२०२०-१०-०३

स्तोत्रानुवाद-०७: ईशावास्य उपनिषदाचा मराठी अनुवाद

ईशावास्य उपनिषदाचा मराठी अनुवाद

विद्येने अमरत्व प्राप्त करतो - नरेंद्र गोळे २०२००४०८

 

ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्

जगती गतिस्थ सारे ईश्वरार्थ उभे असे
नसे माझे असे भोगा, पराचे धन ना हरा

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः
एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे

कर्म करतची येथे शतायू ईप्सिते धरा
तेव्हाच, एरव्ही नाही, नरा कर्म न वेढते

असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसावृताः
तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः

आत्म्यास मारते लोक, पोहोचती लोकी अशा
असूर्यगणती ज्याला, अंधारे ग्रासले असे

अनेजदेकं मनसो जवीयो
नैनद्देवा आप्नुवन् पूर्वमर्षत्‌
तद्धावतोऽन्यानत्येति तिष्ठत्
तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति
- उपजाति

मनाहुनी वेग स्थिरास आहे
पोहोचला, ईश न जेथ कोणी
गतीस्थ तो, थांबत जेथ सारे
वायू तिथे देत जनांस नीरे
-    उपजाती

अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते
ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः

आराधती अविद्येला अंधारात प्रवेशती
विद्या आराधती जे ते घोर अंधारि जात हो

अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया
इति शुश्रुम धीराणां ये नस्तद्विचचक्षिरे

विद्येने लाभते एक अविद्येनेहि वेगळे
ऐकले ते, शहाण्यांनी लक्षात आणुनी दिले

विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते

विद्या व अविद्येसह, जाणे ब्रम्हास एकत्र
जिंके मृत्यू अविद्येने, विद्येने अमृतास तो


प्रस्तुत वेचा ईशावास्योपनिदातून संकलित केलेला आहे. ईशावास्यम्‌ ह्या अक्षरांपासून सुरूवात झाल्याने ह्यास ईशावास्योपनि अशी संज्ञा दिलेली आहे. हे उपनिषद यजुर्वेदाच्या माध्यंदिन तसेच कण्व संहितेचा ४० वा अध्याय आहे, ज्यात १८ मंत्र आहेत. ह्या संकलनातील दोन मंत्रांत, ईश्वराचे सर्वव्यापीत्व दर्शवत, कर्तव्य भावनेने काम करणे तसेच त्यागपूर्वक विश्वातील पदार्थांचा उपयोग आणि संरक्षण करण्याचा निर्देश दिलेला आहे. आत्मस्वरूप ईश्वराचे व्यापकत्व जे लोक स्वीकारत नाहीत, त्यांचे अज्ञान तिसर्‍या मंत्रात दर्शवलेले आहे. चौथ्या मंत्रात चैतन्यस्वरूप, स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी आत्मतत्त्वाचे निरूपण केलेले आहे. पाचव्या व सहाव्या मंत्रांत अविद्या म्हणजे व्यावहारिक ज्ञान तसेच विद्या म्हणजे आध्यात्मिक ज्ञान ह्यांवर सूक्ष्म चिंतन केलेले आहे. अखेरचा मंत्र व्यावहारिक ज्ञानातून लौकिक अभ्यूदय तसेच अध्यात्मज्ञानाने अमरत्व प्राप्त होते असे सांगत आहे. ह्या वेच्यातून असा संदेश प्राप्त होत आहे की, लौकिक आणि आध्यात्मिक विद्या परस्परपूरक असतात तसेच मानवी जीवनाची परिपूर्णता आणि सर्वांगिण विकासात समान महत्त्व बाळगतात.

संदर्भः संस्कृत शाश्वती-२, इयत्ता-१२ वी चे पुस्तक, पहिला वेचा, प्रकाशक- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद, २०१९-२०.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.