिक तपासाचा कार्यक्रम हाती
घेण्याची कल्पना सुचली. रामण्णा आणि त्यांच्या सहकार्यांनी, सत्वर विरक्तक तसेच विदलनखंडांतून
उत्सर्जित होणार्या गॅमा किरणांची ऊर्जा आणि कोनीय वितरणे मोजली. ह्यामुळे ह्या
प्रारणांचे काळ, विदलन विरक्तकांचे अस्तित्व, विदलनखंडांची सरासरी
फिरत (स्पिन) इत्यादींबाबतची महत्त्वाची माहिती प्राप्त झाली. रामण्णा आणि त्यांच्या
सहकार्यांनी केलेल्या, औष्णिक आणि सत्वर विरक्तकांद्वारे प्रेरित विदलनांतील प्रकाश-भारित-कण-उत्सर्जनाच्या
तपासात, ह्या कणांच्या उत्सर्जनामागच्या घडामोडींबाबत महत्त्वाची जाण प्राप्त झाली.
विदलनातील विदलनखंडांचे वस्तुमान आणि भार वितरण ह्यांबाबतचा सांख्यिकीय सिद्धांत, म्हणजे रामण्णा ह्यांचे विदलन सिद्धांताप्रत केलेले योगदान आहे.
विदलनापूर्वी, दोन फुटू घातलेल्या विदलनखंडांच्या अणुकेंद्रकणांतील यदृच्छय
परस्परविनिमयाचे प्रारूपावर आधारित सिद्धांत; निम्नऊर्जा विदलनांत निरीक्षित विदलनखंडांचे
वस्तुमान आणि भार वितरण ह्यांच्या बहुतेक वैशिष्ट्यांबाबत; तसेच
विदलन होत असलेल्या अणुगर्भाच्या उत्तेजक ऊर्जेवरील त्यांच्या अवलंबित्वाबद्दल
स्पष्टीकरणे देऊ शकतो. आण्विक आणि अणुबंधन ऊर्जांचे भूमितीय समाकलन, हे रामण्णा आणि
त्यांच्या गटाचे आणखी एक अभिनव योगदान होते.
रामण्णांचे सर्वात
महत्त्वाचे योगदान म्हणजे प्रचंड मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक
मनुष्यबळाची निर्मिती होय. म्हणूनच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम.आर.श्रीनिवासन
लिहितात, “अर्ध्या शतकाहून अधिक काळ अणुऊर्जा
कार्यक्रमाशी असलेल्या त्यांच्या संबंधादरम्यान रामण्णांनी, प्रचंड
मोठ्या संख्येतील प्रशिक्षित वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळाची निर्मिती करण्यात
हातभार लावला. ह्या मनुष्यबळानेच आण्विक विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय
प्रगतीकरता नवीन आणि आव्हानात्मक समस्यांचा सामना केला. हाच त्यांचा खरा वारसा
आहे.” ह्याकरता आवश्यक ते मनुष्यबळ प्रशिक्षित
करण्यासाठी १९५७ साली, रामण्णांच्या नेतृत्वाखाली बी.ए.आर.सी.ट्रेनिंग स्कूलची स्थापना
करण्यात आली. रामण्णा आपल्या आत्मचरित्रात लिहितात, “अणुऊर्जा कार्यक्रमाचा एक पैलू, ज्याबाबत मला स्वतःला खूप
काही करायचे असे, तो म्हणजे बी.ए.आर.सी.ट्रेनिंग प्रोग्राम. आमच्या कार्यक्रमात चांगल्या प्रकारे प्रशिक्षित शास्त्रज्ञांचा
समावेश केला जावा अशी अपेक्षा होती. मी पूर्वीच म्हटल्यानुसार, उपयुक्त शास्त्रीय
प्रशिक्षण देण्यात विद्यापीठे निष्प्रभ झालेली होती; तसेच आम्हाला थेट भरती करून
विद्यापीठांतून चांगले शिक्षक काढून घ्यायचे नव्हते. अल्प संख्येतील बुद्धिमान
विद्यार्थ्यांना शिकवू शकतील असे प्रशिक्षित शिक्षक आमचेकडे मोठ्या संख्येत उपलब्ध
होते. त्यांचाच उपयोग करून घेणे हाच काय तो उपाय स्पष्ट दिसत होता. आम्हाला असे वाटले
की, परस्परविनिमयाचा फायदा केवळ विद्यार्थ्यांनाच होईल असे नाही तर अल्प संख्येतील
विद्यार्थ्यांवर शिक्षकही प्रयास केंद्रित करू शकतील आणि लाभान्वित होतील. विशेषतः
ते मोजके विद्यार्थीही असे असतील की, ज्यांनी आपली पात्रता आधीच सिद्ध केलेली आहे.
ह्या विचारांचा आधार, १९५७ मध्ये बी.ए.आर.सी.ट्रेनिंग स्कूलच्या निर्मितीप्रत घेऊन गेला. भविष्याकरताचे शास्त्रज्ञ
घडविण्याव्यतिरिक्त, ह्या स्कूलमुळे देशाबाहेरील स्थलांतरांचा प्रश्नही सुटण्यास
खूपच मदत झाली.” ट्रेनिंग स्कूल लक्षणीयरीत्या यशस्वी ठरले. बी.व्ही.श्रीकांतन लिहितात, “ट्रेनिंग स्कूलने ६,००० हून अधिक शास्त्रज्ञ आणि अभियंत्रज्ञ निर्माण केले, जे
देशाच्या निरनिराळ्या भागातील ऍटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंटच्या विविध विभागांना
मनुष्यबळ पुरवत आहेत. ह्या स्कूलचे जुने विद्यार्थी काही अणुऊर्जा तर काही अवकाश
आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत, काही संरक्षण मंत्रालयाचे सल्लागार झालेले आहेत,
काही निरनिराळ्या प्रयोगशाळांचे संचालक झालेले आहेत, भारत सरकारच्या विज्ञान
खात्याचे सचीव झालेले आहेत, टी.आय.एफ.आर.सारख्या संस्थात प्राध्यापक झालेले आहेत;
तर इतर काही उद्योगांत गेलेले आहेत, काही परदेशात चांगल्या पदांवर स्थिरावलेले
आहेत. वैज्ञानिक सक्रियतेच्या इतर क्षेत्रांतही हे यशस्वी प्रारूप राबवले असते तर,
मोठाच फरक पडला असता.”
रामण्णा प्रत्येक
स्तरावर सर्जकतेला प्रोत्साहन देत असत. विशेषतः ते तरूण शास्त्रज्ञांना
आव्हानात्मक कामे स्वीकारण्यास प्रोत्साहित करत असत. रामण्णांच्या प्रारूपानुसार
अल्पसंतुष्टता आणि मध्यमवर्गीयतेस वावच नसे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी
मिळालेले के.एस.पार्थसारथी म्हणतात, “त्यांनीच (रामण्णांनीच) बी.ए.आर.सी.मध्ये सुरू केलेल्या विभागीय पुनरीक्षण
सभांत, प्रत्येक विभागातील ज्येष्ठ कर्मचारी आपल्या कामास सादर करत. आम्ही त्या
सभांत प्राथमिकतः केवळ डॉ.रामण्णांचे आनंददायी आणि विद्वत्तापूर्ण असे
निष्कर्षात्मक अभिप्राय ऐकण्यासाठी उपस्थित राहत असू. बढाईखोर प्रतिपादनास ते
आकारात बसवीत, सत्पात्र निवेदनाचे कौतुक करत आणि आणखी अभ्यासाकरताची क्षेत्रे
सुचवित असत. त्यांचे शस्त्रक्रियात्मक विश्लेषण म्हणजे एक मेजवानीच असे. त्यांच्या
फटकळ बोलण्याचा फटका मध्यमवर्गास बसत असे. त्यांना ’सरकपट्टी
अभियांत्रिकीचा (स्लाईड रूल इंजिनिअरिंग)’
तिरस्कार वाटत असे! मौलिकत्व आणि सर्जनशीलता ह्यांचे ते भुकेले असत.”
रामण्णा ह्यांनी
देशातील अनेक संस्था उभारण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतलेला
आहे. १९८० नंतर त्यांनी इंदौर येथे प्रगत तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी पुढाकार
घेतला. हे केंद्र प्रगत त्वरक, लेसर्स (लाईट अँप्लिफिकेशन बाय
स्टिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन; उत्तेजित प्रारणोत्सर्जनाद्वारे केलेले
प्रकाश-शक्ती-वर्धन) आणि इतर संबंधित तंत्रज्ञान ह्यांच्या
विकासास वाहिलेले आहे. रामण्णांनी कोलकाता येथे ’बदलती ऊर्जा आवर्तनक केंद्र’
(व्हेरायबल एनर्जी सायक्लॉट्रॉन सेंटर, व्ही.ई.सी.सी.) स्थापण्यातही सहभाग दिला. जे.आर.डी.टाटा
ह्यांनी बंगलोर येथे स्थापन केलेल्या, राष्ट्रीय प्रगत अभ्यासाकरताच्या संस्थेचे
(नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज) ते संस्थापक-संचालक होते. आय.आय.टी.मुंबईच्या
बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे ते अध्यक्षही होते (१९७२-७८). भारतीय राष्ट्रीय विज्ञान
अकादमीचे ते अध्यक्ष होते (१९७७-७८). आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या (अडत म्हणजे
एजन्सी) संचालकांच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे ते अध्यक्ष/सदस्य होते.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा अडतीच्या १९८६ सालच्या व्हिएन्ना येथील ३०-व्या परिषदेचे
ते अध्यक्ष होते.
रामण्णा अनेक
शास्त्रीय शिक्षण संस्थांशी, तसेच विद्वत् सभांशी संबंधित होते. भारतीय विज्ञान
अकादमीचे ते उपाध्यक्ष होते (१९७७-७९). भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी, नवी
दिल्लीचे ते अध्यक्ष होते (१९७७-७८). त्यांना मिळालेल्या निरनिराळ्या
पारितोषिकांत; शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६३), पद्मविभूषण (१९७५), राष्ट्रीय
विज्ञान अकादमीचे मेघनाद साहा पदक (१९८४), आर.डी.स्मृती पारितोषिक (१९८५-८६),
आशुतोष मुखर्जी सुवर्णपदक (१९९६) इत्यादींचा समावेश होतो. त्यांना अनेक
विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी देऊन गौरविलेले होते.
संगीताप्रतीच्या
त्यांच्या प्रेमाचा उल्लेखही न करता रामण्णांच्यावरील कुठलाच लेख पूर्ण होऊ शकत
नाही. ते केवळ संगीतज्ञच होते असे नव्हे तर, स्वतः एक परिपूर्ण संगीतकारही होते.
लहान वयातच ते संगीताकडे आकर्षिले गेले. रामण्णांच्याच शब्दांत, “पाश्चात्य संगीताचा माझा निकटचा संबंध मी
सहा वर्षांचा असतांना माझ्या बदललेल्या शाळेसोबतच घडून आला. डेल्व्ही स्कूल म्हणून
ओळखली जाणारी जुनी शाळा गर्दीने भरलेला गोठाच होती. माझ्या पालकांना असे लक्षात
आले की माझ्याकरता ती योग्य ठरणार नाही. म्हणून मला गुड शेफर्ड कॉन्व्हेंटमध्ये
घालण्यात आले, जी बंगलोर शहराच्या बाहेरील बाजूस होती. ह्या कॉन्व्हेंटच्या नन्सनी
राजघराण्यातील सदस्यांना शिकवले होते आणि त्या त्याकरता ख्यातीप्राप्तही होत्या.
त्याव्यतिरिक्त ह्या शाळेचा मुख्य लाभ हा होता की, ते युरोपिअन संगीत शिकवत असत.
घरी सामान्यतः अशी भावना होती की, कर्नाटकी संगीताचा आस्वाद पुरेसा घेतला जात
असल्याने, कुणीतरी युरोपिअन संगीतही शिकावे. मग असा निर्णय घेण्यात आला की मी
प्रयत्न करावेत. म्हणून मी मग वयाच्या सहाव्या वर्षी नव्या शाळेत पिआनोचे धडे
गिरवण्यास सुरूवात केली. मला वाटते की, कॉन्व्हेंटमधील नन्स कर्तव्यदक्ष होत्या,
मात्र मी त्यांपैकी कुणाहीकडे फारसा आकर्षित झालो नाही. अपवाद फक्त एका उत्कृष्ट
ननचा. त्यांना मदर मॉरीस म्हटले जाई. युवराजपुत्र जय चामराज ह्यांना, तसेच म्हैसूर
दरबारातील सर्वच राजकन्यांनाही त्या संगीत शिकवत असत. विसाव्या शतकाच्या चौथ्या
दशकातील विख्यात व्हायोलिनिस्ट फिलोमिना
थुंबू चेट्टी ह्याही त्यांच्या विद्यार्थिनी होत्या. मदर मॉरीस संवेदनाशील शिक्षिका
होत्या, विशेषतः मुलांकरता त्या चांगल्या होत्या. त्यांनीच माझ्या आयुष्यात
संगीतास अविभाज्य स्थान मिळवून दिले.”
तत्कालीन म्हैसूरचे
महाराज कृष्णराज वोडियार हे तरूण रामण्णांच्या सांगीतिक सामर्थ्याचे मोठे प्रशंसक
होते. रामण्णांनाही त्यांच्या प्रशंसेचे कृतज्ञतापूर्वक मोल होते. ते लिहितात, “सच्चे संगीतप्रेमी असलेल्या म्हैसूर
महाराजांच्या नजरेत भरण्याचे सुदैव मला लाभले. महाराज पाश्चात्य आणि भारतीय संगीत
अशा दोन्हींचा आस्वाद घेत असत. त्यांच्या दरबारास चांगल्या वाद्यमेळाचा आधार असे.
ऑट्टो श्मिड्ट हे जर्मन गृहस्थ त्याचे संचालन करत. महाराजांनी तत्कालीन प्रथेनुसार,
अनेक कर्नाटकी आणि हिंदुस्थानी संगीतकारांना आपल्या पदरी आश्रय दिलेला होता. मी
पिआनो चांगला वाजवतो ही माहिती त्यांच्यापर्यंत निरनिराळ्या स्त्रोतांकडून
पोहोचली. मग माझ्याकरता जगमोहन पॅलेसमध्ये एक चाचणी १९३७ मध्ये आयोजित करण्यात
आली. त्या दिवशी महाराजांनी मी सादर केलेल्या नव्या रचनांचे कान देऊन श्रवण केले.
नंतर ते गप्पा करण्यास आले आणि त्यांनी मला योग्य ते मार्गदर्शन लाभते आहे ना
ह्याविषयी चौकशी केली. माझे शिक्षक युरोपिअन आणि भारतीय मुले असा भेदभाव तर करत
नाहीत ना असा प्रश्नही केला. मला भरून आले. महाराजांची बारा वर्षाच्या मुलाप्रतीची
तळमळ सच्ची होती.”
२४ सप्टेंबर २००४ रोजी मुंबई येथे हृदय बंद पडून
रामण्णांचे देहावसान झाले. आता रामण्णा हयात नाहीत. आपण भारतीयांनी त्यांच्या
स्मृतींचा आदर करायला हवा. मात्र पी.के.अय्यंगार म्हणतात त्यानुसार, “रामण्णांचा सर्वात महत्त्वाचा वारसा
म्हणजे त्यांचा बौद्धिक स्पष्टतेवरचा अविचल विश्वास, आयुष्याच्या सर्वच
क्षेत्रांतील बुद्धिप्रामाण्य आणि राष्ट्र हे विज्ञान व वैज्ञानिक विचारांच्या
आधारेच प्रगती करू शकेल ह्यावरचा अढळ विश्वास (जो त्यांना जवाहरलाल नेहरू आणि होमी
भाभा ह्यांचेकडून मिळालेला होता) आहे. त्यांच्या स्मृतीचा आदर करण्याचा उत्तम
मार्ग म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहणे नसून, त्यांच्या धोरणांप्रती आणि
मान्यतांप्रती स्वतःस पुन्हा एकदा वाहून घेणे हाच आहे.”
संदर्भ
१.
रामण्णा,
राजा, भक्तीयात्रेची वर्षेः एक आत्मचरित्र, नवी दिल्ली, व्हायकिंग,
१९९१.
२.
श्रीनिवासन,
एम.आर., विदलन ते संदलनः भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची कहाणी, नवी दिल्ली, व्हायकिंग,
२००२.
३.
सिंग,
जगजित, काही विख्यात भारतीय शास्त्रज्ञ, नवी दिल्ली, प्रकाशन विभाग, भारत सरकार.
४.
सुंदरम्,
सी.व्ही., एल.व्ही.कृष्णन आणि टी.एस.अय्यंगार, भारतातील अणुऊर्जाः ५० वर्षे, मुंबई,
अणुऊर्जा विभाग, १९९८.
५.
पार्थसारथी, के.एस., रामण्णाः
शास्त्रज्ञांतील शिरोमणी, द हिंदू, ३०
सप्टेंबर २००४.
६.
श्रीनिवासन,
एम.आर., रामण्णा आणि अणुकार्यक्रम, द हिंदू, २८ सप्टेंबर २००४.
७.
श्रीकांतन्, बी.व्ही., राजा
रामण्णाः आठवणींतील वाटेवरून, करंट सायन्स, खंड ८७, क्र.८, पृष्ठ ११५०-५१,
२००४.
८.
राव,
के.आर., रामण्णाः एक व्यक्तीगत मानवंदना, करंट सायन्स, खंड ८७, क्र.८, पृष्ठ ११५२-५४, २००४.
९.
वैज्ञानिक
संशोधनातील व्यक्तीरेखाः सन्माननीय सदस्यांचा सहभाग, खंड १, पृष्ठ ४६०-४६२, नवी दिल्ली, इंडियन
नॅशनल सायन्स ऍकॅडमी, १९९५.
१०. अय्यंगार, पी.के., रामण्णांच्या
आठवणी, द हिंदू, २५ सप्टेंबर २००४.