विल्म्स अर्बुदांकरता रसायनोपचार
रसायनोपचार (केमोथेरपी किंवा नुसतेच केमो) कर्कविरोधी औषधांचा वापर करतात. ही
औषधे शिरेतून किंवा तोंडावाटे (गोळ्यांच्या स्वरूपात) दिली जातात. ही औषधे रक्तात
उतरून शरीराच्या सर्व भागांत पोहोचतात, ज्यामुळे मूत्रपिंडांव्यतिरिक्त इतरत्रच्या
अवयवांत पसरलेल्या अथवा पसरू शकणार्या कर्काकरता हे उपचार उपयुक्त ठरतात.
विल्म्स अर्बुदे असलेल्या बव्हंशी मुलांना उपचारांदरम्यान कुठल्या ना कुठल्या
अवस्थेत रसायनोपचार दिले जातातच. अमेरिकेत बहुधा रसायनोपचार शल्यक्रियेनंतर दिले
जातात. काही वेळेला शल्यक्रिया संभव करण्याकरता, अर्बुद-संकोच घडवून आणण्यासाठी,
ते शल्यक्रियेच्या आधीही द्यावे लागतात. युरोपात शल्यक्रियेच्या आधी रसायनोपचार
दिले जातात आणि शल्यक्रियेनंतरही ते सुरूच ठेवले जातात. दोन्हीही पद्धतींत,
रसायनोपचारांचे प्रकार आणि मात्रा, कर्काची पायरी आणि पेशीरचना ह्यांवर अवलंबून
असतात.
विल्म्स अर्बुदांच्या उपचारार्थ दिली जाणारी रसायनोपचारांची औषधे बहुतेकदा
पुढीलप्रमाणे असतात. ऍक्टिनोमायसिन डी (डिऍक्टिनोमायसिन) आणि व्हिन्क्रिस्टीन.
विपक्षकर पेशीरचना असलेल्या, अधिक प्रगत पायर्यांतील किंवा उपचारांपश्चात पुनःपुन्हा
उद्भवणार्या अर्बुदांकरता इतर औषधे जशी की, डोक्सोरुबिसिन (आड्रिमायसिन),
सायक्लोफॉस्फामाईड, एटोपोसाईड, इरिनोटेकॅन आणि/ किंवा कार्बोप्लॅटीन ही औषधे
वापरली जाऊ शकतात.
ही औषधे शिरेत किंवा शिरा-मध्य-पोहोच-साधनात टोचली जातात. विल्म्स
अर्बुदांच्या प्रकार आणि पायर्यांवर तसेच मुलाच्या वयावर अवलंबून, निरनिराळी
औषधे, मात्रा आणि उपचार-कालावधी ह्यांचा उपयोग केला जातो. बव्हंशी प्रकरणांत, ही
औषधे सप्ताहात एकदा याप्रमाणे किमान काही महिने दिली जातात. डॉक्टरांच्या
कार्यालयातील परिचारक किंवा शुश्रुषालयांच्या बाह्यरुग्ण विभागातील कर्मचारी ती
देत असतात. विल्म्स अर्बुदे असलेल्या मुलांच्या काही प्रकरणांत, ती मुले
रसायनोपचार घेत असता शुश्रुषालयांतच दाखल असतात, मात्र बहुतेकदा हे आवश्यक नसते.
रसायनोपचारांचे संभाव्य उपप्रभाव
रसायनोपचारांची औषधे जलदीने विभाजित होत असणार्या पेशींवर आक्रमण करतात,
म्हणूनच बहुतेकदा ती कर्कपेशींविरुद्ध काम करत असतात. पण शरीरातील अस्थिमज्जा,
तोंडातील अस्तर, आतडे, केसांची मुळे इत्यादी इतर पेशीही जलदीने विभाजित होत असतात.
रसायनोपचारांमुळे ह्या पेशीही प्रभावित होणे शक्य असते. ह्यामुळे उपप्रभाव
संभवतात.
रसायनोपचारांचे उपप्रभाव औषधांच्या प्रकारांवर, मात्रेवर, आणि
उपचार-कालावधींवर अवलंबून असतात. संभाव्य अल्प-अवधी (शॉर्ट टर्म) उपप्रभावांत
खालील उपप्रभावांचा समावेश होत असतो.
- केस-गळती
- तोंड येणे
- भूक न लागणे
- मळमळणे आणि वांती होणे
- अतिसार किंवा बद्धकोष्ठता
- वर्धित-संसर्गप्रवणता (रक्तातील कमी
झालेल्या पांढर्या रक्तपेशींच्या संख्येमुळे)
- सहज-जखम-प्रवणता
आणि सहज-रक्तस्त्राव-प्रवणता (रक्तातील बिंबाणू [प्लेटलेट] संख्या कमी
झाल्यामुळे)
- थकवा (रक्तातील
लाल पेशींची संख्या कमी झाल्यामुळे)
तुमच्या मुलाचे डॉक्टर आणि उपचार-चमू विकसित होणार्या
उपप्रभावांवर बारकाईने लक्ष ठेवेल. हे उपप्रभाव कमी करण्याकरता अनेकदा उपाय उपलब्ध
असतात. उदाहरणार्थ मळमळणे अथवा वांत्या होणे घटविण्या वा रोखण्याकरता औषधे दिली
जाऊ शकतात. तुमच्या मुलाचे डॉक्टर किंवा परिचारक ह्यांना उपप्रभाव घटवणार्या
औषधांबद्दल विचारा आणि त्यांना तुमच्या मुलास जाणवत असलेल्या उपप्रभावांबद्दल
माहिती द्या, ज्यामुळे त्यांचे व्यवस्थापन होऊ शकेल.
उपरोल्लेखित प्रभावांबरोबरच काही औषधांचे विशिष्ट
उपप्रभावही असू शकतात. उदाहरणार्थः
·
व्हिन्क्रिस्टीन मज्जातंतूंना हानी पोहोचवू शकते.
काही रुग्ण अशक्तता अनुभवतात. विशेषतः हाता-पायांना बधीरता येणे, मुंग्या येणे,
दुःख होणे इत्यादी उपप्रभाव लक्षात येऊ शकतात.
·
डोक्सोरुबिसिन हृदयास हानी पोहोचवू शकते.
औषधाच्या मात्रेसोबतच हा धोका वाढत जात असतो. संस्तुत मात्रेहून दिलेली मात्रा कमी
राखून, आणि इको-कार्डिओ-ग्राम (हृदयाची ध्वन्यातीत लहरींद्वारे चाचणी) नावाच्या
चाचणीद्वारे हृदय तपासत राहून, ह्या उपचारांदरम्यान डॉक्टर शक्यतोवर हा धोका
घटवण्याचा प्रयत्न करतच असतात.
·
सायक्लोफॉस्फामाईड मूत्राशयास हानी पोहोचवू
शकते, ज्यामुळे लघवीत रक्त येऊ शकते. असे घडून येण्याची शक्यता, द्रव-विपुल-औषधे
देऊन आणि मेस्ना नामक औषध देऊन घटवता येते, ज्यामुळे मूत्राशयाचे संरक्षण होत
असते.
रसायनोपचारांचे उपप्रभाव जाणून घेण्याकरताच्या प्रयोगशालेय तपासण्या
रसायनोपचार देण्यापूर्वी तुमच्या मुलाचे डॉक्टर, यकृत, मूत्रपिंड आणि अस्थिमज्जा
कार्यवाही समजून घेण्यासाठी रक्त तपासणी करतील. जर काही समस्या असतील तर
रसायनोपचार लांबणीवर टाकले जाऊ शकतात किंवा त्यांची मात्रा घटवली जाऊ शकते.
संपूर्ण-रक्त-गणनेत (कंप्लीट ब्लड काऊंट) पांढर्या-रक्तपेशींची संख्या, लाल
रक्तपेशींची संख्या आणि बिंबाणूंची संख्या समाविष्ट असते. रसायनोपचार ह्या पेशींची
संख्या घटवू शकतात. म्हणून रसायनोपचारांदरम्यान आणि तद्नंतर रक्त-गणनेवर बारकाईने
लक्ष ठेवले जाते.
रक्त-रसायनशास्त्र-चाचण्या रक्तातील काही रसायनांचे मापन करतात, जी डॉक्टरांना
यकृत आणि मूत्रपिंडे कशी कार्य करत आहेत ह्याबद्दल माहिती देतात. काही रसायने यकृत
आणि मूत्रपिंडे यांस हानी पोहोचवू शकत असतात.
रसायनोपचारांचे दीर्घकालीन उपप्रभाव
कर्कोपचारांपश्चात मुलांना ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते, ते म्हणजे उपचारांचे
संभाव्य दीर्घकालीन प्रभाव हे असतात.
उदाहरणार्थ, जर तुमचे मुलास डोक्सोरुबिसिन दिले जात असेल तर, त्यामुळे
त्याच्या हृदयास हानी पोहोचण्याची शक्यता असते. तुमचे डॉक्टर, वापरलेल्या
मात्रांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवतील आणि मुलाच्या हृदयकार्याची चित्रक
चाचण्यांद्वारे तपासणी करतील.
काही रसायनोपचार औषधे, विल्म्स अर्बुद बरे झाल्यानंतर अनेक वर्षांनी, दुसर्या
एखाद्या प्रकारचा कर्क (जसे की रक्त-कर्क) विकसित करण्याचा
धोका असतो. पण ह्या लहानशा धोक्यातील वाढीचे मूल्यांकन, विल्म्स अर्बुदांवरच्या
रसायनोचारांच्या पर्यवसानांच्या मूल्यांकनाशी करावे लागेल.
विल्म्स अर्बुदांकरताच्या प्रारणोपचार पद्धती
कर्कपेशी मारण्याकरता, प्रारणोपचार पद्धती उच्च-ऊर्जा किरणे
अथवा कणांचा उपयोग करत असते. प्रारणोपचार पद्धती ही केवळ
अधिक प्रगत (पायरी-III, IV आणि V) विल्म्स अर्बुदांच्या उपचारार्थ आणि काही विपक्षकर
पेशीरचना असलेल्या सुरूवातीच्या पायर्यांतील अर्बुदांकरता उपयोगांत आणली जात
असते.
विल्म्स अर्बुदांकरता वापरल्या जाणार्या बाह्य-शलाका-प्रारणोपचार-पद्धती
चे प्रारण, प्रारणास शरीरा-बाहेरून, कर्कावर केंद्रित करत असते.
क्ष-किरणांप्रमाणेच ते असते. मात्र प्रारणाचे परिमाण खूपच जास्त असते. एकूण-प्रारण-मात्रा
दैनिक भागांत विभागली जाते, आणि बहुधा दोन सप्ताहांत दिली जाते.
उपचार सुरू होण्यापूर्वी, प्रारण-चमू संगणक-त्रिमिती-आलेखन
किंवा चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकने अशांसारख्या चित्रक चाचण्याद्वारे काळजीपूर्वक
मापने घेतात. ह्यामुळे प्रारण-शलाका सोडण्याचा सुयोग्य कोन आणि योग्य
प्रारण-मात्रा ह्या गोष्टी निर्धारित केल्या जाऊ शकतात.
प्रत्येक उपचार सत्राकरता, नेमक्या कोनातून यंत्र प्रारणे
देत असता तुमचे मूल विशेष टेबलावर पडून राहते. तुमच्या मुलावर मुलाच्या शरीराच्या
आकाराचा प्लास्टिकचा साचा बसवलेला असतो, ज्यामुळे प्रत्येक वेळी ते त्याच जागी
खिळवले जाते आणि प्रारणाचा नेम अधिक अचूक धरला जाऊ शकतो. प्रत्येक दिवशी
प्रत्यक्षात लागणारा उपचारांचा कालावधी खूपच अल्प असतो. उपचार दुःखद नसतात, पण
लहान मुलांना प्रत्येक उपचारापूर्वी झोपाळलेल्या अवस्थेत राखण्यासाठी औषधे दिली
जातात. ज्यामुळे ते स्थिर राहण्याची खात्री केली जाऊ शकते.
काही नवीन प्रारण-तंत्रे डॉक्टरांना, प्रारणे अधिक नेमकेपणे
केंद्रित करू देतात.
त्रिमिती-अनुरूप-प्रारणोपचार-पद्धती
ही पद्धती चुंबकीय-अनुनाद-चित्रणासारख्या चित्रक चाचण्या
आणि नेमकेपणाने अर्बुदाची जागा निश्चित करण्यासाठी विशेष संगणक यांचा वापर करत असते.
अनेक प्रारण-शलाका मग विशिष्ट आकारांत घडवून, निरनिराळ्या दिशांनी त्या अर्बुदावर
केंद्रित केल्या जातात. प्रत्येक शलाका बर्यापैकी अशक्त असते, ज्यामुळे शरीरातील
सामान्य ऊतींना हानी पोहोचविण्याची शक्यता कमी असते, पण त्या शलाका अर्बुदावर
केंद्रित होतात, ज्यामुळे तिथे प्रारणाची उच्चतर मात्रा प्राप्त होऊ शकते.
प्रखरता नियमीत प्रारणोपचार पद्धती (इंटेन्सिटी मॉड्युलेटेड
रेडिअशन थेरपी – आय.एम.आर.टी.)
त्रिमिती पद्धतीचेच हे एक प्रगत स्वरूप आहे. शलाका विशिष्ट
आकारांत घडवणे आणि त्यांचे निरनिराळ्या दिशांतून अर्बुदावर केंद्रिकरण करणे ह्या
व्यतिरिक्त, जवळपासच्या सामान्य ऊतींपर्यंत पोहोचणार्या मात्रेची तीव्रता
मर्यादित राखण्याकरता शलाकांची प्रखरताही जुळवून घेतली जाऊ शकते. ह्यामुळे
डॉक्टरला अर्बुदास उच्चतर मात्रा देणे शक्य होते. अनेक प्रमुख शुश्रुषालये आणि
कर्क-केंद्रे आता ह्या पद्धतीचा उपयोग करत आहेत.
प्रारणोपचार पद्धतीचे संभाव्य उपप्रभाव
अनेकदा प्रारण हा उपचारांचा एक महत्त्वाचा भाग असतो, पण
लहान मुलांची शरीरे प्रारणास खूप संवेदनाक्षम असतात, म्हणून डॉक्टर कमीत कमी
प्रारण वापरण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे कुठल्याही समस्या टाळण्यास किंवा
मर्यादित ठेवण्यास मदत होते. प्रारणोपचार पद्धत अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे
दोन्हीही प्रकारचे उपप्रभाव घडवू शकते. उपप्रभाव प्रारण-मात्रेवर आणि केंद्रिकरण
बिंदूवर अवलंबून असतात.
संभाव्य अल्पकालीन उपप्रभाव
- प्रारण
प्राप्त करणार्या त्वचाभागांतील प्रभाव, सौम्य सौर-चटक्यागत बदल आणि केस
गळणे यांपासून तर अधिक गंभीर स्वरूपाच्या त्वचा-प्रतिक्रियांपर्यंत असू
शकतात.
- पोटास
मिळणार्या प्रारणामुळे मळमळणे किंवा अतिसार अनुभवास येऊ शकतात.
- प्रारणोपचार
पद्धती मुलास थकवू शकतात, विशेषतः उपचारांच्या अखेरीस.
संभाव्य दीर्घकालीन उप गर्भाशय प्रभाव
- प्रारणोपचार
पद्धत शरीरातील प्रारण प्राप्त करणार्या सामान्य ऊतींची (जसे की अस्थी) वाढ
मंदावू शकते, विशेषतः लहान मुलांत. भूतकाळात ह्यामुळे आखूड अस्थी किंवा पाठीच्या
कण्याला येणारा वाक अशांसारख्या समस्या उद्भवू शकतात. पण हल्ली वापरल्या
जाणार्या कमी प्रारण मात्रांमुळे असे घडण्याची शक्यता कमी झालेली आहे.
- छातीपर्यंत
पोहोचणारे प्रारण हृदय आणि फुफ्फुसांना प्रभावित करू शकते. ह्यामुळे ताबडतोब
बहुधा काही समस्या निर्माण होत नाहीत, पण काही मुलांत वाढत्या वयासोबतच
यथावकाश हृदयाच्या किंवा फुफ्फुसाच्या समस्या उद्भवू शकतात.
- मुलींच्या
पोटास मिळणार्या प्रारणामुळे बिजांडकोशास हानी पोहोचू शकते. यामुळे
अपसामान्य मासिक पाळी किंवा गर्भार राहण्याकरता अथवा मुले होण्याकरता पुढे
जाऊन समस्या निर्माण होऊ शकतात.
- प्रारणामुळे
अ-पान-शर्करा-गर्भकाम्लास हानी पोहोचू शकते. परिणामी, प्रारणोपचार पद्धती,
ज्या भागास प्रारण सोसावे लागते त्या भागात दुसरा कर्क उद्भवण्याचा धोका
किंचितसा वाढवत असते. हे बहुधा प्रारण दिल्यानंतर अनेक वर्षांनंतर घडून येऊ
शकत असते. अनेकदा विल्म्स अर्बुदांसोबत असे घडून येत नाही कारण, वापरलेली
प्रारणमात्रा खूप कमी असते.
पालकांनी आपल्या मुलांवर डॉक्टरांकरवी बारकाईने लक्ष ठेवतच
राहावे, ज्यामुळे उद्भवणार्या समस्यांचा ते लगेचच इलाज करू शकतील. संभाव्य दीर्घकालीन
प्रभावांबद्दल अधिक माहितीकरता "विल्म्स
अर्बुदांच्या उपचारांनंतर काय होत असते?" हा अनुभाग
पाहावा.
विल्म्स अर्बुदांकरताच्या वैद्यकीय चाचण्या
तुमच्या मुलाला कर्क आहे असे सांगितल्यानंतर तुम्हाला अनेक
निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यांपैकी तुम्हाला घ्यावा लागणारा एक सर्वात महत्त्वाचा
निर्णय म्हणजे कुठला उपचार सर्वोत्तम ठरू शकेल हा आहे. अशा प्रकारच्या कर्काकरता वैद्यकीय
चाचण्या केल्या जातात असे तुम्ही ऐकलेले असू शकते. किंवा आरोग्य-निगा-चमूपैकी
कुणीतरी तुमच्याजवळ वैद्यकीय चाचण्या केल्या जातात त्याचा उल्लेखही केलेला असू
शकतो.
वैद्यकीय चाचण्या ह्या काळजीपूर्वक नियंत्रित संशोधन अभ्यास
असतात, जे त्याकरता स्वतःहून तयार असलेल्या रुग्णांवर केले जातात. आश्वासक नवीन
उपचार आणि पद्धतींचा बारकाईने शोध घेण्यासाठी हे अभ्यास केले जात असतात.
तुम्हाला ह्याचा निर्णय घ्यावा लागेल की अशा वैद्यकीय चाचण्यांकरता
तुमच्या मुलाची नोंदणी करायची की नाही. पालकांची संमती स्वीकारण्यापूर्वी, काहीशी
मोठी मुले, जी अधिक जाणून घेऊ शकतात त्यांनीही बहुधा सहभाग घेण्यास सहमती दाखवलेली
असावी लागते.
वैद्यकीय चाचण्या म्हणजे तुमच्या मुलास, कलेची-सद्य-अवस्था (स्टेट-ऑफ-द-आर्ट)
अशा स्वरूपाची या विषयातील कर्क-निगा प्राप्त करवून देण्याचाच एक मार्ग असतात.
काही वेळेस त्या केवळ काही नवीन उपचारांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असू शकतात.
त्या म्हणजे, डॉक्टरांना कर्कोपचाराच्या चांगल्या पद्धती शिकून घेण्याचा एकमेव
मार्ग असू शकतात. तरीही त्या प्रत्येकच मुलाकरता योग्य ठरतीलच असे नाही.
विल्म्स अर्बुदांकरताच्या पूरक आणि पर्यायी
उपचार पद्धती
जेव्हा तुमच्या मुलाला कर्क झालेला असेल तेव्हा तुम्ही, तुमच्या डॉक्टरांनी
उल्लेखही न केलेल्या, लक्षणांपासून मुक्ती मिळवणार्या उपचारांबाबत ऐकतही असाल.
मित्रांपासून आणि कुटुंबियांपासून तर महाजालावरील गटांपासून आणि संकेतस्थळांवरून
कशा कशाचा उपयोग होऊ शकेल ह्याबाबतच्या कल्पना दिल्या जात असतील. ह्या पद्धतींत,
काही नावेच घ्यायची झाली तर, जीवनसत्त्वे, वनस्पतीजन्य-औषधे आणि विशेष आहार किंवा
ऍक्युपंक्चर वा मसाजासारख्या इतर पद्धतींचा समावेश होत असतो.
पूरक आणि पर्यायी उपचारपद्धती म्हणजे नक्की काय?
हे शब्द, सगळेच काही सारख्याच अर्थांनी वापरत नाहीत आणि
त्यांचा निर्देश अनेक निरनिराळ्या पद्धतींकडे असतो. म्हणून हे गोंधळात पाडणारे ठरू
शकते. आपण पूरक शब्दाचा वापर अशा उपचारांकरता करणार आहोत, जे तुमच्या
नियमित वैद्यकीय निगेसोबतच घेतले जाऊ शकतात.
पूरक उपचारपद्धतीः बहुतेक पूरक
उपचारपद्धती कर्क बरा करण्यासाठी दिल्या जात नाहीत. मुख्यतः अशा पद्धती कर्कबाधित
व्यक्तीस बरे वाटावे म्हणून दिल्या जात असतात. नियमित वैद्यकीय निगेसोबतच दिल्या
जाणार्या काही पूरक उपचारपद्धती पुढीलप्रमाणे आहेत. तणाव कमी करण्याकरता
कला-उपचारपद्धती किंवा क्रीडा-उपचारपद्धती. दुःखमुक्तीकरता ऍक्युपंक्चर किंवा मळमळ थांबवण्या-करता पेपरमिंट-चहा इत्यादी. काही पूरक उपचारपद्धती
उपयोगी ठरतात तर, इतर काही उपचारपद्धती अजून आजमावून पाहिलेल्या नाहीत. काही
उपचारपद्धती उपयोगी ठरत नाहीत असे निष्पन्न झालेले आहे आणि काही धोकादायक
असल्याचेही आढळून आलेले आहे.
पर्यायी उपचारपद्धतीः पर्यायी उपचार कर्क बरा करण्यासाठी दिले जातात. हे उपचार
सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे वैद्यकीय चाचण्यांत सिद्ध झालेले नाही. ह्यांपैकी
काही उपचारपद्धती धोकादायक ठरू शकतात किंवा त्यांना जीवघेणे उपप्रभाव असू शकतात.
मात्र अशा बव्हंशी प्रकरणांतील सर्वात मोठा धोका हा आहे की, तुमच्या मुलाची
प्रमाणित उपचार प्राप्त करण्याची संधी वाया जाईल. वैद्यकीय उपचारात होणारे उशीर
किंवा त्यात येणारे अडथळे कर्कास वाढीकरता अवधी देतात आणि उपचारांनी मदत होण्याची
शक्यता कमी करतात.
जास्तीच्या माहितीचा शोध घेणे
कर्क असलेल्या मुलांचे पालक पर्यायी पद्धतींचा विचार का
करतात हे समजून घेणे सोपे आहे. कर्काशी लढत देण्याकरता जे जे करता येणे शक्य आहे
ते ते करण्याची इच्छा तुम्हाला असते आणि मोजके किंवा अजिबात उपप्रभाव नसलेले उपचार
करण्याची संकल्पना महान वाटत असते. काही वेळेस, रसायनोपचारांसारखे वैद्यकीय उपचार
घेण्यास अवघड वाटतात किंवा ते काम करत नाहीत. पण सत्य हे आहे की, बव्हंशी पर्यायी
उपचारपद्धती तपासल्या गेलेल्या नाहीत आणि कर्कोपचार करण्यास समर्थ ठरलेले नाहीत.
तुम्ही तुमच्या मुलास उपलब्ध असलेले पर्याय विचारात घेत
असता तुम्हाला तीन महत्त्वाच्या पायर्यांत त्यांचा विचार करावा लागेल. त्या पायर्या
पुढीलप्रमाणे आहेत.
- “लाल बावट्यांवर”
लक्ष ठेवा, जे फसवणूक सूचित करतात. उपचारपद्धती बव्हंशी कर्कांना बरे
करण्याची आशा दाखवते काय?
- तुमचे नेहमीचे
औषधोपचार घेऊ नका असे तुम्हाला सांगितले आहे काय?
- उपचार “गुप्त” आहेत काय, ज्यामुळे तुमच्या
मुलास काही विशिष्ट उपचारदात्यांकडेच किंवा दुसर्या देशात जावे लागेल का?
तुम्ही ज्या उपचारपद्धतीचा विचार करत आहात तिच्याबद्दल तुमच्या मुलाच्या
डॉक्टरांशी किंवा परिचारकाशी बोला.
निवड तुमचीच असते
तुमच्या मुलावर कसे उपचार केले जावेत ह्याबाबत निर्णय
तुम्हालाच घ्यायचा असतो. जर तुम्हाला अ-प्रमाणित उपचारपद्धत वापरायची असेल तर, त्या
पद्धतीबद्दल जितके समजून घेता येईल तितके समजून घ्या आणि तुमच्या मुलाच्या
डॉक्टरांशी त्याबाबत बोला. चांगल्या माहितीच्या आधारे आणि तुमच्या मुलाच्या
आरोग्य-साहाय्य-चमूच्या आधाराने, तुम्ही धोकादायक पद्धती टाळून, तुमच्या मुलास
उपयुक्त ठरू शकतील अशा पद्धती सुरक्षितपणे वापरू शकाल.
पायर्यांनुरूप आणि पेशीरचनेनुसार विल्म्स अर्बुदांचे उपचार
विल्म्स अर्बुदे झालेल्या रुग्णांकरताच्या काही सर्वसामान्य उपचार पद्धती खाली
दिलेल्या आहेत. ह्या प्रकारचा कर्क असलेल्या बव्हंशी मुलांना,
बाल्य-अर्बुदशास्त्र-गटातर्फे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांत विकसित करण्यात आलेले उपचार दिले जात असतात.
ह्या अभ्यासांचे उद्दिष्ट, आवश्यकतेनुरूप थोडेसे उपचार देऊन उपप्रभाव मर्यादित
ठेवत असता, शक्य तितक्या अधिक मुलांना बरे करण्याचे असते. प्रचलित सर्वोत्तम
उपचारांची तुलना, डॉक्टर त्याहून चांगले ठरू शकेल असे समजत असतात त्या उपचारांशी
करून हे साधले जाते. ह्यामुळे काही प्रकरणांत खाली वर्णन केल्यापेक्षा उपचार
किंचित निराळेही असू शकतील.
विल्म्स अर्बुदांवरील उपचार प्रामुख्याने कर्काच्या पायरीवर आणि
पेशीरचना पक्षकर आहे की विपक्षकर आहे ह्यावर आधारलेले असतात. अमेरिकेत डॉक्टर
बव्हंशी प्रकरणांत पहिला पर्याय म्हणून शल्यक्रिया पसंत करतात आणि त्यानंतर
रसायनोपचार (आणि संभवतः प्रारणोपचार) दिले जातात. युरोपात डॉक्टर रसायनोपचारांची
सुरूवात शल्यक्रियेपूर्वीच करणे पसंत करतात. परिणाम मात्र दोन्हीही बाबतीत
एकसारखेच असतात.
जेव्हा कर्क काढून टाकण्याकरता शल्यक्रिया केली जाते
तेव्हा, बहुतेक प्रकरणांत, पायरी आणि कर्काची पेशीरचना (हिस्टॉलॉजी) प्रत्यक्षात
निर्धारित केली जाते, कारण अनेकदा केवळ चित्रक चाचण्यांद्वारे अर्बुदाचा विस्तार
निर्धारित केला जाऊ शकत नाही. शल्यक्रियेच्या निष्पन्नांचा मग नंतरच्या
उपचारांच्या मार्गदर्शनार्थ उपयोग करून घेतला जातो. पण काही वेळेस शल्यक्रियेच्या
आधीच चित्रक चाचण्यांद्वारे हे स्पष्ट झालेले असते की, कर्क मूत्रपिंडाच्या
बाहेरही पसरलेला आहे. अशा वेळी दिल्या जाणार्या उपचारांचा क्रम आणि
शल्यक्रियेच्या मर्यादा प्रभावित होत असतात.
पायरी-I
ही अर्बुदे केवळ मूत्रपिंडांतच असतात. शल्यक्रिया (मूलगामी मूत्रपिंड
शल्यक्रिया), संपूर्ण मूत्रपिंडासहित अर्बुद, जवळपासच्या संरचना आणि
जवळपासचे काही लसिका जोडही काढून टाकते.
पक्षकर पेशीरचना: अर्बुद असलेल्या (आणि
वजन ५५० ग्रॅमहून कमी असलेल्या) दोन वर्षांहून लहान मुलांना आणखी पुढे
रसायनोपचारांसारखे उपचार करत राहण्याची आवश्यकता नसते. पण त्यांचेवर बारकाईने नजर
ठेवावी लागते, कारण कर्क परत येण्याची शक्यता रसायनोपचार घेतला असता असते त्याहून
किंचित जास्त असते. जर कर्क परतून आला तर, ह्या अवस्थेत ऍक्टिनोमायसिन-डी
(डाक्टिनोमायसिन) आणि व्हिन्क्रिस्टाईन औषधांसह रसायनोपचार (आणि संभवतः आणखी
शल्यक्रिया) खूपच प्रभावी ठरू शकतात.
अर्बुद असलेल्या पण दोन वर्षांहून मोठ्या कितीही वयाच्या
असलेल्या मुलांना, बहुधा शल्यक्रिया आणि त्यानंतर ऍक्टिनोमायसिन-डी
(डाक्टिनोमायसिन) आणि व्हिन्क्रिस्टाईन औषधांसह केलेले रसायनोपचार दिले जातात. जर
अर्बुद-पेशींत काही रंगसूत्र-बदल असतील तर, डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) हे औषधही
दिले जाऊ शकते. रसायनोपचार अनेक महिन्यांपर्यंत दिले जातात.
विपक्षकर पेशीरचना: विपक्षकर पेशीरचना
असलेल्या अर्बुदासहितच्या कुठल्याही वयाच्या मुलांकरता, शल्यक्रियेपश्चात बहुधा
अर्बुदाच्या जागेवर प्रारणोपचार दिले जातात, सोबतच ऍक्टिनोमायसिन-डी
(डाक्टिनोमायसिन), व्हिन्क्रिस्टाईन आणि डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) औषधांसह
केलेले रसायनोपचार अनेक महिन्यांपर्यंत दिले जातात.
पायरी-II
ही अर्बुदे मूत्रपिंडाबाहेर जवळपासच्या ऊतींत पसरलेली असतात, पण
शल्यक्रियेत (मूलगामी मूत्रपिंड शल्यक्रियेत) कर्काची दृश्य चिन्हेच काढून टाकणे
शक्य होते.
पक्षकर पेशीरचना: शल्यक्रियेनंतर प्रमाणित उपचार म्हणजे ऍक्टिनोमायसिन-डी (डाक्टिनोमायसिन), आणि
व्हिन्क्रिस्टाईन औषधांसह केलेले रसायनोपचार. जर अर्बुद-पेशींत काही
रंगसूत्र-बदल असतील तर, डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) औषधही दिले
जाऊ शकते. रसायनोपचार अनेक महिन्यांपर्यंत दिले जातात.
(केवळ काहीशा) पेशीकेंद्र-विकारासहितची विपक्षकर
पेशीरचना: शल्यक्रियेतून
मूल सावरल्यावर अनेक दिवसांपर्यंत पोटावर प्रारणोपचार दिले जातात. हे झाल्यावर,
सुमारे सहा महिन्यांकरता ऍक्टिनोमायसिन-डी (डाक्टिनोमायसिन), आणि
व्हिन्क्रिस्टाईन औषधांसह केलेले रसायनोपचार दिले जातात.
(सर्वदूर) पसरलेल्या पेशीकेंद्र-विकारासहितची विपक्षकर
पेशीरचना: शल्यक्रियेनंतर
ह्या मुलांना अनेक दिवसांपर्यंत पोटावर प्रारणोपचार दिले जातात. त्यानंतर अधिक
तीव्र प्रकारचे व्हिन्क्रिस्टाईन, डोक्सोरुबिसिन, इटोपोसाईड,
सायक्लोफॉस्फामाईड आणि कार्बोप्लॅटीन, तसेच मेस्ना (सायक्लो-फॉस्फामाईडच्या
उपप्रभावांपासून मूत्राशयाचे संरक्षण करणारे औषध) ह्या औषधासहित केले जाणारे रसायनोपचार
सुमारे सहा महिन्यांपर्यंत दिले जातात.
पायरी-III
त्यांचे आकारमान किंवा स्थान किंवा इतर काही कारणांमुळे, ही
अर्बुदे शल्यक्रियेने पूर्णतः काढून टाकली जात नाहीत. काही प्रकरणांत, इतर उपचारांनी प्रथम
अर्बुदाचा संकोच घडून येईस्तोवर, अर्बुद काढून टाकण्याकरता केल्या जायच्या शल्यक्रिया
(मूलगामी मूत्रपिंड शल्यक्रियेत) पुढे ढकलाव्या लागतात (खाली पाहा).
पक्षकर पेशीरचना: शक्य असेल तर बहुधा शल्यक्रिया केली जाते, त्यानंतर अनेक दिवसांपर्यंत पोटावर प्रारणोपचार दिले
जातात. त्यानंतर ऍक्टिनोमायसिन-डी (डाक्टिनोमायसिन),
व्हिन्क्रिस्टाईन, आणि डोक्सोरुबिसिन, ह्या औषधासहित केले जाणारे रसायनोपचार सुमारे सहा महिन्यांपर्यंत दिले जातात.
(केवळ काहीशा) पेशीकेंद्र-विकारासहितची विपक्षकर
पेशीरचना: शक्य असेल तर बहुधा शल्यक्रिने उपचारांची सुरूवात होते. त्यानंतर अनेक
दिवसांपर्यंत पोटावर प्रारणोपचार दिले जातात. त्यानंतर ऍक्टिनोमायसिन-डी
(डाक्टिनोमायसिन), व्हिन्क्रिस्टाईन, आणि डोक्सोरुबिसिन, ह्या औषधासहित केले
जाणारे रसायनोपचार सुमारे सहा महिन्यांपर्यंत दिले
जातात.
(सर्वदूर) पसरलेल्या पेशीकेंद्र-विकारासहितची विपक्षकर
पेशीरचना: शक्य असेल तर बहुधा शल्यक्रियेने उपचारांची सुरूवात होते. त्यानंतर
अनेक दिवसांपर्यंत पोटावर प्रारणोपचार दिले जातात. त्यानंतर व्हिन्क्रिस्टाईन,
डोक्सोरुबिसिन, इटोपोसाईड, सायक्लोफॉस्फामाईड आणि कार्बोप्लॅटीन, तसेच मेस्ना
(सायक्लो-फॉस्फामाईडच्या उपप्रभावांपासून मूत्राशयाचे संरक्षण करणारे औषध) ह्या
औषधासहित केले जाणारे रसायनोपचार सुमारे सहा महिन्यांपर्यंत
दिले जातात.
काही प्रकरणांत, अर्बुद खूपच मोठे असू शकते किंवा आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांत
किंवा इतर संरचनांत वाढलेले असू शकते, ज्यामुळे ते सुरक्षितरीत्या काढून टाकले जाऊ
शकत नाही. अशा मुलांत, तो विल्म्स अर्बुदच आहे हे निश्चित करण्यासाठी आणि त्याची
पेशीरचना निर्धारित करण्यासाठी, अर्बुदाचा एक लहानसा नमुना काढून घेतला जातो. मग
रसायनोपचार सुरू केले जातात. जर रसायनोपचारांनी अर्बुद पुरेसे संकोचले नाही तर,
प्रारणोपचार दिले जातात. बहुधा अनेक सप्तांहांनी अर्बुद संकोचते, ज्यामुळे
शल्यक्रिया (मूलगामी मूत्रपिंड शल्यक्रिया) शक्य होते. शल्यक्रियेनंतर पुन्हा
रसायनोपचार सुरू केले जातात. जर शल्यक्रियेपूर्वी प्रारणोपचार दिलेले नसतील तर ते
शल्यक्रियेनंतर दिले जातात.
पायरी-IV
ही अर्बुदे निदानसमयीच शरीरातील दूरस्थ भागांत पसरलेली
असतात.
तिसर्या पायरीतील अर्बुदांप्रमाणेच शक्य असल्यास अर्बुद काढून टाकण्याची
शल्यक्रिया (मूलगामी मूत्रपिंड शल्यक्रिया) प्रथम केली जाते किंवा इतर उपचारांकरवी
अर्बुद-संकोच घडवून आणेपर्यंत ती पुढे ढकलली जाते (खाली पाहा).
पक्षकर पेशीरचना आणि (केवळ काहीशा) पेशीकेंद्र-विकारासहितची विपक्षकर
पेशीरचना: प्रमाणित उपचार हे बहुधा शल्यक्रियाच असतात. त्यानंतर पोटावर केलेले
प्रारणोपचार. पोटात अजूनही कर्क असेल तर, संपूण पोटास उपचार दिले जातात. जर कर्क फुफ्फुसांत पसरला असेल तर, त्या भागास
प्रारणाच्या लहान मात्रा दिल्या जातात. त्यानंतर बहुधा ऍक्टिनोमायसिन-डी
(डाक्टिनोमायसिन), व्हिन्क्रिस्टाईन आणि डोक्सोरुबिसिन, ह्या तीन औषधासहित केले
जाणारे रसायनोपचार सुमारे सहा महिन्यांपर्यंत दिले जातात.
(सर्वदूर) पसरलेल्या पेशीकेंद्र-विकारासहितची विपक्षकर
पेशीरचना: उपचार बहुधा शल्यक्रियेनेच सुरू होत असतात. त्यानंतर पोटावर केलेले
प्रारणोपचार. पोटात अजूनही कर्क असेल तर, संपूण पोटास उपचार दिले जातात. जर कर्क
फुफ्फुसांत पसरला असेल तर, दोन्हीही फुफ्फुसांच्या त्या भागास प्रारणाच्या लहान
मात्रा दिल्या जातात. त्यानंतर व्हिन्क्रिस्टाईन, डोक्सोरुबिसिन,
इटोपोसाईड, सायक्लोफॉस्फामाईड आणि कार्बोप्लॅटीन, तसेच मेस्ना
(सायक्लो-फॉस्फामाईडच्या उपप्रभावांपासून मूत्राशयाचे संरक्षण करणारे औषध) ह्या
औषधासहित केले जाणारे रसायनोपचार सुमारे सहा महिन्यांपर्यंत
दिले जातात.
जर अर्बुद खूपच मोठे असेल किंवा प्रथम शल्यक्रिया करून काढून टाकता येऊ नये
इतके विस्तारलेले असेल तर, ते विल्म्स अर्बुदच आहे हे
निश्चित करण्यासाठी आणि त्याची पेशीरचना निर्धारित करण्यासाठी, अर्बुदाचा एक लहानसा
नमुना काढून घेतला जातो. त्यानंतर अर्बुद-संकोच घडवून आणण्याकरता रसायनोपचार आणि/
वा प्रारणोपचार दिले जातात. ह्या अवस्थेत शल्यक्रिया हा एक पर्याय असू शकतो.
त्यानंतर मग रसायनोपचार (आणि आधीच दिलेले नसल्यास प्रारणोपचार) दिले जातात.
यकृतात पसरलेल्या चवथ्या पायरीतील कर्काकरता, अजूनही शिल्लक राहिलेले यकृतातील
अर्बुद काढून टाकण्याकरता शल्यक्रिया करणे हा एक पर्याय असू शकतो.
पायरी-V
प्रातिनिधिकरीत्या जरी त्यात कुठल्या ना कुठल्या अवस्थेत
शल्यक्रिया, रसायनोपचार आणि प्रारणोपचारच समाविष्ट होत असले तरी, दोन्हीही मूत्रपिंडांत
अर्बुद असलेल्या मुलांचे उपचार प्रत्येक मुलाकरता निराळे असतात.
जेव्हा दोन्हीही मूत्रपिंडांत अर्बुदे असतात तेव्हा ती
विल्म्स अर्बुदे असण्याची शक्यता दाट असते म्हणून, जरी सर्वच डॉक्टरांना हे आवश्यक
वाटत नसले तरीही, दोन्हीही मूत्रपिंडांतील आणि नजीकच्या लसिका-जोडांतील
अर्बुद-नमुने प्रथम गोळा केले जातात.
प्रथम अर्बुद-संकोचनार्थ प्रातिनिधिक रसायनोपचार दिले
जातात. वापरलेली औषधे विस्तार आणि (माहीत असल्यास) पेशीरचना यांवर अवलंबून असतात.
सुमारे सहा सप्ताहांच्या रसायनोपचारांनंतर, जर पुरेशा प्राकृत मूत्रपिंड ऊती
शिल्लक राहिलेल्या असतील तर, अर्बुद काढून टाकण्यासाठी शल्यक्रिया (आंशिक
मूत्रपिंड शल्यक्रिया) केली जाते. जर अर्बुदे पुरेशी संकोचली नसतील तर सहा
महिन्यांकरता उपचारांत आणखी रसायनोपचार किंवा प्रारणोपचार समाविष्ट केले जातात. मग
शल्यक्रिया (आंशिक किंवा मूलगामी मूत्रपिंड शल्यक्रिया) केली जाते. त्यानंतर आधीच
दिलेले नसतील तर संभवतः प्रारणोपचारांसहित, रसायनोपचार दिले जातात.
जर शल्यक्रियेपश्चात पुरेशा प्राकृत मूत्रपिंड ऊती शिल्लक
राहिलेल्या नसतील तर, मुलास यांत्रिक-रक्त-गाळणी सप्ताहातून अनेकदा दिली जाते,
जिच्यात विशेष यांत्रिक गाळण्यांद्वारे विसर्जित निष्पादने रक्ताबाहेर काढून टाकली
जातात. एक वा दोन वर्षांनंतर जर कुठल्याही कर्काचा पुरावा आढळून आला नाही तर,
मूत्रपिंड दात्याकडूनचे मूत्रपिंड प्रत्यारोपित केले जाते.
पुनरावर्ती विल्म्स अर्बुदे
पुनरावर्ती विल्म्स अर्बुदे असलेल्या मुलांची निदानात्मक
अटकळ (प्रोग्नॉसिस) आणि उपचार हे पूर्व-उपचारांवर, कर्काच्या (पक्षकर किंवा
विपक्षकर) पेशीरचनेवर आणि अर्बुद पुन्हा कुठे आढळून येते त्यावर अवलंबून असतात. खालील वैशिष्ट्यांसह
विल्म्स अर्बुद पुन्हा प्रकट होण्याचे परिप्रेक्ष्य सामान्यपणे चांगले असते.
- पक्षकर पेशीरचना
- सुरूवातीस निदानसमयी पायरी-I वा II ची अवस्था असणे
- सुरूवातीचे रसायनोपचार केवळ ऍक्टिनोमायसिन-डी (डाक्टिनोमायसिन) आणि व्हिन्क्रिस्टाईन ह्या
औषधांसह केलेले असणे
- प्रारणोपचार केलेले नसणे
- पूर्वीच्या निदानानंतर किमान १२
महिन्यांनी पुन्हा प्रकट होणे
अशा मुलांकरता सामान्य उपचार, शक्य असल्यास अर्बुद काढून
टाकण्याकरताची शल्यक्रिया, (त्या जागेवर आधीच केलेले नसल्यास) प्रारणोपचार
आणि अनेकदा पहिल्या उपचारांत वापरली गेली त्याहून निराळ्या औषधांसह केलेले
रसायनोपचार हेच असतात.
उपरोल्लेखित वैशिष्ट्ये नसलेली पुनरावर्ती विल्म्स अर्बुदे उपचार करण्यास खूपच
कठीण असतात. अशा मुलांना बहुधा आक्रमक रसायनोपचार दिले जातात, जसे की
आय.सी.ई.रेजिमेन (इफॉस्फॉमाईड, कार्बोप्लॅटीन आणि इटोपोसाईड) किंवा वैद्यकीय
चाचण्य़ांत अभ्यासली जाणारी इतर औषधे. अति-उच्च-मात्रा रसायनोपचारांनंतर
मूल-पेशी-प्रत्यारोपण (स्टेम-सेल-ट्रान्सप्लान्ट) ज्याला काही वेळेस
अस्थिमज्जा-प्रत्यारोपण (बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट) असेही म्हटले जाते, तोही एक
पर्याय अशा अवस्थेत उपलब्ध असू शकतो.
विल्म्स अर्बुदांच्या उपचारांनंतर काय होत असते?
विल्म्स अर्बुदांच्या उपचारांनंतर बहुतेक कुटुंबांची
मुख्य काळजी अर्बुदाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभावांची, त्याचेवरील
उपचारांची आणि पुनरावर्ती अर्बुदांची वा त्यांच्या प्रगतीची असते.
अर्बुद आणि त्याचे उपचार मागे टाकून द्यावे आणि
कर्काभोवतीच न घुटमळत राहणार्या सामान्य जीवनास पुन्हा सामोरे जावे असे वाटणे
अगदी सामान्य आहे. पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते की, पाठपुरावा निगा (फॉलो-अप-केअर)
ही ह्या प्रक्रियेचा मध्यवर्ती भाग आहे, ज्यामुळे तुमच्या मुलास दीर्घकाळ बरे
राहण्याची सर्वोत्तम संधी मिळू शकते.
पाठपुरावा तपासण्या आणि चाचण्या
तुमच्या मुलाची आरोग्य-निगा-चमू पाठपुराव्याचे वेळापत्रक
तयार करेल, ज्यात अर्बुदाची वाढ वा पुनरावर्तन किंवा उपचारांशी संबंधित काही
समस्या आहेत काय ह्याचा शोध घेण्याकरता शारीरिक तपासण्या आणि चित्रक चाचण्या (जसे
की ध्वन्यातीत लहरी आणि संगणित-त्रिमिती-चित्रण चित्रांकन) समाविष्ट असतात. अशा
बहुतेक मुलांचे मूत्रपिंड काढून टाकलेले असल्याने, उर्वरित मूत्रपिंड कसे काय काम
करत आहे हे शोधून काढण्याकरता, रक्त आणि मूत्र चाचण्या केल्या जातात. जर तुमच्या
मुलास रसायनोपचारांदरम्यान डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) हे औषध दिले गेलेले असेल
तर, डॉक्टर तुमच्या मुलाच्या हृदयाचे कार्य जाणून घेण्याकरता चित्रक चाचण्या
करावयास सांगू शकतील.
पाठपुरावा तपासण्यांचे आणि चाचण्यांचे संस्तुत वेळापत्रक सुरूवातीच्या
पायरीवर, कर्काच्या (पक्षकर अथवा विपक्षकर) दिसण्यावर आणि मुलास उपचारांदरम्यान
भेडसावत असलेल्या इतर कुठल्याही समस्येवर अवलंबून असते. सुरूवातीस डॉक्टरकडील फेर्या
आणि चाचण्या अधिक वारंवार होतील (पहिल्या एक दोन वर्षांत, प्रत्येक ६ ते १२
सप्ताहात एकदा), पण जसजसा काळ पुढे जात राहील तसतसा दोन भेटींमधील कालावधी वाढवता
येईल.
ह्या कालावधीत, कुठलीही नवीन लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब तुमच्या मुलाच्या
डॉक्टरांना ती कळवणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आवश्यकता पडल्यास, त्यापाठचे कारण
शोधून काढून त्यावर उपचार केले जाऊ शकतील. कुठल्या लक्षणांकडे लक्ष ठेवले पाहिजे
त्याबाबत तुमचे डॉक्टर तुम्हाला कल्पना देऊ शकतील.
जर अर्बुद पुन्हा प्रकट झाले, किंवा जर ते उपचारांना दाद देत नसेल तर, तुमच्या
मुलाचे डॉक्टर तुमच्याशी इतर पर्यायी उपचारांची चर्चा करतील (ह्याकरता “विल्म्स
अर्बुदांवर उपचार कशा प्रकारे केले जातात?” हा अनुभाग पाहा).
कर्कोपचारांचे दीर्घकालीन प्रभाव
उपचारांत झालेल्या मोठ्या प्रगतीमुळे, विल्म्स अर्बुदांकरता उपचार केल्या
गेलेली अनेक मुले आता प्रौढ वयापर्यंत जगू शकत आहेत. डॉक्टरांना आता हे समजलेले
आहे की, ह्या उपचारांमुळे नंतरच्या आयुष्यात मुलांच्या आरोग्यावर प्रभाव पडू शकत
असतो. म्हणून अलीकडच्या वर्षांत, त्यांचे वय वाढत असता, अशा आरोग्य-प्रभावांवर
लक्ष ठेवण्याची चिंता वाढली आहे.
बाल्य-कर्काचे उपचारांकरता जसा खूपच विशेष मार्ग चोखाळावा लागत असतो, तसाच
मार्ग उपचारोत्तर निगा आणि पाठपुरावा ह्यांकरताही चोखाळावा लागत असतो. कुठलीही
समस्या जितकी लवकर लक्षात येऊ शकेल, तितकाच तिचा उपचार प्रभावीरीत्या केला
जाण्याची संभावना वाढेल.
विल्म्स अर्बुदांकरता उपचार केल्या गेलेल्या लहान मुलांना,
काही अंशी त्यांच्या कर्कापासून उद्भवणार्या अनेक संभाव्य विलंबित प्रभावांचा (लेट
इफेक्टस) धोका असतो. विलंबित प्रभावांचा धोका अनेक घटकांवर अवलंबून असतो. जसे की
मुलास मिळालेले विशेष उपचार, उपचारांची मात्रा आणि उपचार घेतांनाचे मुलाचे वय.
ह्या विलंबित प्रभावांत खालील प्रभावांचा समावेश होत असतो.
- घटलेले
मूत्रपिंड-कार्य
- हृदय वा
फुफ्फुसांकरताच्या रसायनोपचारांदरम्यान काही विशिष्ट रसायने सेवन केली असता
अथवा प्रारणोपचार घेतल्यानंतर, हृदय वा फुफ्फुसांच्या समस्या निर्माण होणे
- मंदावलेली किंवा
घटलेली वाढ अथवा मंदावलेला किंवा घटलेला विकास
- (विशेषतः
मुलींच्या) लैंगिक विकासात आणि सामर्थ्यात घडून येणारे बदल
- (क्वचित)
नंतरच्या आयुष्यात होणारा दुसर्या कर्काचा विकास
विलंबित प्रभावांबाबतची जागरूकता वाढवण्यास मदत व्हावी
म्हणून आणि बाल्य-कर्कातून वाचणार्या
मुलांना त्यांचे आयुष्यभर दिली जाणारी पाठपुरावा-निगा सुधारण्याकरता,
बाल्य-अर्बुदशास्त्र-गटाने बाल्य-कर्कातून वाचणार्या मुलांकरता दीर्घकालीन
पाठपुराव्याची मार्गदर्शक तत्त्वे विकसित केलेली आहेत. कशावर लक्ष ठेवायला हवे,
समस्यांचा शोध घेण्याकरता कशा प्रकारच्या चाचण्या करवून घ्याव्यात आणि विलंबित
प्रभावांवर कशाप्रकारे उपचार करावेत ह्याबाबत ही मार्गदर्शक तत्त्वे तुम्हाला मदत
करू शकतात.
विल्म्स अर्बुदांतून वाचलेल्यांचे आणि त्यांच्या
कुटुंबियांचे भावनिक आणि सामाजिक प्रश्न
विल्म्स अर्बुदे असलेली मुले निदानसमयी खूप लहान असतात.
तरीही काही मुलांना भावनिक आणि मानसिक प्रश्न असू शकतात, ज्यांचा उपचारांदरम्यान
आणि नंतरही विचार व्हावा लागतो. त्याशिवाय वयानुरूप त्यांना सामान्य व्यवहार आणि
शालेय अभ्यास यांबाबतच्याही काही समस्या असू शकतात. अनेकदा आधार आणि
प्रोत्साहनाद्वारे त्यांचे निरसन केले जाऊ शकते. कर्कोपचारांनंतर, अशा मुलंना मदत
व्हावी म्हणून, डॉक्टर आणि आरोग्य-निगा-चमूचे इतर सदस्य अनेकदा विशेष आधार कार्यक्रमांची
आणि सेवांची शिफारसही करू शकतात.
विल्म्स अर्बुदे असलेल्या रुग्णांवर उपचार करणार्या
केंद्रांपाशी, नवीन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना, उपचार संपवलेल्या इतरांची
ओळख करून देण्याचे कार्यक्रमही असू शकतात. विल्म्स अर्बुदे असलेले रुग्ण चांगल्या
प्रकारे जगतांना पाहून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळू शकतो.
चांगल्या प्रकारे वैद्यकीय नोंदी सांभाळणे
उपचारसमाप्तीनंतर तुम्हाला जितका तो अनुभव विसरून जावा असे
वाटत असते, तितकेच हेही महत्त्वाचे असते की, ह्या कालावधीतील तुमच्या मुलाच्या
आरोग्य-निगेबाबतच्या नोंदी चांगल्या प्रकारे सांभाळल्या जाव्यात. यथावकाश तुमचे
मूल मोठे होईल आणि स्वतःच्या पायावर उभे राहील. हे महत्त्वाचे आहे की, तुम्ही वा
तुमचे मूल, त्यावेळी इतर डॉक्टरांना मुलास झालेला कर्क, त्याचे निदान आणि उपचार
ह्यांबाबतचे तपशील देण्यास समर्थ असायला हवे. भविष्यात कधीतरी तो मिळवण्याऐवजी,
उपचारांनंतर हा तपशील लगेचच गोळा करणे नेहमीच सोपे असते. अगदी प्रौढ
वयापर्यंत, तुमच्या मुलाच्या डॉक्टरांना माहीत असायला हवी अशीही काही माहिती असते.
ज्यात खालील गोष्टींचा समावेश होत असतो.
- नमुना काढून घेण्यासाठी अथवा उपचारार्थ
करण्यात आलेल्या कुठल्याही शल्यक्रियेच्या निदानात्मक अहवालाची प्रत.
- शल्यक्रिया झालेली
असल्यास तिचे दरम्यानच्या कार्यवाहीचा अहवाल.
- जर तुमचे मूल
शुश्रुषालयात दाखल केले गेलेले असेल तर तिथून सुटका मिळतांना डॉक्टरांनी
दिलेले सुटका-समयीचे-सारांश अहवाल.
- जर तुमच्या मुलास रसायनोपचार दिले
गेलेले असतील तर, तुमच्या मुलास दिल्या गेलेल्या प्रत्येक
औषधांच्या अंतिम मात्रांची यादी. काही औषधांचे विशिष्ट दीर्घकालीन उपप्रभाव
असू शकतात. ही यादी जर तुम्हाला बाल्य-अर्बुद-तज्ञाकडून मिळू शकत असेल तर,
कुठल्याही नवीन डॉक्टरांना उपयोगाची ठरू शकेल.
- जर तुमच्या मुलास प्रारणोपचार दिले गेलेले असतील तर, दिल्या गेलेल्या प्रारणांचा
प्रकार, मात्रा, देण्याचा कालावधी आणि स्थळ ह्यांबाबतचा सारांश.
विल्म्स अर्बुदांच्या संशोधनांत आणि उपचारांत नवीन काय आहे?
विल्म्स अर्बुदांच्या क्षेत्रात होणारे बहुतांशी संशोधन, हे
बाल्य-अर्बुदशात्र-गटाच्या समन्वयाने होत असते, ज्याचे उद्दिष्ट उपचारांत सुधारणा
होऊन, विल्म्स अर्बुदे आणि इतर प्रकारचे कर्क असलेल्या मुलांच्या आयुष्यांची
गुणवत्ता सुधारावी हेच असते. हा गट डॉक्टर, परिचारक, शास्त्रज्ञ आणि
आरोग्य-व्यावसायिक यांचा बनलेला असतो, ज्यांच्या कठोर परीश्रमामुळे यापूर्वीच,
विल्म्स अर्बुदे असलेल्या हजारो मुलांचे जीव वाचलेले आहेत.
विल्म्स अर्बुदांचे जीवशास्त्र
काही विशिष्ट जनुकांतील बदलांमुळे, विल्म्स अर्बुदे कशी
निर्माण होत असतात, हे शोधून काढण्या-साठीचे संशोधन सुरूच आहे. काही अर्बुदे
संभवतः किती आक्रमक होऊ शकतात हे प्रभावित करण्यात, निरनिराळ्या जनुका गुंतलेल्या
असल्याचे दिसते.
विल्म्स अर्बुदांचे उपचार अधिक प्रभावीपणे कसे केले जाऊ
शकतात हे डॉक्टर आता शिकलेले असतात. कुठल्या मुलांना अधिक तीव्र उपचारांपासून
वाचवले जाऊ शकते, हे निर्धारित करण्याचे मार्ग शोधून काढण्यास, ते आता शिकलेले
असतात. ते आता अशा मुलांना ओळखण्याचे मार्गही शोधत असतात, ज्यांना बरे होण्याकरता
अधिक आक्रमक उपायांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, अलीकडील अभ्यासांनी असे दाखवून
दिलेले आहे की, १ ते १६ रंगसूत्रांतील काही बदलांसहितची विल्म्स अर्बुदे
सुरूवातीच्या उपचारांनंतर पुन्हा परतून येण्याची शक्यता अधिक असते. अशी अर्बुदे
असलेल्या मुलांना अधिक प्रखर उपचारांचा लाभ होऊ शकेल काय ह्याचा, डॉक्टर आता
अभ्यास करत आहेत.
जे रेण्वीय बदल, विल्म्स-अर्बुद-पेशींची वाढ आणि प्रसार घडवून
आणतात असे दिसते, त्यांचा अभ्यासही संशोधक आता करत आहेत. ह्यामुळे अशा उपचारांप्रत
पोहोचता येऊ शकेल, जे अशा बदलांवर केंद्रित केले जाऊ शकतील आणि त्यांना दुरूस्त
करू शकतील.
विल्म्स अर्बुदांचे उपचार
वैद्यकीय चाचण्या, विल्म्स अर्बुदे असलेल्या मुलांकरताचे
उपचार सुधारण्याचे उपाय अभ्यासत आहेत. यापूर्वीच्या अभ्यासांनी असे उपचार ओळखलेले
आहेत, जे सर्वाधिक पक्षकर पेशीरचना असलेल्या विल्म्स अर्बुदांना बरे करण्यात खूपच
प्रभावी ठरत आहेत. प्रचलित वैद्यकीय चाचण्या, उपप्रभाव शक्य तितके कमी राखून, अशा
कर्कांचा यशस्वी उपचार करण्याचे उपाय शोधत आहेत. उदाहरणार्थ, खूपच पक्षकर
परिप्रेक्ष्य असलेल्या लहान मुलांकरता शल्यक्रियेव्यतिरिक्त इतर उपायांची आवश्यकता
आहे काय ह्याचा शोध ह्या अभ्यासांत घेतला जात आहे.
इतर अनेक अभ्यास, प्रचलित रसायनोपचारांत सुधारणा कशी करता
येईल ह्याचा शोध घेत आहेत. उदाहरणार्थ, युरोपातील अलीकडील अभ्यास असे सुचवितात की,
काही प्रकरणांत जितका दीर्घकाळ रसायनोपचार द्यावे लागतील असे यापूर्वी समजले जात
असे, तितका दीर्घकाळ रसायनोपचार देण्याची आवश्यकताच भासणार नाही.
विपक्षकर पेशीरचना असलेल्या विल्म्स अर्बुदे असलेल्या रुग्णांचे परिप्रेक्ष्य
तितकेसे चांगले नाही. डॉक्टर अशा मुलांकरता, अधिक तीव्र आणि अधिक प्रभावी
उपचारांचा अभ्यास करत आहेत. टोपोटेकॅन आणि इरिन्टोटेकॅन यांसारखी रसायनोपचारांची
नवीन औषधे आता चाचपली जात आहेत.
इतर अभ्यास, अस्थिमज्जा वा परीघीय (पेरिफेरल) मूल-रक्तपेशी-प्रत्यारोपणाचा
शोध घेत आहेत. ज्यामुळे डॉक्टर, शरीर सामान्यतः सोसू शकते त्याहून,
रसायनोपचारांच्या अधिक मात्रांचा वापर करू शकतील. ही पद्धत प्रमाणीत उपचारांना दाद
न देणार्या किंवा एरव्हीही खराब परिप्रेक्ष्य असलेल्या अर्बुदांच्या उपचारार्थ
कामी येऊ शकेल.
विल्म्स अर्बुद-पेशींतील जनुका-बदलांबाबत संशोधकांनी जेवढे
अधिक समजून घेतलेले आहे, तेवढेच अधिक त्या बदलांवर विशेषत्वाने केंद्रित अशी नवीन
औषधे विकसित करणेही सुरू केलेले आहे. लक्ष्य-केंद्रित औषधे प्रमाणीत
रसायनोपचारांपेक्षा निराळ्या प्रकारे काम करत असतात. त्यांचे उपप्रभावही निराळेच
(कमी गंभीर स्वरूपाचे) असतात. काही प्रकारांच्या प्रौढ-कर्कांकरता, लक्ष्य-केंद्रित
उपचारपद्धती यापूर्वीच प्रमाणित उपचारपद्धती ठरलेल्या आहेत.
पक्षकर पेशीरचना असलेली विल्म्स अर्बुदे बहुधा शल्यक्रिया व रसायनोपचारांनी
बरी होत असल्याने आणि विपक्षकर पेशीरचना असलेली विल्म्स अर्बुदे तेवढी सामान्य
नसल्याने, आजवरचे लक्ष्य-केंद्रित औषधांवरील बहुतेक संशोधन
प्रयोगशालेय बशा आणि प्राण्यांच्या शरीरांत पेशी वाढवूनच केले जात आहे. यथावकाश,
वैद्यकीय चाचण्यांत ही औषधे चाचपली जाण्याची आशा संशोधक करत आहेत, ज्यामुळे एके
दिवशी ती, विपक्षकर पेशीरचनेची विल्म्स अर्बुदे असलेल्या मुलांना उपचार देण्यासाठी
उपयोगी पडू शकतील.