कर्कोपचार
अनेक कर्करुग्णांना त्यांच्या आरोग्यनिगेबाबत निर्णय
घेण्यात सक्रिय सहभाग हवा असू शकतो. तुमचा रोग आणि त्यावरील उपचारांचे पर्याय
यांबाबतचे सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असणे स्वाभाविकच आहे. मात्र, निदानापश्चातचा
धक्का आणि तणाव हे सोसण्यास अवघड असतात. त्यामुळे डॉक्टरला विचारायच्या सर्व
गोष्टी लक्षात येणेच कठीण असते. म्हणून डॉक्टरांची भेट ठरविण्यापूर्वीच त्यांना
विचारायच्या प्रश्नांची एक यादीच करून ठेवणे सोयीचे ठरत असते.
डॉक्टर काय म्हणतात हे लक्षात ठेवण्यास सोयीचे
व्हावे म्हणून त्याची नोंद करू शकता किंवा श्राव्यफीत तयार करू शकता. काही लोक,
डॉक्टरशी बोलतांना चर्चेत सहभागी होण्यास किंवा केवळ ऐकून घेण्याकरताही,
कुटुंबातील एखादा सदस्य किंवा मित्र सोबत नेणे पसंत करतात.
तुम्ही सर्व प्रश्न एकदमच विचारले पाहिजेत असे नसते.
तुम्हाला डॉक्टर किंवा परिचारकास स्पष्टीकरणे वा अधिक माहिती विचारून घेण्याची
संधी अवश्य मिळेल.
कदाचित तुमचे डॉक्टर तुम्हाला विशेषज्ञाकडे संदर्भित
करतील किंवा तुम्हीच त्यांना तसे करण्यास सांगू शकाल. कर्कोपचार करणार्या
विशेषज्ञ डॉक्टरांत शल्यविशारद, वैद्यकीय-अर्बुदतज्ञ, रक्ततज्ञ आणि
प्रारण-अर्बुदतज्ञ ह्यांचा समावेश होत असतो.
दुसरे मतः उपचार सुरू करण्यापूर्वी, तुमच्या निदानाबाबत
आणि उपचारयोजनेबाबत दुसरे मत जाणून घेणे तुम्ही पसंत कराल. अनेक विमाकंपन्या
तुमच्या डॉक्टरांनी विनंती केल्यास दुसरे-मतही छत्राखाली घेतील. वैद्यकीय नोंदी
गोळा करण्यात काही काळ जाईल आणि त्याकरता काही प्रयास करावे लागतील. दुसर्या
डॉक्टरची भेटही जुळवून आणावी लागेल. बहुधा ह्याकरता अनेक सप्ताह लागले तरी त्यात
कुठलीही समस्या येत नाही. बहुतेक प्रकरणांत उपचार सुरू करण्यातील विलंब, उपचारांना
कमी प्रभावी करत नाही. पण काही कर्करुग्णांना त्वरित उपचारांची गरज असते. खात्री
करून घेण्याकरता ह्या विलंबाबाबत तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.
दुसर्या मताकरता डॉक्टरची निवड करण्याचे अनेक मार्ग
आहेत.
१.
तुमचे डॉक्टरच एका वा अनेक विशेषज्ञांकडे तुम्हाला
संदर्भित करू शकतात. कर्ककेंद्रांत अनेक विशेषज्ञ अनेकदा एकाच चमूत सोबत काम करत
असतात.
२.
स्थानिक किंवा राज्य वैद्यकीय समाजाचे एक नजीकचे
शुश्रुषालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय बहुधा विशेषज्ञांची नावे सुचवू शकेल.
३.
कर्क उपचारांत स्वारस्य असलेल्या, ना-नफा तत्त्वावर
चालणार्या संस्था मदत करू शकतील.
कर्कासाठीच्या उपचार पद्धती
उपचार योजना मुख्यतः कर्काच्या प्रकारावर आणि
रोगाच्या अवस्थेवर अवलंबून असते.
डॉक्टर्स रुग्णाचे वय आणि सामान्य आरोग्य ह्यांचाही
विचार करतात. अनेकदा उपचारांचे उद्दिष्ट कर्क बरा करण्याचे असते. इतर प्रकरणांत,
उद्दिष्ट, रोगावर शक्य तितके नियंत्रण मिळवण्याचे किंवा लक्षणे घटविण्याचे असते.
उपचार योजना काळानुरूप बदलू शकते.
बव्हंशी उपचार योजनांत; शल्यक्रिया, प्रारणोपचार
किंवा रसायनोपचार यांचा समावेश होत असतो. काही योजनांत, अंतर्प्रेरकोपचार किंवा
जैवोपचारही समाविष्ट होत असतात. याशिवाय, मूलपेशी-प्रत्यारोपणाचाही वापर केला जाऊ
शकतो, ज्यामुळे रुग्ण खूप उच्च मात्रेतील रसायनोपचार किंवा प्रारणोपचार ग्रहण करू
शकत असतो.
काही कर्क एकाच प्रकारच्या उपचारांना सर्वात चांगला
प्रतिसाद देत असतात. इतर काही, उपचार-संयोगांना सर्वात चांगला प्रतिसाद देतात.
उपचार एखाद्या विशिष्ट भागात (स्थानिक-उपचार-पद्धत)
किंवा संपूर्ण शरीरात (प्रणाली-उपचार-पद्धत) उपयुक्त ठरत असतात.
- स्थानिक-उपचार-पद्धत शरीराच्या केवळ एका भागातील कर्काचा विनाश करत असते.
अर्बुद काढून टाकण्याची शल्यक्रिया ही अशा प्रकारची पद्धत आहे. अर्बुद
संकोचनार्थ किंवा विनाशार्थचे प्रारणोपचार बहुधा असेच असतात.
- प्रणाली-उपचार-पद्धत रक्तप्रवाहातून कर्कपेशीविनाशार्थची औषधे संपूर्ण
शरीरात प्रवाहित करत असते. ती, मूळ अर्बुदाच्या बाहेर प्रसृत झालेल्या
कर्कपेशींच्या वाढीचा विनाश घडवून आणत असते किंवा तिचा दर मंदावत असते.
रसायनोपचार, अंतर्प्रेरकोपचार आणि जैवोपचार बहुधा अशा प्रकारचे असतात.
तुमचे डॉक्टर तुमच्यापुढील उपचारांचे पर्याय आणि
अपेक्षित परिणामांचे वर्णन करू शकतील. तुम्ही आणि तुमचे डॉक्टर मिळून
तुमच्याकरताच्या सर्वोत्तम उपचार योजनेबाबतचा निर्णय घेऊ शकता.
कर्कोपचार अनेकदा निरोगी पेशी आणि ऊतींनाही हानी
पोहोचवत असतात, उपप्रभावही सामान्यतः प्रचूर असतात. ते प्रामुख्याने उपचारांचे
प्रकार आणि मर्यादा यांवर अवलंबून होत असतात. प्रत्येक व्यक्तीकरता सारखेच
उपप्रभाव होत नाहीत. एका उपचारसत्रापासून तर दुसर्या उपचारसत्रापर्यंतही ते बदलत
असतात.
उपचार सुरू होण्यापूर्वी, तुमची आरोग्य-निगा-चमू
संभाव्य उपप्रभाव स्पष्ट करून सांगतील आणि त्यांच्या व्यवस्थापनाचे उपायही
सुचवतील. ह्या चमूत परिचारक, आहारतज्ञ, शारीरिक उपचारतज्ञ आणि इतरांचा समावेश होत
असतो.
कर्काच्या कुठल्याही अवस्थेत, उपचारांच्या
उपप्रभावांपासून आराम मिळण्याकरता, आणि दुःख व इतर लक्षणांच्या नियंत्रणाकरता;
तसेच भावनिक आणि व्यावहारिक समस्यांतून मोकळे होण्याकरता आधार-निगा उपलब्ध असते.
वैद्यकीय चाचण्यांत (नवीन उपचार पद्धतींच्या संशोधन
अभ्यासांत) सहभागी होण्याबाबत डॉक्टरसोबत तुम्ही विचारविनिमय करू शकता. “कर्क संशोधनापासूनच्या आशा” ह्या अनुभागात वैद्यकीय
चाचण्यांबाबत अधिक माहिती मिळू शकेल. उपचार सुरू करण्यापूर्वी, डॉक्टरांना तुम्ही
खालील प्रश्न विचारणे पसंत कराल.
१.
माझेबाबत निदान काय झाले आहे?
२.
कर्क पसरला आहे का? असल्यास कुठवर? रोगाची अवस्था
काय आहे?
३.
उपचारांचे उद्दिष्ट काय आहे? मला उपचारांचे कुठले
पर्याय उपलब्ध आहेत? तुम्ही त्यांपैकी कुठला संस्तुत कराल? आणि का?
४.
प्रत्येक प्रकारच्या उपचारांपासून अपेक्षित असलेले
लाभ कोणते?
५.
प्रत्येक प्रकारच्या उपचारांत कोणते धोके आहेत?
कुठले उपप्रभाव संभाव्य आहेत? आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करता येईल?
६.
माझ्यावरील उपप्रभावांत वंध्यत्वाचा समावेश असेल का?
त्याबाबत काही करता येईल का? मी बिजांड वा शुक्राणू साठवून ठेवण्याचा विचार करावा
का?
७.
उपचारांकरता मी काय तयारी करावी?
८.
उपचार मला किती वारंवार घ्यावे लागतील? ते किती
काळपर्यंत चालतील?
९.
मला माझ्या दैनंदिन कामांत बदल करावे लागतील का?
किती काळपर्यंत?
१०.
उपचारांना किती खर्च येईल? माझ्या आरोग्य-विम्याच्या
छत्रात तो बसेल का?
११.
कुठले नवीन उपचार अभ्यासाधीन आहेत? माझ्याकरता
वैद्यकीय चाचणी योग्य ठरेल का?
कर्कासाठी शल्यक्रिया
बहुतेक प्रकरणांत शल्यविशारद अर्बुद आणि त्याचे
आसपासच्या काही ऊती काढून टाकत असतो. आसपासच्या ऊती काढून टाकण्याने अर्बुद पुन्हा
प्रकट होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. शल्यविशारद याशिवाय, आसपासचे लसिकाजोडही काढून
टाकू शकतो. शल्यक्रियेचे उपप्रभाव प्रामुख्याने अर्बुदाच्या आकारावर आणि स्थानावर,
तसेच शल्यक्रियेच्या प्रकारावर अवलंबून असतात. शल्यक्रियेनंतर बरे होण्यास काळ
जावा लागतो. प्रत्येक प्रकारच्या शल्यक्रियेसाठी हा काळ निरनिराळा असतो. प्रत्येक
व्यक्तीकरताही तो निरनिराळा असतो. थोडा वेळ अशक्त आणि थकलेले वाटणे स्वाभाविकच
असते.
शल्यक्रियेनंतर पहिले काही दिवसपर्यंत बहुतेक
लोकांना अस्वस्थ वाटत राहते. मात्र, औषधाने दुःख नियंत्रणात राहू शकते.
शल्यक्रियेपूर्वी दुःखनिवारणाच्या योजनेबाबत तुम्ही डॉक्टर वा परिचारकाशी चर्चा
करायला हवी. तुम्हाला अधिक दुःखनिवारणाची आवश्यकता वाटत असेल तर, डॉक्टर त्यानुसार
दुःखनिवारण-योजना जुळवून घेऊ शकतील.
काही लोक अशी चिंता करतात की, कर्काकरताच्या
शल्यक्रियेमुळे (किंवा अगदी नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियेनेही) कर्कप्रसार होईल. असे
क्वचितच घडत असते. शल्यविशारद विशेष पद्धती वापरतात आणि अनेक पायर्यांनी
कर्कपेशींचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करत असतात. उदाहरणार्थ, जर त्यांना एकाहून
अधिक भागांतील ऊती काढून टाकायच्या असतील तर, प्रत्येक भागाकरता ते निरनिराळी
अवजारे वापरतात. ह्या रीतीने निरोगी ऊतींत कर्कपेशी-प्रसार होण्याची शक्यता घटत
असते.
तसेच, काही लोक शल्यक्रियेदरम्यान, कर्क हवेच्या
संपर्कात येऊन त्याचा प्रसार होईल अशी काळजी करत असतात. हे खरे नाही. हवा
कर्कप्रसार करत नाही.
कर्काकरताचे प्रारणोपचार
प्रारणोपचार, कर्कपेशीविनाशाकरता उच्च-ऊर्जा-किरणे
वापरत असतात. डॉक्टर अनेक प्रकारचे प्रारणोपचार वापरत असतात. काही लोकांना त्यांचे
संयुक्त उपचारही दिले जातात.
१.
बाह्य प्रारणः प्रारण शरीराबाहेर ठेवलेल्या मोठ्या
यंत्रातून येत असते. बहुतेक रुग्ण, उपचारांकरता शुश्रुषालयात किंवा
आरोग्यकेंद्रात, दर सप्ताहात ५ दिवसाकरता याप्रमाणे अनेक सप्ताह, जाऊन राहतात.
२.
अंतर्गत प्रारणः प्रारण; ऊतींत किंवा त्यांचेनजीक
बीज, सुया किंवा पातळ अप्रत्यास्थ नलिका यांत ठेवलेल्या किरणोत्सारी पदार्थातून
येत असते. रुग्ण बहुधा शुश्रुषालयात राहतात. रोपण सामान्यतः अनेक दिवसपर्यंत
जागेवरच स्थिर राहते.
३.
प्रणाली प्रारणः शरीरात प्रवास करणार्या, द्रवरूप
किंवा किरणोत्सारी पदार्थ भरलेल्या कुपीतून प्रारण प्राप्त होत असते. रुग्ण ते
द्रव पितो किंवा कुपी गिळतो किंवा त्यास सुई टोचली जाते. ह्या प्रकारचे
प्रारणोपचार, कर्कोपचारार्थ किंवा अस्थींत विखुरलेल्या कर्कापासून होणारे दुःख
नियंत्रणात ठेवण्याकरता वापरले जाऊ शकतात. सध्या केवळ काही प्रकारच्या कर्कांवरच
ह्या स्वरूपाचे प्रारणोपचार केले जात असतात.
प्रारणोपचारांचे उपप्रभाव, प्रामुख्याने मात्रा आणि
प्रारण-प्रकार, तसेच तुमच्या शरीराचा कुठला भाग उपचारित आहे ह्यावर अवलंबून असतात.
उदाहरणार्थ, पोटास दिलेल्या प्रारणाने मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ शकतो.
उपचारित भागातील त्वचा लाल, शुष्क आणि नाजूक होऊ शकते. उपचारित भागातील केसही झडू
शकतात.
प्रारणोपचारांदरम्यान तुम्ही थकून जाऊ शकता. विशेषतः
उपचारांच्या अखेरच्या सप्ताहांत. विश्रांती घेणे महत्त्वाचे असते, पण बहुधा
डॉक्टर्स रुग्णांना शक्य असेल तर सक्रिय राहण्यासच सांगत असतात.
सुदैवाने, बव्हंशी उपप्रभाव काळासोबतच निघून जातात.
दरम्यान, आराम मिळावा म्हणून उपाय करता येत असतात. जर तुम्हाला गंभीर स्वरूपाचा
उपप्रभाव झालेला असेल तर, डॉक्टर उपचारांदरम्यान खंड घेण्याचाही सल्ला देऊ शकतात.
कर्काकरताचे रसायनोपचार
रसायनोपचार म्हणजे कर्कपेशीविनाशाकरता औषधाचा उपयोग
करणे होय. रसायनोपचार घेणारे बहुतेक रुग्ण मुखातून अथवा शिरेतून ते घेत असतात.
कुठल्याही प्रकाराने घेत असतील तरी, औषध रक्तप्रवाहात प्रवेशते आणि शरीरभरातील
सर्व कर्कपेशींना प्रभावित करू शकत असते. रसायनोपचार बहुधा चक्राकार पद्धतीने दिले
जात असतात. रुग्ण एक वा अनेक दिवस उपचार घेतो. त्यानंतर दुसर्या सत्रापूर्वी अनेक
दिवस वा सप्ताहांचा काळ हानी भरून येण्यास दिला जात असतो.
बहुतेक रुग्ण शुश्रुषालयाच्या बाह्यरुग्णविभागात,
एखाद्या डॉक्टरांच्या कार्यालयात किंवा घरीच असे उपचार घेऊ शकतात. काहींना
रसायनोपचारांदरम्यान शुश्रुषालयात राहणे आवश्यक ठरते. उपप्रभाव प्रामुख्याने त्या
विशिष्ट औषधावर आणि मात्रेवर अवलंबून असतात. औषधे झपाट्याने विभागत असलेल्या
कर्कपेशींना प्रभावित करतात.
१.
रक्तपेशीः जेव्हा औषधे निरोगी रक्तपेशींना हानी
पोहोचवतात तेव्हा, तुम्हाला संसर्ग होणे, सहजी खरचटणे, सहज रक्तस्त्राव होणे आणि
खूप अशक्त व थकलेले वाटणे अधिक संभवनीय असते.
२.
केशमूलस्थपेशीः रसायनोपचारांमुळे केसगळती होऊ शकत
असते. तुमचे केस पुन्हा वाढतील, मात्र ते काहीसे निराळ्या रंगाचे आणि पोताचे असू
शकतील.
३.
पचनमार्ग-अस्तर-पेशीः रसायनोपचारांमुळे भूक मंदावते,
मळमळ, उलट्या, अतिसार, तोंड येणे आणि ओठांवर व्रण पडणे इत्यादी उपप्रभाव जाणवू
शकतात.
काही औषधे फलनक्षमता प्रभावित करत असतात. स्त्रिया
गर्भार राहण्यास असमर्थ ठरतात आणि पुरूष वडील होऊ शकत नाहीत. जरी रसायनोपचारांचे
उपप्रभाव त्रासदायक असले तरी, त्यांपैकी बहुतेक तात्पुरते असतात. तुमचे डॉक्टर
त्यावर उपचार करू शकतील किंवा त्यांना नियंत्रणात ठेवू शकतील.
कर्काकरताचे अंतर्प्रेरकोपचार
काही कर्कांना वाढीकरता अंतर्प्रेरकांची आवश्यकता
असते. अंतर्प्रेरकोपचार, कर्कपेशींना आवश्यक
असलेली अंतर्प्रेरके, त्यांना मिळण्यापासून किंवा त्यांनी
वापरण्यापासून, त्यांना वंचित ठेवतात. ही एक
प्रणाली-उपचार-पद्धती आहे. ह्या पद्धतीत औषधांचा अथवा शल्यक्रियेचा उपयोग केला जात
असतो.
o
औषधेः डॉक्टर अशी औषधे देतात ज्यामुळे काही विशिष्ट अंतर्प्रेरकांचे उत्पादन
थांबते किंवा त्यांचे कर्तव्य करण्यापासून त्यांना रोखले जात असते.
o
शल्यक्रियाः शल्यविशारद अंतर्प्रेरके उत्पन्न करणारे अवयव (जसे की बिजांडकोश अथवा वृषण) काढून टाकत असतो.
अंतर्प्रेरकोपचार पद्धतीचे उपप्रभाव, उपचारांच्या पद्धतीवर अवलंबून
असतात. त्यांत वजनवाढ, गरम वाफा येणे, मळमळ आणि फलनसमर्थतेत परिवर्तन होणे
इत्यादींचा समावेश होत असतो. स्त्रियांत, अंतर्प्रेरकोपचार पद्धती मासिक पाळी थांबवू शकते किंवा अनियमित करू
शकते. योनीशुष्कताही निर्माण होऊ शकत असते. पुरूषांत, अंतर्प्रेरकोपचार पद्धती वंध्यत्व, लैंगिक संबंधांप्रती अनासक्ती आणि स्तनांची
वाढ किंवा कोमलता निर्माण करू शकते.
कर्काकरताचे जैवोपचार
ही आणखी एका प्रकारची, प्रणाली-उपचार-पद्धती आहे. ही
प्रतिरक्षा प्रणालीस (शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली) कर्काचा सामना करण्यात
मदत करत असते. उदाहरणार्थ, मूत्राशयाचा कर्क असलेले रुग्ण शल्यक्रियेनंतर
बी.सी.जी. द्रावण ग्रहण करत असतात. डॉक्टर प्रवेशकाचा उपयोग करून द्रावण
मूत्राशयात सोडत असतात. द्रावणात निर्बल केलेले पण जिवंत जीवाणू असतात, जे
प्रतिरक्षा प्रणालीस कर्कपेशीविनाशार्थ उत्तेजित करत असतात. बी.सी.जी.चे उपप्रभाव
होऊ शकतात. तिच्यामुळे मूत्राशयाचा प्रक्षोभ होऊ शकतो. काही व्यक्तींना मळमळ होऊ
शकते, हलकासा ताप येऊ शकतो किंवा थंडी वाजून येऊ शकते. इतर बहुतेक प्रकारच्या
जैवोपचार-पद्धती शिरेतून दिल्या जात असतात. रक्तप्रवाहातून जीवाणू प्रवास करतात.
काही व्यक्तींना उपचार ज्या जागेवर टोचले जात असतात त्या जागेवर पुरळ येऊ शकते. काहींना फ्ल्यू-सारखी लक्षणे; जसे की ताप, थंडी, डोकेदुखी, स्नायूदुखी,
थकवा, अशक्तता आणि मळमळ; जाणवू शकतात. जैवोपचार-पद्धत आणखीही गंभीर स्वरूपाचे
उपप्रभाव निर्माण करू शकत असते. जसे की, रक्तदाबातील बदल आणि श्वसनसमस्या.
जैवोपचार बहुधा डॉक्टरांच्या कार्यालयात, आरोग्यकेंद्रात किंवा शुश्रुषालयात दिले
जातात.
मूलपेशी प्रत्यारोपण
रक्त-निर्मात्या-मूलपेशींचे प्रत्यारोपण केल्याने रुग्ण; रसायनोपचार, प्रारणोपचार किंवा दोन्हीही
उपचारांच्या उच्च मात्रा घेण्यास समर्थ होत असतात. उच्च मात्रा कर्कपेशी आणि
अस्थीमज्जेतील प्राकृत रक्तपेशी दोन्हींचा विनाश करत असते. उपचारांनंतर रुग्ण;
निरोगी, रक्त-निर्मात्या-मूलपेशी,
मोठ्या शिरेत बसवलेल्या लवचिक नलिकेतून ग्रहण करतात. प्रत्यारोपित मूलपेशींपासून मग, नवीन रक्तपेशी
विकसित होतात. रुग्णाकडूनच उच्च-मात्रा-उपचारांपूर्वीच, मूलपेशी
घेतल्या जाऊ शकतात किंवा त्या इतर व्यक्तींकडूनही
प्राप्त केल्या जाऊ शकतात. ह्या उपचारांकरता रुग्णास शुश्रुषालयात राहावे लागते.
उच्च-मात्रा-उपचारांचे उपप्रभाव आणि मूलपेशी-प्रत्यारोपण यांत संसर्ग आणि
रक्तस्त्राव ह्यांचा समावेश होत असतो. याशिवाय, एखाद्या दात्याकडून
मूलपेशी-प्रत्यारोपण ग्रहण करणार्या रुग्णांत,
कलम-विरुद्ध-मूळ असा रोग निर्माण होऊ शकेल. ह्यात, दिलेल्या
मूलपेशी रुग्णाच्या ऊतींवर आक्रमण करत असतात. बहुतेकदा ह्यामुळे यकृत, त्वचा किंवा
पचनमार्ग प्रभावित होत असतात. हा रोग गंभीर किंवा जीवघेणाही ठरू शकत असतो.
प्रत्यारोपणानंतर तो कधीही होऊ शकतो. अनेक वर्षांनंतरही. ह्या रोगाचा प्रतिबंध,
उपचार आणि नियंत्रणही औषधांनी केले जाऊ शकते.
पूरक आणि पर्यायी उपचार
काही कर्करुग्ण पूरक आणि पर्यायी उपचार वापरत असतात
o
प्रमाणित उपचारांसोबतच वापरल्या जाणार्या पद्धतीस
सामान्यतः पूरक उपचार पद्धत म्हटले जाते.
o
प्रमाणित उपचारांऐवजी वापरल्या जाणार्या पद्धतीस सामान्यतः पर्यायी उपचार पद्धत म्हटले जाते.
ऍक्युपंक्चर, मर्दन-उपचार-पद्धत, वनौषधी,
जीवनसत्त्वे किंवा विशेष आहार, दृश्यकल्पन, ध्यान आणि आध्यात्मिक उपचार हे पूरक
आणि पर्यायी उपचारांचे प्रकार असतात. अनेक लोक असे म्हणतात की, यांमुळे त्यांना बरे वाटते. मात्र, काही
प्रकारच्या पूरक आणि पर्यायी उपचारांमुळे प्रमाणित उपचार ज्या प्रकारे कार्य
करायला हवेत, त्यात परिवर्तन घडून येत असते. असे बदल हानीकारक असू शकतात. इतर प्रकारचे पूरक आणि पर्यायी उपचार एक एकटे वापरले असताही हानीकारक ठरू शकतात. काही
प्रकारचे पूरक
आणि पर्यायी उपचार खर्चिक असतात. पूरक आणि पर्यायी उपचार घेण्याचा निर्णय करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या
डॉक्टरांना खालील प्रश्न विचारावेसे वाटतील.
१.
ह्या उपचारपद्धतीपासून मी कुठल्या लाभांची अपेक्षा करू शकतो?
२.
ह्यात कुठले धोके आहेत?
३.
अपेक्षित लाभ धोक्यांना पुरून उरणारे आहेत का?
४.
कुठल्या उपप्रभावांवर मी लक्ष ठेवले पाहिजे?
५.
माझ्या कर्कोपचाराचे कार्य त्यांच्यामुळे बदलू शकेल का? ते हानीकारक ठरू शकेल
का?
६.
ही उपचारपद्धती वैद्यकीय चाचण्यांत अभ्यासली जात आहे का? असल्यास तिचे
प्रायोजक कोण आहेत?
७.
ह्या उपचारपद्धतीकरता माझा आरोग्यविमा छत्र देईल का?
पोषण आणि शारीरिक सक्रियता
कर्करुग्णांनी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे असते.
ह्यात चांगलेचुंगले खाणे आणि शक्य तितके सक्रिय राहणे ह्यांचा समावेश होत असतो.
चांगले वजन राखण्यासाठी पुरेसे अन्नसेवन करावे लागते. अंगात ताकद राखण्याकरता
त्यांना पुरेशा प्रथिनांची आवश्यकताही असते. काही वेळेस, विशेषतः उपचारांदरम्यान किंवा त्यानंतर लगेचच, भूक लागेल. त्रास
किंवा थकवा जाणवेल. अन्न पूर्वीप्रमाणे गोड लागत नाही असेही जाणवू शकेल. याशिवाय,
भूक मंदावणे, मळमळ, उलटी, तोंड येणे ह्यांसारखे उपचारांचे
उपप्रभाव, समस्या ठरू शकतात. डॉक्टर, आहारतज्ञ किंवा इतर
आरोग्य-निगा-दाता व्यवस्थित अन्नसेवनाचे उपाय सांगू शकतील.
अनेक रुग्णांना सक्रिय राहिल्यास बरे वाटते. चालणे, योगचर्या, पोहणे आणि इतर हालचाली तुम्हाला सशक्त आणि ऊर्जस्वल बनवू शकतात. व्यायामाने
मळमळ आणि दुःख घटते आणि उपचार सोपे वाटू लागतात. त्यामुळे तणावमुक्तीही होत असते.
जी काही शारीरिक सक्रियता तुम्ही निवडाल, ती सुरू करण्यापूर्वी तिच्याबाबत तुमच्या
डॉक्टरांशी अवश्य चर्चा करा. जर त्यामुळे तुम्हाला दुखत असेल किंवा इतर काही
समस्या असतील तर डॉक्टर किंवा परिचारकांस त्याची कल्पना द्या.
पाठपुरावा निगा
लवकर शोध घेण्यातील आणि उपचारांतील प्रगतीमुळे अनेक कर्करुग्ण बरे होतात. पण
कर्क परत येणार नाही अशी खात्री डॉक्टर कधीही देऊ शकत नाहीत. न शोधल्या गेलेल्या
कर्कपेशी उपचारांनंतरही शरीरात तशाच राहतात. जरी कर्क पूर्णपणे काढून टाकला गेला
किंवा नष्ट झाला असे वाटत असले तरी तो परतू शकतो. ह्याला डॉक्टर पुनरावृत्ती
म्हणतात. कर्क पुन्हा अवतरला आहे का हे शोधण्यासाठी तुमचे डॉक्टर,
शारीरिक तपासणी, प्रयोगशालेय चाचण्या, क्ष-किरण-चाचणी आणि इतर चाचण्याही करवून घेऊ
शकतात. जर पुनरावृत्ती झालेली असेल तर, तुम्ही आणि तुमचे डॉक्टर मिळून, नवीन
उपचारांबाबत निर्णय घेऊन, नवी उपचारयोजना आणि तिची उद्दिष्टे निश्चित करावी
लागतील.
पाठपुरावा तपासण्यांदरम्यान डॉक्टर इतरही समस्यांचा तपास करतील, जसे की उपचारांनांतर दीर्घ काळाने व्यक्त होणारे
कर्कोपचारांपासूनचे उपप्रभाव. आरोग्यातील बदलांची दखल घेतली जाणे आणि आवश्यकता
पडल्यास त्यावर उपचार सुरू करणे ह्या गोष्टी ह्या तपासण्यांतून साध्य होऊ शकतात.
ठरलेल्या भेटींदरम्यानही आरोग्य समस्या उद्भवल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवे.
आधाराचे स्त्रोत
कर्कासारख्या गंभीर आजारासोबत जीवन जगत असणे सोपे
नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, कामाची किंवा दैनंदिन कर्मांचीही चिंता असू
शकेल. उपचार आणि उपप्रभाव-व्यवस्थापन, शुश्रुषालय-निवास, वैद्यकीय देयके हेही
सामान्यतः काळजीचे विषय असू शकतात. डॉक्टर्स, परिचारक आणि आरोग्य-निगा-चमूतील इतर
सदस्य उपचारांबाबतच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. अनेकदा समाजसेवक आर्थिक मदत,
वाहतूक, घरगुती निगा किंवा भावनिक आधार यांचे स्त्रोत सुचवितात. समाजसेवक,
समुपदेशक किंवा धार्मिक हितोपदेशकास भेटून तुम्हाला आपल्या भावना आणि चिंता
मोकळ्या करता येऊ शकतील.
मित्र आणि नातेवाईक हे खूप आधारदायक ठरू शकतात. त्याशिवाय अनेक लोकांना, इतर
कर्करुग्णांसोबत बोलणेही लाभकारक ठरते असे आढळून येत असते. कर्करुग्ण अनेकदा
आधारगटांत एकत्रित येत असतात. अशा गटांत रुग्ण आणि त्यांचे कुटुंबिय, इतर रुग्ण
आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटतात. परस्परांच्या अनुभवातून ते, रोगाशी जुळवून
घेणे आणि उपचारांच्या प्रभावांबाबत शिकू शकतात.
गटांचा आधार प्रत्यक्ष भेटीत, दूरध्वनीवरून किंवा
महाजालाद्वारेही प्राप्त होऊ शकतो. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की प्रत्येकाचे
प्रकरण निराळेच असते. एखादी व्यक्ती ज्याप्रकारे कर्कास हाताळत असेल त्याच प्रकारे
कर्क हाताळणे दुसर्यास योग्य ठरणारही नाही. तुमच्या आरोग्य-निगा-चमूतील सदस्यास
इतर कर्करुग्णांनी दिलेल्या सल्ल्याबाबतही विचारू शकता.
कर्कसंशोधनातील आशा
जगभरातील संशोधक, कर्क प्रतिबंधाच्या, शोधाच्या, निदानाच्या
आणि उपचारांच्या नवीन आणि चांगल्या उपायांच्या शोधात असतात. कर्काच्या कारणांबाबत
ते अधिक जाणून घेत असतात. अनेक प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या ते करत असतात. दीर्घ
आणि काळजीपूर्वक केलेल्या संशोधन प्रक्रियेच्या अखेरच्या
अवस्थांतील त्या एक भाग असतात. नवीन उपचारांचे संशोधन प्रयोगशाळेत सुरू होत असते. जर प्रयोगशाळेत एखादी पद्धत आशादायक आढळून आली तर,
पुढली पायरी म्हणजे प्राण्यातील कर्कावर त्या उपचारांचा काय परिणाम होतो ते पाहणे
आणि त्याचे काही हानीकारक प्रभावही आहेत का हे तपासणे. अर्थातच जे उपचार
प्रयोगशाळेत नीट काम करत असतील किंवा प्राण्यांतही प्रभावी ठरत असतील ते,
कर्करुग्णांना नेहमीच उपयुक्त ठरतील असे नसते. कर्क प्रतिबंध, शोध, निदान आणि
उपचार यांकरताच्या नवीन पद्धती सुरक्षित आणि प्रभावी आहेत की नाही हे शोधून
काढण्याकरता, वैद्यकीय चाचण्या आवश्यक ठरतात.
वैद्यकीय चाचण्या कर्कविरोधातील ज्ञान आणि प्रगतीत भर घालत असतात. संशोधनाने आधीच अनेक प्रगत
उपायांप्रत नेऊन पोहोचवले आहे आणि शास्त्रज्ञ अधिक प्रभावी पद्धतींचा शोधही घेतच
आहेत. वैद्यकीय चाचण्यांद्वारे झालेल्या
प्रगतीमुळे, अनेक कर्कांकरता उपचारित, अनेक रुग्ण, अधिक दीर्घायुषी झालेले आहेत.
यांपैकी कर्कातून वाचलेल्या अनेक जणांच्या आयुष्याची गुणवत्ता, पूर्वी कर्कातून वाचलेल्या रुग्णांच्या आयुष्यांपेक्षा चांगली आहे.
वैद्यकीय चाचण्यांचे अनेक प्रकार आहेत
o
प्रतिबंधक चाचण्याः असे अभ्यास; काही पदार्थ (जसे की
जीवनसत्त्वे किंवा औषधे), आहारातील बदल किंवा जीवनशैलीगत परिवर्तने ह्यांचा शोध
घेत असतात, ज्यांचेमुळे कर्काचा धोका कमी होईल.
o
गाळणी चाचण्याः लक्षणे दिसू लागण्यापूवीच कर्क शोधून
काढ्ण्याच्या पद्धती, असे अभ्यास चाचपत असतात. संशोधक अशा प्रयोगशालेय चाचण्या आणि
प्रतिमांकन पद्धतींचा अभ्यास करत आहेत ज्या, विशिष्ट प्रकारच्या कर्काचा शोध घेऊ
शकतील. उदाहरणार्थ आंत्र-कर्काकरताच्या गाळणीसाठी आभासी-प्रकाशित- नलिका-आंत्रदर्शक
(आंत्राचे संगणित-त्रिमिती-चित्रांकन) वापरण्यातील लाभ आणि हानी ह्यांबाबतची
माहिती संशोधक जाणून घेत आहेत. इतर शास्त्रज्ञ, फुफ्फुसाच्या कर्काच्या गाळणी चाचणीसाठी, संगणित-त्रिमिती-चित्रांकन आणि छातीचे क्ष-किरण-चित्रांकन ह्यांची तुलना करत
आहेत.
o
उपचार चाचण्याः उपचारात्मक अभ्यास, नव्या उपचारांचा आणि अस्तित्वात असलेल्या
उपचारांच्या नव्या संयोगांचा शोध घेत असतात. उदाहरणांमध्ये,
नव्या प्रकारांनी कर्कपेशीविनाश साधणार्या औषधांचा अभ्यास, शल्यक्रियेच्या किंवा
प्रारणोपचारांच्या नवीन पद्धती आणि लसीकरणासारखे नवीन उपाय,
ह्यांचा समावेश होत असतो.
o
आयुष्याची-गुणवत्ता-स्वरूपाच्या-चाचण्या (आधारात्मक निगा): कर्करुग्णांच्या
आयुष्याची गुणवत्ता आणि सौख्य सुधारण्याच्या उपायांचा शास्त्रज्ञ अभ्यास करत
असतात. उदाहरणार्थ, डॉक्टर्स अशा औषधांचा अभ्यास करू शकतात, जी रसायनोपचारांचे
उपप्रभाव कमी करतील. किंवा ते असे उपायही शोधू शकतील जे वजनघट रोखू शकतील आणि दुःख-नियंत्रण करू शकतील.
नवीन पद्धत जर प्रभावी ठरली तर, जे लोक वैद्यकीय चाचण्यांत सहभागी होत असतात
ते लाभ मिळवणार्यांत पहिले ठरू शकतात आणि जरी सहभागी व्यक्ती थेटपणे लाभ मिळवू
शकल्या नाहीत तरी; डॉक्टरांना कर्क, त्याचा प्रतिबंध, शोध आणि नियंत्रण यांबाबत
माहिती मिळवण्यास मदत करून, त्यांनी केलेले योगदान
महत्त्वाचे ठरत असते. जरी वैद्यकीय चाचण्या काहीसा धोका बाळगत असल्या तरी, संशोधक
रुग्णांच्या संरक्षणार्थ शक्य असेल ते सर्व करतच असतात. ज्यांना वैद्यकीय चाचण्यांचा एक
भाग होण्यात स्वारस्य असते, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांशी त्याबाबत चर्चा करावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.