२०१३-०५-०७

युईंग्ज अर्बुदे-भाग एकूण ६ पैकी ३


युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांकन कसे केले जाते?

एकदा युईंग्ज अर्बुदांचे निदान झाले की कर्काची अवस्था (आणि कर्कप्रसाराच्या मर्यादा) निर्धारित करण्याकरता चाचण्या केल्या जातात. युईंग्ज अर्बुदांची अवस्था ही, व्यक्तीचे पेरिप्रेक्ष्य (रोग वा आजाराची संभाव्य वाटचाल) निर्धारित करण्यात आणि नंतर उपचारांची निवड करण्यात एक महत्त्वाचा घटक असते.

युईंग्ज अर्बुदांचे निदान कसे केले जाते?” ह्या अनुभागात वर्णिल्याप्रमाणे, चित्रक चाचण्या व मुख्य अर्बुद आणि इतर ऊतींच्या नमुना-निष्कर्षण-शल्यक्रिया यांचे फलस्वरूपच अवस्थांकन केले जात असते.

अवस्थांकन प्रणाली हा एक प्रमाणित मार्ग असतो, ज्याद्वारे कर्क-निगा-चमू कर्क-प्रसाराच्या मर्यादांचे वर्णन करत असते. युईंग्ज अर्बुदांकरताची, औपचारिक (आणि अधिक तपशीलवार) अवस्थांकन प्रणाली आहे “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर” ह्यांची प्रणाली. जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला तिचा संदर्भ दिला तर, तुम्हाला कळण्यास मदत व्हावी म्हणून, इथे तिचे वर्णन केलेले आहे. मात्र व्यवहारातील उद्दिष्टांकरता, डॉक्टर्स बहुधा साध्या प्रणालीच वापरत असतात, ज्यात स्थानिक किंवा प्रसार-अवस्था-गटांत, युईंग्ज अर्बुदांची वर्गवारी केली जात असते. हिचे वर्णन खालीही दिलेले आहेच.

अस्थी-कर्काकरताची “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर” ह्यांची अवस्थांकन प्रणाली

बहुतेक कर्क-प्रकारांकरता, “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर”ने एक अवस्थांकन प्रणाली विकसित केलेली आहे. “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर” ही संस्था, सर्व अस्थी-कर्कांच्या वर्णनाकरता एकच अवस्थांकन प्रणाली वापरते. (जे कर्क अस्थीत सुरू होत नाहीत अशा) अस्थीबाह्य युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांकन निराळ्या प्रकारे केले जाते. त्यांचे अवस्थांकन मऊ ऊतींच्या मांस-अर्बुदांप्रमाणे केले जाते.मऊ ऊतींच्या मांस-अर्बुदांचे अवस्थांकनाबाबतची माहिती, आमच्या “मांस-अर्बुदः प्रौढ मऊ ऊतींचा कर्क”, ह्या नावाने ओळखल्या जाणार्‍या दस्तात मिळू शकेल. अस्थी-कर्काकरताची “अमेरिकन जॉईंट कमिटी ऑन कॅन्सर”ची अवस्थांकन प्रणाली चार कळीच्या माहिती-तुकड्यांवर आधारलेली असते, ज्यांना इंग्रजी टी., एन. एम. आणि जी. ह्या अक्षरांनी व्यक्त केले जाते.

टी.    हा तुकडा, मुख्य (प्राथमिक) अर्बुदा (ट्युमर वरून टी.) च्या आकाराचे वर्णन करतो आणि अस्थीच्या निरनिराळ्या भागांत तो आढळून येतो की नाही ते सांगत असतो.
एन.   हा तुकडा, नजीकच्या (स्थानिक) लसिका-जोडां (नोड वरून एन.) तील प्रसाराच्या मर्यादांचे वर्णन करतो. लसिका जोड म्हणजे लहान, वालाच्या आकाराच्या अबाधित-प्रणाली-पेशींचा संग्रह. अस्थी-अर्बुदे क्वचितच लसिका-जोडांत प्रसृत होत असतात.
एम.   हा तुकडा, शरीराच्या इतर अवयवांत कर्क-प्रसार (मेटॅस्टॅसाईझ्ड वरून एम.) झालेला आहे किंवा नाही ते सूचित करत असतो. (सर्वात सामान्य प्रसाराच्या जागा ह्या फुफ्फुसे अथवा इतर अस्थी ह्या असतात).
जी.   हा तुकडा, अर्बुदाच्या दर्जाचा (ग्रेडकरता जी.) निदर्शक आहे, जो निष्कर्षित नमुन्यांतील पेशी सूक्ष्मदर्शकाखाली कशा दिसतात ह्याचे वर्णन करत असतो. निम्न-दर्जाच्या-अर्बुद-पेशी सामान्य पेशींसारख्या जास्त दिसतात आणि त्या झपाट्याने वाढणे अथवा त्यांचा झपाट्याने प्रसार होणे संभवनीय नसते; तर उच्च-दर्जाच्या-अर्बुद-पेशी अधिक अपसामान्य दिसतात. (सर्वच युईंग्ज अर्बुदे उच्च-दर्जाची-अर्बुदे मानली जातात).

टी., एन. एम. आणि जी. ह्या अक्षरांपाठोपाठ येणारे अंक अथवा अक्षरे ह्या प्रत्येक घटकाबाबत अधिक तपशील पुरवितात.

टी.एन.एम. अवस्था-गट

एकदा का टी., एन. आणि एम. वर्गवारी आणि अस्थीकर्काचा दर्जा निर्धारित झाला की, ही माहिती एकत्रित केली जाते, आणि एकूण अवस्थेच्या स्वरूपात व्यक्त केली जाते. अवस्थेचा अंक देण्याच्या प्रक्रियेस अवस्था-गट-अंकन म्हटले जाते. अवस्था, रोमन आकड्यांत ते IV (१ ते ४) दिल्या जातात आणि काही वेळेस आणखीही विभाजित केल्या जातात.

* सर्व युईंग्ज अर्बुदे जी-४ ह्या उच्च दर्जात वर्गीकृत केली जातात, ज्यामुळे अवस्था-I मधे अस्थी कर्क असत नाही.



स्थलसीमित विरुद्ध प्रसृत अवस्था

व्यवहारातयुईंग्ज अर्बुदांचे सर्वात चांगले उपचार कसे करता येतील ते निर्धारित करण्यासाठी, सोप्याशा अवस्थांकन प्रणालीवर डॉक्टर्स विसंबून असतात. अशा प्रणालीत कर्क, स्थानिकिकृत किंवा प्रसृत अशा अवस्थांत वर्गीकृत केले जातात.

स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे: स्थलसीमित युईंग्ज अर्बुद हे जिथे सुरू झाले त्या एका विशिष्ट भागातच सीमित राहते असे मानले जात असते. ह्यात, स्नायू किंवा अस्थिबंध यांसारख्या जवळपासच्या ऊतींचा समावेश होऊ शकतो. एखादे युईंग्ज अर्बुद हे, चित्रक (क्ष-किरण, संगणित-त्रिमिती-चित्रण-चित्रांकने किंवा चुंबकीय-अनुनादी-चित्रांकने, आणि धन-विजक-उत्सर्जक-त्रिमिती-चित्रण-चित्रांकने अथवा अस्थी-चित्रांकने) चाचण्या आणि अस्थीमज्जा-नमुना-निष्कर्षण व चूषण यांत, इतर दूरस्थ अवयवांत प्रसार नसल्याचे आढळून आल्यानंतरच, स्थलसीमित असल्याचे मानले जाते.

जेव्हा चित्रक चाचण्याही, इतर दूरस्थ अवयवांत प्रसार नसल्याचे दाखवत असतात, तेव्हाही अनेक रुग्णांत सूक्ष्म-प्रसार (चाचण्यांत आढळून न येणारा खूप लहान कर्क-प्रसार) झालेला असू शकतो. म्हणूनच, शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचू शकणारा रसायनोपचार हा, सर्वच युईंग्ज अर्बुदांच्या उपचारातील एक महत्त्वाचा भाग असतो.

प्रसारक्षम युईंग्ज अर्बुद: प्रसारक्षम युईंग्ज अर्बुद हे, जिथे सुरू झाले तिथून शरीराच्या दूरवर असलेल्या भागांत पसरलेले, स्पष्टपणे दिसून येत असते. बहुतेक वेळा, प्रसार हा फुफ्फुसांप्रत किंवा इतर अस्थींप्रत किंवा अस्थीमज्जेप्रत झालेला असतो. प्रसाराच्या कमी प्रचूर असलेल्या जागांत यकृत आणि लसिका-जोडांचा समावेश होत असतो.

सुमारे चार रुग्णांतील एका रुग्णात, प्रसार झाल्याचे चित्रक चाचण्यांत उघडपणे आढळून येते. पण वर उल्लेख केल्यानुसार, इतर अनेक रुग्णांत, शरीराच्या इतर भागांत लहान प्रमाणातील कर्क-प्रसार झालेला असू शकतो, जो चित्रक चाचण्यात दिसून येत नाही.

अवस्थांनुरूप युईंग्ज अर्बुदांतून वाचणार्‍यांचा टिकावदर

व्यक्तीच्या रोगनिदानात्मक परिप्रेक्ष्याची चर्चा करतांना, डॉक्टर अनेकदा टिकावदरांचा उपयोग, प्रमाणित मार्ग म्हणून करत असतात. काही लोकांना, त्यांचेसारख्याच परिस्थितीतील लोकांची टिकाव सांख्यिकी जाणून घेण्याची इच्छा असते, तर इतरांना हे आकडे फारसे उपयुक्त वाटत नाहीत, किंवा त्यांना ते जाणून घेण्याचीही आवश्यकता वाटत नसते. खालील युईंग्ज अर्बुदांकरची टिकाव सांख्यिकी जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा असो वा नसो, ती खाली दिलेली आहे.

५-वर्षे टिकून राहण्याचा दर, म्हणजे कर्कनिदान झाल्यानंतर किमान ५ वर्षे जिवंत राहणार्‍या रुग्णांची टक्केवारी. अर्थातच, अनेक लोक ५-वर्षांनंतरही खूप अधिक जगत असतात (आणि अनेक बरेही होत असतात). ५-वर्षे टिकून राहण्याचा दर प्राप्त करून घेण्यासाठी डॉक्टरांना, निदान पाच वर्षे पूर्वीपासून उपचार दिलेल्या रुग्णांचा शोध घ्यावा लागत असतो. त्यावेळपासून उपचारांत होत असलेल्या सुधारणांमुळे, आज युईंग्ज अर्बुदांचे निदान केले जात असलेल्या रुग्णांकरता अधिक पक्षकर परिप्रेक्ष्य प्राप्त होऊ शकत असते.

टिकावदर अनेकदा भूतकाळातील मोठ्या संख्येतील रुग्णांवर आधारलेले असू शकतात. मात्र, ते एखाद्या विशिष्ट रुग्णाच्या प्रकरणात पुढे काय होईल ह्याचे भाकीत करू शकत नाहीत. एखाद्या रुग्णाच्या कर्काची अवस्था, परिप्रेक्ष्याचे अनुमान करण्याकरता महत्त्वाची असते. पण वय, अर्बुदाची जागा, आणि कर्क उपचारांस कसा प्रतिसाद देत आहे इत्यादी इतर अनेक घटकही रुग्णाचे परिप्रेक्ष्य प्रभावित करत असतात.

स्थलसीमित अर्बुदेः स्थलसीमित युईंग्ज अर्बुदांच्या रुग्णांकरताचा आधुनिक उपचारांमुळे एकूण ५-वर्ष-टिकावदर हा सुमारे ७०% असतो.

प्रसारक्षम अर्बुदेः निदानाच्या वेळी, कर्क आधीच प्रसृत झालेला असल्याने, ५-वर्ष-टिकावदर हा सुमारे १५ ते ३०% असतो. कर्क प्रसार इतर अवयवांपर्यंत न पोहोचता केवळ फुफ्फुसांपर्यंतच मर्यादित राहिला तर, टिकावदर किंचित बरा राहत असतो.

रोगनिदान प्रभावित करणारे इतर घटकः कर्काच्या अवस्थेव्यतिरिक्त इतर घटकही टिकावदर प्रभावित करत असतात. पक्षकर रोगनिदानाशी जोडले गेलेल्या घटकांत खालील घटकांचा समावेश होत असतो.

  • लहान अर्बुद आकार
  • मुख्य अर्बुद (छाती किंवा पुठ्ठ्यावर असण्याऐवजी) हाता-अथवा-पायावर स्थित असणे
  • रक्तातील सामान्य एल.डी.एच. पातळ्या
  • रसायनोपचारास अर्बुदाचा मिळणारा पक्षकर प्रतिसाद
  • वय १० वर्षांपेक्षा कमी असणे

ह्या घटकांना विचारात घेत असतांनाही, टिकावदर केवळ सर्वोत्तम अनुमानेच असत असतात. तुमच्या मुलाचे डॉक्टर हे सांगू शकतील की, हे आकडे कितपत लागू पडतात, कारण ते तुमच्या मुलाच्या विशिष्ट परिस्थितीशी अवगत असतात.

युईंग्ज अर्बुदांवर उपचार कसे केले जातात?

ही माहितीअमेरिकन-कॅन्सर-सोसायटीच्याकर्क-माहिती-विदागार (डाटाबेस)-संपादन-महामंडळात काम करत असलेले डॉक्टर्स आणि परिचारिका ह्यांचे दृष्टीकोन व्यक्त करते. हे दृष्टीकोन वैद्यकीय नियतकालिकांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या अभ्यासांच्या आणि त्यांच्या व्यक्तिगत व्यावसायिक अनुभवांच्या समाकलनांवर आधारलेले असतात.

ह्या दस्तातील उपचारांबाबतची माहिती म्हणजे अमेरिकन-कॅन्सर-सोसायटीचे अधिकृत धोरण नव्हे आणि तुमच्या कर्क-निगा-चमूची विशेषज्ञता आणि निदान ह्यांना पर्यायी वैद्यकीय सल्ला म्हणून तिचा उपयोग व्हावा असा उद्देश नाही. ह्या माहितीचा उपयोगतुम्हालातुमच्या कुटुंबाला आणि डॉक्टरांनामाहितीचे आधारे निर्णय घेण्यास मदत म्हणून व्हावा असा उद्देश आहे.

तुमचे डॉक्टरांना ह्या सर्वसामान्य उपचार पर्यायांहून निराळी उपचार योजना सुचवण्यास कारणे असू शकतात. त्यांना तुमच्याकरता निवडलेल्या उपचार पर्यायांबाबतचे प्रश्न विचारायला संकोच करू नये.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांचा आढावा

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे असतात.
१.      रुग्णास बरे करण्याचा प्रयत्न करणे
२.      शरीराच्या प्रभावित भागांचे बहुतांशी कार्य, शक्य तितके शाबूत राखणे
३.      उपचारांच्या दीर्घकालीन गुंतागुंती किमान राखणे

ही उद्दिष्टे साध्य करण्याकरता, अनेक प्रकारच्या डॉक्टरांचा आणि विशेषज्ञांचा समावेश असलेली चमू पद्धत आवश्यक असते. रुग्णास सर्वोत्तम उपचार आणि जगण्याची सर्वोत्तम संभाव्य गुणवत्ता प्राप्त करवून देण्यासाठी; शल्यविशारद, वैद्यकीय अथवा बाल्य अर्बुद-विशेषज्ञ, प्रारण-अर्बुद-विशेषज्ञ, रोगनिदानतज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि पुनर्वसन विशेषज्ञ एकत्रितरीत्या काम करतात. बालकांकरता आणि कुमारांकरता हे काम मुलांच्या कर्ककेंद्रातच सर्वोत्तमरीत्या साधले जाऊ शकत असते.

युईंग्ज अर्बुदे असलेल्या बहुतेक रुग्णांना वैद्यकीय-चाचण्यांत, मसुदा (प्रोटोकोल) म्हटल्या जाणार्‍या राष्ट्रीय-उपचार-मार्गदर्शक-तत्त्वांनुसार उपचार दिले जात असतात. अमेरिकेत, काही सर्वात यशस्वी मसुदे (प्रोटोकोल्स), बाल्य-अर्बुदशास्त्र-गटाने आणि त्यांच्या पूर्व-संस्थांचे (फोर-रनर्स) आहेत. युरोपातील अशांसारख्या गटांच्या अभ्यासांनीही खूपच महत्त्वाची माहिती प्राप्त केलेली आहे. युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांतील सर्वात प्रगत उपचार, ह्याच वैद्यकीय चाचण्यांतून प्राप्त झालेले आहेत.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांच्या प्रकारांत शल्यक्रिया, रसायनोपचार आणि प्रारणोपचारांचा समावेश होत असतो. बहुतेक सर्व प्रकरणांत रसायनोपचार प्रथम दिले जातात. स्थलसीमित उपचारपद्धती (शल्यक्रिया आणि किंवा प्रारणोपचार) त्यानंतर वापरल्या जात असतात. अनेकदा त्यानंतरही आणखी रसायनोपचार दिले जात असतात.

पुढील काही अनुभाग युईंग्ज अर्बुदांकरता वापरल्या जाणार्‍या उपचारांच्या प्रकारांचे वर्णन देतील. त्यानंतर कर्काच्या अवस्थेवर (मर्यादेवर) आधारित सर्वात सामान्य उपचार पद्धतींची वर्णने दिलेली आहेत.

युईंग्ज अर्बुदांकरताच्या रसायनोपचार पद्धती

रसायनोपचार (केमोथेरपी किंवा नुसतेच केमो) कर्कविरोधी औषधांचा वापर करतात. ही औषधे शिरेतून किंवा तोंडावाटे (गोळ्यांच्या स्वरूपात) दिली जातात. ही औषधे रक्तात उतरून शरीराच्या सर्व भागांत पोहोचतात.

युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांकन कसे केले जाते?” हा अनुभाग असे नोंदवितो की, स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे असणार्‍या रुग्णांच्या अस्थीमज्जा-नमुन्यांत किंवा चित्रक-चाचण्यांत उघड कर्कप्रसार झालेला दिसत नसतो. तरीही ह्यापैकी अनेक रुग्णांत कर्कप्रसाराची लहान लहान क्षेत्रे असतात, जी अशा चाचण्यांत दिसण्याचे दृष्टीने खूपच लहान असतात. अशा रुग्णांना जर रसायनोपचार दिले गेले नाहीत तर, असे लहान प्रसार पुढे मोठ्या अर्बुदांत विकसित होऊ शकत असतात.

म्हणूनच युईंग्ज अर्बुदे असणार्‍या जवळपास सर्व रुग्णांच्या उपचारांचे, रसायनोपचार हे एक भाग असतात. प्रातिनिधिकरीत्या हे उपचार म्हणजे पहिल्यांदा दिले जाणारे उपचार असतात, त्यानंतर शल्यक्रिया केली जाते आणि / किंवा प्रारणोपचार दिले जातात. त्यानंतरही अनेकदा रसायनोपचार दिले जातात.

युईंग्ज अर्बुदे असणार्‍या रुग्णांच्या उपचारारार्थ अनेक रसायनौषधींचा संयोग उपयोगात आणला जातो. अमेरिकेत, अशाप्रकारचे दोन संयोग आलटून पालटून प्रत्येकी २ ते ३ सप्ताहांनी दिले जाणे हे सर्वसामान्य आहे (ह्यालाच व्ही.ए.सी./आय.ई. रेजिमेन म्हणून ओळखले जाते). औषधांच्या पहिल्या संचात व्हिन्क्रिस्टाईन, डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) आणि सायक्लोफॉस्फॉमाईड ह्यांचा समावेश होत असतो. ह्या औषधांच्या प्रभावांतून रुग्ण सावरल्यावर, औषधांचा दुसरा संयोग दिला जातो. ह्यात ईफॉस्फॉमाईड आणि एटोपोसाईड ह्यांचा समावेश होत असतो. काही डॉक्टर औषधांचे काहीसे निराळे संयोगही वापरू शकतात.

अर्बुदास शल्यक्रियेपूर्वी किंवा प्रारणोपचारांपूर्वी रसायनोपचार निदान १२ ते २४ सप्ताह तरी दिले जातात आणि त्यानंतरही दिले जातात (बहुधा एकूण १४ ते १५ आवर्तनांपर्यंत). जर अर्बुद पसरले असेल तर, हीच औषधे वाढत्या मात्रेत दिली जाऊ शकतात.

युईंग्ज अर्बुदांचे निदान झाल्यावर लगेचच (आणि रसायनोपचार सुरू करण्यापूर्वी), डॉक्टर एक शिरा-प्रवेशन-साधन रुग्णाच्या छातीतील मोठ्या शिरेत शिरवण्यास सुचवतील. हे साधन हा एक प्रवेशक (पोकळ नळी) असतो जो शल्यक्रियेद्वारे रुग्णास संपूर्ण भूल देऊन शिरवला जात असतो. ह्या प्रवेशकाचे एक टोक शिरेत राहते, तर दुसरे टोक जेमतेम त्वचेच्या आत अथवा बाहेर राहते. ह्यामुळे आरोग्य-निगा-चमूस रसायने आणि इतर औषधे रक्त-प्रणालीत शिरवणे, तसेच प्रत्येक वेळी शिरेस टोचावे न लागता रक्त-नमुने काढून घेणे शक्य होते. हे साधन बहुधा अनेक महिनेपर्यंत जागीच राहू शकते. ह्यामुळे रसायनोपचार घेणे रुग्णासाठी कमी दुःखमय ठरते. तुमच्या मुलाच्या बाबतीत असे साधन वापरलेले असल्यास, आरोग्य-निगा-चमू तुम्हाला त्याची काळजी कशी घ्यावी शिकवेल, जेणे करून संसर्गासारख्या समस्येचा धोका घटवता येईल.


रसायनोपचारांचे संभाव्य उप-प्रभाव

रसायनौषधे जलदीने विभाजित होणार्‍या पेशींवर आक्रमण करत असतात, म्हणूनच ती कर्कपेशींविरुद्ध कार्य करत असतात. पण अस्थीमज्जेतील, तोंड व आतड्याच्या अस्तरांतील तसेच केशमुळांतील पेशींसारख्या शरीरातील इतर पेशीही जलदीने विभाजित होत असतात. ह्या पेशीही त्यामुळे रसायनोपचारांनी प्रभावित होऊ शकतात, ज्यामुळे उप-प्रभाव निर्माण होत असतात.

प्रौढांपेक्षा मुलांना रसायनोपचार अधिक लाभदायक ठरतात. त्यांना होणारे उप-प्रभाव कमी गंभीर असतात आणि ते त्यांतून अधिक वेगाने सावरतात. त्यामुळे अर्बुदास मारून टाकण्यासाठी, डॉक्टर मुलांना अधिक मात्रेतील रसायनोपचार देऊ शकतात.

रसायनोपचारांचे उपप्रभाव औषधाच्या प्रकारांवर, मात्रांवर आणि उपचार कालांवर अवलंबून असतात.

सामान्य उप-प्रभावः रसायनौषधांच्या सामान्य उप-प्रभावांत खालील उप-प्रभावांचा समावेश होत असतो.
१.      केस गळणे
२.      तोंड येणे
३.      भूक न लागणे
४.      मळमळ व वांत्या होणे
५.      अतिसार
६.      संसर्गप्रवणता (कमी झालेल्या पांढर्‍या पेशींच्या संख्येमुळे)
७.      सहज जखम वा रक्तस्त्रावप्रवणता (कमी झालेल्या बिंबाणू संख्येमुळे)
८.      थकवा (कमी झालेल्या लाल रक्तपेशींच्या संख्येमुळे)

ह्यांपैकी बहुतांशी उप-प्रभाव अल्पकालीन असतात आणि उपचार संपल्यानंतर नाहीसे होतात. हे उप-प्रभाव कमी करण्याचे उपायही असतात. उदाहरणार्थ, मळमळ व वांत्या रोखण्याकरता किंवा रक्तगणना सामान्य पातळ्यांइतकी होण्याकरता उपयुक्त ठरू शकतील अशी औषधे दिली जाऊ शकतात. उप-प्रभावांबाबत तुम्हाला असलेल्या प्रश्नांची आरोग्य-निगा-चमूशी चर्चा करा.

काही औषधांचे उप-प्रभावः वर सूचित केलेल्या प्रभावांसोबतच, काही रसायनौषधांचे विशिष्ट उप-प्रभावही असू शकतात.

सायक्लोफॉस्फॉमाईड आणि ईफॉस्फॉमाईड हे मूत्राशयास हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे मूत्रात रक्त येऊ शकते. हे घडून येण्याची शक्यता, विपुल प्रमाणात द्रव असलेली औषधे आणि मेस्ना नावाचे मूत्राशय-संरक्षक औषध देऊन घटवली जाऊ शकते. ही औषधे बिजांडकोश किंवा अंडकोशासही हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे प्रजोत्पादनक्षमता प्रभावित होत असते.

डोक्सोरुबिसिन हृदयास हानी पोहोचवू शकते. हे घडून येण्याचा धोका, दिलेल्या औषधाच्या एकूण मात्रेसोबतच वाढत जातो. डॉक्टर्स, संस्तुत मात्रेपेक्षा जास्त डोक्सोरुबिसिन हे औषध न देऊन, आणि उपचारांदरम्यान प्रतिध्वनी-हृदयालेखाद्वारे (ईको-कार्डिओग्राम) तपास करून, हा धोका शक्य तितका कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

व्हिन्क्रिस्टाईन मज्जातंतुंना हानी पोहोचवू शकते. काही रुग्ण, झिणझिण्या किंवा बधीरता येणे अनुभवू शकतात. विशेषतः हाता-पायांत.

युईंग्ज अर्बुदांच्या उपचारार्थ वापरण्यात येणार्‍या, एटोपोसाईड सारखी काही औषधे, नंतर पांढर्‍या रक्तपेशींचा कर्क, जो ऍक्यूट मायलॉईड ल्युकेमिया म्हणून ओळखला जातो तो, विकसित होण्याचा धोका वाढवू शकतात. सुदैवाने, हे वारंवार घडून येत नाही.

दीर्घकालीन उप-प्रभावः काही उप-प्रभाव नाहीसे होत नाहीत किंवा उपचार संपल्यानंतर अनेक वर्षेपर्यंत व्यक्तही होत नाहीत. ह्याकरता खालील उदाहरणे देता येतील.
१.      वंध्यत्व
२.      हृदयहानी
३.      दुसर्‍या कर्काचा विकास

ह्यांपैकी काही दीर्घकालीन प्रभाव “युईंग्ज अर्बुदांच्या उपचारांनंतर काय होत असते?” ह्या अनुभागात वर्णिलेले आहेत.

रसायनोपचारांचे उप-प्रभाव तपासण्याकरताच्या चाचण्याः प्रत्येक रसायनोपचार घेण्यापूर्वी तुमचे डॉक्टर प्रयोगशालेय चाचण्यांचे निष्कर्ष तपासून, यकृत, मूत्रपिंड आणि अस्थीमज्जा यांची कार्ये व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करून घेतील. नसल्यास रसायनोपचार लांबणीवर टाकावे लागतील किंवा त्यांच्या मात्रा घटवाव्या लागतील.

संपूर्ण-रक्त-गणनेत पांढर्‍या रक्तपेशींचा, लाल रक्तपेशींचा, आणि रक्तातील बिंबाणूंचा समावेश होत असतो. रसायनोपचार ह्या रक्तपेशींची संख्या घटवू शकत असतात. म्हणून रसायनोपचारांदरम्यान आणि रसायनोपचारांनंतरही रक्तगणनेवर बारीक लक्ष ठेवले जात असते. रसायनोपचार दिल्यावर सुमारे दोन सप्ताहांनंतर ह्या पेशी निम्नतम पातळीप्रत पोहोचत असतात. उच्च मात्रा वापरलेल्या असल्यास हे आधीही घडून येऊ शकते.

रक्त-रसायन-चाचण्या रक्तातील काही रसायनांची मोजमाप करतात, ज्या डॉक्तरांना यकृत आणि मूत्रपिंडे कशी कार्ये करत आहेत ते सांगू शकतात. काही रसायनौषधे मूत्रपिंडे व यकृतास हानी पोहोचवू शकत असतात.

जर डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) द्यावयाचे असेल तर, प्रतिध्वनी-हृदयालेखन (हृदयाची ध्वन्यातीत चाचणी) यासारख्या चाचण्या, उपचारांपूर्वी आणि उपचारांदरम्यानही हृदयकार्य जाणून घेण्यासाठी, केल्या जाऊ शकतात.

युईंग्ज अर्बुदांवरील शल्यक्रिया

युईंग्ज अर्बुदांकरता अनेक प्रकारच्या शल्यक्रियांचा उपयोग करता येतो. अर्बुदाच्या आकार आणि स्थानावर, तसेच शरीराच्या प्रभावित भागाचे कार्य शल्यक्रियेमुळे कशाप्रकारे बदलेल ह्यावर अवलंबून निवड करता येते.

मऊ ऊतींतील आणि काही अस्थींतील अनेक अर्बुदे मोठी अपंगिता (डिसऍबिलिटी) किंवा विकृती (डिफॉर्मिटी) आल्याविना, काढून टाकली जाऊ शकतात. हाता-पायांच्या अस्थींतील बहुतांश इतर अर्बुदे, हाता वा पायाचे कार्य प्रभावित झाल्याविना, संपूर्णतः काढून टाकली जाऊ शकत नाहीत.

हाता वा पायातील अर्बुदेः बव्हंशी प्रकरणांत हाता वा पायाचे कार्य अबाधित राखणारी शल्यक्रिया करून, हाता वा पायास मूलतः शाबूत राखून, प्रभावित झालेले संपूर्ण किंवा आंशिक हाड काढून टाकणे शक्य असते. काढून टाकलेले हाड; कलमाद्वारे (शरीरातील इतर भागातील अथवा इतर व्यक्तीतील हाडाने), किंवा धातू वा इतर पदार्थापासून बनवलेल्या अंतर्गत कृत्रिम अवयवाद्वारे (मनुष्यनिर्मित आंशिक वा संपूर्ण हाडाने) बदलवले जाते.

जर अर्बुद पायाच्या वरच्या भागात असेल तर, गुढघ्यासकट मांडीचे हाड काढून टाकले जाऊ शकते. ह्या हाडा व गुढघ्याकरता कृत्रिम हाड आणि गुढघ्याचा सांधा खालच्या भागाशी जोडण्याकरता, बदलवला जाऊ शकतो. मात्र, खालच्या पायाचे भाग काढून टाकणे आणि त्यांची पुनर्बांधणी करणे अवघड असते. अवयव वाचवण्याच्या शल्यक्रियेसाठी दंडाचे हाड उपयुक्त ठरत असते, कारण त्यावर शरीराचे वजन पडत नसते.

अवयव वाचवण्याची शल्यक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. ती करणारा शल्यविशारद विशेष कुशल आणि अनुभवी असावा लागतो. आजूबाजूचे अस्थीबंध, मज्जातंतू, आणि रक्तवाहिन्या आणि शक्यतोवर अवयवाचे कार्य व दर्शन शाबूत राखत; संपूर्ण अर्बुद काढून टाकण्याचे आव्हान त्या शल्यविशारदापुढे असते. मात्र जर कर्क ह्या संरचनांतही वाढला असेल तर, त्याही अर्बुदासोबतच काढून टाकाव्या लागतील. अशा प्रकरणांत प्रारणोपचार किंवा अवयव उच्छेद (संपूर्ण अवयव काढून टाकणे) हाच काही वेळेस सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

विशेषतः बालकांत अंतर्गत कृत्रिम साधन बसवणे आव्हानात्मक असते. वाढत्या वयासोबत बालकातील असे साधन, अधिक लांबीचे करून बसविणेही पारंपारिकरीत्या करावे लागत आलेले आहे. नवीन साधने अतिशय सुलभ करण्यात आलेली आहेत. कुठल्याही अतिरिक्त शल्यक्रियेविनाच त्यातील काहींची लांबी वाढवली जाऊ शकते. त्यांच्यात लहानशी साधने असतात, जी मूळ साधनाची लांबी, मुलाच्या वाढीसोबत आवश्यक ठरणार्‍या लांबीनुरूप वाढवून देऊ शकतात. मात्र, मुलाचे वाढीचे वय सरल्यावर प्रौढ वयात असे कृत्रिम अवयवही बदलावे लागू शकतात.

पायावरील अवयव वाचविणार्‍या शल्यक्रियेनंतर, रुग्णांना चालणे शिकून घेण्यास, सरासरीने सुमारे एक वर्ष लागते. जर रुग्णाने पुनर्वसन कार्यक्रमात भाग घेतला नाही तर, वाचविण्यात आलेला अवयव निकामी ठरू शकतो.

अर्बुद, अवयव बदलविण्यास अवघड जागी असल्याने किंवा अर्बुद, जीवनावश्यक मज्जातंतूंत वा रक्तवाहिन्यांत विस्तारलेले असल्याने, अवयवास गंभीर हानी न पोहोचता; काही मुलांवर अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया करणे शक्य नसते. अशा मुलांना बहुधा शल्यक्रियेऐवजी प्रारणोपचार दिले जातात. क्वचित, प्रभावित अवयवाचा उच्छेद (संपूर्ण अवयव काढून टाकणे) हाच काही वेळेस सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.


छातीच्या भिंतीतील किंवा पुठ्ठ्याच्या हाडातील अर्बुदे

छातीच्या भिंतीतील युईंग्ज अर्बुदांकरता, शल्यविशारदास अनेकदा रोगग्रस्त भाग आणि जवळपासच्या फासळ्याही काढून टाकाव्या लागत असतात. छातीच्या भिंतीतील विकृती बुजविण्याकरता, फासळ्या, मनुष्यनिर्मित पदार्थांनी बदलविल्या जातात. जर मुलाचा कर्क फुफ्फुसांपर्यंत प्रसृत झालेला असेल तर, छाती उघडून फुफ्फुसांतील अर्बुद काढून टाकले जाऊ शकते. ह्या शल्यक्रियेस थोरॅकोटोमी असे म्हणतात. अशा मुलांना अनेकदा प्रारणोपचारही दिले जात असतात.

पुठ्ठ्याच्या हाडातील अर्बुदे शल्यक्रियेने उपचार करण्यासाठी कठीण ठरू शकतात आणि अनेक प्रकरणांत प्रारणोपचार पसंतीचे ठरू शकतात. पण जर अर्बुद सुरूवातीच्या रसायनोपचारांना प्रतिसाद देत असेल तर, शल्यक्रिया (काही वेळेस त्यानंतर प्रारणोपचारही) हाही पर्याय ठरू शकतो. शल्यक्रियेनंतर अनेकदा पुठ्ठ्याच्या हाडांची पुनर्बांधणीही केली जाऊ शकते.

शल्यक्रियेचे संभाव्य उप-प्रभाव

शल्यक्रियेच्या अल्पकालीन उप-प्रभावांत जखम योग्य प्रकारे बरी न होणे, शल्यक्रियेच्या जागी रक्तस्त्राव होणे आणि संसर्ग ह्यांचा समावेश होत असतो. अवयव-वाचविणार्‍या-शल्यक्रियेतील गुंतागुंतींत, निखळणार्‍या वा तुटणार्‍या कलम वा दंड यांचा समावेश होत असतो. शल्यक्रियेपूर्वी वा नंतर घेतल्या जाणार्‍या रसायनोपचार व प्रारणोपचारांमुळे जखम बरी होण्यात अडथळे निर्माण होऊ शकत असल्याने, ह्या गुंतागुंती एरव्हीच्या शल्यक्रियांच्या मानाने अधिक संभाव्य असतात.

शल्यक्रियेपश्चातचे पुनर्वसनः उपचारांचा हाच बहुधा सर्वात कठीण भाग असतो आणि इथली चर्चा त्याचे संपूर्ण वर्णन करू शकत नाही. रुग्ण आणि पालक यांनी पुनर्वसन विशेषज्ञास भेटावे आणि सर्व उपलब्ध पर्याय समजून घ्यावेत.

जर एखादा अवयव काढून टाकलेला असेल तर, रुग्णाने कृत्रिम अवयवासोबत जगणे आणि त्याचा वापर करणे शिकून घ्यायला हवे. विशेषतः वाढत्या वयातील मुलांकरता, जर वाढत्या वयासोबत कृत्रिम अवयव बदलावा लागला तर, हे अवघड ठरू शकते.

जेव्हा अवयव-वाचविणार्‍या-शल्यक्रियेत केवळ अर्बुद आणि हाडाचा काही भागच काढून टाकलेला असतो तेव्हा, परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होऊ शकते. विशेषतः वाढत्या वयातील मुलांत. ज्यांचेवर अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया झालेली असेल त्या मुलांना नंतरच्या वर्षांत, वाढत्या वयातील शरीराच्या आकारास योग्य ठरणारा कृत्रिम अवयव बदलविण्याकरता आणखीही शल्यक्रियेची आवश्यकता भासू शकते आणि काहींच्यात तर संपूर्ण अवयवच काढून टाकण्याची आवश्यकताही प्राप्त होऊ शकते.

दोन्हीही प्रकारच्या शल्यक्रिया समस्यांप्रत घेऊन जातात तसेच त्यांचे संभाव्य लाभही असतात. उदाहरणार्थ, अवयव काढून टाकणार्‍या शल्यक्रियेपेक्षा, अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया जरी अधिक स्वीकारार्ह असत असली तरी तिच्यातील क्लिष्टतेमुळे ती अधिकाधिक गुंतागुंतीची होत जाण्याचा कल असतो. अवयव-वाचविणारी-शल्यक्रिया झालेल्या वाढत्या वयातील मुलांना पुढे आणखीही शल्यक्रियांना सामोरे जावे लागू शकते.

जेव्हा संशोधकांनी निरनिराळ्या शल्यक्रियांच्या अंतिम निष्कर्षांवर; आयुष्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात, दृष्टी टाकली तेव्हा त्यांत थोडाच फरक असल्याचे आढळून आले. बहुधा सर्वात मोठा प्रश्न कुमारवयीन रुग्णांचा होता, ज्यांना त्यांच्या शल्यक्रियेच्या सामाजिक प्रभावांची चिंता होती. भावनिक मुद्देही खूपच महत्त्वाचे ठरू शकतात आणि सर्वच रुग्णांना आधार व प्रेरणा ह्यांची आवश्यकता असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.