२०१२-०५-२७

गीतानुवाद-०१२: तुम अगर साथ देने का


मूळ हिंदी गीतकार: साहिर, संगीत: रवी, गायक: महेंद्र कपूर
चित्रपट: हमराज, साल:१९६७, भूमिका: सुनील दत्त, मुमताज, विम्मी, राजकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०३२६


तुम अगर साथ देने का 
साथ देण्याचे जर काधृ
तुम अगर साथ देने का वादा करो
मैं यूँही मस्त नग़मे लुटाता रहूं
तुम मुझे देखकर मुस्कुराती रहो
मैं तुम्हें देखकर गीत गाता रहूँ
साथ देण्याचे जर का तू करशील कबूल
मी असाच धुंद गीतांचे गुंजन करीन
तू मला पाहुनी स्मित, करतच राहा
मी तुला पाहुनी गीत, गातच राहीन

कितने जलवे फ़िज़ाओं में बिखरे मगर
मैने अबतक किसीको पुकरा नहीं
तुमको देखा तो नज़रें ये कहने लगीं
हमको चेहरे से हटना गवारा नहीं
तुम अगर मेरी नज़रों के आगे रहो
मैं हर एक शय से नज़रें चुराता रहूँ
रूपसौंदर्य उपवनी विखुरले जरी
आजवर साद कोणाही मी ना दिली
पाहिले ग तुला मग हे नयन बोलले
रूप सोडून तुझे दूर होऊच नये
दृष्टीपुढतीच जरी तू राहशील तरी
हरक्षणी नजरानजरीस 'खो' मी देईन

मैने ख़्वाबों में बरसों तराशा जिसे
तुम वही संग--मरमर की तस्वीर हो
तुम समझो तुम्हारा मुक़द्दर हूँ मैं
मैं समझता हूं तुम मेरी तक़दीर हो
तुम अगर मुझको अपना समझने लगो
मैं बहारों की महफ़िल सजाता रहूं
स्वप्नी, वर्षानुवर्षे मी जशी तासली
तू तशीच मूर्ती संगमरवरी आहेस
तू मला मान ना भवितव्यच तुझे
मी तुला मात्र भाग्यच माझे म्हणेन
आणि तू जर समजशील आपला मला
मी बहारीच्या मैफलीस रंगत आणीन

मैं अकेला बहुत देर चलता रहा
अब सफ़र ज़िन्दगानी का कटता नहीं
जब तलक कोई रंगीं सहारा ना हो
वक़्त क़ाफ़िर जवानी का कटता नहीं
तुम अगर हमक़दम बनके चलती रहो
मैं ज़मीं पर सितारे बिछाता रहूं
एकटा मी कधीचाच चालत आहे
हा पथ जीवनाचा पण सरतच नाही
जोवरी संग रंगीत ना सोबत असे
काळ हा यौवनाचा सरतच नाही
सोबतीने माझ्या जर तू चलशील तर
मी भुईवरती तारे पसरत चलेन


२०१२-०५-०९

गीतानुवाद-०११: न मुँह छुपा के जियो


मूळ हिंदी गीत: साहीर, संगीत: रवी, गायक: महेंद्र कपूर, 
चित्रपट: हमराज, साल: १९६७, भूमिका: राजकुमार, सुनिल दत्त, मुमताज, विम्मी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००५०५२८


मुँह छुपा के जियो
मुख न लपवून जगा

धृ
मुँह छुपा के जियो, और सर झुका के जियो
गमों का दौर भी आये, तो मुस्कुरा के जियो
मुख न लपवून जगा, आणि मानही झुकू द्या
की दु: कोसळो कितीही,  तुम्ही हसून जगा

घटा मे छुप के, सितारे फना नहीं होते
अंधेरी रात के दिल में, दिये जला के जियो
की अंधारात बुडून, तारे नाहीसे होती
अंधेर्‍या रात्रीच्या हृदयी, दिवे उजाळा, जगा

ये जिंदगी किसी मंझिल पे, रुक नहीं सकती
हर एक मकाम के, आगे कदम बढा के जियो
कुणा पडावावरी, जीवन थांबू ना शकते
दरेक पडावा नंतरही, पुढे मार्ग चला

जाने कौनसा पल, मौत की अमानत हो
हरेक पल की खुशी को,  गले लगा के जियो
जाणे कोणता क्षण, मृत्यूच्या सुपूर्त असेल
क्षणोक्षणींच्या सुखांना, उरी धरून जगा


२०१२-०५-०३

आभासी उपकरणन-३

आभासी उपकरणन: संकल्पना
आजकाल निरंतर संकेत, अंकित संकेतांच्या मानाने चांगले मानले जात नाहीत. ह्याची दोन कारणे आहेत. एक तर दर्शनाचे दृष्टीने सापेक्षपृथकता, आणि दुसरं म्हणजे संस्करणसुलभता. निरंतर संकेतांची दर्शनाचे दृष्टीने सापेक्षपृथकता सीमित असते. उदाहरणार्थ: निरंतर संकेतात एकदशलक्षांश सापेक्षपृथकता मिळवण्यासाठी एक किलोमीटर लांबीची मापनपट्टी लागेल तर अंकित संकेतात तेव्हढीच सापेक्षपृथकता मिळवण्यासाठी फक्त सहा आकडी अंकित-संकेत-दर्शक पुरेसा ठरेल. अलीकडेच उपलब्ध झालेल्या दृतगती (फास्ट), कार्यक्षम (एफिशियंट) आणि यथातथ्य (अक्युरेट) संस्करण क्षमतेमुळे अंकित संकेतांचा उपयोग आणखीनच सुलभ झाला आहे. याशिवाय, आवृत्ती-जनक (फ्रिक्वेन्सी आऊटपुट) संवेदकांचा (जसे: चक्रवर्ती प्रवाह मापक- व्होर्टेक्स फ्लो मीटर) विकासही अंकित संकेतांचा पक्षधर राहीला आहे. पारंपारिक उपकरणे, मुळात सहा वेगवेगळ्या प्रकारे अधिगृहित माहितीचे प्रदर्शन वा नियंत्रण, चालकास उपलब्ध करून देतात. ते आहेत:
१. निरंतर संकेत दर्शक, अंकित संकेत दर्शक, अंकदर्शक
२. य-क्ष आरेखक, य-समय आरेखक, पट्टरूप आरेखक (स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर), गोलाकार आरेखक
३. चालू-बंद निदर्शक, मापनसीमापार लक्षवेधक (अलार्म इंडिकेटर), स्थितिनिदर्शक (स्टेटस इंडिकेटर)
४. माहितीसूची (डाटा लिस्टस), माहिती तालिका (डाटा टेबल्स)
५. उभे व आडवे दंडदर्शक (बार टाईप इंडीकेटर्स), गोलाकार हिस्सा दर्शक (पाय टाईप इंडीकेटर्स)
६. नियंत्रण खिटया (कंट्रोल नॉब्स), दाबकळा (पुश बटन्स), खटकें (स्विचेस), अविरत चक्रनियंत्रक (कंटिन्युअस रोटेटिंग नॉब्स), अंगुष्ठवर्तित चक्र (थम्ब व्हिल्स)
हे सारे प्रकार संगणकाच्या पडद्यावर सहज साकार करता येतात. म्हणून प्राय: सगळी उपकरणे संगणकावर साकारता येतात.


इथे, एक आकृतिकल्पन (कॉन्फिगरेशन) दिले आहे. यात एक सर्वसाधारण, औद्योगिक-स्वीय-संगणन-चलित पर्यवेक्षी नियंत्रण व माहिती अधिग्रहण प्रणाली दिसून येते. ३२ संवेदकांकडून प्राप्त होणारे संकेत, एका तारांतका (टर्मिनेशन) वर आणलेले आहेत. अशा चार तारांतकांना, चार वेगवेगळ्या चयनकांशी जोडलेले आहे. चार चार चयनक प्रत्येक डब्यात दाखवलेले आहेत. असे दोन डबे, ६८ तारांच्या तारगुच्छाद्वारे, एकसर जोडलेले आहेत आणि त्या तारगुच्छद्वारेच औद्योगिक-स्वीय-संगणकाशी जोडलेले आहेत. औद्योगिक-स्वीय-संगणक, वर्धित तापमानावर, अविरत चालण्याची क्षमता राखतात. ते औद्योगिक स्पंदनांसाठी अबाधित राखले जातात. धूळ आणि प्रदूषणांपासूनही मुक्त राखण्यासाठी व शीतनासाठी गाळणीवाटे वायुवीजनाची वेगळी व्यवस्था असते. एरव्ही, हे साधारण स्वीय-संगणकच असतात. आभासी उपकरणनाच्या विविध कार्यप्रणाली, संगणकाकडून चयनकाद्वारा कोणत्याही एका वेळी, आळीपाळीने एकेका वाहिनीची निवड करून, त्याद्वारे मिळणार्‍या संकेतांचे अंकन व संग्रहण करण्याची क्षमता ठेवतात.
आभासी उपकरणनाचे फायदे
रचनासहज, संस्करणसुलभ, लवचिक कार्यप्रणाली-लेखन आणि दोन्ही अक्षांमध्ये अधिगृहित अंतिम माहिती घटकापर्यंत दर्शन करविण्याची विस्तार/संकोच सुलभता, आभासी उपकरणनाची प्रमुख उपलब्धी आहे. आभासी उपकरणन, नियंत्रण कक्षांत चालकास संयंत्रस्थितीचे सम्यक दर्शन करवते, आणि अधिगृहित माहितीचे संस्करण सोपे बनवते. खुली प्रणाली अनुबंध (ओपन सिस्टिम इंटरकनेक्ट) आधुनिक विजकविद्या (इलेक्ट्रॉनिक्स) आणि उपकरणन यांचा आवश्यक गुण आहे. खुल्या विशिष्टतेमुळे निर्माता आपल्या पसंतीचे उपकरण बनवून त्यास दुसर्‍या निर्मात्यांच्या उपकरणांशी परस्परानुकूल (कॉम्पॅटिबल) राखू शकतो. उपभोक्त्याला परस्परपुरकता (कॉम्पॅटिबिलिटी) पारखण्याची गरज राहत नाही. आभासी उपकरणन खुली प्रणाली अनुबंध स्वीकारते. त्यामुळे आभासी उपकरणनात, उपभोक्ता स्वत:ला आवश्यक असलेली सामुग्री आणि कार्यप्रणाली अखंड नियंत्रण प्रणालीमध्ये वापरू शकतो. आभासी उपकरणनामध्ये चयनक (मल्टिप्लेक्सर) आणि संकेत स्थितिनिवारक (सिग्नल कंडिशनर) यांना संवेदकाजवळ ठेवतात. त्यामुळे शेकडो चलांची संकेत-माहिती एकाच तारगुच्छावर मुख्य संगणकापर्यंत आणली जाऊ शकते. परिणामत: संदेशवहन तारांचा खर्च बराच कमी होतो. याव्यतिरिक्त आभासी उपकरणनाचा आणखीही एक फायदा होऊ  शकतो. तो म्हणजे सुटसुटीत (पोर्टेबल) नियंत्रण कक्ष. मुख्य संगणक सुटसुटीत असल्याने, विविध प्रयोगांना लागणारी साधनसामग्री तयार ठेवून, प्रयोग मुख्य संगणकास आळीपाळीने जोडून आणि त्यात संबंधित कार्यप्रणाली चालवून संशोधन साधता येते. यामुळे पारंपारिक ग्राहक-उपकरणांवर होणारा विनिवेश मोठया प्रमाणावर कमी केला जाऊ शकतो.
माहिती (डाटा/इन्फॉर्मेशन)-प्रवाह चित्रनिर्भर कार्यप्रणाली लेखन
कुठल्याही सामान्य संकेत-अधिग्रहण-वाहिनीचे घटक असतात संवेदक, पारेषक, निरंतर-संकेत-अंकक आणि मुख्य संगणक. यांना पारंपारिक दृष्टीने 'घटक' (ब्लॉक्स) म्हणतात. संपूर्ण वाहिनी, घटकांच्या माहितीग्रहण समयानुरूप, यथास्थान जोडून तयार होते. अशा नकाशाला 'घटकचित्र' (ब्लॉक डायग्राम) म्हणतात. घटकचित्र बनवणे फारच सोपे असते. जर वाहिनीची कार्यप्रणाली लिहिण्याचे काम घटकचित्र लिहिण्याएव्हढे सोपे असते तर उपभोक्ते हे काम स्वत:च करू शकतील आणि त्यासाठी कुणा विशेष लेखकाची जरूर राहणार नाही. पण घटकचित्रांची कार्यप्रणाली लिहिणे केवळ विशेषज्ञांनाच शक्य असते. म्हणून घटकचित्रांचे कार्यप्रणाली-लेखन विशेषज्ञ करतात, तर घटकांपासून घटकचित्रे बनविण्याचे सोपे काम उपभोक्ते, आवश्यकतेनुसार घटकांची जोडतोड करून करतात.
माहिती-विनिमय-तारगुच्छ (इन्फॉर्मेशन एक्स्चेंज बस-माविता)
अंकित-संकेत-संस्करण सुलभ असते. सर्व पारंपारिक उपकरणे संगणक पडद्यांवर साकार होऊ शकतात. मात्र जर संकेत अधिग्रहण वा पारेषण दृतगती नसेल तरीही  आभासी उपकरणन  एक स्वप्नच राहील. आज संकेत-अधिग्रहण १ लाख एकके प्रती सेकंद आणि पारेषण १० कोटी एकके प्रती सेकंद या गतीनी होऊ शकते. म्हणून शेकडो चलांची अद्यतन स्थिती मुख्य संगणकच्या पडद्यावर एकाच वेळी उपलब्ध होते. यामुळे आभासी उपकरणन शक्य झाले आहे. त्याचे रहस्य प्रगत `माविता' आहे, ज्याच्या असण्याने दृतगती पारेषण शक्य झालेले आहे.
आभासी उपकरणन कार्यप्रणालींचा परिचय
हल्ली आभासी उपकरणनाच्या सार्‍या कार्यप्रणाली रोमन लिपीमधेच लिहिल्या जातात. म्हणून संगणन पडद्यावरील जी चित्रे इथे दर्शवलेली आहेत ती सर्व रोमन लिपीतच जशीच्या तशी ठेवलेली आहेत. पण त्याव्यतिरिक्त जे विवरण इथे दिलेले आहे ते देवनागरीत लिहिण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. लॅबव्ह्यू-६.१ (लॅबव्ह्यू-६.१-लॅबोरेटोरी व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरींग वर्कबेंच अथवा प्रयोगशालेय आभासी उपकरणन-योग्य अभियांत्रिकी कार्यमंच-६.१) हे नॅशनल इन्सट्रुमेंटस यु.एस.ए. द्वारा विकसित, उपभोक्तासुलभ, उपायोजन कार्यप्रणाली लेखन-योग्य, विकसन-पर्यावरण (डेव्हलपमेंट एन्विरॉनमेंट) आहे.
यात चित्रनिर्भर कार्यप्रणाली लेखनामुळे सामान्य उपभोक्त्यांसाठी, मापन आणि स्वयंचलन-उपायोजन-प्रणाली-लेखन, सुलभ झाले आहे. लॅबव्ह्यू, रुंद-पल्ला (वाईड रेंज) साधन-सामुग्री व कार्यप्रणालींच्या आकृतिकल्पनासठी (कॉन्फिगरेशन) रुपकसाधने (फिचर्स) उपलब्ध करून देते. लॅबव्ह्यू मध्ये बनवलेली प्राथमिक संचिका (फाईल) `आभासी उपकरण  म्हणविली जाते. तिचा विस्तार असतो .vi, उदाहरणार्थ `basic.vi' या .vi विस्ताराची संचिका लॅबव्ह्यू मध्येच उघडते.
या प्रकारच्या संचिकेचे तीन आविष्कार असतात. एक `अग्रपटल', दुसरा `घटकचित्र' व तिसरा `प्रकटनचिन्ह व संबंधन'. संचिका उघडल्यावर पहिले दोन आविष्कार संकलित व संपादित करता येतात. तिसरा आविष्कार, ही संचिका जेंव्हा दुसर्‍या संचिकेमध्ये वापरल्या जात असेल, तेंव्हा त्यात हिचे अस्तित्व दाखवण्यासाठी उपयोगात आणतात. हेच आकृती क्र.१ मध्ये दर्शवलेले आहे.


मुख्य प्रसूची पट्टी, अग्रपटल व घटकचित्र यांच्या पडद्यांवर शिरोरेखेगत राहते. यात विविध, रूपके उपलब्ध केली जातात. ज्यांमुळे प्रणालीलेखन सुलभ होते. हेच आकृती क्र.२ मध्ये दर्शविलेले आहे.

अवजार तबक, अग्रपटल व घटकचित्र या दोन्ही पडद्यांवर हजर असतं. यात दहा अवजारांची प्रकटन चिन्ह दिसतात. अवजार, मूषकसुईचे एक विशेष कार्यकारी रूप असते. सुई, निवडलेल्या अवजाराचे प्रकटन चिन्ह धारण करते. ही अवजारे अग्रपटल व घटकचित्रांच्या संपादन तसेच कार्यप्रवण करण्याच्या कामी येतात. जर स्वयं-अवजार-निवडीचा पर्याय स्वीकारलेला असेल तर सुई घटकचित्रातील कोणत्याही वस्तूवर ठेवण्याचा अवकाश, लॅबव्ह्यू आपोआप अवजार-तबकातील संबंधित अवजार उचलून घेते. हातासारखे दिसणारे पहिले अवजार पकडून मूषकाद्वारे चलांचे मूल्य बदलता येते. बाणासारखे दुसरे अवजार घटकचित्रे निवडण्यासाठी वापरतात. A सारखे तिसरे अवजार लिखित संदेशांच्या संपादनाचे कामी येते. चौथे अवजार तारेच्या वलयासारखे दिसते. आणि त्याने परस्परानुकूल घटकचित्रें जोडता येतात. याप्रकारे अन्य अवजारेही नीट समजून घेऊन वेवेगळ्या प्रकारे वापरता येतील. अवजार तबक आकृती क्र.३ मध्ये दर्शवलेले आहे.
अग्रपटलाची निर्मिती जरूरी नियंत्रक व दर्शकांना जवळ जवळ ठेवून व जोडून देवून करतात. नियंत्रक, अग्रपटलावरील एक वस्तू असते जिचेद्वारा वापरकर्ता आभासी उपकरणासोबत देवाणघेवाण करू शकतो. नियंत्रकाची सरळ उदाहरणं म्हणजे, खटके आणि लिखित संदेश. दर्शक, अग्रपटलावरील ती वस्तू आहे जी उपभोक्त्यास दर्शन करवते. उदाहरणार्थ आरेखक, तापमापक आणि अन्य दर्शक. जेंव्हा अग्रपटलावर नियंत्रक वा दर्शक ठेवतात तेंव्हा घटकचित्रावर संबंधित अंतक आपोआप दिसू लागतात. नियंत्रक तबक आकृती क्र.४ मध्ये दर्शवलेले आहे. 


प्रकार्य तबक आकृती क्र.५ मध्ये दर्शवलेले आहे. अग्रपटलावर नियंत्रक वा दर्शक ठेवल्यास घटकचित्रात त्यांचे जोड दिसू लागतात. त्या जोडांना उचित तारांनी जोडून घटकचित्र बनवले जाते. घटकचित्रावर दुसर्‍या अन्य .vi संचिका, प्रकार्यचित्रे, ढाचें, प्रकार्य तबकातून उचलून ठेवता येतात आणि त्यांनाही घटकचित्रावरील अन्य वस्तुंसोबत समुचित तारांनी जोडले जाऊ शकतं. ढाचे, प्रकार्य आणि दुसर्‍या अन्य .vi संचिका, प्रकार्य तबकावर राहणारी `केंद्रके' म्हणवतात. ही केंद्रके या तबकास प्रकार्य क्षमता देतात. एक पूर्ण घटकचित्र, प्रवाहचित्रासारखे दिसते. 


अग्रपटल निर्माण
अग्रपटल, .vi संचिकेचे उपभोक्त्याशी समन्वयन करवते. अग्रपटल नियंत्रक आणि दर्शकांपासून बनते, जी .vi संचिकेची आवागमन द्वारे असतात. नियंत्रक; खुंटया, दाबकळा आणि अन्य नियंत्रण-माहिती स्वीकार-साधनांच्या स्वरूपात असतात. दर्शक; आरेखक, प्रकाशोर्त्सजक एकदिशा-प्रवर्तक आणि अन्य दर्शन साधने असतात. नियंत्रक; .vi संचिकेच्या घटकचित्रास माहिती पुरवठा करतात. दर्शक माहिती दर्शवतात, जी घटकचित्रात स्वीकारली अथवा उपलब्ध केली जाते. प्रत्येक नियंत्रक वा दर्शकास एक स्वल्प प्रसूची असते जी त्यांच्या अंतर्गत पर्याय निवडण्याचे अथवा त्यांचे स्वरूप बदलण्याचे कामी येते. नियंत्रक वा दर्शक अग्रपटलावर ठेवताच, संबंधित जोड घटकचित्रावर दिसू लागतात.

घटकचित्र निर्माण
अग्रपटल निर्माण केल्यावर अग्रपटलावर स्थित वस्तूंचे नियंत्रण करण्यासाठी घटकचित्रावर प्रकार्य प्रकटनचित्र ठेऊन आणि जोडून प्रणाली संपन्न करता येते. नियंत्रक वा दर्शक अग्रपटलावर ठेवताच, संबंधित जोड घटकचित्रावर दिसू लागतात.


उदाहरणस्वरूप सेल्शिअस ते फ़ॅरनहीट प्रवर्तक आभासी उपकरण.

समजा आपल्याला एक .vi संचिका बनवायची आहे, जी तापमानास सेल्शिअस मध्ये स्वीकार करून फ़ॅरनहीट मध्ये परिवर्तीत करून दाखवेल. यासाठी अग्रपटल उघडा, सेल्शिअस नियंत्रक आणि फ़ॅरनहीट दर्शक त्यावर ठेवा. हेच आकृती क्र.६ मध्ये दर्शवलेले आहे. या दोन्हीचा जोड घटकचित्रा वर दिसून येतो. घटकचित्रावर प्रकार्य तबकातून एक गुणक व एक समायोजक आणून ठेवा.

 घटकचित्रावरच ह्या सर्व वस्तू आकृती क्र.७ नुसार जोडून मग अग्रपटलावर जाऊन ही प्रणाली चालवल्यास, तो नियंत्रक त्यावर लावलेला आकडा प्रक्रमित करून फ़ॅरनहीट दर्शकावर दर्शवतो. आता नियंत्रकात वेगवेगळे आकडे टाकून दर्शक ठीक दाखवतो आहे, हे पारखून घ्या. आहे न किती सोपं, एक `आभासी उपकरण' तयार करणे?
समारोप
आभासी उपकरणनाची संकल्पना, त्याचे फायदे, त्याची साधनसामग्री (हार्डवेअर), कार्यप्रणाली (सॉफ्टवेअर), माहिती-विनिमय-तारगुच्छ, या सार्‍यांचा परिचय ह्या लेखात करून दिलेला आहे. सामान्य माणसास जर आभासी उपकरणनाबाबत प्राथमिक माहिती ह्या लेखाद्वारे मिळू शकली तर त्याचे प्रयोजन सफल होईल.
--- समाप्त ---

आभासी उपकरणन-२

परिशिष्ट
इंग्रजी शब्द आणि त्यांचेकरता
'आभासी उपकरणन'
या लेखात वापरलेले मराठी प्रतिशब्द, इथे दिलेले आहेत. बव्हंश औद्योगिक शब्द, `शाब्दिका' नामक अधिकृत शब्दसंग्रहातून घेतलेल्या हिंदी प्रतिशब्दांच्या आधारे बनवलेले आहेत. इलेक्ट्रॉन = विजक यांसारखे काही शब्द मीच घडविले आहेत. त्यावर यथोचित टिप्पणी, चर्चा करावी ही विनंती.
ऍबिलिटी = क्षमता
ऍक्युरेट = यथातथ्य
अचिव्हमेंटस = श्रेये
ऍक्विझिशन = अधिग्रहण
अलार्म = लक्षवेधक
ऍनालॉग सिग्नल इंडिकेटर = निरंतर संकेत दर्शक
ऑडिओ-व्हिजुअल = दृक-श्राव्य
बार टाईप इंडिकेटर = दंडदर्शक
बियॉन्ड मेझरमेंट लिमिटस = मापनसीमापार
ब्लॉक डायग्राम = घटकचित्र
बस = तारगुच्छ
चॅनेल = वाहिनी
सर्कुलर चार्ट रेकॉर्डर = गोलाकार आरेखक
कॉम्प्लेक्स = क्लिष्ट
कॉम्पॅटिबल = परस्परानुकूल
कॉम्प्लिमेंटरी = परस्परपूरक
कॉन्सेप्ट = संकल्पना
कंडिशनर = स्थितिनिवारक
कॉन्फिगरेशन = आकृतिकल्पन
कनेक्ट = संबंधन
कनेक्शन = संबंध
कंटिन्युअस = अविरत
कंट्रोल = नियंत्रण
कंट्रोल नॉब्स = नियंत्रण खिटया
कंट्रोल पॅनेल = नियंत्रण पटल
कन्व्हिनियंट = सुलभ
कन्व्हेन्शनल = पारंपारिक
कन्व्हर्टर = प्रवर्तक
डाटा = माहिती, विदा
डाटा/इन्फॉर्मेशन लिस्ट = माहितीसूची
डाटा/इन्फॉर्मेशन टेबल = माहिती सारणी
डेव्हलपमेंट एन्हिरॉन्मेंट = विकसन-पर्यावरण
डिजिटल इंडिकेटर = अंकदर्शक
डिजिटल सिग्नल इंडिकेटर = अंकित संकेत दर्शक
डिजिटल सिग्नल = अंकित संकेत
डिजिटायझर = अंकक
इझी टू कंस्ट्रक्ट = रचनासहज, रचनासुलभ
एफिशियंट = कार्यक्षम
इलेक्ट्रॉन = विजक
इलेक्ट्रॉनिक्स = विजकविद्या, विजकशास्त्र
एक्झाक्ट = हूबेहूब
एक्सर्पट्स = झलकी
एक्श्चेंज = विनिमय
एक्स्टेंशन = विस्तार
फॅसिलिटी = सुविधा
फास्ट = दृतगती
फिचर = रुपकसाधन
फिगर = आकृती
फाईल = संचिका, कोषिका
फ्लेक्सिबल = लवचिक
फॉर्मॅट, आऊटलाईन = आकृतीबंध, रूपरेषा
फ्रिक्वेन्सी आऊटपुट = आवृती-जनक
फ्रंट पॅनेल = अग्रपटल
फन्क्शन = प्रकार्य
ग्राफिक = चित्रनिर्भर
हार्डवेअर = साहित्य
ह्यूज = अजस्त्र
आयकॉन = प्रकटनचिन्ह
इम्प्लिमेंटेशन = समायोजन
इन्कार्नेशन = अवतार
इंडिकेटर = दर्शक
इन्फॉर्मेशन = माहिती
इन्ट्रुमेंट = उपकरण
इन्ट्रुमेंटेशन = उपकरणन
इंटरकनेक्ट = अनुबंध
की-बोर्ड = कुंजीपट
मॅप = नकाशा
मेनु = प्रसूची
मेसेज कॅरिंग = संदेशवहन
माऊस = मूषक, उंदीर
मल्टिप्लेक्सर = चयनक
ओपन = खुली
पाय = गोलाकार हिस्सा
प्लॅन्ट = संयंत्र
पॉइंटर = सुई
पोर्टेबल = जंगम, सुटसुटीत
प्रेसेंटेशन = सादरीकरण
प्रेशर इंडिकेटर = दाबमापक
प्रोसेस = प्रक्रिया
प्रोसेस स्टेटस इन्फॉर्मेशन = प्रक्रिया-स्थिति-सूचना
पर्पज = प्रयोजन
पुश बटन = दाबकळ
रेंज = पट्टी, पल्ला
रिअल टाईम = यथाकाल
रिऍलिटी = तथ्य
रिझोल्युशन = सापेक्षपृथकता
रूम = कक्ष
रोटेटिंग नॉब्स = चक्रनियंत्रक
स्काडा = पनिवमा, पर्यवेक्षी नियंत्रण व माहिती अधिग्रहण
स्केल = मापनपट्टी
स्क्रिन्स = पडदे
सेन्सर = संवेदक
सिग्नल = संकेत
सिन्गल ऑपरेटर रन = एकचालकानुवर्ती
स्केच = रेखाटन
सॉफ्टवेअर = कार्यप्रणाली
स्पेशॅलिटी = खासियत
स्पेसिफिकेशन = विशिष्टता
स्टेटस इंडिकेटर= स्थितिनिदर्शक
स्टोअरेज = साठवण
स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर = पट्टरूप आरेखक
सुपर्वायझरी = पर्यवेक्षी
स्विचेस = खटकें
सिम्बॉल = चिन्ह
सिस्टिम = प्रणाली
टेप = फीत
टेम्परेचर इंडिकेटर = ताप मापक
थम्ब व्हिल = अंगुष्ठवर्तित चक्र
टूल = अवजार
ट्रॅन्समिशन = पारेषण
अन्डरस्टॅन्डिंग = आकलन
युज = वापर
युजर = उपभोक्ता, वापरदार
व्होर्टेक्स फ्लो मीटर = चक्रवर्ती प्रवाह मापक
वाईड रेंज = रुंदपट्टी
वाय-टी रेकॉर्डर = य-काल आरेखक
एक्स-वाय रेकॉर्डर = य-क्ष आरेखक
.

२०१२-०५-०२

आभासी उपकरणन-१


आभासी उपकरणन (व्हर्च्युअल इन्स्ट्रुमेंटेशन)
नरेंद्र गोळे २००५१२११ (पूर्वप्रसिद्धी मनोगत डॉट कॉम)
(डॉ.होमी भाभा विज्ञान लेख प्रतियोगिता-२००३, ह्या हिंदी विज्ञान साहित्य परिषदेच्या स्पर्धेतील, माझ्या 'उत्तेजनार्थ पारितोषक' प्राप्त लेखाचा, हा मराठी अनुवाद आहे.  ह्या मूळ प्रदीर्घ लेखाचे तीन भाग करीत आहे. पहिल्या भागात तंत्रविषयाची ओळख. दुसर्‍यात पारिभाषिक शब्द व त्यांचे अर्थ. आणि तिसर्‍या भागात कार्यप्रणालीचे उदाहरण देत आहे.)
सारांश
स्वीय-संगणनात झालेल्या क्रांतीमुळे  उपकरणन आणि नियंत्रण  हे सशक्त, गतिमान आणि परिवर्तनक्षम झाले आहे. स्वीय-संगणक-निर्भर माहिती-अधिग्रहण, एक वेगानी उदयास येणारे क्षेत्र गणले जात आहे. विशेषत: प्रक्रिया उपकरणनाच्या संदर्भात. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणारे वैज्ञानिक व अभियंते, आज स्वीय-संगणक-निर्भर, माहिती-अधिग्रहणात रुची राखतात. प्रक्रिया उपकरणनात पर्यवेक्षी नियंत्रण व माहिती-अधिग्रहण कार्यप्रणालीं (पनिवमा कार्यप्रणाली - सुपर्वायझरी कंट्रोल ऍन्ड डाटा ऍक्विझिशन - स्काडा सॉफ्टवेअर) मुळे माहितीच्या सादरीकरणाचे अनेकानेक आकृतीबंध आज उपलब्ध आहेत. ह्यापूर्वी अशाच कामासाठी अनेक उपकरणे लागत असत. जेंव्हा संवेदक (सेन्सर्स), संकेत स्थितिनिवारक (सिग्नल कंडिशनर्स), निरंतर-अंकित प्रवर्तक (अनालॉग-डिजिटल-कन्व्हर्टर्स), आणि चयनक (मल्टिप्लेक्सर्स) आजही आवश्यक असतात; तेंव्हा ग्राहक उपकरणांचे (रिसिव्हिंग इन्स्ट्रुमेंटस) काम, माहिती-अधिग्रहण-कार्यप्रणालींनी सांभाळलेले आहे. या कार्यप्रणाली, सर्व इच्छित आकृतिबंधांमध्ये अधिगृहित माहिती, यथाकाल (रिअल टाईम) सादर करू शकतात. याशिवाय, या कार्यप्रणालींना, इप्सित सर्व दृक-श्राव्य परिणाम साध्य करण्यासाठी विकसित केले जाऊ शकते.
सर्वसामान्य व्यक्तीला या तथ्यांचा पत्ताही लागला नसता. पण संयंत्रांच्या दृक-श्राव्य फितींमधून (ऑडिओ-व्हिजुअल टेप्समधून) आजकाल होत असलेल्या ओळखींमधून परिवर्तनाचा अंदाज करता येतो. पारंपारिक नियंत्रण कक्षात दिसून येणारी नियंत्रण पटले आधुनिक नियंत्रण कक्षात दिसत नाहीत. जे संयंत्र अनेक चालक मोठया प्रयासाने सांभाळत असत ते आज एकच चालक सहज सांभाळतांना दिसतो. क्रिकेट कसोटी दरम्यान जसा एकच समालोचक खेळाची सर्व माहिती दूरदर्शन वर दर्शकांना दाखवतो, ठीक त्याचप्रमाणे संयंत्र चालक, संयंत्रस्थितीची समग्र माहिती व्यवस्थापनास देऊ शकतो. ह्या परिवर्तनाचे रहस्य `आभासी उपकरणन'  आहे.
ह्या खास तंत्रज्ञानाचे स्वरूप, आम माणसापर्यंत नेण्याचा प्रयत्न, इथे केलेला आहे. ह्या लेखात आभासी उपकरणनाची संकल्पना, यातील आधारभूत संगणक सामग्री (हार्डवेअर), कार्यप्रणाली (सॉफ्टवेअर), ह्यांचा उहापोह केलेला आहे. सामान्य माणसाच्या जिज्ञासेचे समाधान होईल आणि त्याला आभासी उपकरणनाबाबत प्राथमिक माहिती मिळेल, ह्या उद्देश्याने हा लेख लिहिलेला आहे. आशा आहे की तो वाचकांना आवडेल.
परिशिष्टांत इंग्रजी शब्द आणि त्यांचेसाठी या लेखात वापरलेले मराठी प्रतिशब्द, दिलेले आहेत. बव्हंश औद्योगिक शब्द, `शाब्दिका' नामक अधिकृत शब्दसंग्रहातून घेतलेल्या हिंदी प्रतिशब्दांच्या आधारे बनवलेले आहेत. जिथे जिथे गरज भासली, तिथे तिथे या लेखातही मूळ इंग्रजी शब्द जसेच्या तसे उद्धृत केलेले आहेत. यामुळे लेखाची वाचनीयता अस्खलित जरी राहिली नाही तरी, आकलनसुलभ जरूर होईल.
उपकरणन अभियांत्रिकी: एक आधुनिक विज्ञान शाखा
उपकरणन अभियांत्रिकी ही विज्ञानाची अशी शाखा आहे जिच्यात प्रक्रिया-नियंत्रणासाठी, प्रक्रिया-स्थिति-सूचनांचे अधिग्रहण, संग्रहण, संस्करण आणि प्रक्रिया नियंत्रकासाठी आकलनसुलभ प्रस्तुती केली जाते. विद्युत अभियांत्रिकीतून उत्पन्न झालेल्या या विद्याशाखेने थोडयाच अवधीत महत्वपूर्ण स्थान प्राप्त केले आहे. विद्युत अभियांत्रिकी सगळ्यात जुन्या विद्याशाखांमधील एक आहे. पण उपकरणन अभियांत्रिकी मागील ३०-४० वर्षात उदयमान झाली आहे. उपकरण, प्रक्रिया-स्थिति-माहिती चे संवेदन करून, प्रक्रिया चालकास स्थितिशी अवगत करते. उदाहरणच द्यायचं झालं तर डॉक्टरच्या तापमापकाचे देता येईल. गोलाकार मापनपट्टीवर सुईने माप दाखवणारा दाब मापकही आपल्या ओळखीचाच आहे.
आभासी उपकरणन: उपकरणन अभियांत्रिकी चा नवा अवतार
संयंत्रांमधून विभिन्न चलांची माहिती घेण्यासाठी अशी अनेक उपकरणे लागतात. त्यांना उचित उंचीवर आकलनसुलभ आकृतीबंधात स्थापित करुन नियंत्रण पटलांची निर्मिती केली जाते. अशी अनेक नियंत्रण पटले असतात. त्यामुळे अनेक चालकांची गरज पडते. अजस्त्र आणि क्लिष्ट संयंत्रांचे नियंत्रण अनेक चालकांच्या असण्यामुळे कठीण होते. तुलनेत, एकचालकानुवर्ती संयंत्रे सहज काबूत येतात. मोठ्या संयंत्रांनाही एकचालकानुवर्ती बनवता येतं. या दृष्टीने नियंत्रण पटलांऐवजी संगणकाच्या पडद्यावर सार्‍या संयंत्राचे आकलन साकार करणार्‍या नव्या तंत्रालाच 'आभासी उपकरणन' म्हणतात. संगणाकाच्या पडद्यावर आळीपाळीने वेगवेगळ्या उपकरणांचा आभास निर्माण केला जातो. त्या त्या उपकरणांमध्ये सामान्यत: उपलब्ध असणार्‍या सर्व सोयी व नियंत्रणे आभासी उपकरणामध्येही उपलब्ध केली जातात. त्या, उपकरणांमध्ये परंपरेने असणार्‍या नियंत्रणांना, कुंजीपट अथवा मूषकाद्वारे उपलब्ध केले जाते. संगणकाच्या पडद्यावर पारंपारिक उपकरण तयार करण्याच्या आणि वापरण्याच्या संकल्पनेतूनच 'आभासी उपकरणनाचा' जन्म झालेला आहे.

२०१२-०५-०१

ऊर्जेची मूलतत्त्वे

ऊर्जा ही बहुधा विश्वाचे अंतर्बाह्य वर्णन करू शकेल अशी एक अर्थपूर्ण अभिव्यक्ती आहे. भौतिकशास्त्र व जीवशास्त्र यांसाठी ती आधारभूत आहेच, शिवाय आपल्या उद्योगसंपन्न समाजाच्या बहुतेक आविष्कारांसाठीही ती महत्त्व राखते. ऊर्जा म्हणजे दळणवळण, वातानुकूलन, शेतीसाठी लागणारी खते आणि उद्योगांना लागणारी रासायनिक उत्पादने ह्यांसाठीचे इंधनच नव्हे तर अन्न, घरबांधणी व एकूणच मानवाच्या कल्याणासाठी लागणारे इंधन होय. 

ऊर्जेने आपल्या संस्कृतीच्या विकासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. अठराव्या शतका अखेर लागलेल्या वाफेच्या इंजिनाच्या शोधाने ऊर्जेच्या अभिनव आणि मूलभूत आविष्काराची मुहूर्तमेढ रोवली, ज्यामुळे आपल्या नव्या युगातील सामाजिक-आर्थिक क्रांतीला चालना मिळाली. एक प्रत्यक्ष परिणाम म्हणजे सूतगिरण्यांचे खेड्यांतून (जिथे त्या जलप्रवाहांच्या शक्ती वापरीत) शहरांत झालेले स्थलांतर. कठीण सामाजिक परिस्थितीत उद्योगांचा जन्म झाला. वाफेच्या इंजिनाने क्रांती घडविलेले आणखी एक क्षेत्र होते दळणवळणाचे. वाफेचे इंजिन तयार करणार्‍यांच्या अनेक अनुभवांच्या परिणामस्वरूप, एक जास्त अचूक आणि वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सित मार्ग विकसित झाला, ज्यामुळे नंतर उष्णताचालिकी (thermodynamics) चे आणि व्यापक स्तरावर आधुनिक भौतिकशास्त्राचे आधार निर्माण झाले. ऊर्जेचा प्रश्न हा आज काहीसाच तांत्रिक उरलेला आहे, कारण तो सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व सर्वोपरी आपल्या जीवनशैलीतील नैतिक मूल्यांच्या आधारांवर बव्हंशी अवलंबून आहे. 

१९७३ मध्ये प्रमुख अरब तेलोत्पादक देशांनी मध्यपूर्वेतील घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वीकारलेल्या जहाल धोरणाचे परिणाम पश्चिमी देशांत पोहोचले, तेव्हा वीज कपातीने फारच उग्र स्वरूप धारण केले. त्यावेळी पहिल्यांदा अपरिवर्तनशीलतेमुळे व नंतर निव्वळ गरजेपोटी, ग्राहक समाजाचे भव्य चक्र वास्तवांत फिरायचे जरी थांबले नाही तरी ते तात्पुरते मंदावले जरूर, व काही भागात अडचणी आल्या. प्रणालीने लवकरच नवीन परिस्थितीशी जुळते घेतले, आणि बाजारांत पुन्हा भरपूर ऊर्जा उपलब्ध झाली. ती वर्षे आता भूतकाळात जमा झालेली आहेत आणि ऊर्जेबाबतची व्यस्तताही विसरल्यागत झालेली आहे. 

यानंतर, ऊर्जा-जिचे वर्णन जागतिक अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा कच्चा माल असे करता येईल- व तिच्या विविध रूपांवरील आपल्या जीवनशैलीचे संपूर्ण अवलंबित्व याबाबतची लोकांच्यात झालेली जागृती मात्र कायम राहिली. कसे का होईना, यामुळे, अतिशय स्वस्त ऊर्जा वापरणार्‍या समाजाचे चित्र (जे १९६०-१९७० या दशकाचे वैशिष्ट्य राहिले) अस्तंगत झाले, आणि एका नव्या, अगदीच सहजरीत्या नव्हे पण निश्चितपणे विकसित होणार्‍या आर्थिक परिस्थितीचे चित्र साकारू लागले, जिचे वर्णन सावकाश विकसित होणारा उपभोक्ता समाज असे करता येईल. श्रीमंत, औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्रांकरता ऊर्जोपभोगावर मर्यादा घालणे सकारात्मक प्रक्रिया ठरली. विकसनशील आणि गरीब देशांकरिता, जिथे प्रगतीला ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणावरील वाढत्या वापराच्या गरजेमुळे म्हणजेच भरपूर व स्वस्त ऊर्जा उपलब्ध असण्याअभावी बंधने पडतात, तिथे मात्र परिस्थिती अगदीच वेगळी होती व आहे. 

ऊर्जेचे अर्थकारणावरील प्रभाव जबरदस्त व दूरगामी आहेत. ऊर्जेच्या अंतिम दराबाबत, उपभोक्ते म्हणून आपल्याला पूर्ण जाणीव असते, पण त्याव्यतिरिक्त, ऊर्जास्त्रोतांचा उपयोग करून घेण्यासाठी लागणारी गुंतवणूकही विचारात घ्यावीच लागते. ऊर्जा पुरवठ्याची पुनर्रचना (उदा. तेल अतिदूरच्या प्रदेशांतून, वाढत्या सफाईच्या तंत्राने मिळविण्यासाठी लागणारी) करण्यासाठी, तेल ऊर्जेवरून आण्विक, वायुजन्य व कोळशाद्वारे मिळणार्‍या ऊर्जेकडे वापराचा कल झुकविण्यासाठी, विद्युतऊर्जेचे एकूण वापराशी असलेले प्रमाण वाढविण्यासाठी आणि आवश्यक ती सर्वंकश वितरण प्रणाली (जसे नळवाहिन्या व वीजवाहक जाळे) विकसित करण्यासाठी ह्या भांडवल गुंतवणुकीची गरज पडेल. बदलती ऊर्जापरिस्थिती आणि निम्नस्तरीय वापर यामुळे जरी परिणामकारक भांडवली गरज अपेक्षेपेक्षा खूपच कमी लागली तरी वरील आकडा भांडवलबाजारातील ऊर्जाव्यापाराचे महत्त्व पटवून देतो. 

नव्या ऊर्जास्त्रोतांस उपयोगात आणण्यासाठी बहुधा भव्य उतारा-काढणार्‍या सोयी व शक्तिसंयंत्रे लागतात, जी तयार होणार्‍या ऊर्जेचा मोठा वाटा खर्चून टाकतात. सामानाची जुळवाजुळव, जसे धातूंचे उत्खनन व प्रक्रिया करण्यासाठीही कच्च्या मालाची व ऊर्जेची गरज भासते. अणुगर्भिय ऊर्जेच्या संपूर्ण इंधनचक्रासाठी (खनिज उत्खननापासून, शुद्धीकरण, सघनीकरण, इंधननिर्मिती ते वापरलेल्या इंधनाच्या पुन:प्रक्रीयेपर्यंत) आणि प्रत्यक्ष आण्विक ऊर्जासंयंत्रासाठी लागणारी ऊर्जाच बघा ना. अशा संयंत्राची वीज-खर्च-समाधान-मुदतच ३ ते ५ वर्षांची असते, म्हणजे पहिल्या ३-४ वर्षांत अणुवीजसंयंत्राने निर्मिलेली वीज ही त्या संयंत्राच्या उभारणीदरम्यान खर्चिलेल्या वीज गुंतवणुकीपोटीच लागते.

ऊर्जा आणि सामान यांतील हे संबंध, सामानाच्या (आणि अन्नाच्या) किमतीचे ऊर्जामूल्यावरील आणि ऊर्जामूल्याचे त्यांचे किमतीवरील निकडीचे अवलंबित्व दर्शवतात. पाश्चात्य, औद्योगिकदृष्ट्या विकसित राष्ट्रे ऊर्जासंबंधी प्रश्नांच्या लाटेवर स्वार होऊ शकत असताना आणि ऊर्जेसंबंधी आर्थिक समस्यांना काबूत ठेवू शकत असताना, गरीब विकसनशील (ज्यांचे स्वतःचे ऊर्जास्त्रोत नाहीत त्या) देशांनी भविष्यातील ऊर्जा उपलब्धता व मूल्याबाबत जागृत का असावे हे यावरून समजू शकेल.

मनुष्याद्वारे ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर पर्यावरणाची हानी करतो, हा उपभोक्त्या समाजाला बाधणारा एक प्रश्न आहे. मोठ्या पारंपरिक शक्तिसंयंत्रांमध्ये, तेल, कोळसा व आण्विक स्त्रोतांद्वारे जवळपास एक तृतियांश मूलभूत ऊर्जा विजेत रूपांतरित केल्या जाते. उर्वरित दोन तृतियांश ऊर्जा संयंत्रांभोवतीच्या वातावरणांत उष्णतेच्या रूपाने सोडून दिली जाते, ज्यामुळे उष्णतेच्या प्रदूषणाचा प्रश्न उद्भवतो. नैसर्गिक पाण्याच्या अवास्तव गरम होण्याने पर्यावरणाचा तोल ढळू नये म्हणून, बहुदा शीतक मनोरे लागतात, अन संयंत्राजवळ तेच ठळकपणे दिसतात, विसंवादी वाटतात.

एक आणखी गंभीर प्रश्न असतो काही प्रकारच्या पारंपरिक शक्तिकेंद्रांमुळे उद्भवणार्‍या वातावरण प्रदूषणाचा. एका मोठ्या पण सुविहित, १ अब्ज वॅट शक्तीच्या, कोळशावर चालणार्‍या विद्युतकेंद्रास १०,००० टन कोळसा रोज लागतो, ज्यापैकी बव्हंशी कर्बद्विप्राणिलाच्या रूपांत वातावरणात जातो. आणि जवळपास ६०० टन राख व २०० टन गंधकद्विप्राणिल तयार होतो. प्रचलित कायद्यानुसार बसवाव्या लागणार्‍या गाळण्या असूनही, ह्यापैकी बराचसा भाग वातावरणात सोडतात व मोठ्या प्रदेशावर विखरून टाकतात.

आण्विक ऊर्जा भविष्यातील एक महत्त्वाची ऊर्जा असेल. जरी सध्याच ती एक महत्त्वाचा हिस्सा असली (उदा. १९८४ मध्ये युरोपिअन सामायिक विजेपैकी एक तृतियांश वीज आण्विक असायची), तरी भविष्यातील तिची भूमिका विचारमंथनासाठी खुली आहे. ऊर्जाप्रश्नाच्या ह्या विविध स्वरूपात अनुस्यूत असा एक पैलू आहे गरिबी. जगातील २५ टक्के लोक गरिबीमुळे कुपोषणाने पीडित असतात आणि जवळजवळ ५ लक्ष माणसे दरसाल भुकेने मरतात. गरिबी हे एक प्रकारचे प्रदूषण आहे जे दुःख, तिरस्कार व मरण प्रसविते. अन् गरिबी पुरेशा ऊर्जेअभावी निवारता येत नाही. जगातील गरीबांना, प्रदूषण आणि संभाव्य किरणोत्साराच्या धोक्याबाबतच्या आपल्या विद्वत्तापूर्ण वादांमध्ये विशेष स्वारस्य नसते. ह्या उणीवा नाहीश्या करता येतात किंवा क्वचितप्रसंगी खर्चिक उपायांनी त्यांचा सामना करता येतो. 

पेटसः पेट्रोलियम टन सममूल्य ऊर्जा

ह्या प्रकरणात आतापर्यंत जे अनेक प्रश्न चर्चिले वा उल्लेखिलेले आहेत ते आकृती क्र.१.१ मध्ये दर्शविलेल्या उत्क्रांतीरेषेवर सुसूत्रित केलेले आढळतील. दरडोई ऊर्जावापर जसजसा वाढत जाईल तसतसे दोघांतील चक्रवर्ती संबंधांमुळे उत्पन्नही वाढत जाते, अन् राष्ट्रे उद्यमपूर्व अवस्थेतून उद्यमी अवस्थेत विकसित होत जातात. औद्योगिक उत्क्रांतीच्या संबंधात, खालील औद्योगिक क्षमता व अवस्थांची व्याख्या करण्याची वहिवाट आहे. प्राथमिक उद्योग जसे की उत्खनन वा शेती, दुय्यम अथवा निर्मिती उद्योग, तिसर्‍या स्तरावर सेवा उद्योग आणि चवथ्या स्तरावर माहिती उपायोजक उद्योग. उद्यमी समाजात चारही अवस्थांचे मिश्रण आढळते, मात्र उद्यमोत्तर समाजाकडे जावे तसतसे सेवा व माहिती उपायोजन उद्योगच अधिक आढळतात. ह्या उद्योगांत उत्पादनाची मूल्यवृद्धी मुख्यत्वे वैज्ञानिक व तांत्रिक ज्ञानाच्या आधारे आणि कार्यक्षम सेवा चौकटीच्या आधारे करण्यात येते, म्हणून ते उद्योग मध्यम ऊर्जा उपभोगी ठरतात. ऊर्जेसंबंधात एक कळकळीचा प्रश्न हा आहे की समाज जसजसा उद्यमोत्तर अवस्थेत उत्क्रांत होईल तसतसा ऊर्जावापरावर काय फरक पडेल?

कित्येक विश्लेषक असे मानतात की काही उद्यमी देशांतील सध्याची ऊर्जेची गरज, वर्तमान राहणीमानात काहीही कमी न करता बर्‍याच प्रमाणात कमी करता येईल. जर्मन प्रजासत्ताक व स्वित्झर्लंड मध्ये दरडोई ऊर्जावापर, अमेरिकेतील दरडोई ऊर्जावापराच्या अर्धा असूनही राहणीमान ढोबळपणे तसेच आहे, ही वस्तुस्थिती वरील समजाला पुष्टी देते. तिन्ही देशांच्या वेगवेगळ्या आर्थिक आणि औद्योगिक रचनांखातर पुरेशी सूट देऊनही, हे उदाहरण असा समज पक्का करते की इच्छा व पुरेसा रस असेल तर पाश्चात्य उद्यमी देश तेथील सरासरी ऊर्जावापर बराचसा कमी करू शकतात. १९७९ पासून ऊर्जावापरांत आलेली स्थिरता किंबहुना ऊर्जावापरांत झालेली घट असे दर्शविते की ही उत्क्रांती आधीच सुरू झालेली आहे.

ऊर्जाप्रश्न आजच्या आणि भावी विश्वांतील बहुतेक पैलू, एवढेच काय आपले अस्तित्वही निर्णायकरीत्या ठरवीत राहील. गेल्या काही वर्षांत, सामान्य जनता व विशेषज्ञांनी ऊर्जाप्रश्नांचे विश्लेषण व त्यांचा उहापोह केला आहे. तसेच ऊर्जेचा प्रश्न इतरही अशा काही ज्वलंत व बदलत्या प्रश्नांसोबत उल्लेखिल्या गेला आहे, ज्यांचा मानवी समाजाला येत्या काही दशकां व शतकांमध्ये सामना करावा लागणार आहे. जसेः

१. भुकेलेल्यांचे पोषण
२. सृष्टीच्या परिसर प्रणालीचे संवर्धन
३. जगाच्या सर्व देशांतील अथवा भागांतील अन्न, संपत्ती व संधी यांच्या वितरणांतील असमतोलामुळे किंवा केवळ समाजाच्या राजकीय संस्कृतींमुळे उद्भवलेल्या सामाजिक-राजकीय अस्वस्थतेचे नियंत्रण
४. जागतिक युद्ध टाळणे
५. गेल्या तीस वर्षांतील फार मोठ्या वैद्यकीय संशोधनाच्या फलस्वरूप वृद्धांच्या संख्येत झालेली वाढ व विशेषतः: उमलत्या पिढीतील बेरोजगारी यांमुळे निर्माण होणारे मानसिक आणि सामाजिक ताण सुसह्य करणे
६. समाजांतील नव्या तंत्रशाखांचे पदार्पण व तदनुषंगिक परिणाम उदाहरणार्थ सूक्ष्म-वीजकविद्या (micro-electronics), यंत्रमानवशास्त्र, नवे दूरसंचारशास्त्र आणि माहिती प्रक्रियाशास्त्र, जीव-तंत्रशास्त्र (वंश-अभियांत्रिकीसह), नवे पदार्थ, महासागर व अवकाश यांचे दोहन (एक्सप्लोईटेशन).

मात्र ऊर्जाप्रश्न या सर्व समस्यांपासून स्वभावत:च वेगळा आहे. कारण तो आधिभौतिक दृष्टिकोनातून पाहता जास्त मूलभूत व त्याचवेळी कमी नाट्यमय आहे. ऊर्जेची परवडणार्‍या दरांत मुबलक उपलब्धता असणे ही त्याच्या सोडवणुकीसाठी आवश्यक (पण पुरेशी नाही अशी) अट आहे. सुदैवाने, ऊर्जाप्रश्न कमी तापदायक आहे कारण सृष्टीवर प्रत्यक्षात दोहनक्षम ऊर्जा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे कारण आवश्यक मोठी गुंतवणूकक्षमता आणि अद्ययावत (गेल्या काही शतकांत गोळा झालेले) तंत्रज्ञान हाताशी आहे, अथवा दृष्टिगोचर आहे.

श्रेय अव्हेरः हे प्रकरण मूलतः माझे लेखन नाही. "ऊर्जा २०००: भावी दशकातील ऊर्जास्त्रोतांचा एक आढावा [१]",  ह्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचा हा संक्षिप्त आणि स्वैर मराठी अनुवाद आहे.


संदर्भः
[१] “एनर्जी-२०००: ऍन ओव्हर्व्ह्यू ऑफ द वर्ल्ड एनर्जी रिसोर्सेस इन द डिकेडस टु कम”, हेंझ नोप्फेल, युराटोम व युरोपिअन अणुऊर्जा अडत यांच्या संयुक्त विद्यमाने, ऊर्जा संशोधन केंद्र, फ्रास्काटी (रोम), पृष्ठसंख्या: १८१, गॉर्डन आणि ब्रिच विज्ञान प्रकाशन, १९८६.