२०१२-०३-२९

नैसर्गिक आपत्ती


नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती हा नैसर्गिक धोक्याचा एक प्रभाव असतो (उदाहरणार्थ पूर, झंझावात, चक्रीवादळ, ज्वालामुखी, भूकंप, उष्णतेची लाट किंवा भूस्खलन). यामुळे आर्थिक, पर्यावरणात्मक अथवा जीवहानी होऊ शकते. प्रभावित लोकसंख्येच्या हानीप्रवणतेवर, हानी अवलंबून असते. हानी त्या लोकांच्या कणखरपणावरही अवलंबून असते. धोका जेव्हा हानीप्रवणतेस भेटतो तेव्हा आपत्ती येत असते ह्या उद्गारांत हेच तथ्य सामावलेले आहे. म्हणूनच जी क्षेत्रे हानीप्रवण नसतात तिथे, नैसर्गिक धोकाही, नैसर्गिक आपत्ती आणू शकत नाही. उदाहरणार्थ निर्जन भागात घडून आलेला तीव्र भूकंपही, आपत्ती आणू शकत नाही. यातील नैसर्गिक शब्दाबद्दल वाद आहेत, कारण माणसे त्यात समाविष्ट असल्याखेरीज एखादी घटना ही, धोका किंवा आपत्ती ठरत नाही. नैसर्गिक धोका आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यातील फरकाचे ठोस उदाहरण म्हणजे १९०६ साली सॅन फ्रँसिस्को मध्ये झालेला भूकंप ही आपत्ती होती, तर सर्वसामान्यपणे भूकंप हा धोका असतो. ह्या लेखात दखलपात्र नैसर्गिक आपत्तींची ओळख करून दिलेली आहे. नैसर्गिक आपत्तींच्या सर्वंकष यादीकरता संर्भित यादी पहावी.

अनुक्रमणिका
१. भूपृष्ठीय आपत्ती
                १.१. हिमस्खलन
                १.२. भूकंप
                १.३. ज्वालामुखी
२. भूपृष्ठ-जलीय आपत्ती
                २.१. पूर
                २.२. अपान-विस्फोट
                २.३. सुनामी
३. हवामानशास्त्रीय आपत्ती
                ३.१. हिमवादळ
                ३.२. वादळी वारे
                ३.३. अवर्षण
                ३.४. गारपीट
                ३.५. उष्णतेची लाट
                ३.६. झंझावात
४. आ
५. आरोग्य आपत्ती
                ५.१. साथीचे रोग
                ५.२. दुष्काळ
६. अवकाशीय आपत्ती
                ६.१. आघात
                ६.२. सौर वादळे
                ६.३. गॅमा किरण विस्फोट
७. आंतरराष्ट्रीय कायद्याचे संरक्षण
८. हे ही पाहा
९. संदर्भ
१०. बाह्य दुवे
१.०. भूपृष्ठीय आपत्ती
१.१. हिमस्खलन

१९१० वेलिंग्टन हिमस्खलन
१९१० रॉजर्स पास हिमस्खलन
१९५४ ब्लोन्स हिमस्खलन
१९९९ गाल्तुर हिमस्खलन
२००२ कोल्का-कार्मादोन खडक बर्फ स्खलन

१.२. भूकंप

भूकंप म्हणजे अंतर्गत भूस्तर आपापसांत आदळून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे अचानक हादरणे. स्पदनांचे परिमाण बदलू शकते. भूकंपाचा भूमिगत मूळ बिंदू ’केंद्र’ म्हणून ओळखला जातो. केंद्राच्या थे वर पृथ्वीच्या पृष्ठभागावरला बिंदू पृष्ठकेंद्र म्हणून ओळखला जातो. प्रत्यक्ष भूकंपामुळे मनुष्यजीव वा वन्यजीवांचा नाश क्वचितच होतो. मात्र भूकंपामुळे उद्‌भवणार्‍या दुय्यम घटना जशा की इमारतींचे कोसणे, आगी लागणे, सुनामी येणे आणि ज्वालामुखी भडकणे; ह्याच प्रत्यक्षात मनुष्याकरता आपत्ती ठरत असतात. यांपैकी बर्‍याच घटना; बहुधा चांगले बांधकाम, सुरक्षा प्रणाली, पूर्वसूचना आणि आपत्कालीन स्थलांतरणाचे नियोजन यांचे आधारे टाळता येण्यासारख्या असतात. भूपृष्ठीय फटींतून साखळलेल्या ऊर्जेचे विमोचन झाल्याने भूकंप घडून येत असतात. अलीकडल्या काळातील काही सर्वात लक्षणीय भूकंपांत खालील भूकंप मोडतात.

१.  २००४ साली हिंदी महासागरात झालेला भूकंप. हा नोंदवलेल्या इतिहासातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप होता. त्याचे क्षणिक परिमाण ९.१-९.३ इतके होते. ह्या भूकंपाने निर्माण झालेल्या सुनामी लाटेमुळे २,२९,००० लोकांचे प्राण गेले.
२.  २०११ साली टोहोकू येथे झालेला भूकंप आणि सुनामी. त्याचे नोंदवलेले क्षणिक परिमाण ९.१-९.३ इतके होते. भूकंप आणि सुनामी यांच्यामुळे झालेली जीवितहानी १३,००० हून अधिक होती आणि १२,००० लोक अजूनही बेपत्ता आहेत.
३.  २७ फेब्रुवारी २०१० रोजी चिलीत झालेला भूकंप आणि सुनामी. हा भूकंप ८.८ परिमाणाचा होता. यांच्यामुळे ५२५ लोकांचे जीव गेले.
४.  १२ मे २००८ रोजी चीनमधील सिच्युआनमध्ये झालेला भूकंप. ह्याचे परिमाण ७.९ होते. ह्यामुळे २७ मे २००८ पर्यंतच ६१,१५० लोक मृत्युमुखी पडलेले होते.
५.  जुलै २००६ मध्ये जावा येथे झालेल्या भूकंपानेही सुनामी लाटा उसळल्या होत्या. ह्याचे परिमाण ७.७ होते.
६.  २००५ मध्ये काश्मीरमध्ये झालेला भूकंप ७.६ ७.७ परिमाणाचा होता. ह्यामुळे पाकिस्तानातील ७९,००० लोक प्राणास मुकले होते.

१.३. ज्वालामुखी

ज्वालामुखी सर्वदूर विनाश घडवू शकतात आणि परिणामतः अनेक प्रकारे आपत्ती आणू शकतात. प्रभावांमध्ये स्वतः ज्वालामुखीच्या भडकण्यामुळे विस्फोट आणि पत्थरांच्या वर्षावाद्वारे होणारी हानी समाविष्ट असते. दुसरे म्हणजे ज्वालामुखी जागृत होत असतांना लाव्हारस निर्माण होऊ शकतो. तो ज्वालामुखीच्या तोंडातून बाहेर पडत असता, वाटेत लागतील ती बांधकामे आणि वनस्पती यांचा विनाश करत जातो. तिसरे म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर उडणारी राख, म्हणजे सामान्यतः निवलेली राख असते, जिचा ढग बनून आसपासच्या परिसरात जाड थरांत जाऊन विसावते. ही पाण्यासोबत मिसळली असता काँक्रीटसारखा घट्ट पदार्थ निर्माण होत असतो. पुरेशा प्रमाणात राख साठली असता, घरांची छप्परेही कोसळून पडतात. अगदी कमी प्रमाणातही जर ती श्वसनात आली तरी मनुष्यास हानी पोहोचते. ज्वालामुखीच्या आसपासच्या भागातील मनुष्यहानीचे मुख्य कारण तप्तढगांचे उसळते लोट असतात जे निवत असता उतारांवरून खाली घसरत येतात. असे मानले जाते की अशाच प्रवाहांमुळे पॉम्पेटीचा विनाश झाला होता. ज्वालामुखीतील चिखलाचा प्रवाह किंवा भूस्खलन यांना ’लहर’ असे संबोधले जाते. १९५३ मध्ये तांगीवाईची आपत्ती लहरीमुळेच ओढवली होती. १९८५ मध्येही अर्मेरो शहर लहरीमुळे गाडले जाऊन अशीच शोकांतिका घडून आली होती जिच्यात अंदाजे २३,००० लोक मारले गेले.

एक विशिष्ट प्रकारचा ज्वालामुखी म्हणजे अतितीव्र-ज्वालामुखी. तोबा-सर्वनाश-सिद्धांतानुसार ७० ते ७५ हजार वर्षांपूर्वी तोबा तलावानजीकच्या ज्वालामुखीच्या जागृत होण्यामुळे मानवी लोकसंख्या १०,००० पर्यंत घटली. एवढेच नाही तर ती केवळ हजार प्रजननक्षम जोडप्यांपर्यंत सीमित झाली, ज्यामुळे मानवी उत्क्रांतीत मोठाच अडथळा निर्माण झाला होता. ह्याशिवाय त्यामुळे उत्तर गोलार्धातील तीन चतुर्थांश वनस्पतीही नाहीशा झालेल्या होत्या. अतितीव्र-ज्वालामुखीपासूनचा मुख्य धोका म्हणजे त्यापासून निर्माण होणारी प्रचंड प्रमाणातील राख, जिचा अनेक वर्षेपर्यंत जगभरातील हवामान आणि तापमानावर विनाशकारी परिणाम झालेला होता.

२.० भूपृष्ठ-जलीय आपत्ती

२.१. पूर

पूर म्हणजे जलाशय भरून बाहेर वाहणारे पाणी. ह्यामुळे आसपासची जमीन बुडून जाते. पुराची युरोपिअन व्याख्या अशी आहे की सामान्यतः पाण्याखाली नसलेल्या जमिनीचे, तात्पुरते पाण्यात बुडून जाणे. प्रवाही पाण्याच्या परिभाषेत लाटेच्या अंतर्प्रवाहासही पूर असे संबोधता येईल. भरून वाहणार्‍या व अनिर्बंध होणार्‍या जलाशयांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, परिणामतः पाण्याचे नेहमीचे किनारे सोडून पाणी बाहेर पडते. तलाव अथवा जलाशयाचा आकार, ऋतूनुसार होणार्‍या पर्जन्यमान व बर्फ वितळण्यातील बदलांमुळे बदलू शकत असला तरीही; जोपर्यंत बाहेर पडणारे पाणी मानवाच्या वापरातील खेडे, शहर किंवा इतर व्याप्त क्षेत्रास धोका निर्माण करत नाही तोवर; तो पूर म्हणून फारसा महत्त्वाचा नसतो.

काही सर्वात दखलपात्र पूर

१.  विशेषतः चीनमधील हुआंग हे (पीत-नदी) नदीला नेहमीच पूर येत असतात. १९३१ च्या महापुराने ८,००,००० ते ४०,००,००० म्रूत्यू घडून आलेले होते.
२.  १९९३ चा महापूर अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक पूर होता.
३.  १९९८ च्या चीनमधील यांगत्से नदीच्या पुरांत १.४ कोटी लोक बेघर झाले.
४.  २००० च्या पुराने मोझॅम्बिकची बहुतांश भूमी तीन सप्ताहांपर्यंत पाण्याखाली बुडवली, परिणामतः हजारो मृत्यू झाले आणि अनेक वर्षांपर्यंत देश उध्वस्त होऊन राहिला.
५.  २००५ च्या मुंबईतील पुराने १०९४ लोकांचे प्राण घेतले.
६. २०१० च्या पाकीस्तानातील पुराने अनेकांची प्राणहानी करत असता, पीके आणि पायाभूत सुविधांनाही हानी पोहोचवली

उष्णकटिबंधीय प्रदेशांतील वावटळींमुळे विस्तृत प्रमाणावर पूर आणि वादळी उद्रेक घडून येत असतात, जसे कीः

१.         पूर्व पाकीस्तानात (हल्लीच्या बांगला देशात) १९७० मध्ये आलेले भोला वादळ
२.        चीनमध्ये १९७५ मध्ये आलेले टायफून नीना
३.        लुसिआनामधील न्यू-अर्लिअन्सवर २००५ साली धडकलेले कटरिना वादळ आणि
४.       ऑस्ट्रेलियावर २०११ मध्ये आलेले यासी वादळ

२.२. अपान-विस्फोट

खोल पाण्याच्या तलावातून अचानकच कर्ब-द्वि-प्राणिल वायूचे कारंजे बाहेर पडते, किंवा त्याचा स्फोट होतो, त्या घटनेस अपान-विस्फोट असे म्हटले जाते. ह्यामुळे वन्यजीव, पशुधन आणि मनुष्यप्राणी यांना गुदमरून जाण्याचा धोका संभवतो. अशा अपान-विस्फोटामुळे तलावात उसळत्या वायूमुळे सुनामी लाटाही उसळू शकतात. शास्त्रज्ञ असे समजतात की भूस्खलन, ज्वालामुखी सक्रियता किंवा स्फोट अशा अपान-विस्फोटास बत्ती देऊ शकतात. आजवर केवळ दोनच अपान-विस्फोटांचे निरीक्षण केले गेलेले आहे आणि त्यांची नोंदही ठेवली गेलेली आहे.

१.         १९८४ मध्ये कॅमेरूनमधील मोनोऊन तलावातील अपान-विस्फोटात जवळपासच्या ३७ रहिवाशांचा मृत्यू झाला.
२.        १९८६ मध्ये न्योस तलावानजीक बराच मोठा अपान-विस्फोट होऊन १,७०० ते १,८०० माणसे श्वास कोडल्याने मारली गेली.

२.३. सुनामी

समुद्रांतर्गत घडलेल्या भूकंपांमुळे सुनामी लाटा निर्माण होतात. अओ नांग येथील भूकंप, थायलंड; २००४ मधील हिंदी महासागरातील भूकंप तसेच लिटुया बे येथे घडलेल्या भूस्खलन अशांसारख्या घटनांमुळे सुनामी लाटा उद्‌भवू शकतात.

१.         २००४ मधील अओ नांग, थायलंड येथे घडून आलेली सुनामी. २००४ मधील हिंदी महासागरातील भूकंपाने निर्माण केलेली बॉक्सिंग-डे-सुनामी आणि तिथली आपत्ती.
२.        १९५३ मध्ये लिटुया बे, अलास्का येथे घडलेल्या भूस्खलनाने ओढवलेली सुनामी.
३.        २०१० मधील चिलीतील भूकंपामुळे ओढवलेली सुनामी.
४.       २६ ऑक्टोंबर २०१० रोजी सुमात्रा, इंडोनेशिया येथे ओढवलेली सुनामी.
५.       ११ मार्च २०११ रोजी फुकुशिमा, जपान येथे उसळलेली आणि प्रशांत महासागरात पसरलेली सुनामी.

३.० हवामानशास्त्रीय आपत्ती

३.१. हिमवादळे

खूप कमी तापमान, तीव्र वारे आणि प्रचंड प्रमाणातील हिमपात या स्वभावात्मक लक्षणांनी युक्त अशा तीव्र स्वरूपाच्या हिवाळी बादळांना हिमवादळे म्हणतात. हिमवादळे आणि हिमवावटळी यांतील मुख्य भेद म्हणजे वार्‍यांची तीव्रता. हिमवादळ म्हणवले जाण्याकरता हिमवावटळीतील वादळाचा वेग ३५ ताशी मैल वा त्याहून अधिक असणे, दृश्यमानता १/४ मैलांपर्यंत कमी होणे आणि ३ वा अधिक तासपर्यंत चालू राहणे ही व्यवच्छेदक लक्षणे दिसून यावी लागतात. ताज्या हिमपातापेक्षा आधीच झालेल्या हिमपातास घुसळून काढण्याकरता जमिनीवरील हिमवादळांत वेगवान वारे असावे लागतात. हिमवादळांचा स्थानिक आर्थिक व्यवहारांवर नकारात्मक प्रभाव पडत असतो आणि हिमपात क्वचित होणार्‍या भागांत त्यामुळे दृश्यमानता नाहीशी होऊ शकते.

महत्त्वाच्या हिमवादळांत खालील हिमवादळे समाविष्ट आहेत.

१.         १८८८ मधील अमेरिकेतील महा-हिमवादळ.
२.        २००८ मधील अफगाणिस्तानमधले हिमवादळ.
३.        १९४७ मधील उत्तर अमेरिकेतील हिमवादळ.
४.       १९७२ मधील इराणच्या हिमवादळात सुमारे ४,००० मृत्यू झाले. ते सतत ५ ते ७ दिवसपर्यंत सुरूच होते.

३.२. वादळी वारे

वादळे, उष्णकटिबंधीय वादळे, झंझावात आणि तुफान ही निरनिराळी नावे एकाच आविष्काराची नावे आहेत, ज्यात महासागरांवर निर्माण होणारी वादळी-उद्रेक-प्रणाली कार्यरत असते. १९७० चा भोला झंझावात, आजवरचा सर्वात विघातक झंझावात होता. अटलांटिक मधील सर्वात विघातक झंझावात, १७८० सालचा महा-झंझावात होता ज्यामुळे मार्टिनिक, सेंट इऊस्टेटिअस आणि बार्बाडोस यांचा पुरता विध्वंस झाला होता. आणखी एक दखलपात्र झंझावात कटरिनाचा होता. त्यामुळे २००५ मध्ये अमेरिकेतील आखात-किनारा उध्वस्त झाला.
३.३. अवर्षण

इतिहासात सर्वविख्यात असलेल्या अवर्षणांत खालील अवर्षणांचा समावेश होतो.

१.         १९०० सालचे भारतातील अवर्षण, ज्यात अडीच ते साडेतीन कोटी लोक मृत्युमुखी पडले.
२.        १९२१-२२ चे सोव्हिएत युनियन मधील अवर्षण, ज्यात ५० लाख लोक उपासमारीने नाहीसे झाले.
३.        १९२८-३० चे वायव्य चीनमधील अवर्षण, ज्यात दुष्काळ पडून ३० लाख लोक मारले गेले.
४.       १९३६ आणि १९४१ चे चीनमधील सिच्युआन प्रांतातले अवर्षण, ज्यात अनुक्रमे ५० लाख आणि २५ लाख लोक गेले.
५.       २००६ पर्यंत पाच ते दहा वर्षांच्या कालावधीत झालेली, दक्षिण ऑस्ट्रेलिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया, न्यू-साऊथ-वेल्स, उत्तरी क्षेत्र आणि क्विन्सलँड या ऑस्ट्रेलियन राज्यांचा समावेश असलेली अवर्षणे. दुष्काळाने प्रथमच यावेळी शहरी भागास प्रभावित करण्यास सुरूवात केली. देशाच्या बहुतेक भागात पाण्याचा तुटवडा होता.
६.        २००६ मधील चीनच्या सिच्युआन प्रांतातले अवर्षण. अलीकडील काळातील चीनमधील हा सर्वात वाईट दुष्काळ होता. यात जवळपास ८० लाख माणसे आणि ७० लाख गुरे यांना पाण्याचा तुटवडा जाणवला होता.

३.४. गारपीट

पाण्याचे थेंब साखळून बर्फाचे गोळे होतात आणि त्यांचा वर्षाव होतो. विशेष विध्वंस घडवणार्‍या एका गारपीटीने म्युनिक, जर्मनी येथे १२ जुलै १९८४ रोजी प्रचंड विध्वंस घडवला होता. ज्याकरता २ अब्ज डॉलर्सचे विम्याचे दावे उद्‌भवले.

३.५. उष्णतेची लाट

अलीकडील इतिहासातील सर्वात वाईट उष्णतेची लाट ही २००३ ची युरोपातील उष्णतेची लाट होय.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथल्या उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटेमुळे २००९ मध्ये वणवे पेटले. मेलबोर्नमध्ये सतत तीन दिवसपर्यंत तापमान ४०°से हून जास्त राहिले. सामुहिकरीत्या ब्लॅक सॅटर्डे म्हणून ओळखले गेलेल्या ह्या वणव्यांचे कारण अंशतः विध्वंसकांची कृत्ये होती.

२०१० मध्ये उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यात आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे २,००० हून जास्त लोक मारले गेले. हिच्यामुळे शेकडो आगी लागल्या, सर्वदूर वायू-प्रदूषण झाले आणि हजारो वर्ग-मैलांवरील जंगले जळून गेली

३.६.  झंझावात

झंझावात (जो बहुधा चक्रीवादळ अथवा चुकीने वादळ म्हणूनही संबोधला जातो) हा हिंसक, धोकादायक, चक्राकार फिरत येणारा हवेचा स्तंभ असतो जो, जमिनीचा पृष्ठभाग आणि कुलोनिंबस ढग या दोघांशीही संपर्कात असतो. क्वचित कुलमस ढगाच्या तळाशीही जोडलेला असतो. झंझावात अनेक आकार आणि आकारमानांत प्रकट होत असतो. मात्र प्रातिनिधिकरीत्या दृश्यमान संघनन नसराळ्याच्या स्वरूपात दिसत असतो, ज्याचा अरुंद भाग पृथ्वीच्या संपर्कात असतो आणि कचरा व धूळ यांनी वेढलेला असतो. बहुतेक झंझावातांत वार्‍याचा वेग ताशी ११० मैल (ताशी १७७ किलोमीटर) हून कमी असतो, त्यांचा व्यास सुमारे २५० फुटांपर्यंत (८० मीटरपर्यंत) असतो आणि नामशेष होण्यापूर्वी ते अनेक मैल चालून जात असतात. सर्वाधिक गतीमान झंझावात, ताशी ३०० मैलांहून (४८० किलोमीटरहून) अधिक वेग गाठतात, दोन मैल (३ किलोमीटर) व्यासापर्यंत वाढतात आणि जमिनीवर १०० किलोमीटरपर्यंत चालूनही जातात.



४.० आग

वणवे ह्या वन जमिनींवर पेटणार्‍या अनियंत्रित आगी असतात. सर्वसामान्य कारणे असतात वीज पडणे आणि दुष्काळ, पण मानवी निष्काळजीपणा आणि दंगली ह्याही वणवे पेटण्यास कारण ठरत असतात. त्यांच्यामुळे ग्रामीण जीवनास तसेच वन्य जीवांस धोका संभवतो.

दखलपात्र वणव्यांची प्रकरणे म्हणजे १८७१ मधील अमेरिकेतील पेष्टिगो-आग, ज्यात किमान १,७०० लोक मारले गेले; आणि २००९ सालचा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन वणवा.

५.० आरोग्य आपत्ती

५.१. साथीचे रोग

संसर्गजन्य रोगांची साथ मानवी वस्तीतून झपाट्याने पसरते. साथ जगभरही पसरू शकते. इतिहासात साथीचे रोग पसरण्याचे अनेक दाखले आहेत. ब्लॅक डेथ हे एक उदाहरण आहे. गेल्या शंभर वर्षांत जगभर पसरलेल्या महत्त्वाच्या साथीत खाली दिलेल्या साथी समाविष्ट आहेत.

१. १९१८ साली उद्‍भवलेली स्पॅनिश फ्ल्यूची साथ. हिच्यात जगभरात अंदाजे ५ कोटी लोक मारले गेले.
२. १९५७-५८ साली उद्‍भवलेली आशियन फ्ल्यू ची साथ. हिच्यात अंदाजे १० लाख लोक मारले गेले.
३. १९६८-६९ सालची हाँगकाँग फ्ल्यू ची साथ.
४. २००२-२००३ ची सार्स ची साथ.
५.  १९५९ पासून सुरू झालेली एडसची साथ.
६.  २००९-२०१० सालची स्वाईन फ्ल्यू ची साथ.

इतर रोग जे मंद गतीने पसरतात पण तरीही जागतिक आरोग्याचे दृष्टीने जागतिक-आरोग्य-संस्थेने आणीबाणीचे मानलेले आहेत ते म्हणजेः

१.         औषधांना दाद न देणारा क्षयाचा एक प्रकार. एक्स.डी.आर.क्षय.
२.        मलेरिया. जो दरसाल अंदाजे १६ लाख प्राण घेत असतो.
३.        एबोला रक्तस्त्रावी ताप. ज्याने अनेक उद्रेकांत आफ्रिकेत शेकडो जीव घेतले आहेत.

५.२. दुष्काळ

अलीकडील काळात आफ्रिकेतील सहारा भागात सर्वात कडक दुष्काळ पडलेला होता. तरीही, २०व्या शतकातील आशियन दुष्काळाने मारल्या गेलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा, आधुनिक दुष्काळांतील मारल्या गेलेल्या लोकांची संख्या खूपच कमी असते.

६.० अवकाशीय आपत्ती

६.१. आघाती घटना

१९०८ च्या जून मध्ये घडलेली तुंगुस्का घटना आधुनिक काळातील सर्वात मोठी आघाती घटना होती.

६.२. सौर वादळे

सौर वादळ हा असा आविष्कार असतो ज्यात सूर्य अचानकच मोठ्या प्रमाणात सौर प्रारणे मुक्त करतो. नेहमीपेक्षा खूपच मोठ्या प्रमाणात. काही ज्ञात सौर वादळांत खालील सौरवादळे समाविष्ट आहेत.

१.         १६ ऑगस्ट १९८९ ची एक्स-२० घटना
२.        २ एप्रिल २००१ ची यासारखीच घटना.
३.        आजवर नोंद झालेल्यांपैकी सर्वात शक्तिशाली सौरवादळ ४ नोव्हेंबर २००३ चे होते. अंदाजित एक्स-४० ते एक्स-४५ दरम्यानचे.
४.       गेल्या ५०० वर्षांतील सर्वात शक्तिशाली सौरवादळ सप्टेंबर १८५९ मध्ये घडल्याचे मानले जाते.

६.३. गॅमा किरण विस्फोट

गॅमा किरण विस्फोट हे विश्वात घडून येणारे शक्तिशाली विस्फोट असतात. त्यात प्रचंड प्रमाणात ऊर्जा लघुसेकंद ते दहा सेकंद कालावधीत विमोचित होत असते. सूर्याने आयुष्यभरात द्यावी तितकी किंबहुना त्याहूनही अधिक ऊर्जा ते देत असतात. गॅमा किरण विस्फोट ह्या काही क्वचित घडणार्‍या घटना नसतात, कारण अशा घटना जवळजवळ दररोज एक घडत असतात आणि पृथ्वीवरील व अवकाशातील दुर्बिणींनी संवेदल्या जातच असतात. बहुधा सूर्याहून मोठ्या तार्‍यांची मोठी वस्तुमाने गॅमा किरण विस्फोट निर्माण करू शकतात. ८,००० प्रकाशवर्षांहून कमी अंतरांवर घडलेले गॅमा किरण विस्फोट पृथ्वीवरील जीवनाकरता काळजीचे कारण ठरू शकतात. मुख्यतः वुल्फ-रायेत तारे डब्ल्यू.आर.-१०४ गॅमा किरण विस्फोट निर्माण करू शकतात. अवकाश शास्त्रज्ञ असे मानतात की, पृथ्वीवरील दुसर्‍या क्रमांकाच्या मानल्या जाणार्‍या, सुमारे अर्धा अब्ज वर्षांपूर्वी घडून आलेल्या सृष्टीवरील प्रचंड प्रमाणातील जीवहानीचे (ओर्डोव्हिसिअन-सिलुरिअन-एक्सटिन्क्शन, यात सुमारे ४९% समुद्री सजीवांच्या जाती नाहीशा झाल्या) कारण, गॅमा किरण विस्फोट हेच असावे.

नैसर्गिक आपत्ती

भारतात निरनिराळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. देशाच्या निरनिराळ्या भागात घडून येणार्‍या नैसर्गिक आपत्तींचे काही प्रकार खाली दिलेले आहेत.

अवर्षण

अवर्षण हे बहुधा वाळवंटविस्ताराचे पर्यवसान असते. मग तो वाळवंटविस्तार अभूतपूर्व जमिनीच्या क्षरणामुळे असो, प्रचंड प्रमाणातील निर्वनीकरणामुळे असो किंवा अचानकच घडून आलेल्या ऋतुमानातील फरकाने वाढलेल्या तापमानाने किंवा घटलेल्या पर्जन्यमानाने असो. अंतिमतः यामुळे भूजल पातळीत घट होते आणि पाण्याच्या अभावामुळे जमिनीचा कस कमी होतो. भारतीय शेती बव्हंशी पावसावर अवलंबून असल्यामुळे, देशाच्या निरनिराळ्या भागात अवर्षण घडून येण्याचे प्रकार सामान्यपणे होतच असतात.

पूर

विशेषतः पावसाळ्यात जेव्हा नद्यांच्या पाणलोटक्षेत्रांत भरपूर पाऊस पडतो तेव्हा, धरण बांधलेले नसल्यास, नद्यांना पूर येतात. अवर्षणाप्रमाणेच देशाच्या निरनिराळ्या भागात पूर येण्याचे प्रकारही सामान्यपणे होतच असतात.

भूकंप

देशातील भूपृष्ठशास्त्रीय स्तर गोंडवाना भू-भागात समाविष्ट आहे; जो तुलनेने नवीन आहे आणि अस्थिर भूपृष्ठशास्त्रीय निर्मिती आहे. देशाचे इतरही नेक भाग आहेत जे भूकंप-प्रवण आहेत. जर इतिहासातील संदर्भ पाहिले तर देशाचे कंबरडेच मोडणारे अनेक भीषण भूकंप झालेले आढळून येतात. अगदी अलीकडील भूकंप गुजरातमधील भुज येथे झाला होता. तुलनेने तरूण भूपृष्ठशास्त्रीय निर्मितीत मोडत असलेल्या भव्य हिमालयन पर्वतराशी अजूनही परिवर्तन-प्रक्रियेत असल्यामुळे हिमालयाच्या गढवाल क्षेत्रात बांधले जात असलेले टिहरी धरण एक मोठा धोका ठरत आहे.

वादळे

वातावरणातील कमी दाब आणि वारंवार निर्माण होणार्‍या वावटळी व भोवरे भारताच्या पूर्व किनार्‍यावर नेहमीच घडत असतात. बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्यात हे कमी दाबाचे भोवरे निर्माण होत असतात. मग ते आंध्रप्रदेश आणि ओरिसाच्या किनारपट्टीवर प्रेषित होत असतात. अलीकडले ओरिसामधील प्रचंड चक्रीवादळ १९९९ मध्ये झालेले होते. त्यात २५,००० लोकांचे प्राण गेले. हजार अब्ज डॉलर्सची संपत्ती त्यात नाहीशी झाली आणि लाखो लोक रोजगारास मुकले. सामान्य माणसांच्या उपजीविकेची सुरक्षितताही गंभीरपणे धोक्यात आली.

उष्णतेच्या लाटा

अलीकडील काळात भारत नव्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींनी भरडला जात आहे. उदाहरणार्थ पूर्व किनार्‍यावर वाहणार्‍या उष्ण लाटा; उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, गुजराथ, ओरिसा आणि आंध्र प्रदेश यांसारख्या उत्तर आणि पूर्व भारतीय भागांत; हजारो जीव घेतात. उष्ण हवेच्या लाटांना उष्माघात म्हणतात, जो आपल्या देशात सामान्यपणे होत असतो. एकट्या ओरिसातच १९९९ मध्ये १५१ लोक मारले गेले. सर्वात वाईटरीत्या प्रभावित होणारे लोक म्हणजे शारीरिकदृष्ट्या अशक्त असलेले लोक, म्हातारी माणसे, स्त्रिया आणि मुले.

थंडीच्या लाटा

थंडीच्या लाटांनी मृत्यू होण्याच्या घटना उच्च आणि निम्न हिमालयात; विशेषतः उत्तरांचल, सिक्किम, हिमाचल प्रदेश आणि दार्जिलिंगसकटच्या पश्चिम बंगालच्या उत्तर भागात घडून येत असतात.

याशिवाय, झंझावात, समुद्री भोवरे इत्यादी इतरही नैसर्गिक आपत्ती आपल्या देशात घडतच असतात.

नैसर्गिक आपत्ती आपल्याला टाळता येऊ शकतात काय?

अलीकडे आपण नैसर्गिक आपत्ती टाळू शकत नाही. कारण आप तंत्रज्ञानाच्या अशा अवस्थेप्रत आलेलो आहोत जिथून पुन्हा परतणे शक्य नाही.

नैसर्गिक आपत्तींची काही कारणे खाली दिलेली आहेत.

१.    पृथ्वीचे अमर्याद उत्खनन आणि विंधन (ज्यामुळे भूकंप घडून येतात).
२.  पृथ्वीचे अमर्याद विद्युतभारण (उद्योग आणि घरांतील अतिरिक्त विजेचे पृथ्वीप्रवेशन; यांत उद्योग आणि रस्त्यांवरील दिव्यांचा हातभार ८०% असतो. यामुळे भूकंपही होऊ शकतात; शिवाय यामुळे जमिनीची धूपही होत असते, ज्यामुळे जमिनीचा कस कमी होऊन निकृष्ट अन्न-निर्मिती होत असते, ज्याचे पर्यवसान आपले आरोग्य बिघडण्यात होत असते. जमिनीचा पोत घसरल्याने दुष्काळ/ अवर्षणेही घडून येऊ शकतात).
३.  अतिरिक्त वातावरणीय प्रदूषण (हेच पावसाळ्यात अनियमित आणि अतिरिक्त पाऊस पडण्याचे, तसेच उन्हाळ्यात अतिरेकी उष्णता निर्माण होण्याचे कारण असते).

संदर्भः
१.        विकिपेडिया

१३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

या माहितीचा खुप चांगला उपयोग झाला मला
आकाश बारणे

नरेंद्र गोळे म्हणाले...

आकाश,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लोकांना उपयोग व्हावा हीच तर इच्छा आहे.

Sushant Danekar म्हणाले...

thanks for this
This was very useful for kids

ऊर्जस्वल म्हणाले...

धन्यवाद सुशांत! मुले खूप प्रगती करोत हीच शुभेच्छा!

अनामित म्हणाले...

thank you this information helps me a lot

अनामित म्हणाले...

your information is useful

shweta pawar

Unknown म्हणाले...

KHUP CHANGLA KAM KARAT AHAT APAN THUMALA KHUP KHUP SHUBHECHHA

अनामित म्हणाले...

thank you very much!!

Unknown म्हणाले...

आपल्या माहिती मुळे मी पर्यावरणावरील प्रोजेक्ट पूर्ण करू शकलो....

ऊर्जस्वल म्हणाले...

रोहन,

प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लोकांना उपयोग व्हावा हीच तर इच्छा आहे.

ऊर्जस्वल म्हणाले...

श्वेता,

प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

लोकांना उपयोग व्हावा हीच तर इच्छा आहे.

Vinayak Karnik म्हणाले...

उपक्रम आवडला, अनुवाद ही निःसंशय एक कला आहे. अनुवादामध्ये भाषांतर कमी आणि रुपांतर अधिक झाल्यास लिखाण सहज अर्थवाही होते, असे माझे मत आहे. यात आग्रहाने मराठी प्रतिशब्दांचा वापर केला गेला पाहिजे.

ऊर्जस्वल म्हणाले...

कर्णिक साहेब धन्यवाद!

अनुवाद ही निःसंशय एक कला आहे. अनुवादामध्ये भाषांतर कमी आणि रुपांतर अधिक झाल्यास लिखाण सहज अर्थवाही होते, असे माझे मत आहे. यात आग्रहाने मराठी प्रतिशब्दांचा वापर केला गेला पाहिजे.>>>>>> असे ,मानणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहो हीच सदिच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.