२०१७-०२-२८

शास्त्रज्ञ-०४: चंद्रशेखर व्यंकट रमण

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण ह्यांनी रमण प्रभावाचा शोध लावला [१]. त्याकरता त्यांना १९२९ साली सरही उपाधी मिळाली. १९३० साली त्याकरताच त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही मिळाले आणि ह्याच कार्यासाठी १९५४ साली त्यांना भारतरत्नहा सर्वोच्च सन्मानही प्रदान करण्यात आला [२]. त्या स्मृतीस उजागर करण्यासाठी, २८ फेब्रुवारी हा दिवस दरसाल विज्ञान दिवसम्हणून साजरा करावा अशी शिफारस राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संचार परिषदेने १९८६ साली केली होती. तत्कालीन भारत सरकारने तिचा स्वीकार करून आपल्या देशात १९८७ सालापासून २८ फेब्रुवारी हा दिवस दरसाल विज्ञान दिवसम्हणून साजरा करावा अशी प्रथा सुरू केली आहे. पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस २८ फेब्रुवारी १९८७ रोजी साजरा करण्यात आला.


विज्ञान दिवस साजरा करण्याचा उद्देश

१.
जनसामान्यांत विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणे,
२.
लोकांच्या दैनंदिन जीवनास समृद्ध करण्यातील विज्ञानाचा फार मोलाचा वाटा लोकांच्या नजरेस आणून देणे,
३.
मनुष्यजातीच्या उन्नयनार्थ सुरू असलेल्या विज्ञान क्षेत्रातील कार्यांची, प्रयासांची आणि श्रेयांची जनसामान्यांना ओळख करून देणे,
४.
शास्त्रविकासार्थ नवतंत्रांचा वापर करणे आणि त्यावर चर्चा घडवून आणणे,
५.

नागरिकांना विज्ञान अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन देऊन नवीन संधी उपलब्ध करून देणे.
शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी ह्या दिवशी निरनिराळ्या प्रकल्पांची प्रात्यक्षिके सादर करतात. प्रश्नमंजूषांत भाग घेतात. निरनिराळ्या संकल्पनांवरील व्याख्याने, दूरदर्शनवरील परिसंवाद, वैज्ञानिक प्रदर्शने, प्रात्यक्षिके, वादविवाद, परिचर्चा आयोजित केल्या जातात.

रमण प्रभावहा वर्णपट-दर्शन-शास्त्रातील (म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपीतील) एक आविष्कार आहे. रमण ह्यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी तो सर्वप्रथम शोधून काढला. म्हणून ह्या प्रभावास त्यांचेच नाव देण्यात आले आहे. त्यावेळी ते असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, कोलकाता येथे संशोधन कार्य करत होते.

जेव्हा प्रकाश शलाका एखाद्या धूळविरहित, पारदर्शी संयुगाच्या नमुन्यातून पार होत असते, त्या वेळी त्या संयुगातील रेणूंमुळे तिच्यातील थोडासा प्रकाश आपाती प्रकाशाच्या दिशेव्यतिरिक्त इतर दिशांतून विखुरला जात असतो. त्या विखुरलेल्या बहुतांशी प्रकाशाची तरंगलांबी, मूळ आपाती प्रकाशाच्या तरंगलांबीएवढीच असते. मात्र त्यातील थोड्याशा प्रकाशाची तरंगलांबी, मूळ आपाती प्रकाशाच्या तरंगलांबीहून वेगळी असते. तरंगलांबीत घडून येणार्‍या ह्या बदलालाच रमण प्रभाव असे संबोधले जात असते.

१९९९ सालापासून विज्ञान दिवस दरसाल एखाद्या संकल्पनेवर आधारित अशा रीतीने साजरा केला जाऊ लागला. त्यानंतरच्या वर्षांतील संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत [३].
साल संकल्पना
१९९९ आपली बदलती वसुंधरा
२००० मूलभूत विज्ञानात पुन्हा स्वारस्य निर्माण करणे
२००१ विज्ञान शिक्षणाकरता माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग
२००२ कचर्‍यातून समृद्धी
२००३ अपान-शर्करा-गर्भकाम्लाची (डी-ऑक्सी-रायबो-न्युक्लिक-आम्लाची) पन्नास वर्षे आणि नलिकाबालक (आय.व्ही.एफ.) विज्ञानाची पंचवीस वर्षे - जीवनाचा आराखडा
२००४ समाजात वैज्ञानिक जागृती करणे
२००५ भौतिकशास्त्र समारोह
२००६ आपल्या भवितव्याकरता निसर्गसंगोपन
२००७ थेंबागणिक अधिक धान्य
२००८ पृथ्वी ग्रहाचे आकलन
२००९ विज्ञानाची क्षितिजे विस्तारणे
२०१० लिंगसमानता, शाश्वत विकासाकरता विज्ञान आणि तंत्रज्ञान
२०११ दैनंदिन आयुष्यातील रसायनशास्त्र
२०१२ स्वच्छ ऊर्जा पर्याय आणि अणुकेंद्रीय सुरक्षा
२०१३ जनुकीयरीत्या परिवर्तित पिके आणि अन्नसुरक्षा
२०१४ वैज्ञानिक प्रवृत्तीची जोपासना
२०१५ राष्ट्र उभारणीकरता विज्ञान
२०१६ राष्ट्राच्या विकासाकरताचे शास्त्रीय मुद्दे
२०१७ दिव्यांग व्यक्तींकरता विज्ञान आणि तंत्रज्ञान

सर्वच व्यक्ती काही सारखीच सामर्थ्ये घेऊन जन्माला येत नाहीत. कुणी हुशार असतात. कुणी शक्तीमान असतात. कुणाला संगीतात रुची आणि गती असते तर कुणी नृत्यविशारद होतात. कुणी उत्तम वक्ते होतात तर कुणाला साहसी खेळांत स्वारस्य असते. सगळ्याच व्यक्तींना जर आपापल्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करण्याची पूर्ण संधी मिळाली तर त्या त्या व्यक्ती अत्यंत मोलाची कामगिरी करू शकतील राष्ट्राच्या उन्नतीकरता सार्यां चीच गरज असते. म्हणून सगळ्यांनाच बरोबर घेऊन चालले पाहिजे. आपले पंतप्रधान म्हणतात त्यानुसार सबका साथ, सबका विकाससाध्य झाला पाहिजे.

काही व्यक्ती अपंग असतात. हल्ली आपण त्यांना दिव्यांग व्यक्ती म्हणतो. कारण काय माहीत आहे का? ज्या व्यक्तीची एक संवेदना नाहीशी झालेली असते, ती व्यक्ती आपल्या इतर संवेदना बळकट करून ती उणीव भरून काढत असते. त्यामुळे तिचा विकास आगळ्याच दिशेने होत राहतो. ती व्यक्ती कदाचित इतरांना साध्य नसलेले कामही लीलया साध्य करू शकते. म्हणून अशा दिव्यांग व्यक्तींचा कल आणि कौशल्य कुठल्या नव्या क्षेत्रात विकसित होते आहे ते समजून घेऊन, समाजाने त्यांना जमतील त्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असते. आजच्या विज्ञानदिनी आपण किमान सर्व व्यक्तींना समान लेखण्याचा निश्चय करू या. त्यांना उणे लेखणे सोडून देऊ या. सगळे मिळून सुखांत गाठू या.

अशीच एक कहाणी आहे अरुणिमा सिन्हाची. उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा, १२ एप्रिल २०११ रोजी, लखनऊ येथून दिल्लीला जात असताना, काही गुंडांनी पद्मावती एक्स्प्रेसमधून तिला बाहेर फेकले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला. उत्तरकाशी येथील शिबिरात, टाटा स्टील ऍडव्हेंचर फाऊंडेशनशी ती जोडली गेली. तिथे, एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले. २०१२ साली, ,६२२ मीटर उंचीचे लडाखमधील छामसेर कांग्री हे उंच शिखर तिने काबीज केले. २२ मे २०१३ रोजी मंगळवारी सकाळी १०.५५ ला ८,८४८ मीटर उंचीच्या हिमालयाच्या सर्वोच्च शिखरावर ती चढून गेली. टाटा समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या इको एव्हरेस्ट मोहिमेअंतर्गत अरुणिमा, जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली अपंग महिला ठरली आहे. मग, जगातील प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याचा संकल्पही तिने सोडला. त्यांपैकी एकूण पाच शिखरेही तिने आजवर पादाक्रांत केलेली आहेत. आपले सगळ्यांचे तर दोन्ही पाय शाबूत आहेत. आपण तिच्याहूनही अधिक देदिप्यमान कर्तब करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.

पुण्याच्या जुन्नर तालुक्यात, खोडद येथे एक, भव्य मीटरतरंग प्रारण दूरदर्शक (भमीप्रादू - जी.एम.आर.टी.) बसविण्यात आलेला आहे. टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या वतीने तेथे संशोधन होत असते. तेथील प्रयोगशाळेत [४], विज्ञान दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. अवकाशातून पृथ्वीतलावर नियमितपणे येत असलेल्या मीटरतरंगांचे वेध घेणार्‍या जगभरातील मोजक्या दुर्बिणांतील ही एक दुर्बिण भारतात आणि तेही आपल्यापासून एवढ्या कमी अंतरावर आहे ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि वर्षभरात कधीतरी आपण तेथील संशोधन प्रयोगशाळेस भेटही देऊन तेथील उपस्कर समजून घेतले पाहिजेत.

संदर्भः
१.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ http://ncsm.gov.in/?p=3430
२.
टाईम्स ऑफ इंडिया दैनिकातील विज्ञान दिवसाबद्दलची माहिती http://www.indiatimes.com/…/on-national-science-day-here-s-…
३.
विकिपेडियावरील संबंधित मजकूर https://en.wikipedia.org/wiki/National_Science_Day
४.
खोडद येथील प्रयोगशाळेचे संकेतस्थळ http://www.ncra.tifr.res.in/…/o…/events/national-science-day

---------------------------------------------------------------------

भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण
जन्मः ७ नोव्हेंबर १८८८, तिरुवनकोईल, मृत्यूः २१ नोव्हेंबर १९७०, बंगळुरू
http://www.nobelprize.org/…/p…/laureates/1930/raman-bio.html
सर चंद्रशेखर व्यंकट रमण ह्यांचे अल्प चरीत्र (नोबेल परिचयातून)
भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९३०

जन्मः ७ नोव्हेंबर १८८८, तिरुचिरापल्ली,
मृत्यूः २१ नोव्हेंबर १९७०, बंगळुरू

चंद्रशेखर व्यंकट रमण ह्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी, दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे व्याख्याते होते. त्यामुळे ते सुरूवातीपासूनच शैक्षणिक वातावरणात बुडालेले होते. १९०२ साली त्यांनी मद्रास येथील प्रेसिडन्सी कॉलेजात प्रवेश घेतला. १९०४ साली ते बी.ए. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पारितोषिक म्हणून त्यांना सोन्याचे पदक प्राप्त झाले. १९०७ साली त्यांना एम.ए. पदवी प्राप्त झाली. सर्वोच्च विशेष प्राविण्यांसह. प्रकाशशास्त्र आणि ध्वनीवहनशास्त्रातील त्यांचे सुरूवातीचे प्रयोग त्यांनी विद्यार्थीदशेतच केले होते. ह्याच शास्त्रशाखांच्या तपासात त्यांनी पुढे आपले सारे आयुष्य वाहून टाकले.

त्या काळी शास्त्रीय कारकीर्दीत सर्वोत्तम संभावना दिसून येत नसल्याने, रमण १९०७ साली इंडियन फायनान्स डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. कार्यालयातील त्यांचे कामच त्यांना बहुतांश वेळ पुरत होते, तरीही, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स ऍट कोलकाता येथील प्रयोगशाळेत संशोधन करण्याची संधीही त्यांना मिळाली होती. ह्याच संस्थेचे ते १९१९ मध्ये सन्माननीय सचीव झाले.

१९१७ मध्ये त्यांना, कोलकाता विद्यापीठातील नव्यानेच प्रस्थापित पलित चेअर ऑफ फिजिक्सदेऊ करण्यात आली आणि त्यांनी तिचा स्वीकार केला. कोलकात्यात १५ वर्षे राहिल्यानंतर ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथे प्राध्यापक झाले (१९३३-१९४८). १९४८ पासून ते, त्यांनीच स्थापन केलेल्या रमण इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च, बंगळुरू येथे ते संचालक राहिले. ह्याशिवाय १९२६ मध्ये त्यांनी इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सचीही स्थापना केली होती. त्याचे सुरूवातीचे संपादकही तेच होते. इंडियन ऍकॅडेमी ऑफ सायन्सेसची स्थापनाही त्यांनीच प्रायोजित केली होती आणि सुरूवातीला त्यांनीच तिचे अध्यक्षपदही भूषविले होते. त्या ऍकॅडेमीच्या प्रोसिडिंग्जनाही त्यांनीच सुरूवात केली. त्यातच त्यांचे बहुतेक कामही प्रकाशित झाले. भारतातून करंट सायन्स प्रकाशित करणार्‍या करंट सायन्स असोसिएशन, बंगळुरूचेही ते अध्यक्ष आहेत.

रमण ह्यांच्या सुरूवातीच्या काही आठवणी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स मध्ये बुलेटिन्सच्या स्वरूपात प्रकाशित झाल्या होत्या (बुले.६ व ११, ’स्पंदांचा सांभाळ’-मेंटेनन्स ऑफ व्हायब्रेशन्स, बुले.१५, १९१८, व्हायोलिन कुटुंबातील वाद्यांच्या सिद्धांतांबाबत). १९२८ मध्ये हँडबूक डर फिजिकच्या ८व्या खंडात त्यांनी वाद्यांचा सिद्धांत लिहिला होता. १९२२ मध्ये त्यांनी प्रकाशाचे रेण्वीय विवर्तनहे त्यांचे कार्य प्रकाशित केले. त्यांच्या सहकार्‍यांसोबत केलेल्या तपासकामांच्या मालिकेतील हे पहिले होते. अंतिमतः ह्यातूनच पुढे त्यांचा २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाशित झालेला प्रारण प्रभावाचा शोधही लागला होता, ज्याला पुढे त्यांच्याच नावाने ओळखले जाऊ लागले (एक नवीन प्रारण’-’A new radiation’, इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स, २ (१९२८) ३८७). ह्या संशोधनाखातरच त्यांना पुढे १९३० सालचे भौतिकशास्त्राकरताचे नोबेल पारितोषिकही प्राप्त झाले होते.

रमण ह्यांनी केलेले इतर तपास पुढीलप्रमाणे आहेत. अधोश्राव्य (हायपरसॉनिक) आणि ऊर्ध्वश्राव्य (अल्ट्रासॉनिक) वारंवारितांच्या ध्वनीलहरींद्वारे घडवून आणलेल्या प्रकाश विवर्तनावरचे त्यांचे प्रायोगिक व सैद्धांतिक अभ्यास (प्रकाशनकाल-१९३४ ते १९४२) आणि सामान्य प्रकाशाच्या संसर्गात स्फटिकांतील अवरक्त स्पंदांवर क्ष-किरणांचे होणारे प्रभाव. १९४८ मध्ये, रमण ह्यांनी नव्या पद्धतीने स्फटिकांच्या वर्णपट वर्तनांचा अभ्यास करून स्फटिक गतीशास्त्राच्या समस्यांचा तपास केला. त्यांची प्रयोगशाळा, हिर्यांची संरचना आणि गुणधर्म ह्यांचा अभ्यास करत आहे. असंख्य प्रस्फुरक (इर्रिडिसेंट सब्स्टन्सेस- लॅब्राडोराईट, पिअर्ली फेल्स्पार, अगाटे, ओपल आणि पर्ल्स) पदार्थांची संरचना आणि प्रकाशशास्त्रीय वर्तन ह्यांबाबत कार्य करत असते.

साख्यांचे (कोलाईडस) प्रकाशशास्त्रीय वर्तन, विद्युत् आणि चुंबकीय सदीश वर्तन आणि मानवी दृष्टीचे शरीरशास्त्र ह्या विषयांतही त्यांना स्वारस्य होते.

रमण ह्यांना मोठ्या संख्येने सन्माननीय पदव्या आणि वैज्ञानिक समाजांची सदस्यत्वे प्राप्त झालेली होती त्यांच्या कारकीर्दीच्या सुरूवातीसच ते रॉयल सोसायटीचे सन्माननीय सदस्य निवडले गेले होते. १९२९ साली त्यांना सरही पदवी प्राप्त झाली होती.

हा उतारा फिजिक्स-१९२२-१९४१ह्या, ऍम्स्टरडॅम येथील, एल्सेव्हिअर पब्लिशिंग कंपनीने १९६५ साली प्रकाशित केलेल्या, ग्रंथातील नोबेल लेक्चर्सह्या पाठातून घेतलेला आहे.


हे चरीत्र पारितोषिकाचे प्रदानसमयी लिहिले गेले आहे आणि ह्याचे प्रथम प्रकाशन लेस प्रिक्स नोबेलमध्ये झालेले आहे. नंतर संपादित करून नोबेल लेक्चर्सह्या पाठात ते पुनर्प्रकाशित करण्यात आले. ह्या दस्ताचा उल्लेख करतांना, नेहमीच, वरीलप्रमाणे स्त्रोतास नमूद करावे.