२०२०-१०-१५

शास्त्रज्ञ-०५: डॉ. अब्दुल कलाम

आज १५ ऑक्टोंबर डॉ. अब्दुल कलाम ह्यांचा जन्मदिवस (जन्मः १५ ऑक्टोंबर १९३१, मृत्यूः २७ जुलै २०१५)

हा दिवस २०१५ साली त्यांच्या मृत्यू झाल्यापासून महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.

त्यानिमित्ताने ’स्वतःकरता नोंदी’ ह्या त्यांच्या आत्मचरित्रातील हा पहिला भाग ’माडबन’ !

तुम्ही प्रत्येक दिवसाची काळजी घ्या - पंचांग वर्षाची काळजी घेईल[१]

आपली आयुष्ये पंचांगा (कॅलेंडर) भोवती संघटित झालेली असतात. आपण वेळेची आकडेमोड करतो. एखादी विशिष्ट घटना घडण्यास किती दिवस शिल्लक आहेत किंवा काही महत्त्वाचे घडून गेल्यानंतर किती दिवस उलटलेले आहेत, ह्याची माहिती करून घेत असतो. अगदी सुरूवातीची पंचांगे, ती तयार करणार्‍या लोकांच्या भौगोलिक स्थानांमुळे प्रभावित होत असत, असे दिसून येते. थंड हवामानांच्या देशांत, वर्षाची संकल्पना ऋतूंमुळे निर्धारित होत असे. विशेषतः हिवाळ्याच्या संपण्याने हे निर्धारण होत असे. ऋतूमान अधिक ठसठशीतपणे व्यक्त होत नाही, अशा ऊबदार देशांत, कालमापनाचे साधन म्हणून, चंद्र बहुधा कळीची भूमिका बजावतांना दिसतो. हिजरी वा इस्लामिक कालगणना, उष्णकटिबंधीय प्रदेशात निर्माण होणारी पंचांगे, आजही चांद्र आवर्तनांद्वारे कालमापन करतात. आजचा सौदी अरेबिया उष्णकटिबंधीय प्रदेशांत मोडतो.

हिजरी सनाच्या १३५० व्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या दुसर्‍या दिवशी, मी ह्या जगात अवतरलो. त्या दिवशी गुरूवार होता. इसवी सनाच्या १९३१ सालातील ऑक्टोंबरचा पंधरावा दिवस होता तो. जैनुलाब्दीन आणि त्यांची पत्नी ऐशम्मा ह्यांचे तिसरे अपत्य आणि दुसरा मुलगा होतो मी. माझे वडील, भारत देशाचे सच्चे आणि श्रद्धावान पाईक होते. हा देश पुढे इंडिया म्हणून ओळखला जायचा होता. थोर भारतीय विद्वान आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील विख्यात राजकीय नेते, अबुल कलाम आझाद ह्यांचे नाव माझ्या वडिलांनी मला दिले. माझ्या पालकांना असे वाटत असे की, मी सुदैवी बालक आहे. कारण माझ्या जन्मानंतर लगेचच माझे वडील स्थानिक मस्जिदीचे इमाम झाले.

त्या काळातील प्रथेनुसार, माझा जन्म माझ्या वंशपरंपरागत घरातच झाला. रामेश्वरमच्या पवित्र शहरातील, ते एक परंपरेत शोभणारे बर्‍यापैकी घर होते. विख्यात रामेश्वरमच्या मंदिरापासून जवळच, रस्त्याच्या कडेला फरसबंद ओसरी असलेले ते घर होते.

माझे शहर, पंबन बेटाच्या जवळपास मध्यावरच स्थित होते. भारत आणि श्रीलंका ह्यांदरम्यानच्या पाल्कच्या सामुद्रधुनीत, मुख्यभूमीपासून दोन किलोमीटर अंतरावर, वसलेला ३० किलोमीटर लांबीचा जमिनीचा तुकडा होता तो. बेटावर पंबन आणि रामेश्वरम ह्या दोन प्रमुख वसाहती आहेत. एका अर्थाने त्या जीवनाची दोन आवश्यक अंगेच व्यक्त करतात. काम आणि आध्यात्मिक जीवन. पंबन हे बेटाच्या पश्चिमेकडील टोकावर वसलेले मासेमारी करणारे एक खेडे आहे. हे बंदर, बेटाच्या पूर्वेकडे पाल्कच्या सामुद्रधुनीवर लक्ष ठेवून असते.

माझ्या लहानपणी पंबन बेटावर आणखीही एक शहर होते. धनुष्कोडी. ते बेटाच्या अगदी दक्षिण टोकावर आहे, जिथे जमीन ही श्रीलंकेच्या दिशेने निमुळती होत जाते. १९६४ च्या वादळामुळे जरी ते राहण्यालायक राहिलेले नव्हते तरीही, तेथील श्री रामाचे कोठांडरनस्वामी मंदिर शिल्लक होतेच. वादळात बचावलेली, धनुष्कोडीतील ती एकमेव ऐतिहासिक वास्तू होती. एरव्ही, ७.६ मीटर उंचीच्या लाटांनी, २३ डिसेंबर १९६४ रोजी शहरास दलदलीत पार बुडवून टाकलेले होते.

हिंदूंकरता पंबन बेट एक महत्त्वाचे स्थान आहे. चार धामांतील रामेश्वरम हे सर्वात दक्षिणेकडील धाम आहे. त्यामुळेच दरसाल यात्रा करणार्‍या हजारो हिंदूंकरता ते तीर्थस्थान ठरलेले आहे. रामेश्वर म्हणजे संस्कृतात रामाचा ईश्वर. रामनाथस्वामी मंदिरातील मुख्य दैवत असलेल्या शिवाचेच ते एक विशेषण आहे. राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे. इथून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीलंकेत, राक्षसांचा राजा रावण ह्याचे विरुद्ध झालेल्या युद्धादरम्यान, जे अनेक अपराध आपले हातून घडले असू शकतात, त्यांतून मुक्त करण्याची प्रार्थना, त्याने, इथे शिवास केली होती.

उर्वरित भारताप्रमाणेच पंबन बेटही नव्या धार्मिक संकल्पनांसाठी लक्षणीयरीत्या खुले होते. मलिक कफूरसोबतच, इस्लाम धर्मही पंबन बेटावर आला. दिल्ली सल्तनतीचा शासक असलेल्या अल्लाऊद्दिन खिलजीचा, गुलाम असलेला हिजडा कफूर, पुढे त्याच्या सैन्यात सेनापती पदापर्यंत पोहोचला होता. १२९४ ते १३१६ दरम्यानच्या दक्षिण भारतातील त्याच्या तीन मोहिमांतील एकीदरम्यान मलिक कफूर इथे पोहोचला होता. अल्पजीवी मदुराई सल्तनतीकरताचा मंचच त्यामुळे जणू सज्ज झाला होता. ही सल्तनत, प्रस्थापनेनंतर जेमतेम अर्धशतकानंतर लयास गेली. इस्लाम मात्र राहिला.

१७९५ मध्ये, रामेश्वरम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या थेट अंमलाखाली आले आणि ते मद्रास प्रेसिडेन्सीस जोडून घेण्यात आले. ब्रिटिश शासनकाळात ख्रिश्चन धर्माला बेटावर वाव मिळाला. पाल्क सामुद्रधुनीतील ह्या लहानशा पण पवित्र भूमीवर, ख्रिस्ताचे निष्ठावान अनुयायी रुजू झाले. तेवढ्याच निष्ठावान असलेल्या मुस्लिम आणि हिंदूत ते रुजू झालेले होते.

“प्रत्येक मूल, आपल्या अंगभूत गुणांसह, एका विशिष्ट सामाजिक-आर्थिक आणि भावनिक वातावरणात जन्माला येते आणि अधिकारी व्यक्तींकडून विशिष्ट पद्धतीने, प्रशिक्षित केले जात असते.” [२]

विश्वातील तीन महान धर्म सुखाने वावरत असलेल्या वातावरणात मी वाढलो, हे माझे सुदैव. रामेश्वरममधील माझे तीन जवळचे मित्र होते रामनाथ शास्त्री, अरविंदन आणि शिवप्रकाश. ते पारंपारिक हिंदू ब्राम्हण कुटुंबातून वाढलेले होते. माझ्याशी मात्र, आम्ही सर्व जणू एकाच कुटुंबातील आहोत अशा पद्धतीने ते खेळत असत. मी रामनाथस्वामी मंदिरात सुखाने बसत असे. तेथील वैभवशाली शिल्पकलेचे कौतूक करत असे. म्हटल्या जाणार्‍या प्रार्थना ऐकत असे. काही वेळेला, जवळच्याच कॅथॉलिक चर्च मधील सामुहिक उपदेशही (मासचे सर्मॉन्सही) ऐकत असे.

प्रत्येक धर्माच्या धार्मिक मान्यतांचा रामेश्वरममध्ये सगळेच आदर करत असत. बेटावरील प्रत्येक समाजाच्या धार्मिक उत्सवांत सगळ्यांचाच सहभाग असे. वार्षिक श्री सीता राम कल्याणम समारंभात, माझे वडील आणि माझ्याहून चवदा वर्षे मोठा असलेला माझा भाऊ मराकायेर, छोट्याशा जलाशयातील मध्यावर असलेल्या, राम तीर्थ म्हटल्या जाणार्‍या जागेपर्यंत मूर्ती नेण्यासाठी लागणार्‍या विशिष्ट फलाटाच्या बोटी जुळवत असत.

इथे, माझे वडील आणि भाऊ हे खुल्या समुद्रातील मुस्लिम, छोट्याशा जलाशयात बोट नेऊन प्रार्थना करण्याकरता आपल्या हिंदू बांधवांना मदत करत असत. जैनुलाब्दीन आणि मराकायेर साधे वास्तव समजून होते. समुद्र, नद्या, जलाशये, तलाव आणि निर्झर ही केवळ नावे निराळी असतात; पाणी तर सगळ्यांतच असते, आणि आमची बोटही त्यांवर एकसारखीच तर तरंगत असते. तसेच, धर्मांचे स्वरूपही निरनिराळे असते, पण त्या प्रत्येकांत सत्य असते आणि त्यांच्या लोकांचे आध्यात्मिक जीवनही तेच सांभाळत असतात.

वर्षभर ऊबदार हवामान असलेले एक सुखी आणि मैत्रीपूर्ण व्यवहार करणार्‍या लोकांचे स्थान असले तरी, पंबन बेट काही परिपूर्ण नव्हते. गटागटाने राहतांना, नेहमीच ह्या ना त्या स्वरूपाची आव्हाने समोर येत असतात. स्वातंत्र्यपूर्व भारतातील माझ्या लहानपणीचा काळ, आर्थिकदृष्ट्या कठीणही होता. १९३० सालची तीव्र मंदी, वसाहतवादी राजवटीने लादलेले अवजड कर आणि ब्रिटिश सरकारची संरक्षणात्मक धोरणे, हे सर्व भारतीय लोकांना फारच भारी पडत होते. पंबन बेटावरील लोकांनाही ऊर्वरित देशासोबत आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र बेटावर वस्तूंचा तुटवडा जाणवत असतांनाही, दैनंदिन मुद्दे सोडविण्याकरता विविध धर्मांत संवादाची उणीव नव्हती.

खूप लहान असतांनापासूनच मी विविध धर्मांदरम्यानच्या संवादास साक्ष राहिलो आहे. माझ्या परिवाराच्या घरातील अंगणात नियमितपणे होणारी सम्मेलने माझ्या मनावर कोरली गेलेली आहेत. रामनाथस्वामी मंदिराचे प्रमुख पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्रीगळ, ख्रिश्चन समाजाचे नेते रेव्हरंड फादर बोडल आणि माझे वडील जैनुलाब्दीन; बेटावरील लोकांपुढच्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी, दर काही महिन्यांनी माझ्या घरीच भेटत असत. काही कारणांनी मी ह्या बैठकांची विशेषत्वाने नोंद घेतली, जणू काय त्यांचे भेटणे, ताकाचे पेले किंवा चहाचे कप परस्परांना देणे, गुण्यागोविंदाने गप्पा करणे हे कशाने तरी लक्षणीय होते. मात्र, त्यांच्यासाठी आपल्या छोट्याशा समाजाच्या समस्या सोडवणे पूर्णतः स्वाभाविकच होते. दैनंदिन व्यवहाराचा एक भाग होते.

त्या बैठकांत एक संदेश दडला होता, जो माझ्यासोबत राहिला. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभिक वर्षांइतके आंतरधर्मीय सुसंवादाचे माहात्म्य एरव्ही कधीही सुसंगत भासले नसेल. धार्मिक फूट काही ठिकाणी दरी ठरू लागली आणि मतभिन्नता अनेकदा हिंसेप्रतही नेऊ लागली. उणीव जर कशाची असेल तर ती सहिष्णुतेची नव्हती. ती होती परस्परांप्रतीच्या आदराची. पक्षी लक्ष्मण शास्त्रीगळ, रेव्हरंड फादर बोडल आणि माझे वडील केवळ एक दुसर्‍याच्या श्रद्धांचा आदर करत होते. लोक जर परस्परांच्या श्रद्धा आणि मानमान्यतांप्रती आदर बाळगू लागले तर, सहिष्णुतेची गरजच राहणार नाही. अशा आदरामुळे मग परस्परविरोधास जागाच राहणार नाही.

परस्पर विश्वासावरच पंबन बेटावरील आध्यात्माइतकेच आर्थिक अस्तित्वही टिकून होते. भारताच्या बव्हंशी भागांत लोकांच्या आमदनीचा प्रमुख स्त्रोत शेतीच असतो. पंबन बेटावर मात्र असे नव्हते. बेटावरील वालुकामय माती पीकपाण्यास धार्जिणी नव्हती. नारळ आणि अंजिरांखेरीज फारच थोड्या गोष्टी इथे पिकवल्या जाऊ शकत. बेटावरील अर्थकारण समुद्री उत्पादनांवरच अवलंबून असे. मासे आणि शंख-शिंपली. तसेच ते यात्रेकरूंना मूलभूत सेवा आणि सुविधा पुरवण्यावरही अवलंबून असे.

“उभे राहून पाण्याकडे पाहत राहल्याने काही समुद्र ओलांडता येत नाही.” [३]

तरीही माझ्या कुटुंबाला शेतीचा काहीसा आधार होता. माझ्या वडिलांचे एक छोटेसे माडबन होते. आमच्या घरापासून सहा किलोमीटर दूर. एके काळी आमच्या कुटुंबाच्या उपजीविकेचे ते प्रमुख साधन होते. नंतर, माझ्या वडिलांनी व्यवसायात हात घातला. तरी पण माझ्या लहानपणातील बहुतांश काळात चणचण हेच दररोजचे वास्तव होते. माझ्या माता-पित्यांनी मला सुखाचे बालपण दिले असले तरीही, टोके जुळवण्याकरता त्यांना खूप कष्ट करावे लागत.

जैनुलाब्दीन आणि ऐशम्मा कुटुंबासाठी कराव्या लागत असलेल्या कष्टांनी विचलित होत नसत. मी सकाळी लवकरच उठे. त्यांच्या प्रातःप्रार्थनेनंतर लगेच मी त्यांना कामाला लागलेले पाहत असे. समुद्रातून सूर्य वर येण्यापूर्वीच जैनुलाब्दीन माडबनात रवाना होत असत. मी पहाटेसच घराबाहेर पडून त्यांची नक्कल करत असे. सकाळच्या ताज्या हवेत मी खेळत असे. समुद्री पक्षांचे समूहगान ऐकत असे. माझे वडील मला सांगत असत की, उपजीविकेकरता सुखकर मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच यशप्राप्ती होय.

जैनुलाब्दीन ह्यांना काळासोबत हा मार्ग सापडत गेला. त्यासोबतच यशही प्राप्त झाले. मी जेव्हा सहा वर्षांचा झालो तेव्हा, रामेश्वरम आणि धनुष्कोडी दरम्यान यात्रेकरूंची ने-आण करायला आवश्यक असणारी लाकडी नाव बांधण्याच्या प्रकल्पात त्यांनी पाऊल ठेवले. किनार्‍यावरच, अहमद जैनुलाब्दीन नावाच्या एका नातेवाईकासोबत, नाव बांधण्याचे काम ते करू लागले. अहमद ह्यांनी पुढे जाऊन माझ्या वडील बहिणीसोबत -जोहरासोबत- लग्न केले. त्या दोघांनी पारंपारिक कॅरव्हेल प्लँकिंग [४] पद्धतीने होडी बांधली. ह्यात फळकुटं परस्परांना घट्ट चिकटून आतील दृढ ढाचावर बसवली जात असतात. ह्या पद्धतीने तयार होणारा होडीचा सांगाडा अवजड माल बाळगू शकतो.

माझे वडील आणि अहमद, लाकडाच्या अग्नीद्वारे उभ्या भिंतींच्या लाकडांना सुकवित असतांना, त्यांपासून सांगाडा बनवत असतांना, मी लक्षपूर्वक पाहत किनार्‍यावर बसून राहत असे. माझ्या डोळ्यांना त्यात होडीचा सांगाडा दिसू लागे. लाकडाच्या फळ्या बसवत बसवत, लवकरच समुद्रात झेपावण्याकरता होडी तयार झाली. मी पाहत होतो की, ज्ञान आणि केंद्रिकृत प्रयासांच्या आधारे सामान्य पदार्थांचा वापर करून, अत्यंत उपयुक्त असे काही तरी घडवले जाऊ शकते. लाकडाच्या तुकड्यांपासून होडीपर्यंत घडत जाणारे रूपांतर, खरोखरच आश्चर्यचकित करणारे होते. मला हेही कळले की, होडी बांधणार्‍याला पदार्थांच्या गुणधर्मांची माहिती असावी लागते. माझे वडील मला स्पष्ट करून सांगत असत की, लाकडाचा झीजरोधक गुणधर्म त्याच्या टणकपणानुसार आणि घनतेनुसार बदलत असतो. तसेच, जर पाणी किंवा समुद्री जीव लाकडात घुसू दिले तर लाकडाचा र्‍हास होतो.

बोटीचा व्यवसाय खूप यशस्वी ठरला. कित्येकदा मीही वडिलांसोबत, यात्रेकरूंकडून बसमधल्या कंडक्टरप्रमाणे भाड्याची नाणी गोळा करण्यासाठी, बोटीवर जात असे. इथून श्रीलंकेत जाण्याकरता श्री रामांनी वानरसेनेच्या साहाय्याने पूल कसा बांधला; श्री रामांनी सीतेला परत कसे आणले, मग ते पुन्हा रामेश्वरमला कसे थांबले, रावणाचा वध केला (त्याचा पश्चात्ताप) म्हणून त्यांनी तपश्चर्या कशी केली; श्री हनुमंतास मोठे शिवलिंग आणण्याकरता उत्तरेत कसे पाठवले होते, पण त्यास आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागतांना पाहून, पूजेस वेळ लागू नये म्हणून श्री सीतामाईंनी स्वहस्तेच लिंग कसे तयार केले ह्या कहाण्या मी अशा खेपांदरम्यानच ऐकल्या होत्या.

ह्या कहाण्या आणि इतरही अनेक कथा माझ्या अवती भोवतीच फिरत होत्या. भारतभरातून बोटसेवेचा लाभ घेण्याकरता येणारे जे लोक तिथे जमा होत असत, त्या लोकांच्या तोंडातून निरनिराळ्या स्वरूपात, त्या बाहेर येत असत. आयुष्यात खूप लहान असतांनाच आपला देश खरोखरीच खूप विशाल असल्याचे मला समजून आले. जरी एका भागातील लोक दुसर्‍या भागातील लोकांपेक्षा खूपच वेगळे दिसत असले तरी, आणि जरी ते खूपच निरनिराळ्या भाषा बोलत असले तरीही; सर्वांना एका सूत्रात बांधणारा काहीतरी गुणधर्म असल्याचेही माझ्या लक्षात आले. कदाचित त्याची व्याख्या करणे अवघड ठरेल. पण मला स्पष्टपणे एक निश्चित भारतीय गुणधर्म आपल्या भूमीतील त्या सर्व लोकांत असल्याचे जाणवले. भारतीयांना त्यांच्या समृद्ध संस्कृतीशी जोडणारा एक विशेष, सखोल संबंध मला दिसून आला. त्यामुळे त्यांना स्थळाचे भान आले आणि उद्देश प्राप्त झाला. हजारो वर्षांपासूनच्या परंपरा भारतात आजही जाग्या आहेत. इतिहास, मूळ आणि संस्कृतीची जाण नसलेले लोक, मूळ नसलेल्या वृक्षासारखेच आहेत.

शिक्षक मुलांत सृजनात्मक अभिव्यक्तीचा आनंद आणि जाण जागवतो.[५]

जेव्हा मी पाचवीत शिकत होतो तेव्हा, आमचे एक शिक्षक शिव सुब्रमण्यम अय्यर ह्यांनी, एक धडा शिकवत असतांना माझ्या मनावर एक अमिट छाप उमटवलेली होती. पक्षी कसे उडतात त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याकरता ते आम्हाला किनार्‍यावर घेऊन गेले. त्या दिवशी सी-गल पक्षांना उडतांना पाहून असेल म्हणा किंवा लाटांवर तरून जात असतांनाच्या हवेतील त्यांच्या कसरती पाहूनच मला अवकाश-शास्त्रात कारकीर्द घडविण्याची प्रेरणा मिळाली होती.

अय्यर ह्यांनी एका पक्षाचे चित्र फळ्यावर काढले, पंख दाखवले, शेपटी, धड आणि मस्तकही दाखवले. हे सगळे त्यांनी पक्षाच्या भरारीबाबतचे शिक्षण देण्यासाठी केले. पंख फडफडवून पक्षी उचल कशी मिळवतात हे त्यांनी विस्ताराने समजावून सांगितले. त्यांनी वर्गास हेही सांगितले की, पक्षी उडत असतांना दिशा बदलवण्याकरता पंख निरनिराळ्या कोनात कसे मुडपतात.

जेव्हा त्यांनी वर्गास विचारले की, आम्हाला पक्षी कसे उडतात हे कळले आहे ना? तेव्हा मी उठून उभा राहिलो आणि प्रामाणिकपणे कबूल केले की मला ते कळलेले नाही. आमचे शिक्षक विचलित झाले नाहीत. त्यांनी फक्त, वर्गास पक्षी उडतांना पाहण्याकरता समुद्र किनार्‍यावर नेले. त्या दिवशी मला उमगले की पक्षास स्वतःच्या जैवबलाचे आणि उडण्याच्या प्रेरणेचे सामर्थ्य असते. ते सामर्थ्य म्हणजे त्याची इच्छाशक्ती. शिव सुब्रमण्यम अय्यर ह्यांच्या धड्याने केवळ पक्ष्यांच्या उड्डाणाबाबतची समजच दिली नाही. मला आता पक्ष्यांच्या आकाशात पोहोचण्यामागचा काहीसा अर्थच उमगून आला होता. मी त्यामुळे भारलेलो होतो. त्या क्षणांपासून माझ्यात उडण्याबद्दलचे आकर्षण विकसित झाले.

ऑक्टोंबर १९४२ मध्ये, बंगालच्या उपसागरावर एक शक्तिशाली वादळ निर्माण झाले होते. त्यामुळे पंबन बेटावर मुसळधार पाऊस आणि ताशी १६० किलोमीटरहून अधिक वेगाने झेपावणारे वादळ उद्भवले. माझ्या वडिलांच्या माडबनातील वृक्ष पार उखडले गेले आणि त्यांची बोटही फुटली. आम्ही सारे रडलो, पण माझ्या वडिलांनी धीर सोडला नाही. ते केवळ इतकेच म्हणाले की, ’इन्ना लिल्लाही वा इन्ना इलाह्यी राजीऊ’ (म्हणजे आपण सर्व ईश्वराकडूनच आलेलो आहोत आणि ईश्वराकडेच परतही जाणार आहोत). मी जेव्हा ह्या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला तेव्हा ते म्हणाले होते की,

’असे ह्या जगात अनेकदा घडून येत असते की, माणसाचे काहीतरी हरवते, किंवा त्याचेवर काही संकट कोसळते. अशा प्रसंगास ईश्वरी इच्छा समजून, आपण जाणीवपूर्वक आपल्या दुर्दैवास सादर झाले पाहिजे. ईश्वरानेच हे सर्व जग मानवजातीची परीक्षा घेण्याकरताच निर्माण केलेले आहे. इथे लाभ आणि हानी दोन्हीही मानवाच्या चाचणीसाठीच घडून येत असतात. म्हणून माणसास काही लाभते तेव्हा त्याने ईश्वराचा सेवक म्हणून ईश्वराचे आभार मानावेत आणि जेव्हा त्याची काहीशी हानी होते तेव्हा त्याने धीर धरावा. जो असे करू शकेल तोच ईश्वरी परीक्षेत उत्तीर्ण होईल.’

हानीमुळे खचून न जाता वडिलांनी बोट पुन्हा बांधण्याकरता सागवानी लाकडाचे ओंडके विकत आणले. काम करतांना त्यांना पाहत असता मला समजले की, सागवानी लाकडाच्या टिकाऊपणाचे कारण हे असते की त्यास उधई खात नाही. सामान्यतः उधईकरता लाकूड हेच खाद्य असते आणि एकदा का लाकडात त्यांनी शिरकाव केला की, त्या लाकडाची झपाट्याने अवनती होत जाते. मात्र सागाच्या कडवट चवीपायी ते उधईस आवडत नाही. सागाच्या संरक्षणार्थ निसर्गाने त्यास असा गुणधर्म दिलेला आहे की, आक्रमक कीटक त्यापासून दूरच राहतात. निसर्गाच्या पुस्तकातील हे एक पान वाचून, मी ठरवले की, मी माझ्यात असे गुणधर्म विकसित करण्यासाठी झटेन, ज्यामुळे माझे शत्रू माझ्यापासून दूरच राहतील.

बोटीच्या पुनर्बांधणीदरम्यानच्या माझ्या वडिलांच्या कठोर परिश्रमांनी प्रेरित होऊन, मी माझ्या पहिल्या कामास सुरूवात केली. चिंचोके विकण्याच्या. कापड, कागद आणि ज्यूट उद्योगांवर दुसर्‍या महायुद्धाचे सावट असल्याने, अचानकच बाजारात चिंचोक्यांची मागणी वाढली. त्यांच्यापासून बनणारे वाटण, कच्च्या मालाच्या प्रक्रियेकरता एक रसायन म्हणून वापरले जाऊ लागले. मी दारोदार फिरून चिंचोके गोळा करणे आणि व्यापार्‍यांच्या दुकानात जाऊन ते विकून येणे सुरू केले. एका दिवसाच्या कामाचे मोल म्हणून मला चक्क एक आणा मिळत असे. त्या काळात त्यातून एक वेळेचे चांगले जेवण मिळू शके. मी अभिमानाने ते नाणे माझ्या आईकडे घेऊन जात असे आणि सुरक्षित ठेवून देण्याकरता तिला ते देत असे. माझ्या छोट्याश्या उद्योगाने माझे वडील खूश होते. मी त्यांना, माझ्या आईपाशी माझी स्तुती करत असतांना दूरून ऐकलेले होते. ते म्हणाले की, कठोर कष्ट, पैसे वाचवणे आणि स्वयंनियंत्रण काही ह्याकरता महत्त्वाचे नाही की त्यांमुळे संपदा निर्माण होत असते, पण ते ह्याकरता महत्त्वाचे आहे की त्यामुळे चारित्र्य घडत असते.

’मानवी स्वभावातील आपल्याला खूप आवडणारे गुणधर्म अडचणींच्या डोंगरातूनच वाढत असतात.’ [६]

माझ्या कामाची दुसरी आघाडी वर्तमानपत्र वाटपाची होती. जगभरातील तरूणांकरता हा सर्वात सामान्य असा पहिला रोजगार असतो. भारतास मित्र राष्ट्रांसोबत जबरदस्तीने जोडून घेण्यात आलेले होते. समुद्रातून होऊ शकणारे जपानी आक्रमण रोखण्यासाठी, आपली सैन्यदले पंबन क्षेत्रात तैनात केली गेली. रामेश्वरम स्थानकावरील आगगाडीचा थांबा काढून टाकण्यात आला. धनुष्कोडीच्या अंत्य स्थानकाप्रत जात असता, गाड्या रामेश्वरम स्थानकावरून पुढे निघून जात. माझे चुलत भाऊ शमसुद्दिन ह्यांनी, गार्डच्या डब्यातून चालत्या गाडीतून फेकलेले वृत्तपत्रांचे गठ्ठे गोळा करण्याचे आणि दारोदार पोहोचविण्याचे काम मला सोपवले.

मी ते काम करत असतांना, त्या वृत्तपत्रांच्या पानांवर छापलेल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या फोटोंकडे माझे लक्ष वेधले गेले. मी रोमांचित झालो. स्वतंत्र भारताची संकल्पना प्रथमच झपाट्याने साकारत होती.

दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस हे स्पष्ट झाले की, भारत लवकरच ब्रिटिश हुकुमतीतून मुक्त होणार. गांधीजींनी घोषित केले की, ’भारतीयच स्वतःच्या भारताची उभारणी करतील’. अपूर्व अशी उमेद हवेत भरून राहिली होती. नवीन राष्ट्राच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी माझा परिवार उत्सुक होता. जेव्हा रामेश्वरममध्ये पहिली पंचायत बोर्डाची निवडणूक झाली तेव्हा माझे वडील तिचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

माझ्या वडिलांकडून एक अशी घटना घडली जी मला खूप काही शिकवून गेली. एकदा दुपारी मी माझा धडा घरातच मोठ्याने वाचत होतो. त्याच वेळी एक पाहुणा आला आणि त्याने माझे वडील आहेत का असे विचारले. मी त्यांना असे सांगितले की ते नमाजाकरता गेले आहेत. ते म्हणाले की, मी त्यांच्याकरता काही घेऊन आलेलो आहे. ते तू ठेवून घेशील का? मी माझ्या आईला संमतीकरता विचारले. पण तीही प्रार्थनेत गुंतलेली होती. तिने लक्षच दिले नाही. मी त्यांना कपड्यांचा तो गठ्ठा पलंगावर ठेवायला सांगितला आणि मी माझ्या अभ्यासास लागलो.

जेव्हा माझे वडील परतले तेव्हा त्यांनी तो गठ्ठा बघितला. हे काय आहे? त्यांनी मला विचारले. इथे कोण ठेवून गेलंय? मी त्यांना सांगितले की, ’कोणीतरी आले होते आणि त्यांनी हे तुमच्याकरता इथे ठेवलेले आहे.’ ते रागावले आणि त्यांनी मला फैलावरच घेतले. मी घाबरलो आणि रडू लागलो. माझ्या आईने मला जवळ घेतले आणि ती माझे सांत्वन करू लागली. जेव्हा माझ्या वडिलांचा राग निवळला तेव्हा त्यांनी प्रेमपूर्वक माझ्या खांद्यावर स्पर्श केला आणि मला कधीही, कुणाकडूनही अयोग्य अशी भेट न स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला सांगितले की, अशा भेटीमागे काही दडलेले हेतू असू शकतात आणि म्हणूनच ते धोकादायक ठरू शकतात. एखादा साप हातात द्यावा तसेच ते आहे. तो साप केवळ तुम्हाला चावून विष चढवू शकतो.

भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. खरे स्वातंत्र्य आणि मुक्तता मात्र योग्य ते करण्यातच असू शकते. एका अनोळखी आंतरिक आवाजाने मला सांगितले की, माझ्या लहानशा निवांत शहरातील सौख्य सोडून आता बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे. जर तुम्ही तुमचे बाल्य घेऊन बाहेर पडाल, तर तुम्ही तुमच्या खर्‍या सामर्थ्याप्रत कधीच पोहोचू शकणार नाही. रामनाथ ह्या जिल्ह्याच्या मुख्यालयात जाऊन उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांची अनुमती घेतली. माझी आई साशंक होती, तरीही अंतिमतः तिने अनुमती दिली. ती माझ्याकरता एखाद्या मोठ्या वृक्षाप्रमाणे होती, ज्याच्या छायेत माझा सर्व समस्यांपासून बचाव होत आला आहे. तिने मी चिंचोके विकून आणि वर्तमानपत्रे टाकून कमावलेली सर्व नाणी आणली आणि म्हणाली की, त्यांचा माझ्या शाळेची फी भरण्यासाठी उपयोग होईल. मी नको म्हटल्यावर ती म्हणाली की, ’आया फक्त देतच असतात.’

मी आई-वडिलांना रामेश्वरममधील घरीच सोडून माझा थोरला चुलत भाऊ शमसुद्दिन आणि जावई अहमद जलालुद्दिन ह्यांच्यासोबत प्रवास करून रामनाथ मधील श्वार्झ हाय स्कूलमध्ये गेलो. मी माझ्या नव्या शाळेत ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्या नावानेच दाखल झालो. ए. पी. आणि जे ही माझी अद्याक्षरे माझे कूळ दर्शवतात. माझ्या पणजोबांचे नाव होते अवूल. त्यांच्याकरता ए. माझ्या आजोबांचे नाव होते पकीर. त्यांच्याकरता पी. आणि माझ्या वडीलांचे नाव होते जैनुलाब्दीन. त्यांच्याकरता जे.



[१] ईद व्यान (१८८६-१९६६) हे एक अमेरिकन अभिनेते आणि विनोदी कलाकार होते. त्यांचा १९६१ मधील चित्रपटअब्सेंट माईंडेड प्रोफेसर”, हा चित्रपट डॉ.कलामांचा आवडता होता.

[२] ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अरूण तिवारी, विंग्ज ऑफ फायर, युनिव्हर्सिटी प्रेस, १९९९, पृ.८.

[३] रबिंद्रनाथ टागोर (१८६१-१९४१) ह्यांना आधुनिक भारतीय उपखंडातील उत्कृष्ट सृजनात्मक कलाकार मानले जाते. १९१३ साली त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. युरोपीय नसून साहित्यातील नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती होते. “व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय” ही त्यांची कविता राष्ट्रपती डॉ.कलामांनी स्वतःच्या टेबलावर ठेवलेली होती.

[४]  एक लहान पण वेगवान स्पॅनिश वा पोर्तुगीज होडी, जी १५ व्या ते १७ व्या शतकात वापरली जात असे.

[५] अल्बर्ट आईन्स्टाईन (१८७९-१९५५) हे एक जर्मनीत जन्मलेले भौतिक शास्त्रज्ञ होते. ते वस्तुमान व ऊर्जा ह्यांतील समत्वाच्या E= mc2 ह्या सूत्राकरता विख्यात आहेत. त्यांना १९२१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकही प्राप्त झाले होते. डॉ.कलामांनी २८ मे २००५ रोजी, राष्ट्रपती ह्या नात्याने स्वित्झर्लँडला दिलेल्या शासकीय भेटीदरम्यान त्यांच्या पूर्वीच्या घरासही भेट दिली होती.

[६] हॅरी इमर्सन फॉस्डिक (१८७८-१९६९) हे एक अमेरिकन धर्मगुरू होते, ज्यांना मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर, ’ह्या शतकातील सर्वात थोर धर्मोपदेशक’ मानत असत. डॉ.कलाम फॉस्डिक ह्यांच्या खालील ओळी गात असत, ’लीलेच्या ईश्वरा आणि वैभवाच्या ईश्वरा, आम्हाला असे शहाणपण द्या, असे धैर्य द्या की ज्यामुळे आम्ही तुमच्या साम्राज्याचे उद्दिष्टच विस्मरू नये’.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.