अरुंधती दीक्षित आणि ’अनुवाद
पारिजात’ http://anuvadparijat.blogspot.com/ ही दोन्हीही नावे स्वयंप्रकाशित आहेत. अन्य कुणीही त्यांचे गुणविवरण
करण्याची मुळी गरजच नाही. तरीही मराठीशी संबंधित कुणाही अनुवादकाने जर ’अनुवाद
पारिजात’ ही अनुदिनी पाहिलेलीच नसेल तर त्याने अवश्य वाचावी हीच प्रार्थना आहे.
मात्र अनुवादकांच्या अंतरात
कायमच वास करणार्या ’अनुवाद कसा असावा’ या प्रश्नाला अरुंधती दीक्षित या
सिद्धहस्त, व्यासंगी, अनुवादिकेने दिलेले समर्थ उत्तरच, आपला मार्ग प्रशस्त करू
शकेल यात मला तिळमात्र संशय नाही! हा लेख इथे प्रस्तुत करण्यास त्यांनी सहर्ष
सहमती दिलेली आहे. त्याखातर त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा ही त्यांना
विनंती.
अनुवाद कसा असावा – अरुंधती दीक्षित
एखाद्या सामर्थ्यशाली राजकुमाराने दूरदेशीची राजकन्या प्रेमात किंवा पणात जिंकून
(वीरशुल्का) आपल्या घरी आणावी त्याप्रमाणे एखादा समर्थ कवी अथवा लेखक (कवयित्री
किंवा लेखिका ही) दुसर्या भाषेतील कविता, कथा, कादंबरी, ललित
लेखन अथवा एखादी कलाकृती आपल्या भाषेत घेऊन येतो.
दुसर्या भाषेच्या सांस्कृतिक, भौगोलिक, मानसिक
आणि सामाजिक विचारधारेच्या वेगळेपणावर मात करून स्वभाषेत ती कलाकृती उतरवणं हा
शिवधनुष्य पेलायचा अवघड पण तो जिंकतो.
झाडावरून गळून पडणार्या पक्व फळात संपूर्ण वृक्ष जसा
बीजरूपात सामावलेला असतो त्याप्रमाणे आपल्या हाती आलेल्या पुस्तकात त्याचा लेखक
विचाररूपाने आणि त्या विषयांश रूपाने संपूर्ण सामावलेला असतो. प्रत्येक वाचकाला तो
भेटत असतो. झाडावरून पिकलेलं फळ गळून पडलं की झाडाचा आणि फळाचा संबंध संपतो. तसा
पुस्तक प्रकाशित झालं की लेखक आणि पुस्तकाचा संबंध संपतो. ( पुढच्या आवृत्तीच्या
वेळी तो परत पुस्तकावर विचार करू लागतो ती वेळ वेगळी असते.) मग पुस्तक आणि वाचकाचा
संबंध सुरू होतो. बीज रूपातील विषयांश वाचकाच्या मनात अंकुरत असतो बहरत असतो आणि
लेखकरूपी मूळ झाडाचा आकार घेत असतो. त्यामुळे अनुवाद करण्यासाठी लेखकाला प्रत्यक्ष
भेटण्याची गरज भासू नये. कित्येकवेळा ते अनेक कारणांनी शक्यही नसतं. पण अशी गरज
भासली तर लेखकाच्या विचारात तरी संदिग्धता आहे किंवा आपल्याला तरी त्याला जाणून
घेतांना संदिग्धता आहे असे समजावे. दुसर्या भेटीच्या वेळेस `तो’ लेखक
वेगळा असतो. एकदा का पुस्तकातील बीजरूपातील लेखक ओळखता आला की तुम्ही आणि तो
समोरासमोर बसता. तो तुम्हाला सांगत राहतो आणि तुम्ही भाषांतर उतरवत राहता.
``हे शब्द ह्या संकल्पना हे वातावरण माझ्या भाषेत नाही.’’ हा प्रश्न सिद्धहस्त अनुवादकाला पडत नाही.
इंद्राच्या आश्रयाने लपलेला तक्षक जनमेजयाच्या यज्ञकुंडात पडत नसेल तर तो
इंद्रासहित पडेल अशा सामर्थ्याने तो अनुवादक
दुसर्या भाषेतील शब्द, पात्र वातावरणासकट ओढून आपल्या भाषेत
आणतो. ते त्याचं कौशल्य! शब्दसामर्थ्य! मंत्रसामर्थ्य! अर्थसामर्थ्य!
प्रेमात जिंकून आणलेल्या कलाकृती जणु अभिन्नच असतात. एक
आत्मा दोन देह अशी त्यांची अवस्था असते. ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे
भावार्थाच्या पालखीत ठेवलेल्या त्या दोन मखमली पादुकाच असतात. एकमेकांना पूरक.
भाषांची टरफलं कधीच गळून पडतात आणि ह्या देहीचे त्या देही घातल्याप्रमाणे मूळ
कलाकृतीचा आत्मा नवीन भावानुवादित कलाकृतीत
ओतला जातो. जणु कलाकृतीचं दुसर्या
भाषेतील clone
तयार होतं. एका दिव्यावर दुसरा दिवा लावला तर आधीचा कुठला
हे कळु नये त्याप्रमाणे ह्या कलाकृती तयार होतात.
जेंव्हा दोन भाषा वेगळ्या असात तेंव्हा सहाजिकच त्याच्यात
अनेक गोष्टींमधे वेगळेपण अपेक्षितच आहे. सामायिक असते एकच गोष्ट ती म्हणजे, दोन्ही
भाषा माणसाच्याच असतात. त्यामुळे भावनाविश्व तेच असतं. विचारविश्व तेच असतं. काही
विचारांना दोन भाषेत कमी अधिक महत्त्व, वा वजन अथवा कमी अधिक मान्यता असू शकते. संस्कृत भाषेतील कलाकृती
मराठी वा भारतीय भाषेत अनुवादित करतांना भौगोलिक आणि सांस्कृतिक अंतर कमी असेलही
पण काळाचं अंतर फार मोठं असतं. अशावेळी ती अनुवादित कलाकृती कालबाह्य ठरता कामा
नये.
दोन पाय एक गती, दोन हात एक कृती, दोन
कान एक श्रुती,
दोन डोळे एक दृष्टी, दोन ओठ एक उक्ती त्याप्रमाणे
दोन भाषा एक अनुभूती असेल तेव्हाच भावानुवाद साधला जातो. एका भाषेतील ही अनुभूती
दुसर्या भाषेत मिळण्यासाठी रूपांतर, भावानुवाद, अनुवाद
त्या संपूर्ण रचनेचा करायचा असतो. त्यातील शब्दांचा नाही. (अपवाद industrial , scientific
translations) प्रत्येक भाषेचा लहेजा सांभाळत भावानुवाद झाला पाहिजे.
एखादी संकल्पना त्या भाषेला किती पेलवते हेही महत्त्वाचे.
उदा. मराठीत ज्ञानोबारायांनी आणि तुकाराममहाराजांनी आणि इतर संतजनांनी ओढलेली
भक्तिरेषा इतकी ठळक आहे की एखादा दुसरा अधिक शृंगारिक शब्द सुद्धा बीभत्स वाटू
लागतो. डोक्यावर पदर घेऊन जिजाऊ सारखी उभी असलेली माझी मराठी पराक्रम, सात्त्विकता, अध्यात्म
ह्यांच स्वागत करते पण उत्ताल वा उत्तान पणाने ती ओशाळी होते. अशावेळी मूळ कलाकृतीतील
भाव किती टक्के मराठीत उतरवला तर तीच अनुभूती येईल हाही विचार करावाच लागतो.
शृंगाररसाला राजमार्गाने मराठीच्या दबारात न आणता मागच्या दरवाजाने आणून मागच्याच
आसनावर बसवावे लागते. ``मुदा गोपीनारीवदनकमलास्वादमधुपः।'' ह्या एका ओळीचा सरळसोट अनुवाद
होऊ शकतो पण तो भावविश्वावर आघात झाल्यासारखा न होता वेगळेपणाने
अशा जीवे भावे हरिमयचि होता गवळणी
मुखांना शोभा ये कुमुदवनिची लोभस कशी
हरीच्या नेत्रांचे मधुकर रसास्वाद करण्या
कधी येती जाती फिरति मुखपद्मांवरिच त्या।
असाही होऊ शकतो.
श्रीराम सीतेला घेऊन आले तेंव्हा सारे नगरवासी राम-सीतेला
पहाण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. दुसर्या देशाची सौंदर्यवती कन्या
आपल्या सामर्थ्यशाली राजकुमारामेवत कशी काय शोभत आहे हे पहायला सारेच उत्सुक होते.
त्याप्रमाणे सारेच वाचक ही रूपांतरीत कलाकृती डोळ्यात तेल घालून तपासून बघत असतात.
ही रूपांतरीत कलाकृती लावण्यवती आहे ना? तिच्यात एक जरी कमतरता दिसली
तरी वाचक ती नजरेआड करत नाहीत. उलट त्या कमतरतेलाच अधोरेखित केलं जातं. त्याचाच
बोलबाला सर्वत्र होतो.
दुसर्या भाषेतून आपल्या भाषेत आणलेली कलाकृती त्या
कलाकाराच्या सानिध्यात कधी रूपगर्विता द्रौपदीप्रमाणे उभी असेल वा कधी सात्त्विक
भावांनी निथळणार्या सीतेप्रमाणे. कधी पत्र लिहून आपल्या योग्य प्रियकराला बोलावून
घेणार्या सुजाण विवेकी रुक्मीणीप्रमाणे तर कधी दैदीप्यमान दृढनिश्चयी
सावित्रीप्रमाणे.
ह्या दूरदेशीच्या राजकुमारी त्यांच्या देशीच्या संकल्पना
रूपी अलंकारांनी नटलेल्या असतील वा कधी लेखकाच्या अस्सल स्वभाषेचा साज चढवून नवीन
उंबरठा ओलांडून नव्या घरातीलच होण्यासाठी आल्या असतील. सर्वांना वाटावं अरे ही तर
आपलीच! चुकून तिकडे जन्मली. काही
मस्तानीप्रमाणे अशाही असतील की ज्यांना नव्या उंबर्यावर प्रवेश नाकारला गेला.
त्यावेळी तो सामर्थ लेखक गडबडत नाही. त्याला आपल्या रूपांतरीत कलाकृतीबद्दल
आत्मविश्वास असतो. She
is my lady म्हणून तो तिच्यासोबत खंबीर उभा असतो. भवभूतीप्रमाणे तो
गर्जना करतो,
``ज्यांना माझी रचना मान्य नाही, त्यांचं
ज्ञान तोकडं आहे. म्हणूनच ते तिचा उपहास करत आहेत. पण लक्षात ठेवा! काळ अनंत आहे
आणि पृथ्वीही विशाल आहे. ह्या पृथ्वीवर कधी ना कधी असा गुणग्राही जन्मेल ज्याला
माझ्या रचनेची उचित कदर असेल.’’
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी॥
हा त्याचा उद्दामपणा नसतो तर रचनेवरील विश्वास असतो. लोक
रचनेच्या वेगळेपणाला किंवा त्यातील प्रयोगशीलपणाला नाकारू शकतील पण तिचं लावण्य कोणाला नाकारता येत नाही. अशी
अजरामर कलाकृती त्या लेखकासोबत He is my man म्हणत मान वर करून अभिमानाने
उभी असते. तिला लोकांच्या नाकारण्याची पर्वा नसते. कारण ती अभिजात सुंदरीच असते.
कलाकृती कशी सजवावी कशी उभारावी ह्या गोष्टी प्रत्येकजण
स्वतःच्या सौंदर्यदृष्टीप्रमाणे करत असतो. एखाद्या रत्नहारात अनेक रत्नांसाठी
वेगवेगळ्या आकाराची कोंदण असतात. त्या प्रत्येक कोंदणात बसणारं रत्नच तिथे जडवावं
लागतं अशी सुयोग्य कोंदणात सुयोग्य रत्न बसवली की परिणामस्वरूप तयार होणारा
रत्नहार डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरतो त्याप्रमाणे नेमक्या सुयोग्य शब्दांची निवड
वाचकांना थेट अर्थविश्वाच्या अनुभूती पर्यंत नेऊन पोचविते.
-------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -