संधारणा उपचार (किलेशन थेरपी)
धमनी काठीण्य आणि वयपरत्वे येणाऱ्या रोगांनी पीडित रुग्णांची नवी आशा
मूळ इंग्रजी लेखक: एल्मर एम. क्रँटन, एम.डी.
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे
२००६०९२६
शीरेतून करायचे संधारणा उपचार, हे सोपे, इथिलीन डाय अमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड (इ.डी.टी.ए.) वापरून केल्या जाणारे उपचार आहेत. ह्या उपचारांमुळे धमनीकाठीण्य आणि इतर वयपरत्वे येणाऱ्या अवनतीकारक रोगांची प्रगती मंदावते. शरीरातील अनेक निरनिराळ्या भागांवर प्रभाव टाकणारी लक्षणे बहुधा सुधारतात. त्याची कारणे अजूनपर्यंत पूर्णपणे कळलेली नाहीत. हृदय, मेंदू, पाय आणि सर्वच शरीरास रक्तपुरवठा करणाऱ्या अवरुद्ध धमन्यांतील रक्तप्रवाह वाढतो. ह्या उपायांनी हृदयाघात, पक्षाघात, पायातील वेदना आणि अचेतनता (गँगरिन) यांचा प्रतिबंध करता येतो. बहुतेकदा, संधारणा उपचारांनंतर, हृदयधमनीउल्लंघन आणि फुग्याद्वारे केलेल्या हृदयधमनीरुंदीकरणाची गरजच राहत नाही. प्रसिद्ध झालेले संशोधन असेही दर्शविते की संधारणा उपचार कर्करोग प्रतिबंधकही आहेत.
मुक्त प्राणवायू-मूलकांमुळे होणाऱ्या रोगांबाबतचा सिद्धांत, संधारणा उपचारांमुळे मिळतात असे लक्षात आलेल्या अनेक लाभांसाठी, एक वैज्ञानिक स्पष्टीकरण देतो. तज्ञपरीक्षित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले अनेक वैद्यकीय अभ्यास, लाभांचे ठोस पुरावे देतात. ही अनातिक्रमक उपचारपद्धत खूपच सुरक्षित आणि उल्लंघन शल्यक्रिया अथवा रूंदीकरण यांचे मानाने खूपच कमी खर्चाची असते.
संधारणा उपचारपद्धत ही सुरक्षित आणि उल्लंघन वा रूंदीकरण शल्यक्रिया अथवा विस्फारक यांसाठीची प्रभावी पर्याययोजना आहे. धमनीकाठीण्याचे पर्यवसान हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया, हृदयाघात, अवयवविच्छेद, पक्षाघात अथवा वृद्धत्व यांच्यात होणे अपरिहार्य नाही. ह्या आणि इतर संबंधित रोगग्रस्तांसाठी एक आशेचा नवा किरण आहे. तुम्ही इतर सुत्रांकडून काय ऐकलेले असेल ते असो, मात्र योग्य प्रशिक्षित डॉक्टरने दिलेले इ.डी.टी.ए. संधारणा उपचार, आरोग्यदायी जीवनशैली, आहार आणि पोषण परिपूरके ह्यांचेबरोबरीने घेणे म्हणजे हृदयधमनीविकार, मेंदूधमनीविकार, रक्तप्रवाह विस्कळीमुळे येणाऱ्या मेंदूविकृती, सर्वसाधारण धमनीकाठीण्य; आणि वृद्धत्व, अचेतनता व त्वरित शारीरिक अवनतीकारक विकारांनी ग्रस्त झालेल्या व्यक्तींनी गांभीर्याने विचार करावा असा पर्याय आहे.
संधारणा उपचारांचे वैद्यकीय लाभ एकूण कितीदा उपचार घेतले त्यावर आणि ज्या अवस्थेवर उपचार केल्या जात असेल तिच्या गांभीर्यावर अवलंबून बदलत असतात. संधारणा उपचार घेतलेले सरासरी ८५ टक्के रुग्ण लक्षणीयरीत्या सुधारलेले आहेत. ३५ अथवा त्याहून जास्त वेळा टोचून संधारणा उपचार घेतलेल्यांपैकी ९० टक्के रुग्ण ह्या उपचारपद्धतीचे ऋणी राहण्याइतपत पुरेसे लाभ मिळवतात. जर आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे, तंबाखू वर्ज्य करणे हेही अनुसरत असतील तर नक्कीच. लक्षणे सुधारतात, रोगग्रस्त अवयवांना रक्तप्रवाह वाढतो, औषधांची गरज घटते आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे आयुष्याची गुणवत्ता जास्त उत्पादक आणि आस्वाद्य होते.
जेव्हा रुग्ण प्रथमच इ.डी.टी.ए. संधारणा उपचारांबद्दल ऐकतात अथवा तिचा विचार करतात तेव्हा त्यांना खूप सारे प्रश्न असतात. तुम्हालाही नक्कीच असतील. सर्वसामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची, सोप्या, वैद्यकीयदृष्ट्या तांत्रिक नसलेल्या भाषेतील उत्तरे इथे लिहीली आहेत.
संधारणा उपचार (किलेशन) म्हणजे काय?
संधारणा उपचार ही धातू अथवा खनिज (जसे की कॅल्शियम, शिसे, कॅडमियम, लोह, आर्सेनिक, अल्युमिनियम वगैरे) दुसऱ्या पदार्थासोबत (इथे इ.डी.टी.ए.-एक अमिनो आम्ल) बांधल्या जाण्याची एक प्रक्रिया असते. संधारणा उपचार ही एक जीवनासाठी पायाभूत असणारी प्रक्रिया आहे. संधारणा उपचार ही एक यंत्रणा आहे, जिच्या आधारे साधारण पदार्थ जसे की ऍस्पिरिन, प्रतिजैविके, जीवनसत्त्वे, खनिजे आणि विरळ मूलद्रव्ये शरीरात काम करतात. रक्तरंजक द्रव्य (हेमोग्लोबिन-रक्तातील लाल रंग, जो प्राणवायू सोबत बाळगतो) लोहाचा एक संधारक (किलेट) आहे.
संधारणा उपचार एक वैद्यकीय उपचारपद्धती म्हणून काय आहे?
संधारणा उपचार ही एक उपचारपद्धती आहे जिच्याद्वारे थोडेसे इथिलिन डायमाईन टेट्रा ऍसिटिक ऍसिड (इ.डी.टी.ए.), रुग्णास शीरेतून सावकाश (अनेक तासांच्या कालावधीत) चढवितात. कालावधी, परवानापात्र डॉक्टरांच्या सल्ल्यावरून ठरविल्या जातो. आणि त्याच्याच निगराणीखाली उपचारही दिल्या जातात. इ.डी.टी.ए. धारक द्रव, रुग्णाच्या हातातील शीरेत घातलेल्या छोट्या सुईतून आत सोडले जाते. आत सोडलेले इ.डी.टी.ए. शरीरातील नको असलेल्या धातूंना चिकटते आणि त्यांना त्वरेने लघवीत घेऊन जाते. अवघड जागेतील पोषक धातू जसे की लोह; शिसे, पारा आणि अल्युमिनियम यांसारख्या विषारी मूलद्रव्यांसोबतच इ.डी.टी.ए. संधारणा उपचारांनी सहज हटविले जातात. आरोग्यास आवश्यक असणारी सामान्यत: आढळणारी खनिजे आणि विरळ मूलद्रव्ये शरीरासोबत घट्ट बांधलेली असतात; आणि योग्यप्रकारे संतुलित पुरक पोषणाद्वारे कायम राखता येतात.
हे उपचार एकदाच करायचे असतात का?
नाही. उलट, संधारणा उपचार पद्धतीत प्रत्येक रुग्णाच्या आरोग्यस्थितीनुरूप २० ते ५० स्वतंत्र टोचण्यांद्वारे इलाज केल्या जातो. समुचित लाभ मिळण्यासाठी, सरासरी ३० वेळा उपचार घेणे, धमनीत अडथळे असण्याची लक्षणे असलेल्या रुग्णांना आवश्यक असते. काही रुग्णांना अनेक वर्षांच्या काळात १०० हून जास्त वेळा उपचार घ्यावे लागतात. तर काहींना प्रतिबंधक कार्यक्रमाचा भाग म्हणून केवळ २० टोचण्याच दिल्या जातात. प्रत्येक संधारणा उपचारास ३ ते ४ तास लागतात. आणि दर सप्ताहात रुग्णास १ ते ५ उपचार दिल्या जातात. परिणाम एकूण उपचारांवरच ठरतात. वेळापत्रक आणि वारंवारतेवर नाही. काही काळानंतर ह्या टोचण्यांमुळे मुक्त मूलकांच्या रोगाची प्रगती थांबते. धमनीकाठीण्य आणि इतर अनेक वयपरत्वे येणाऱ्या अवनतीकारक रोगांच्या पाठीमागे मुक्त मूलकेच असतात. हानीकारक मुक्त मूलके घटविल्यास रोगग्रस्त धमन्या बऱ्या होऊन रक्तपुरवठा पूर्ववत होतो. संधारणा उपचार काळासोबत अनेक आवश्यक शारीरिक आणि चयापचयासंबंधी सखोल सुधारणा घडवितात. पेशींच्या अंतर्गत रसायनस्थिती सामान्य करून शरीराचे कॅल्शियम व कोलेस्टेरॉल नियमन पूर्ववत केल्या जाते. शरीरावर संधारणा उपचाराच्या अनेक वांछनीय क्रिया घडून येतात.
शरीरारातील प्रत्येक धमनीतील रक्तप्रवाहास संधारणा उपचार लाभकारक ठरतात. अगदी मोठ्यात मोठ्यात धमनीपासून सूक्ष्म केशवाहिन्यांपर्यंत, ज्यांपैकी बव्हंशी वाहिन्या शल्यचिकित्सेच्या दृष्टीने खूपच लहान असतात, किंवा मेंदूत खोलवर असतात, जिथे शल्यक्रियेसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. अनेक रूग्णांमध्ये, बारीक रक्तवाहिन्याच सर्वात जास्त रोगग्रस्त असतात, विशेषत: मधूमेह असतो तेव्हा. कीलेशनचे लाभ डोक्यापासून पायापर्यंत एकसाथ घडतात, ज्यांचे उल्लंघन शक्य असते अशा केवळ काही मोठ्या धमन्यांच्या छोट्या भागापर्यंतच नाही.
संधारणा उपचार करवून घेण्यासाठी मला शुश्रुषालयात जावे लागेल का?
नाही. बव्हंशी प्रकरणांमध्ये संधारणा उपचार बाह्यरुग्ण उपचार असतात, जे डॉक्टरच्या दवाखान्यातच करवून घेता येतात.
संधारणा उपचारांमुळे दुखते का? संधारणा करवून घेतांना कसे वाटते?
इतर उपचारांच्या मानाने संधारणा करवून घेणे हा एक वेगळाच अनुभव असतो. काहीही दु:ख नसते आणि बव्हंशी प्रकरणांमध्ये अस्वस्थताही फारच थोडी जाणवते. रुग्णांना आरामखुर्चीत बसवतात. उपचार घेत असतांना, इ.डी.टी.ए. धारक द्रव त्यांच्या शरीरांमधून वाहत असते तेव्हा, ते वाचू शकतात. डुलकी घेऊ शकतात. टी.व्ही. पाहू शकतात. विणकाम करू शकतात. गप्पा मारू शकतात. गरज पडल्यास रुग्ण, सभोवार चालूही शकतात. प्रसाधनगृहात जाऊ शकतात. इच्छेनुरूप खाऊपिऊही शकतात. दूरध्वनी करू शकतात. फक्त त्यांच्या शीरेतून आत शिरवलेली सुई बाहेर येणार नाही ह्याची काळजी मात्र घ्यावी लागते. काही रुग्ण त्यांचे व्यवसायही दूरध्वनी वा संगणकाद्वारे, संधारणा उपचार घेत असतांनाही चालवितात.
संधारणा उपचारांत काही धोके अथवा नकोसे उपप्रभाव असतात का?
संधारण उपचार हे निर्विषारी आणि निर्धोक आहेत. विशेषत: इतर उपायांच्या तुलनेत. संधारणा उपचारांनंतर रुग्ण नेहमीप्रमाणे स्वत:च्या पायांनी, स्वत:च वाहन चालवत सहज घरी जातात. योग्यरीत्या दिल्या गेल्यास, उपचारित १०,००० रुग्णांमागे एखाद्याच रुग्णाला दखलपात्र उपप्रभावांचा धोका असतो. तुलनेत, थेट हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रियेमुळे उद्भवणारा एकून्ण मृत्यूदर १०० रुग्णांगणिक तीन रुग्ण असा असतो. व तो शुश्रुषालय आणि शस्त्रक्रिया करणार्या चमूवर अवलंबून बदलत असतो. शस्त्रक्रियेनंतर उद्भवणर्या गंभीर गुंतागुंतींचे प्रमाण खूपच जास्त असते. ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचणारे असते. ज्यात हृदयाघात, पक्षाघात, रक्तगुठळ्या, मानसिक अवनती, संसर्ग आणि दीर्घकालीन दु:ख यांचा समावेश होतो. संधारणा उपचार हे हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रियेपेक्षा कमीत कमी ३०० पट सुरक्षित आहेत.
क्वचित कधीतरी रुग्णाला शीरेत सुई टोचतात त्या जागी थोडेसे दु:ख जाणवू शकते. काहींना तात्पुरते सौम्य मळमळणे, चक्कर येणे किंवा डोके दुखणे अनुभवास येते. हे उपचाराचे तात्कालीन दुष्परिणाम असतात. पण बव्हंशी प्रकरणांमध्ये ही बारीकसारीक लक्षणे सहज निवळतात. संधारणा उपचार, ह्या प्रकारच्या उपचारांमध्ये तज्ञ असणार्या डॉक्टरने, योग्य रीतीने उपचार केले असता, इतर अनेक औषधोपचारांच्या मानाने सुरक्षित असतात. सांख्यिकीच्या दृष्टीकोनातून बोलायचे तर, हे उपचार, डॉक्टरकडे स्वयंचलित वाहन चालवत जाण्यापेक्षासुद्धा जास्त सुरक्षित असतात.
जर इ.डी.टी.ए. संधारणा उपचार खूप जलद अगर मोठ्या प्रमाणात दिले गेले तर त्याने धोकादायक उपप्रभाव उद्भवू शकतात. जसे कुठल्याही औषधाच्या अतिरिक्त मात्रेमुळे घडू शकतात तसेच. अनेक वर्षांपूर्वी गंभीर आणि प्राणघातक गुंतागुंतीही, अतिरिक्त इ.डी.टी.ए. मात्रेमुळे, जलद गतीने दिल्यामुळे आणि योग्य प्रयोगशाळेच्या निगराणीअभावी उद्भवल्याचे अहवाल आलेले आहेत. जर तुम्ही योग्य, प्रशिक्षित आणि अनुभवी इ.डी.टी.ए. वापरण्यातील तज्ञ डॉक्टर निवडाल तर संधारणा उपचारांतील धोके खूपच कमी पातळीवर राहतील.
जेव्हा असेही म्हटल्या गेले आहे की इ.डी.टी.ए. संधारणा उपचार तुमची मूत्रपिंडे बिघडवितात, तेव्हा नविनतम संशोधन (ज्यामध्ये ३८३ एकापाठोपाठच्या एक अशा रुग्णांमध्ये बद्धमूल अवनतीकारक रोगांकरीता केलेल्या संधारणा उपचारांच्या आधी आणि नंतर केल्या गेलेल्या मूत्रपिंड कार्य चाचणीचा समावेश आहे.) दर्शविते की सत्य याचे विपरितच आहे. सरासरीने, संधारणा उपचारांनंतर मूरपिंडकार्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. क्वचित एखादा रुग्ण प्रमाणाबाहेर संवेदनाक्षम असतो. मात्र, संधारणा उपचार तज्ञ असलेले डॉक्टर मूत्रपिंडांवर अतिभार येणे टाळण्यासाठी मूत्रपिंडांच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण करत असतात. मूत्रपिंडांचे कार्य जर सामान्य नसेल तर संधारणा उपचार जास्त सावकाश आणि कमी वेळा द्यायला हवेत. काही प्रकारच्या गंभीर मूत्रपिंड समस्या असलेल्या रुग्णांनी इ.डी.टी.ए. संधारणा उपचार घेऊ नयेत.
संधारणा उपचार सुरू करण्याआधी कुठल्या प्रकारच्या चाचण्या आणि तपासण्या करायलाच हव्यात?
संधारणा उपचारांची आवर्तने सुरू करण्याआधी संपूर्ण वैद्यकीय इतिहास मिळविल्या जातो. आहार, पोषणपूर्ती आणि संतुलन ह्यांकरीता विश्लेषित केल्या जातो. त्यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल आणि शुश्रुषालय भरतीबाबतचे गोषवारे यांच्या प्रती मिळविल्या जातात. प्रत्यक्षात नखशिखांत संपूर्ण वैद्यकीय तपासणी केल्या जाते. प्रचलित औषधोपचारांची संपूर्ण यादी नोंदविल्या जाते. ज्यामध्ये औषधांचे वेळापत्रक आणि प्रमाण यांचा समावेश असतो. कुठल्याही अतिसंवेदनाशीलतेची स्वतंत्र नोंद केली जाते.
संधारणा उपचारांनी बिघडू शकेल अशी कुठलीही अवस्था नाही ह्याची खात्री करण्यासाठी केल्या जाणार्या अनेक तपासण्यांतर्गत रक्त आणि मूत्र नमुने मिळविल्या जातात.
मूत्रपिंडाचे काळजीपूर्वक आकलन केल्या जाते. बहुधा एक विद्युत हृदयालेखही काढल्या जातो. वैद्यकीय लक्षणांनुरूप अनातिक्रमक चाचण्या, उपचारांपूर्वीची धमनींतील रक्तप्रवाहस्थिती जाणून घेण्यासाठी केल्या जातात. इतर वैद्यकीय तज्ञांसोबत विचारविनिमयही केल्या जातो.
संधारणा उपचार नवीन आहेत का?
नाही मुळीच नाही. सर्वात आधीचा, मनुष्यावरील संधारणा उपचारांचा दाखला दुसर्या महायुद्धातील आहे. जेव्हा ब्रिटिशांनी ब्रिटिश अन्टीलेवेसाईट (बी.ए.एल.), हे दुसरेच औषध संधारणेसाठी वापरलेले होते. हे वापरले होते विषारी वायूवर उपाय म्हणून. बी.ए.एल. आजही औषधशास्त्रात वापरले जाते.
इ.डी.टी.ए. औषध म्हणुन अमेरिकेत १९४८ मध्ये पहिल्यांदा वापरल्या गेले. विजेरी कारखान्यातील शिश्याच्या विषाने पीडित औद्योगिक कर्मचार्यांवर उपचार करण्यासाठी. त्यानंतर थोड्याच काळाने अमेरिकन नौदलाने संधारणा उपचार; बंदर सुविधांमध्ये सरकारी जहाजे रंगविणार्या ज्या खलाशांमध्ये शिश्याचे अवशोषण झाअलेले होते त्यांच्या उपचारांसाठी; प्रशंसित केल्या गेले. त्यानंतरच्या काळात शिश्याच्या विषबाधेवर आणि खेळणी, पाळणे व भिंतींवरील शिश्याचे रंग खाल्ल्यामुळे मुलांच्या शरीरात होणार्या विषसंचयावर उपचार म्हणून संधारणा उपचार निर्विवादपणे निवडलेले उपचार ठरले आहेत.
१९५० नंतरच्या काही वर्षांमध्ये असे भाकित करण्यात आले की इ.डी.टी.ए. संधारणा उपचार धमन्यांतील कठीणतेस कारणीभूत ठरणार्या कॅल्शियमच्या पुटांना काढून टाकण्यासाठीही उपयोगी ठरू शकतील. प्रयोग केल्या गेले आणि धमनीकाठीण्यग्रस्त रुग्णांच्या आरोग्यात संधारणा उपचारांनंतर सुधारणा अनुभवास आली. हृदयशूळ कमी होणे, स्मरणशक्ती वाढणे, दृष्टी, श्रुती आणि उत्साहात वाढ होणे इत्यादी. नंतर अनेक डॉक्टरांनी नियमितपणे अवरुद्ध धमन्यांमुळे संत्रस्त व्यक्तींचे उपचार संधारणा उपचार पद्धतीने सुरू केले. बव्हंशी रुग्णांमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा दिसून आली.
१९५५ मध्ये वैद्यकीय नियतकालिकांमध्ये पहिल्यांदा, इ.डी.टी.ए. संधारणा उपचारांनी धमनीकाठीण्यावर केलेले यशस्वी उपचार वर्णन करणारे लेख प्रसिद्ध झाले. त्यानंतर डझनावारी समर्थन करणारे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. अयशस्वीतेचे अहवाल कधीच प्रसिद्ध झालेले नाहीत (अपवाद अनेक अलीकडील अभ्यासांचा आहे, ज्यामध्ये हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया करणार्या शल्यविशारदांनी ह्या स्पर्धात्मक उपचारपद्धतीला उणे ठरविण्यासाठी सादर केलेली विकृत माहिती आहे). रक्तवाहिनी शस्त्रक्रिया आणि संबंधित पद्धतींमध्ये रुची राखणार्या काही डॉक्टरांनी, काही टीकात्मक स्वरूपाच्या टिप्पण्याही केलेल्या आहेत.
१९६४ पासून मात्र, संधारणा उपचारांचे फायदे आणि सुरक्षित उपचारपद्धतींचे अहवाल सातत्याने येत राहिले, तरी संधारणा उपचारांचा धमनीविकारावर उपचार म्हणून वापर हा विवादाचा विषय राहिला आहे.
हे उपचार कायदेशीर आहेत का?
पूर्णपणे. परवानाप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकास संधारणा उपचार करण्यापासून रोखेल असा कुठलाही कायदा नाही. अन्न आणि औषध प्रशासनानाने मंजूर केलेल्या इ.डी.टी.ए. संचावरील माहितीत जरी धमनीकाठीण्याचा समावेश नसला तरी, जेव्हा रुग्णाच्या सर्वोत्तम हितसंबंधांना जपण्यासाठी संधारणा उपचारांना डॉक्टर आवश्यक समजत असतील, तेव्हा ते वापरू शकतात. अन्न आणि औषध प्रशासन औषधपद्धतींचे नियमन करीत नाही. केवळ औषधे आणि उपकरणे यांच्या विक्री, संबोधनपट्टी आणि जाहिरातींमधील दावे यांना आंतरराज्यीय व्यापारासाठी संमत/मंजूर करते.
इ.डी.टी.ए. सारख्या बर्याच काळापासून प्रस्थापित असलेल्या औषधाच्या विक्रीसाठी तयार केलेल्या माहितीपत्रकात त्याच्या नव्या उपयोगाचे नाव घालण्यासाठी आणि नव्या औषधोपचाराबाबत दावा करणारी कागदपत्रे अन्न व औषध प्रशासनास सादर करण्यासाठी, लाखो डॉलर्स खर्च येतो. अन्न व औषध प्रशासनाने, अद्याप जाहिरात व विक्रीसाठी तयार केलेल्या पत्रकांमध्ये समाविष्ट केलेली नाहीत अशी औषधे डॉक्टर नियमितपणे देतच असतात.
द अमेरिकन कॉलेज फॉर अडव्हान्समेंट इन मेडिसिन, दरसाल दोनदा योग्य आणि सुरक्षितरीत्या शीरेद्वारे इ. डी.टी.ए. संधारणा उपचारांचा वापर शिकविण्याचे वर्ग घेते. ते डॉक्टरांसाठीनियमही प्रसिद्ध करते, ज्यांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या मान्यताप्राप्त संधारणा उपचारांच्या वैद्यकीय वापराची मानके दिलेली असतात.
कायदेशीरपणाबाबत, न्यायालयांनी असे मत व्यक्त केलेले आहे की, जर डॉक्टर संधारणा उपचारासारख्या उपलब्ध पर्यायांबाबतची माहिती, रक्तवाहिनीवरील शस्त्रक्रियेपूर्वी दडवून ठेवतील (त्यांच्या इतर सर्व उपचार सोपस्कारांसकट), तर ते 'माहितीपूर्वक संमती'च्या संकल्पनेचा भंग करणारे ठरेल. रुग्णास जर शक्य ते लाभ मिळू शकले नाहीत, तर उपचारांबाबत माहिती न मिळू देणे, ह्याचा अर्थ 'वैद्यकीय भ्रष्टाचार' असा होईल. म्हणून ह्याची दखल न घेता, संधारणा उपचारांबाबतची माहिती रुग्णास न देणार्या डॉक्टरांनाच कायदेशीर दायित्वाचा धोका संभवेल. अनेक रुग्णांना सर्वात सुरक्षित, सर्वात प्रभावी आणि कमीतकमी खर्चिक असणारी अशी जिला ते मानतात, ती पद्धत रुग्णांसाठी वापरणार्या आणि दबावास प्रतिरोध करण्यासाठी रुग्णांस पुरेशी माहिती देतात त्या डॉक्टरांना कायदेशीर दायित्वाचा धोका नाही.
संधारणा उपचार प्रभावी ठरत असल्याचे कोणते पुरावे तुमच्याजवळ आहेत?
संधारणा उपचार प्रभावी बनविणारे करणारे अनुभवी डॉक्टर त्यांच्या बहुसंख्य रुग्णांमध्ये नाट्यमय सुधारणा होत असल्याचे निरीक्षण करतात. ते हृदयशूळ नियमितपणे निवळतांना पाहतात. ज्या रुग्णांना थोडेही अंतर चालल्यावर तीव्र हृदयशूळ होत असतो आणि ज्यांचे पाय दुखू लागत असतात, ते पुन्हा पूर्वस्थिती प्राप्त करू शकतात. संधारणा उपचार घेतल्यानंतर सफल सफल जीवन जगू शकतात. काही सप्ताहांच्या कालावधीतच मधुमेही व्रण आणि अचेतन होणारे पाय पूर्ववत होऊ लागल्याचे नाट्यमय प्रकारही तेवढेच सामान्य आहेत. अनेक व्यक्ती, ज्यांना त्यांचे पाय तोडावे लागतील असे सांगितलेले असते, ते संधारणा उपचारांनी पाय बरे होतांना पाहून स्तिमित होतात. जरी काही मृत स्नायूंचे भाग शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागले तरीही.
जवळपास १,५०० संधारणा उपचार करणारे अमेरिकन डॉक्टर आणि इतर देशांतील शेकडो डॉक्टर यांचेजवळा गंभीर धमनी विकाराची माघार घडवू शकण्याची असंख्य प्रकरणे आहेत. अवरुद्ध धमन्यांनी रोगग्रस्त होऊन मरणाच्या दारात पोहोचलेले पुरूष आणि स्त्रिया अनेकदा डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन पोहोचतात. सप्ताहां आणि महिन्यांनंतर ते लक्षणीयरीत्या सुधारलेले असतात. उपचारित ८५ टक्क्यांपर्यंत रुग्णांमधील, घटलेल्या रक्तप्रवाहाची लक्षणे सुधारतात अशी साक्ष पटविणारी भरपूर माहिती उपलब्ध आहे. दहा लाखांहून जास्त, म्हणजे जवळपास हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया करवून घेणार्या रुग्णांइतक्याच रुग्णांनी, संधारणा उपचार करवून घेतलेले आहेत.
ह्याव्यतिरिक्त, अनेक संशोधन अभ्यासही प्रसिद्ध झालेले आहेत, ज्यांमध्ये संधारणा उपचार घेण्यापूर्वी आणि घेतल्यावर केलेल्या किरणोत्सारी समस्थानिके आणि श्राव्यातीत ध्वनी निदान चाचण्यांचे निकाल, संख्याशास्त्राचे दृष्टीने, संधारणा उपचारांनी रक्तप्रवाह वाढत असल्याचे सिद्ध करतात. रक्तप्रवाह अभ्यासांव्यतिरिक्तही, जर चालल्यानंतर पाय दुखणे कमी झाले, जर हृदयशूळ चिंताजनक राहिला नाही आणि जर शारीरिक टिकावक्षमता (एन्ड्युरन्स) व मानसिक धारणा (अक्विटी) सुधारत असेल, तर हे लाभही इ.डी.टी.ए. संधारणा उपचारांचे समर्थनास पुरेसे आहेत. आयुष्याची सुधारलेली गुणवत्ता आणि आजाराच्या लक्षणांतून सुटका हे संधारणा उपचारांचे सर्वात महत्त्वाचे लाभ आहेत.
संधारणा उपचार किती खर्चिक असतात?
गंभीर धमनीकाठीण्य असणार्या रुग्णास संधारणा उपचारांचा एक उपचारक्रम देण्यास सहा सप्ताह ते सहा महिन्यांपर्यंत वेळ आणि ३० उपचारसत्रांसाठी ४,००० अमेरिकन डॉलर्सपर्यंत खर्च येऊ शकतो. हा खर्च हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रियेस येणार्या खर्चाहून म्हणजे ४०,००० अमेरिकन डॉलर्सहून बराच कमी असतो. एका उपचारसत्रास ११५ अमेरिकन डॉलर्स खर्च येण्याची आपण अपेक्षा करू शकतो. यांमध्ये संबंधित मूत्रपिंड चाचण्याही समाविष्ट असतात. प्रत्येक संधारणा उपचारसत्रास पूर्ण होण्यासाठी तीन ते चार तास लागतात.
हृदयधमनी उलंघनाबाबत काय सांगता येईल?
हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया ही नेहमी सुचविल्या जाणारी विख्यात शस्त्रक्रिया आहे, जिच्यामध्ये रुग्णाच्या पायातील शीर कापून, हृदयधमनीतील अडथळ्यांना उल्लंघन म्हणून, प्रमुख हृदयधमन्यांच्या अवरुद्ध भागाभोवती जोडल्या जाते. मात्र, अल्पसंख्य, औषधाने नियंत्रित होऊ न शकणार्या रुग्णांना हृदयशूळाचा त्रास कमी होण्यापलीकडे, ह्या शस्त्रक्रियेचा फार उपयोग होतो, असे योग्य रीतीने केलेल्या नियंत्रित अभ्यासांनी कधीही सिद्ध झालेले नाही. एवढेच नव्हे तर असेही सुचविण्यात आलेले आहे की शस्त्रक्रियेपश्चात दिसून येणारी हृदयशूळातील घट ही हृदयातून दु:खस्पंदने वाहून नेणार्या आणि हृदयधमनी आकषास उत्तेजना देणार्या मज्जातंतूंच्या कापल्या जाण्यामुळे घडून येत असावी. हृदयधमनी शस्त्रक्रिया ह्या मज्जातंतूंना कापल्याशिवाय संपूर्ण करणे शक्य नसते.
शस्त्रक्रियेआधी क्ष-किरणांद्वारे धमन्यांचे दृश्यांकन करण्यासाठी एक प्रकारचे रासायनिक रंगद्रव्य वापरण्यात येते, ज्यामुळे धमनीआकष होऊ शकतो. क्ष-किरण दृश्यांकनात ह्या धमनीत, अडथळ्यापैकी किती कायमस्वरूपी आहे आणि किती पुन:परिवर्तनक्षम आकष आहे, हे शोधून काढणे कठीण असते. वस्तुत:, सर्वात अलीकडचे संशोधन सुचविते की हृदयशूळ कमी होण्यासाठी व इतर कारणांसाठी दरसाल केल्या जाणार्या २,००,००० उल्लंघन शस्त्रक्रियांपैकी अनेक शस्त्रक्रिया, करण्याची गरजच नसते. हृदयधमनी उल्लंघन करवून घेण्याची घाई करण्याच्या विरोधात एक चांगले प्रतिपादन २४० लक्ष अमेरिकन डॉलर्स खर्चाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासाने मिळवून दिला आहे. ज्यामध्ये उल्लंघन शस्त्रक्रिया करवून घेतलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेनंतर जीवित राहण्याच्या दराची तुलना, रोगाच्या सारख्याच अवस्थेतील तुलनीय गटातील शस्त्रक्रियाविरहित उपचार करवून घेतलेल्या रुग्णांच्या जीवित राहण्याच्या दराशी करण्यात आली आहे.
शस्त्रक्रिया केल्या गेलेल्या बव्हंशी रुग्णांत दुसर्या गटातील रुग्णांच्या तुलनेत कुठलाही फायदा ह्या अभ्यासात आढळून आला नाही. इथे हे नमुद करणे आवश्यक आहे की शस्त्रक्रियाविरहित उपचार करण्यात आलेल्या रुग्णांना दिलेल्या उपचारांत, संधारणा उपचारांचा अथवा नवीन कॅल्शियम ब्लॉकर औषधांचा समावेश नव्हता, आणि त्यामधील केवळ अर्ध्या रुग्णांनाच बिटा ब्लॉकर औषध देण्यात आलेले होते. जरी डाव्या मुख्य हृदयधमनीत अवरोध असणारे रुग्णा शस्त्रक्रियेनंतर काहीसे जास्त जगत असल्याचे दर्शविणारे अभ्यास अहवाल नोंदविलेले असले तरी ते अभ्यास कॅल्शियम ब्लॉकर आणि नवीन बिटा ब्लॉकर उपलब्ध होण्यापूर्वी केल्या गेले होते. ती औषधे लक्षणीयरीत्या हृदयाघातापासून संरक्षण करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे. संधारणा उपचारांसहित सध्या उपलब्ध असलेल्या सर्व शस्त्रक्रियाविरहित उपचारांची तुलना केली असती तर उल्लंघन शस्त्रक्रिया नि:संशयपणे दुसरी सर्वोत्तम उपचारपद्धती सिद्ध झाली असती.
शस्त्रक्रिया केल्यामुळे बव्हंशी रुग्णांच्या जास्त जगण्याची शक्यता, आरोग्यपूर्ण जगण्याची शक्यता, चांगले जगण्याची शक्यता किंवा आयुष्य जास्त उपभोगण्याची शक्यता सुधारली नाही असेच अभ्यासाच्या परिणामांच्या सांखिकीय विश्लेषणानंतर आढळून आले. हृदयाघाताच्या घटना (हृदयस्नायूच्या अतिआकुंचनाच्या घटना)आणि रोजगार व मनोरंजन स्थितीही सारख्याच आढळल्या, जेव्हा मोठ्या संख्येतील रुग्णांच्या गटंची तुलना करण्यात आली होती. शस्त्रक्रिया न केलेल्या गटास संधारणा उपचार न देताही.
सर्वात महत्त्वाचे, रक्ताभिसरण विषयक शस्त्रक्रिया शरीराच्या निरनिराळ्या हागात वेगवेगळ्या पातळीवर अस्तित्वात असणार्या रोगास रोखण्यासाठी वा परतविण्यासाठी काहीही करीत नाही. शरीरभरच्या समस्येवर, शस्त्रक्रिया म्हणजे फारतर एक भागश: समाधान असते. शरीरातील रक्तवाहिनिच्या एका छोट्याशा भागाचे उल्लंघन केल्याचा लाभ थोड्या काळापुरताच टिकतो. मात्र, सर्वाधिक मोठा अडथळा एका वा दोन जागी घडविण्यास कारणीभूत ठरणारी अवनतीकारक अवस्था इतरत्रही राहतच असते. सबंध रक्ताभिसरणप्रणालीत.
सर्वसामान्य लोकांना एक गोष्ट माहीत नसते आणि ती म्हणजे, एक उल्लंघन शस्त्रक्रिया केलेल्यांना नंतर दुसरी करण्याची गरज भासते. काही वेळा ज्या धमन्या उल्लंघित नसतात त्या अवरुद्ध होतात आणि उल्लंघनाची गरज भासते. काही वेळा पहिल्या उल्लंघनाचे वेळी बसविलेली उल्लंघन वाहिनी नव्या कीटणाने अवरुद्ध होते. काही वेळा शस्त्रक्रिया असफल ठरते अथवा उल्लंघन वाहिनी खूपच लहान ठरते. वस्तुत: शस्त्रक्रियेनंतर १० वर्षांनंतर ४० टक्के रुग्णांमध्ये उल्लंघन वाहिनी बंद झालेली होती व उर्वरित ६० टक्क्यांपैकी अर्ध्यांच्या उल्लंघन वाहिनीत आणखी अडथळे विकसित झालेले होते. एकदा का तुमची उल्लंघन शस्त्रक्रिया झाली की मग तुम्हाला दुसर्या उल्लंघन शस्त्रक्रियेची गरज भासण्याची शक्यता ३० ते ४० टक्के इतकी जास्त असते. आणि काही रुग्णांना तिसर्या अथवा आणखीही शस्त्रक्रियांची गरज भासू शकते. आणि उल्लंघन करवून घेणार्या १०० रुग्णांपैकी दोन वा तीन रुग्ण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या तरून गेले तरी नंतर त्या प्रक्रियेतच दगावतात. याहून खूप अधिक रुग्णांमध्ये गंभीर गुंतागुंती निर्माण होतात. जरी ते शस्त्रक्रियेदरम्यान वाचले तरीही. हे आकडे विस्फारकासहित वा विस्फारकाविरहित केलेल्या फुग्याच्या रुंदीकरण शस्त्रक्रियेमध्ये याहूनही जास्त असतात.
संधारणा उपचारित रुग्ण बहुधा कामावर परतण्यास सक्षम होतात आणि खेळू लागतात व इतर कामेही करू लागतात. शस्त्रक्रिया न करताही. जर ते योग्य आहार घेत राहीले, मर्यादेत राहून व्यायाम करत राहीले, सांगितलेला परिपूरक पोषणाहार घेत राहीले आणि क्षतिपूर्तीपुरते संधारणा उपचार (दर एक वा दोन महिन्यांनी, आजाराच्या वैद्यकीय निदानाच्या गंभीरतेनुसार) घेत राहीले, तर पुन्हा हृदयाघात, पक्षाघात, म्हातारपण अथवा हातापायात अचेतनता न येता, ते अनेक वर्षे जगू शकतात.
ज्याप्रमाणे संधारणा उपचाराबाबत जास्त माहिती जाणून घेण्यास उत्सुक असणार्या बव्हंशी लोकांप्रमाणेच जर तुम्हालाही सांगितल्या गेले असेल की तुम्हाला प्रगत अवस्थेतील धमनीविकार आहे तर तुम्हाला रुंदीकरण वा उल्लंघन शस्त्रक्रिया करवून घेण्यासही सांगितलेले असेल. असे असल्यास, तुम्ही तुमच्या रोगाचे स्वरूप आणि उपचाराचे सर्व उपलब्ध पर्याय, विचारपूर्वक निर्णय घेण्याआधी, समजून घेणे गरजेचे आहे. आणि जरी संधारणा उपचार व इतर शस्त्रक्रियाविरहित उपचार असफल ठरले तरी. उल्लंघनाचा पर्याय शिल्लक राहतोच.
संधारणा उपचार शीरेतून टोचून घेण्याऐवजी तोंडाने घेता येणार्या गोळ्यांच्या स्वरूपात का घेता येत नाही?
संधारणा उपचार पद्धतीस एवढ्या वेगाने मान्यता मिळते आहे की त्यामुळे शीरेतून दिल्या जाणार्या संधारकाप्रमाणेच लाभ देणार्या परंतु तोंडावाटे घेता येईल अशा संधारकाचा विकास करण्यातील रुची वाढत आहे. तोंडावाटे घेतल्या जाणार्या अनेक पोषक पदार्थात संधारक गुणधर्म असल्याचे दिसून आले आहे. पण कुणातही शीरेतून दिल्या जाणार्या इ.डी.टी.ए. सारखा क्रियाशीलतेचा पल्ला नाही. अनेक पोषणाद्रव्ये जसे की 'क'-जीवनसत्त्व आणि अमिनो आम्ले सिस्टिन अस्पारटीक आम्ल यांच्यात धातू संधारणा करण्याचे थोडेफार सामर्थ्य असते. ते इतर प्रकारे म्हणजे मुक्त मूलकांद्वारे होणार्या हानीपासूनही, प्राणिलीकारी या नात्याने संरक्षण करतात.
क्षीण संधारक असलेल्या पोषण परिपूरकांचा वापर धमनी काठीण्याच्या रुग्णांसाठी केल्याचे दावे मोठ्या प्रमाणात केल्या जाऊ लागले आहेत. फसव्या जाहिरातींद्वारे आणि चमकत्या प्रमाणपत्रांसकट ह्या बहुधा जीवनसत्त्वे आणि क्षार रूपात असलेल्या उत्पादनांची विक्री आक्रमकतेने करणे ह्यात नवीन काहीच नाही. मात्र, शीरेतून दिलेल्या इ. डी.टी.ए. च्या परिमाणांच्या आसपासही, तोंडावाटे घेतल्या जाणार्या उत्पादनांचे परिणाम कधीही पोहोचलेले नाहीत.
अलीकडेच इ.डी.टी.ए. असणार्या काही पोषण परिपूरकांचा, प्रभावी तोंडावाटे घेण्याचे संधारक म्हणून, दावा केल्या गेला आहे. समस्या ही आहे की तोंडावाटे दिलेल्या इ.डी.टी.ए. पैकी केवळ ५ टक्केच तोंडात अवशोषित होते. तेवढेच थोडEसे मोठ्या आतड्यात अवशोषिले जाते. उर्वरित मलावाटे निघून जाते. आणि इ.डी.टी.ए. ची मात्रा प्रभावी ठरण्याइतपतावशोषित होण्यासाठी ते तोंडावाटे रोजच घ्यावे लागेल. दररोज घेतल्यास इ.डी.टी.ए. आवश्यक पोषण द्रव्यांना पचनसंस्थेमध्ये बांधून टाकते, ज्यामुळे त्यांचे अवशोषण थांबते आणि उणीव निर्माण होते. शीरेतून घेतलेले इ.डी.टी.ए. १०० टक्के अवशोषित होते आणि वर्षत केवळ २० ते ३० दिवसच दिलेले चालते. दैनंदिन स्वरूपात शीरेतून इ. डी.टी.ए. उपचार घेतल्यास होणारी पोषणद्रव्यांची तूट सहज भरून निघते.
संधारणा उपचार एखाद्या नळदुरूस्ती करणार्या कामगाराप्रमाणे काम करून, म्हणजेच धमनी कीटामधून कॅल्शियम शोषून काढून, धमनीकाठीण्याचा सामना करते हे खरे आहे काय?
नाही! मुक्तमूलक शरीरतपासणीशास्त्रातील अलीकडील वैद्यकीय संशोधने होण्यापूर्वी असे समजल्या जात असे की इ.डी.टी.ए. संधारणा उपचारांचा प्रमुख लाभकारी प्रभाव कॅल्शियमच्या जैवचयापचयावर होत असतो, तो असा की त्यामुळे कीटातील अतिरिक्त कॅल्शियम दूर केल्या जातो, ज्यामुळे धमन्या काठीण्यापूर्वीच्या लवचिक अवस्थेत परततात. हे वारंवार दिले जाणारे स्पष्टीकरण खरे नाही. मात्र, इ.डी.टी.ए. काही प्रमाणात अभिसरणातील कॅल्शियम काढून टाकते ही वस्तुस्थिती आजकाल संधारणा उपचारांच्या कमी लाभकारी पैलुंपैकी एक समजल्या जात आहे. कॅल्शियम साखळणे ही नंतरच्या अवस्थेतील घटना आहे आणि तीचा धमनीकीट जमा होण्याच्या प्रक्रियेशी फारच थोडा संबंध आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इ.डी.टी.ए.ला, तथाकथित स्थित्यंतर-धातू लोह, संबंधित विषारी धातू शिसे, पारा कॅडमियम, निकेल, अल्युमिनियम आणि इतर, जे मोठ्या प्रमाणातील मुक्तमूलक अभिक्रिया किंवा इतर विषारीकरणप्रक्रिया घडविण्यातील समर्थ उत्प्रेरक असतात; यांचेबाबत ओढ असते. असे मानल्या जाते की, मुक्त मूलकांचे संबंधित शारीरिक-जैवचयापचयप्रक्रिया (पॅथालॉजी) ही अशी महत्त्वाची अनुस्यूत प्रक्रिया आहे, जिच्यामुळे अनेक वयपरत्वे येणार्या कर्करोग, म्हातारपण, संधेदुखी आणि धमनीकाठीण्य यांसारख्या रोगांचा समावेश असणार्या व्याधींचा विकास होण्याची सुरूवात होते. धात्विक उत्प्रेरके आणि विषद्रव्ये वयपरत्वे व्यक्तीच्या शरीरात अवघड जागी साठत असतात. त्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेग घेते. ही धात्विक उत्प्रेरके आणि विषद्रव्ये शरीरातून काढून टाकून, इ.डी.टी.ए. शरीरात चालू असलेले मुक्त मूलकांचे उत्पादन खूपच घटवते. हा इ.डी.टी.ए. पासूनचा प्राथमिक लाभ आहे.
जे प्रत्यक्षात घडत असते त्याचे हे खूपच सरळसोपे स्पष्टीकरण आहे. तुमच्यापैकी ज्यांना वैज्ञानिक तंत्रविवरणांमध्ये निश्चितस्वरूपाचे स्वारस्य असेल त्यांनी 'संधारणा उपचारांचा वैज्ञानिक आधार: कार्यकलाप-एल्मर एम्. कँटन, एम्.डी.आणि जेम्स पी. फ्रॅकेल्टन, एम्.डी.' हा संदर्भलेख वाचावा.
अनेक अनुस्यूत मुद्द्यांच्या विस्तृत स्पष्टीकरणासाठी 'बायपासिंग बायपास सर्जरी' हे पूर्ण लांबीचे, सर्वसामान्यांकरिता लिहीलेले, लोकप्रिय पुस्तकाकारातील, ह्यांचे पुस्तक वाचणे आपल्याला रूचेल. मागील परिच्छेदात उल्लेखिलेले वैज्ञानिक आधार आणि कार्यकलाप ह्यांचेवरील मजकूर 'टेक धिस टू युवर डॉक्टर' ह्या पुस्तकाच्या एका प्रकरणात दिलेला आहे.
संधारणा उपचारांनी इतर कुठल्या रोगांकरीता लाभ होऊ शकेल?
म्हातारपणाची प्रक्रिया प्रचलित मुक्त मूलकांच्या हानीशी संबंधित असल्याने, मोठ्या प्रमाणातील विविध लक्षणे संधारणा उपचारांनी सुधारू लागतात, ह्यात आश्चर्य ते काय? अगदी, प्रत्यक्षपणे अभिसरण विकाराशी संबंधित नसलेली लक्षणेही. सांधेदुखी (आर्थ्रायटीस), स्मृतीभ्रंश (अल्झायमर्स), कंपवात (पार्किन्सन्स), खरूज (सोरायसिस), उच्च रक्तदाब आणि त्वचाकाठीण्य (स्क्लेरोडर्मा) इत्यादी सर्व रोगांची लक्षणे संधारणा उपचारांनी सुधारतात असे अहवाल आलेले आहेत. मात्र, संधारणा उपचार ह्या रोगांवरील उपचार म्हणून वैज्ञानिक पुराव्यांनी सिद्ध झालेले नाही. वस्तुत: त्वचाकाठीण्यासाठी याहून चांगले उपचार उपलब्ध नाहीत. मोतीबिंदू जाऊन दृष्टी पूर्ववत होते. संधारणा उपचारांनंतर रुग्णांना सामान्यत: तरूण आणि ऊर्जस्वल वाटते. जरी ते उपचार केवळ प्रतिबंधात्मक कारणांनी घेतलेले असले तरीही. वस्तुत: संधारणा उपचार स्थिरावलेल्या रोगाच्या उपचारांपेक्षा प्रतिबंधासाठीच जास्त वांछनीय आहेत. प्रतिबंधात्मक औषदोपचार हे नेहमीच प्रगत अवस्थेतील अवघडलेल्या परिस्थितीत हस्तक्षेप करण्यापेक्षा योग्य ठरतात.
स्वित्झरलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ झुरीच येथे अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका लेखात, संधारणा उपचा घेतलेल्या ५६ जणांच्या एका गटाच्या १८ वर्षाMच्या पाठपुराव्याचा अहवाल दिलेला आहे. संधारणा उपचार न घेतलेल्या नियंत्रण गटातील रुग्णांसोबत, कर्करोगाने होणार्या मृत्यूदराची तुलना करता, लेखकांना असे आढळले की संधारणा उपचार घेणार्या रुग्णांमध्ये कर्करोगाने होणार्या मृत्यूदरात ९० टक्के घट दिसून आली. युनिव्हर्सिटी ऑफ झुरीचच्या साथीच्या रोगतज्ञांनी ही माहिती पडताळून पाहिली आणि त्यांना अहवालातील माहिती आणि निष्कर्ष यांच्यात कुठलीही विसंगती आढळली नाही.
एकदा निदान झालेल्या प्रगत कर्करोगाच्या उपचारात संधारणा उपचार लाभदायी ठरत असल्याचा कुठलाही पुरावा नाही. मात्र, बरेचसे वैज्ञानिक संशोधन उपलब्ध आहे जे बहुतेक कर्करोगांच्या सुरूवात होण्यातला महत्त्वाचा घटक म्हणून मुक्त मूलकांमुळे डी.एन.ए.ला होणार्या हानीचा निर्देश करते.
मी यापूर्वीच संधारणा उपचारांबद्दल का ऐकलेले नाही?
अनेक प्रकाशित अभ्यासांनी सुचविल्याप्रमाणे आणि शेकडो डॉक्टर्सच्या अनुभवांनुसार, जर इ.डी.टी.ए. संधारणा उपचार सुरक्षित आणि प्रभावी असतील, तर तुम्ही त्यांचेबद्दल अजून ऐकलेले का नाही? हा एक चांगला प्रश्न आहे.
अगदी अलीकडेपर्यंत तुलनेने फार थोड्या रुग्णांना ह्या उपचारांच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिल्या गेलेली होती. अनेक हृदयरोगतज्ञांनीही ह्या उपचारांचे नावही ऐकलेले नसू शकेल आणि ऐकलेले असेल तरीही ते रुग्णांना, हे उपचार सुचविण्यास नाखूश असू शकतील. अमेरिकन मेडिकल असोसिएशनने संधारणा उपचारांना अजून धमनी काठीण्यावरचे उपचार म्हणून मान्यता दिलेली नाही. जरी ती, शिसे व इतर जड धातुंच्या विषबाधेवर ह्या उपचारांची प्रशस्ती करीत असली तरीही. जर गंभीर स्वरूपाची शिश्याची विषबाधा सिद्ध झालेली नसेल तर, अनेक विमा कंपन्या संधारणा उपचारांच्या खर्चाचा परतावा देत नाहीत. जर धमनीकाठीण्यावर संधारणा उपचार दिल्या गेलेले असतील तर बहुधा, 'प्रायोगिक' किंवा 'अनावश्यक' किंवा 'अपारंपारिक' असे संबोधून, विमाकंपन्यांकडून खर्चाचा परतावा नाकारल्या जातो. जरी ते उल्लंघन शस्त्रक्रियेसाठी परतावा देत असले तरीही, ते संधारणा उपचार घेतलेल्या रुग्णांना परतावा नाकारतात. आणि हे सुद्धा संधारणा उपचार त्यांचे हजारो डॉलर्स वाचवत असतांना. आयुष्यातील इतर अनेक पैलूंप्रमाणेच, ह्यातही बर्यापैकी वैद्यकीय राजकारण गुंतलेले असावे.
राजकीयदृष्ट्या शक्तीमान गट आणि रक्ताभिसरणावरील औषधांचे निर्माते ह्यांनी सातत्याने संधारणा उपचारांबाबतची माहिती दाबून ठेवलेली आहे. बहुधा हृदयधमनी रुंदीकरण व उल्लंघन शस्त्रक्रियांच्या स्पर्धात्मक आरोग्यसेवेत गुंतलेल्या स्वारस्यामुळे असेल. हृदयधमनी उल्लंघन शस्त्रक्रिया आणि औषधोपचार यांचा समावेश असलेल्या, हृदयरुग्णांच्या आरोग्यसेवेची, किंमत अमेरिकेत दरसाल ४० अब्ज डॉलर्सहूनही जास्त आहे. स्पष्टच आहे की, जर सगळीकडे संधारणा उपचार लोकप्रिय झाले तर, अनेक शुश्रुषालये, डॉक्टर्स आणि औषधकंपन्यांच्या सेवेची गरज कमी होईल.
ज्या डॉक्टरांनी संधारणा उपचारांचा कधीच उपयोग केला नाही, तेच त्यांचेबाबत साशंक राहीले. एकतर त्यांना संधारणा उपचारांच्या सुरक्षितता व प्रभावीपणाबाबतच्या संशोधनाविषयी मुळीच माहिती नसावी, किंवा ते शिक्षणाने अथवा मिळकतीच्या स्त्रोतामुळे धमनीवरील शस्त्रक्रिया आणि संबंधित इतर उपचारपद्धतींशी ते बांधलेले असावेत. अनेक डॉक्टरांनी स्वत: सत्यशोधनाची तसदी न घेता, अशा स्त्रोतांकडून होणार्या टीकात्मक संपादकीय टिप्पण्यांचा स्वीकार केला. संधारणा उपचारांना अस्वीकारार्ह ठरविणारे अलीकडील वैद्यकीय अभ्यासांचे दावेच एवढे मूलभूत चुकांनी भरलेले आहेत की ते काहीच सिद्ध करीत नाहीत. डॉक्टर्सना प्रत्येक शब्द वाचायला वेळच नसतो आणि बहुधा ते गैरसमजूत करून देणारे सारांश आणि प्रस्तावना ह्यांचा, स्वत: पडताळून न पाहता स्वीकार करतात. उल्लंघन आणि रक्ताभिसरण औषधौद्योग हे खूप चांगल्या रीतीने, वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये आणि सामान्य लोकांतही, आपले मूल्य राखून आहेत.
संपूर्ण संधारणा उपचार कार्यक्रमात आणखीन कशाचा समावेश होतो?
तुमची जीवनशैली महत्त्वाची ठरते. संधारणा उपचार हे बरे करण्याच्या प्रक्रियेचा केवळ एक भाग असतात. सुधारित पोषण आणि सुधारित जीवनशैली हे संधारणा उपचारांच्या लाभांना स्थिरपद करण्यासाठी नितांत आवश्यक असतात. संधारणा उपचार स्वत:हून 'सर्व बरे करेल' असे नसते. ते केवळ असामान्य मुक्त मुलकांची कार्यशीलता कमी करतात आणि अनावश्यक व विषारी धातू शरीरातून हटवितात. ज्यामुळे सामान्यपणे 'बरे होण्या'ची प्रक्रिया आणि नियंत्रक यंत्रणा कार्यान्वित होऊ शकतात. बरे होण्यास मदत होते. वैद्यकीय पोषणोपचार, प्राणिलीकारकांविरोधी परिपूरके आणि सुधारित जीवनशैली यांचे आधारे आरोग्य पूर्वपदावर येते. संधारणा उपचारांचा संपूर्ण कार्यक्रम ह्या सार्या गुणकांना अंतर्भूत करतो. संधारणा उपचार हे उल्लंघनादी शस्त्रक्रिया व इतर उपचारप्रकारांशी सुसंगत आहेत. जर रक्ताभिसरणावरील औषधे लागली तर तीही संधारणा उपचारांसोबत घेता येतात. कुठलाही अंतर्विरोध न होता.
संधारणा उपचारांची संस्तुत सत्रे घेण्याव्यतिरिक्त, दीर्घकालीन लाभांसाठी उत्सुक असलेल्या रुग्णांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा. पोषण परिपूरके घावीत. शारीरिकदृष्ट्या कार्यशील राहावे. तंबाखूसेवन व अतिरिक्त मद्यार्क ह्यांसारख्या विनाशकारी जीवनशैलीगत सवयी नाहीश्या कराव्यात.
हवेहून जास्त दाबावरील प्राणवायू (हायपरबारीक ऑक्सिजन-एच.बी.ओ.)
हवेहून जास्त दाबावरील प्राणवायूच्या उपचारांमध्ये सर्व शरीर एका लहानशा डब्यात हवेहून जास्त दाबावरील १०० टक्के प्राणवायूत संपूर्णपणे बौडवून ठेवतात. ह्याने पुरेसा रक्तप्रवाह नसताही नवीन रक्तप्रवाहांना उत्तेजना मिळते, अवयव सचेतन आणि कार्यशील राहतात. ह्याने संसर्गाचा प्रतिकार करता येतो. अचेतन अथवा अचेतनतापूर्व अवस्थेत असलेल्य पायांच्या प्रकरणांमध्ये ह्या उपचारांचा विशेष उपयोग होतो. संधारणा उपचारांचे प्रभाव दिसून येण्यास वेळ लागतो. दरम्यान हे उपचार, बरे होण्याचा वेग वाढवितात. पक्षाघातानंतर मेंदूचे कार्य पूर्वपदावर आणण्यासाठी ह्या उपाचारांचा उपयोग होतो. दोन्ही उपचारपद्धतींचे संयुक्त लाभ मिळविण्यासाठी अनेक रुग्ण संधारणा उपचार घेतात त्याच दिवशी हेही उपचार घेतात.
पोषण परिपूरके
वैज्ञानिकदृष्ट्या संतुलित पोषण परिपूरकांची योजना शरीराची प्राणिदीकारकांविरोधी संरक्षणप्रणाली मजबूत करते. तिच्यात जीवनसत्त्वे इ, क, ब१, ब२, ब३, ब६, ब१२, पीएबीए, बीटा कॅरोटीन, कोएन्झाईम क्यू१० आणि इतर ह्यांचा समावेश असावा. क्षार आणि विरल घटक परिपूरकांच्या संतुलित कार्यक्रमात कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, सेलेनियम, मँगनीज, व्हॅनॅडियम आणि क्रोमियम यांचाही समावेश असावा. पोषण परिपूरकांचे नक्की प्रमाण रुग्णागणीक प्रयोगशालेय तपास आणि पोषणनिदान यांवर अवलंबून असेल. डॉ. क्रँटन्स प्राईम न्युट्रिएन्टस हे सर्वोत्तम उच्च-सामर्थ्य बहुजीवनसत्त्व, क्षार, विरल घटक यांच्या सूत्रांवर आधारित पोषण परिपूरक आहे जे पायाभूत संतुलित परिपूरके एकत्रित करून योग्य किंमतीत उपलब्ध करते. डॉ. क्रँटन्स अँटीओक्स पॅकेटस् ही एक खूपच परिपूर्ण योजना अतिरिक्त किंमतीत पुरविल्या जाते. ही विशेषत: लक्षणधारी वयस्कर रुग्णांसाठी सांगितल्या जाते. संधारणा उपचार घेणारे रुग्ण दररोज दोन वेळा जेवणासोबत अँटीओक्स पॅकेटवर ठेवल्या जातात. डॉ.क्रँटन आणि त्यांचे कुटुंबीयही तेच घेतात.
विनाशकारी व्यसने
तंबाखूसेवन थांबविणे महत्त्वाचे आहे. ह्यामध्ये धूम्रपान, तपकीर ओढणे, तंबाखू खाणे ह्यांचा समावेश आहे. संधारणा उपचार घेणारे जे रुग्ण तंबाखूसेवन सुरूच ठेवतात त्यांना इतरांच्या तुलनेत कमी सुधारणा अनुभवास येते आणि ती अल्पकाळ टिकते, अशी निरीक्षणे सातत्याने केल्या जात आहे.
तुलनेने निरोगी प्रौढ लोक माफक प्रमाणात मद्यार्क घेऊन, त्याच्यामुळे निर्माण होणारे प्राणिदीकारक, त्याच्यामुळे नाहीशा होणार्या प्राणिदीकारकांपेक्षा जास्त न होता, बहुधा चालवून घेऊ शकतात. मात्र प्रमाणाबाहेर मद्यार्क घेणारे मुक्त मूलकांद्वारे होणार्या हानीचे धोके पत्करत असतात. बद्धमूल अवनतीकारक रोगांचे रुग्णांनी मद्यसेवन कमीतकमी करावे.
व्यायाम
शेवटी, नियमित व्यायाम फार उपयोगी ठरतो. सप्ताहात अनेकदा ४५ मिनिटे जलद चालणे हेही आरोग्यलाभ आणि संधारणा उपचारांनी सुधारलेले अभिसरण कायम राखण्यात मदत करते. नियमित व्यायामाने सामान्यत: स्नायूंमध्ये लॅक्टेट साठत जाते. आणि लॅक्टेट हे शरीरांतर्गत उत्पादित नैसर्गिक संधारक आहे. आता आपण शेवटल्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.
संधारणा उपचार तुमच्याकरीता आहेत काय?
तुम्हीच निर्णय घेऊ शकता. असे शक्य आहे की तुमचे डॉक्टर तुम्हाला निर्णय घेण्यात मदत करू शकणार नाहीत. संधारणा उपचार घेणारे बहुधा त्यांच्या व्यक्तीगत डॉक्टरच्या अथवा कार्डिओलॉजिस्टच्या सल्याच्या विरोधात जाऊनच तसा निर्णाय घेतात. अनेकांना आधीच रुंदीकरण/उल्लंघन शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला देण्यात आलेला असतो. क्वचित, रुग्णाने शुश्रुषालयात भरती होईपर्यंत संधारणा उपचारांबाबत काही ऐकलेलेच नसते.
नंतर एखादा मित्र अथवा नातेवाईक शस्त्रक्रिया करवून घेण्याआधी ह्या अनातिक्रमक उपचारांची दखल घेण्यास सांगतात. लक्षणीय मोठ्या संख्येतील नवे रुग्ण संधारणा उपचारास, तसेच उपचार यशस्वीरीत्या घेतलेल्या कुणा दुसर्या रुग्णाच्या प्रशस्तीवरूनच येत असतात. एक वा दोन अपयशी उल्लंघन शस्त्रक्रियांनंतरही अनेक रुग्णांना लाभ झालेला आहे.
तुमच्यासारख्याच दुविधेत असलेल्या कुणाशीही संवाद साधण्यास व त्यांचे अनुभव जाणून घेण्यास तुम्ही मोकळे आहात. त्यांच्याशी मोकळेपणाने संपर्क साधा. दवाखान्यांमधून त्यांची नावे उपलब्ध आहेत. ज्यांना लाभ मिळाला आहे असे बहुतेक रुग्ण आनंदाने तुम्हाला त्यांची बाजू समजावून देतील.
संदर्भः २००२-एल्मर एम्.क्रँटन,एम्.डी.
मूळ इंग्रजी
शब्दांसाठीचे पर्यायी मराठी शब्द
अक्र
|
मूळ इंग्रजी शब्द
|
पर्यायी मराठी शब्द
|
१
|
Advocate
|
पुरस्कृत करणे
|
२
|
Aftermath
|
दुर्घटनेचे दुष्परिणाम
|
३
|
Ailment
|
व्याधी
|
४
|
Antibiotics
|
प्रतिजैविके
|
५
|
Approved
|
मंजूर केलेला
|
६
|
Aspirin
|
ऍस्पिरीन, रक्ततरलक
|
७
|
Catalist
|
उत्प्रेरक
|
८
|
Chelete
|
संधारक
|
९
|
Cheletion
|
संधारण उपचार
|
१०
|
Course of remedy
|
उपचारक्रम
|
११
|
Disease
|
रोग
|
१२
|
Dizziness
|
चक्कर येणे, गरगरणे
|
१३
|
E.D.T.A.- Ethylene Diamine Tetraacetic Acid
|
इ.डी.टी.ए.- इथिलीन डाय-अमाईन टेट्रा-असिटिक
आम्ल
|
१४
|
Enjoyable
|
आस्वाद्य
|
१५
|
Favourable
|
समर्थक, अनुकूल
|
१६
|
Gangrene
|
अचेतनता
|
१७
|
Haemoglobin
|
रक्तरंजक द्रव्य
|
१८
|
Hospital
|
रुग्णालय, शुश्रुषालय, इस्पितळ
|
१९
|
Illness
|
आजार
|
२०
|
Infuse
|
आत सोडणे, शिरवणे
|
२१
|
Intravenous
|
शीरेतून द्यावयाचा
|
२२
|
Journal
|
नियतकालीक
|
२३
|
Lewesite
|
धोकादायक विषारी वायू, आर्सेनिक
संयुग
|
२४
|
Maintenance
|
देखभाल, क्षतिपूर्ती
|
२५
|
Majority
|
बहुतांश
|
२६
|
Mechanism of action
|
कार्यकलाप
|
२७
|
Metabolic
|
चयापचयसंबंधित
|
२८
|
Metals
|
धातू
|
२९
|
Minerals
|
खनिजे
|
३०
|
Monitoring
|
निगराणी, देखरेख
|
३१
|
Nausea
|
मळमळ, उलटीची भावना
|
३२
|
Nutritional
|
पोषणात्मक
|
३३
|
Occasionally
|
क्वचित, कधीकधी
|
३४
|
Occlusive
|
ओष्ट्य (स्वर, व्यंजने)
|
३५
|
Optimum
|
समुचित, योग्य, यथातथ्य
|
३६
|
Pathalogy
|
शारीरिक-जैवचयापचयप्रक्रिया
|
३७
|
Peer reviewed
|
तज्ञपरीक्षित
|
३८
|
Pertinent
|
आनुषंगिक, त्या
संदर्भातील, त्याबाबतीतला
|
३९
|
Physiological
|
शारीरिक
|
४०
|
Preferance
|
प्राधान्य
|
४१
|
Pulse, Impulse
|
स्पंदन, स्पंदनधक्का
|
४२
|
Radical, ion
|
मूलक
|
४३
|
Rationale
|
आधार, निकष
|
४४
|
Selection
|
निवड
|
४५
|
Senility
|
म्हातारपण, वृद्धत्व, वयपरत्वे येणारी अवस्था
|
४६
|
Sever
|
गंभीर
|
४७
|
Suppliments
|
पूरके
|
४८
|
Technicalities
|
तंत्रविवरणे
|
४९
|
Trace elements
|
विरळ मूलद्रव्ये
|
५०
|
Transition element
|
स्थित्यंतर मूलद्रव्य
|
५१
|
Treatment of choice
|
निवडलेला उपचार
|
५२
|
Treatment session
|
उपचारसत्र
|
५३
|
Toxins
|
विषद्रव्ये, विषे
|
५४
|
Ultrasound
|
श्राव्यातीत
|
५५
|
Vast
|
खूप, विस्तृत
|
५६
|
Vitamins
|
जीवनसत्त्वे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.