२०१५-१२-२७

शास्त्रज्ञ-०३: मेघनाद साहाः खगोलशास्त्राचे प्रणेते

मेघनाद साहाः खगोलशास्त्राचे प्रणेते
डॉ. सुबोध मोहंती
http://www.vigyanprasar.gov.in/scientists/saha/sahanew.htm

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५१२२०

“साहा ह्यांच्यानंतर घडून आलेल्या, खगोलशास्त्रातील जवळपास सर्वच प्रगतीवर, त्यांच्या कामाचा प्रभाव उमटलेला आहे आणि त्यापैकी बहुतांश कामांचे स्वरूपच साहांच्या संकल्पनांतील सुधारणा असे असल्याने, त्यांच्या कामाने खगोलशास्त्रास दिलेल्या गतीचा अंदाज करता येतो.” - एस.रोस्सेलँड, सैद्धांतिक खगोलशास्त्र (ऑक्सफर्ड विद्यापीठ मुद्रणालय, १९३९).

“वैज्ञानिकांवर अनेकदा आपापल्या हस्तिदंती मनोर्‍यांतच वावरत असल्याचा आणि वास्तवाकडे लक्ष देण्याचा त्रासच घेत नसल्याचा आरोप केला जातो. माझ्या तरूणपणातील राजकीय चळवळींशी असलेल्या माझ्या संबंधांचा काळ वगळता, १९३० पर्यंत मीही माझ्या हस्तिदंती मनोर्‍यांतच वावरत होतो. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय, हल्लीच्या काळात, प्रशासनासाठी ’कायदा आणि सुव्यवस्था’ ह्यांच्याइतकेच महत्त्वाचे ठरत आहेत. माझ्या परीने मी देशाच्या उपयोगी पडावे असे मला वाटे. म्हणून मी सावकाशपणे राजकारणात उतरलो.” - मेघनाद साहा

“साहा हे अत्यंत साधे आणि सवयी व व्यक्तिगत गरजांबाबत साधे राहणीमान पसंत करणारे व्यक्ती होते. बाह्यतः ते दूरस्थ, वस्तुनिष्ठ आणि क्वचित कठोर असल्याचा भावही निर्माण करत असत; पण एकदा त्यांच्या कोशात प्रवेश मिळाला की; एक अत्यंत सालस, सहृदय आणि समजूतदार व्यक्ती पुढे येई. स्वतःच्या व्यक्तिगत सोयीकडे जवळपास दुर्लक्ष करून, ते इतरांची काळजी घेत असत. इतरांच्या समाधानापुरते गोड बोलणे, हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. अप्रतिहत प्रेरणा, दृढनिर्धार, न संपणारी ऊर्जा आणि निष्ठा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती.” - डी.एस.कोठारी; बायोग्राफिकल मेमॉईर्स ऑफ फेलोज ऑफ द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया, व्हॉल्यूम-२, नवी दिल्ली, १९७०.

सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९१०-९५) ह्यांनी लिहून ठेवले आहे की, “भारतातील खगोलशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील मेघनाद साहा ह्यांचे स्थान अद्वितीय आहे.” साहा ह्यांचा औष्णिक मूलकीकरणाचा (थर्मल आयोनायझेशन) सिद्धांत, म्हणजे विसाव्या शतकातील जागतिक विज्ञानास भारताने दिलेले सर्वात महत्वाचे योगदान आहे. अवकाशीय वर्णपटाचे मूळ, ह्या सिद्धांताने स्पष्ट केले. त्या काळातील तो एक लक्षणीय शोध होता. एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकामध्ये तार्‍यांबाबत लिहित असता, ऑर्थर स्टॅन्ले एड्डिंग्टन (१८८२-१९४४) असे वर्णन करतात की, औष्णिक मूलकीकरणाचा सिद्धांत म्हणजे, साहा ह्यांनी पहिल्या चल तार्‍याचा -मिरा सेटीचा- शोध लावल्यापासून भौतिकशास्त्राच्या निरनिराळ्या शाखांत झालेल्या, सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांतील बाराव्या क्रमांकाचा महत्त्वाचा टप्पा होय. मुळात १९३१ साली प्रकाशित झालेल्या, ’ए टेक्स्टबुक ऑन हीट’ ह्या विख्यात पाठ्यपुस्तकाची, साहा ह्यांनी (बी.एन.श्रीवास्तव ह्यांच्या साथीने) ’ट्रिटीज ऑन हीट’ ह्या नावाने नवीन आवृत्ती लिहीली. देशात पहिल्यांदा अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्राचे शिक्षण व प्रशिक्षण सुरू करणारेही साहाच होते. देशातील पहिला आवर्तनक (सायक्लॉट्रॉन) साहा ह्यांच्या पुढाकारानेच उभारला गेला होता. साहा हे थोर संस्था-संघटक होते. त्यांनी उभारलेल्या संस्थांत; भारतातील नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया, अलाहाबाद; इंडियन फिजिकल सोसायटी, कोलकाता; नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया (जिचे पुढे जाऊन, इंडियन नॅशनल सायन्स ऍकॅडमी असे नामकरण करण्यात आलेले होते), नवी दिल्ली; इंडियन सायन्स न्यूज असोसिएशन, कोलकाता; आणि साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, कोलकाता; ह्यांचा समावेश होतो. इंडियन नॅशनल काँग्रेसने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे साहा हे सक्रिय सदस्य होते. ह्या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने १९५२ मध्ये स्थापन केलेल्या, भारतीय दिनदर्शिका सुधार समिती (इंडियन कॅलेंडर रिफॉर्म कमिटी) चे, साहा अध्यक्ष होते. भारतीय संसदेचे ते निर्वाचित स्वतंत्र सदस्य होते. सामाजिक विकासाकरता मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकरणाचे ते समर्थन करत असत.

मेघनाद साहा ह्यांचा जन्म ६ ऑक्टोंबर १८९३ रोजी, अविभाजित भारतातील (हल्लीच्या बांगलादेशातील) ढाक्का जिल्ह्यातील सेवरातली गावात झाला होता. जगन्नाथ साहा आणि भुवनेश्वरीदेवी ह्यांचे ते सहावे अपत्य होते. त्यांचे वडील जगन्नाथ हे किरकोळ वस्तूंचे दुकानदार होते. त्यांची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी पाहता, त्यांच्या पालकांपाशी त्यांच्या मुलांना, प्राथमिक शिक्षणाव्यतिरिक्त शिक्षण देण्यास पुरेसा पैसा आणि प्रवृत्तीही नव्हती. त्यांचे वडीलबंधू जयनाथ, मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर, एका ताग कंपनीत दरमहा रु.२०/- पगारावर काम करू लागले. त्यांच्या दुसर्‍या बंधूंना, दुकान चालवण्यात वडिलांना मदत करण्यासाठी शिक्षण सोडून द्यावे लागलेले होते. वयाच्या सातव्या वर्षी साहा गावातील प्राथमिक शाळेत रुजू झाले. सुरूवातीपासूनच शिक्षणात त्यांनी असामान्य बुद्धिमत्ता प्रदर्शित केली होती.

प्राथमिक शिक्षणानंतर त्यांचे शिक्षण पुढे सुरू राहील ह्याचा मुळीच भरवसा नव्हता. कुटुंबाच्या किराणा मालाच्या दुकानातच त्यांनी काम करावे अशीच कुटुंबाची पसंती राहिली असती. कुठल्याही परिस्थितीत, दुकान चालवण्यात, त्यांना पुढील शिक्षणाचा काही उपयोग होईल असे वाटत नव्हते. शिवाय त्यांच्या गावानजीक कुठलीही माध्यमिक शाळा नव्हती. सर्वात नजीकची माध्यमिक शाळा त्यांच्या गावापासून १० किलोमीटरवरील सिमुलिया येथे होती.  तिथे राहण्याखाण्याची व्यवस्था करण्यास पुरेसा पैसा त्यांच्या पालकांपाशी नव्हता. अशा परिस्थितीत त्यांचे वडीलबंधू जयनाथ ह्यांनी, त्यांना स्थानिक डॉक्टर अनंतकुमार दास ह्यांचेकडून आधार मिळवून दिला. साहांनी आपली थाळी स्वतःच धुवून घेतल्यास आणि गोपालनासकट घरातील किरकोळ कामे करण्याचे मान्य केल्यास; त्यांना स्वतःचे घरातच मोफत राहण्याखाण्याची व्यवस्था पुरवणे, सहृदय डॉक्टर साहेबांनी मान्य केले (ह्यावरून त्याकाळच्या कडक जातीव्यवस्थेचे स्वरूपच स्पष्ट होते). त्यांना पुढील शिक्षण घेण्याची खूप इच्छा असल्याने, साहांनी सर्व अटी सहजच स्वीकारल्या. दर आठ्वड्याला ते आपल्या गावी भेट देत असत. जेव्हा गावात पूर येई तेव्हा ते वल्ह्यांच्या नावेने येत, एरव्ही ते चालत येत असत. सबंध ढाक्का जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावून ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. परिणामी त्यांना दरमहा रु.४/- ची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. १९०५ मध्ये साहा ढाक्का येथे आले. तेथे ते कॉलेजिएट स्कूल नावाच्या एका सरकारी शाळेत रुजू झाले. त्यांच्या वडील बंधूंनी त्यांना, आपल्या मासिक रु.२०/- च्या प्राप्तीतून दरमहा रु.५/- चा भत्ता देऊ केला. हा एक मोठाच त्याग होता. पूर्व-बंगा-वैश्य-समितीने आणखी दरमहा रु.२/- ची मदतही दिली. त्यामुळे साहांना राहणेखाणे व इतर खर्चाकरता रु.११/- हाती राहत असत. १९०५ मध्ये बंगालात सर्वत्र राजकीय अस्वस्थता पसरलेली होती. ब्रिटिश भारताचे वाईसराय, लॉर्ड कर्झन ह्यांनी वंगभंगाचा निर्णय घेतलेला होता. इतर अनेकांप्रमाणेच साहांनाही ह्या राजकीय भूकंपाचा फटका बसला. बंगालचे गव्हर्नर सर बामफिल्डे फुल्लर शाळेला भेट देत असता त्याविरुद्ध निदर्शनांत भाग घेतल्याखातर, इतर काही विद्यार्थ्यांसोबतच साहांनाही कॉलेजिएट स्कूलमधून काढून टाकण्यात आले. साहांनी प्रत्यक्षात निदर्शनांत भाग घेतला होता की नाही ते अनिश्चित आहे. ह्या कहाणीची एक दुसरीही आवृत्ती ऐकिवात आहे. त्यानुसार साहांनी प्रत्यक्षात निदर्शनांत भाग घेतलाच नव्हता. घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणेच शाळेत अनवाणी गेले होते. त्यांना ते रोजचेच होते. कारण पायताण घेण्याकरता त्यांच्याकडे पैसेच नव्हते. त्या दिवशी मात्र अधिकार्‍यांनी तो गव्हर्नर साहेबांचा हेतुतः केलेला अपमानच आहे असा समज करून घेतला. शाळेतून काढून टाकण्याखेरीज त्यांना शिष्यवृत्तीही नाकारण्यात आली. सुदैवाने एका खासगी शाळेत -किशोरीलाल ज्युबिली स्कूलमध्ये- साहांना घेण्यात आले. एवढेच नव्हे तर मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्तीही पुरविण्यात आली होती. १९०९ मध्ये साहांनी तत्कालीन पूर्व बंगालातील सर्व उमेदवारांत सर्वप्रथम येऊन प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली.

शाळेत साहांचा आवडता विषय होता गणित. त्यांना इतिहासही आवडत असे. विशेषतः त्यांना ’टॉड’स राजस्थान’ वाचण्याची आवड होती. राजपूत आणि मराठा योद्ध्यांच्या शौर्यगाथा त्यांना सुरस वाटत असत. रविंद्रनाथ टागोरांचे ’कथा ओ कहिनी’ हे त्यांच्या आवडत्या पुस्तकांतील एक होते. त्यात राजपूत आणि मराठा योद्ध्यांना गौरवान्वित केलेले असे. त्यात मधुसूदन दत्त ह्यांची महान कविता ’मेघनाद बध’ हिचाही समावेश होत होता. त्यांच्या शालेय जीवनात साहा, ढाक्का बाप्टिस्ट मिशनच्या मोफत बायबल वर्गांतही जात असत. मिशनने घेतलेल्या बायबलवरील एका स्पर्धात्मक परीक्षेत ते पहिले आले होते आणि त्यांना रु.१००/- चे पारितोषिकही प्राप्त झाले होते.

१९११ मध्ये, ढाक्का कॉलेज, ढाक्का येथून, कलकत्ता विद्यापीठाची इंटरमिडिएट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर साहा, प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता येथे रुजू झाले. सत्येंद्रनाथ बोस (बोस-आईन्स्टाईन सांख्यिकीसाठी विख्यात असलेले बोस) त्यांचे वर्गबंधू होते, तर प्रसांतचंद्र महालनोबिस (भारतीय सांख्यिकी संस्थेचे संस्थापक) त्यांच्या वरच्या वर्गात शिकत होते. त्यांना, रसायनशास्त्र प्रफुल्लचंद्र राय आणि भौतिकशास्त्र जगदीशचंद्र बोस शिकवत असत. साहा १९१३ साली बी.एस.सी.ची परीक्षा गणितात ऑनर्ससहित उत्तीर्ण झाले. तर एम.एस.सी. (उपायोजित गणित) ही परीक्षा १९१५ साली उत्तीर्ण झाले. दोन्हीही परीक्षांत साहा अनुक्रमे दुसरे आलेले होते. दोन्हीही परीक्षांत एस.एन.बोस हे वर्गात प्रथम आलेले होते.

युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये १९१६ साली, उपायोजित गणित विभागात साहा ह्यांची व्याख्याता म्हणून नियुक्ती केली गेली. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सचा शिलान्यास २७ मार्च १९१४ रोजी झालेला होता. त्यानंतर चार दिवसांनीच विद्यापीठाचे कुलगुरू आशुतोष मुखर्जी ह्यांनी पदत्याग केला होता. इथे हे नमूद करायला हवे की, १९०६ ते १९१४ दरम्यान, तसेच नंतर १९२१ ते १९२३ दरम्यान ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू राहिले होते. साहा आणि एस.एन.बोस हे दोघेही गणित विभागात व्याख्याते होते आणि मग दोघांनीही भौतिकशास्त्र विभागात बदली करून घेतलेली होती. वर्षभरानंतर भौतिकशास्त्र विभागात सी.व्ही रमण हे पलित-प्रोफेसर ऑफ फिजिक्स म्हणून रुजू झालेले होते. भौतिकशास्त्र विभागात रुजू झाल्यानंतर साहा पदव्युत्तर वर्गांना जलस्थैतिकी, सृष्टीचे स्वरूप (फिगर ऑफ द अर्थ), वर्णपटशास्त्र आणि उष्मागतिशास्त्र शिकवू लागले. पदव्युत्तर वर्गांना भौतिकशास्त्र शिकवण्याकरता साहा ह्यांना ते विषय आधी स्वतः शिकून घ्यावे लागत, कारण त्यांनी केवळ पदवीपर्यंतचेच भौतिकशास्त्र शिकलेले होते. हे एक मोठेच आव्हान होते. शिकविण्याव्यतिरिक्त साहा संशोधनही करू लागले. हे काही सोपे नव्हते. त्या काळात युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सच्या भौतिकशास्त्र विभागात प्रयोगशाळा नव्हती. त्यांच्याकरता केवळ एकच ’संशोधन सुविधा’ उपलब्ध होती. ती म्हणजे प्रेसिडन्सी कॉलेजचे सुसज्ज वाचनालय. त्यांच्या संशोधनात्मक कामाची देखरेख करण्यासाठी कुणी मार्गदर्शकही नव्हते. ते आपल्या खासगी अभ्यासातून मिळवलेल्या ज्ञानावरच पूर्णतः विसंबून होते. परकीय नियतकालिकांत (जर्नल्स) आपले संशोधन प्रकाशित करण्यास पुरेसे पैसे त्यांचेजवळ नव्हते.

साहा ह्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, “१९१७ अखेरीस, ’सिलेक्टिव्ह रेडिएशन प्रेशर’ ह्या विषयावर एक दीर्घ निबंध (एस्से) लिहिलेला होता. त्या निबंधात, अणूवर निवडकरीत्या कार्यरत असणार्‍या आणि सौर अणूंवर पडणार्‍या गुरूत्वाकर्षणास निरस्त करणार्‍या, प्रारण दाबाच्या भूमिकेबाबतचा सिद्धांत स्पष्ट केलेला होता. हा शोधनिबंध, ऍस्ट्रोफिजिकल जर्नल फॉर पब्लिकेशनला पाठविण्यात आलेला होता. मात्र संपादकांनी असे उत्तर दिले की, तो काहीसा दीर्घ असल्याने, मुद्रणखर्चाचा काही भार मी उचलायला तयार असलो, तरच तो प्रकाशित करता येईल. मुद्रणखर्च त्या वेळी डॉलर्समध्ये तीन आकडी येत होता. मला कितीही वाटले तरी, तेवढा पैसा जमवणे मला शक्य नव्हते. कारण माझे वेतन कमी होते. शिवाय त्यातच मला माझ्या वृद्ध पालकांचा आणि शिकत असलेल्या एका लहान भावाचा खर्च निभवावा लागत असे. म्हणून मी मुद्रणखर्च देण्यास असमर्थ असल्याबाबत, ऍस्ट्रोफिजिकल जर्नल फॉर पब्लिकेशनच्या संपादकांना लिहिले. मात्र तो शोधनिबंध प्रकाशित होण्याबाबत मला कधीही, काहीही कळवण्यात आले नाही, किंवा तो मला परतही पाठवण्यात आला नाही. अनेक वर्षांनंतर १९३६ साली, मी येर्केस प्रयोगशाळेस भेट दिली असता डॉ.मॉर्गन ह्यांनी मला तिथेच ठेवलेले ते हस्तलिखित दाखवले. मग मी ऍस्ट्रोफिजिकल जर्नलच्या व्हॉल्यूम ५०,२२० (१९१९) मध्ये एक लघुनोंद प्रकाशित केली आणि काही काळानंतर, ’सिलेक्टिव्ह रेडिएशन प्रेशर अँड प्रॉब्लेम ऑफ सोलर ऍटमॉस्फिअर’ (जर्नल ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सायन्स, कलकत्ता युनिव्हर्सिटी, १९१९) ह्या मूळ लेखाची एक प्रत, पुन्हा कधीतरी आमच्याच विद्यापीठाच्या पत्रिकेत प्रकाशित करण्यासाठी सादर केली, जिच्या वाचकांची संख्या दखलपात्रही नव्हती. मी ही वस्तुस्थिती ह्याकरता स्पष्ट करत आहे की, मला ’निवडक प्रारण दाबाच्या सिद्धांता’चा मूळ प्रतिपादक म्हणून दावा करणे शक्य व्हावे. मात्र वरील निरुत्साही परिस्थितीपायी, मी पुढे ह्या संकल्पनेचा विकास करणे सोडून दिले. बहुधा ई.ए.मिल्ने ह्यांनी माझी ’नेचर १०७, ४८९ (१९२१) मधील नोंद वाचली असावी. कारण, कुणाच्याही लक्षात आलेले दिसले नसले तरी, ’ऍस्ट्रोफिजिकल डिटरमिनेशन ऑफ ऍव्हरेज ऑफ ऍन एक्सायटेड कॅल्शियम ऍटम, इन मंथली नोट्स ऑफ रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व्हॉल्यूम ८४’ मधील पहिल्या शोधनिबंधात, त्यांनी माझ्या सहभागाची नोंद तळटीपेत केलेली आहे. त्यांचे नेमके शब्द असे आहेत की, “दीज पॅराग्राफ्स डेव्हलप आयडिआज ओरिजिनली पुट फॉरवर्ड बाय साहा’ ”.

सुरूवातीस साहा ह्यांनी वेगवेगळ्या विषयांवर काम केले. त्यांनी प्रकाशित केलेल्या शोधनिबंधांच्या, खाली उद्धृत केलेल्या शीर्षकांवरूनच समजून येईल.

१. “ऑन मॅक्सवेल्स स्ट्रेसेस” (फिलॉसॉफिकल मॅगझिन, १९१७), हा शोधनिबंध त्यांच्या प्रारणांवरील विद्युत्चुंबकीय सिद्धांताच्या अभ्यासावर आधारित होता.
२. “ऑन द लिमिट ऑफ इंटरफिअरन्स इन द फॅब्री-पेरोट इंटरफेरोमीटर” (फिजिकल रिव्ह्यू १९१७).
३. “ऑन अ न्यू थिअरम इन इलास्टिसीटी” (जर्नल ऑफ द एशिऍटिक सोसायटी, बेंगॉल, १९१८).
४. “ऑन द डायनामिक्स ऑफ इलेक्ट्रॉन” (फिलॉसॉफिकल मॅगझिन, १९१८).
५. “ऑन द प्रेशर ऑफ लाईट” (जर्नल ऑफ द एशिऍटिक सोसायटी, बेंगॉल, १९२८).
६. “ऑन द इन्फ्ल्युएन्स ऑफ फायनाईट व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्यूल्स ऑन द इक्वेशन ऑफ स्टेट” (फिलॉसॉफिकल मॅगझिन, १९१८).
७. “ऑन द मेकॅनिकल अँड इलेक्ट्रो-डायनामिकल प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रॉन” (फिजिकल रिव्ह्यू १९१९).
८. “ऑन द रेडिएशन प्रेशर अँड द क्वांटम थिअरी” (ऍस्ट्रोफिजिकल जर्नल १९१९).
९. “ऑन द फंडामेंटल लॉ ऑफ इलेक्ट्रिकल ऍक्शन” (फिलॉसॉफिकल मॅगझिन, १९१९).

त्यांच्या वरील कामांच्या आधारे साहा ह्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या डॉक्टर ऑफ सायन्स पदवीकरताचा प्रबंध १९१८ मध्ये दाखल केला. १९१९ मध्ये त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्याच वर्षी त्यांना, त्यांच्या “हार्वर्ड क्लासिफिकेशन ऑफ स्टेलर स्पेक्ट्रा” ह्या शोधनिबंधाच्या आधारे, प्रेमचंद रायचंद शिष्यवृत्तीही देण्यात आली. निरनिराळ्या विषयांत काम करत असतांनाच, ते त्यांचे मुख्य कर्तव्य असलेल्या खगोलशास्त्रातील कामाचीही तयारी करतच होते. त्याकरता त्यांना अँजेल क्लार्क ह्यांच्या ऍस्ट्रोनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्स ह्या दोन
लोकप्रिय पुस्तकांचाही उपयोग झाला. प्लांक ह्यांचे थर्मोडायनामिक्स आणि नर्नेस्ट ह्यांचे ’दास नेयू वार्मेस्टॅझ’, तसेच अणुचा पुंज सिद्धांत (क्वांटम थिअरी ऑफ ऍटम) ह्या विषयावरील निल्स बोहर आणि अर्नॉल्ड सॉमरफिल्ड ह्यांचे शोधनिबंध; इत्यादी त्यांनी वाचले होते.

त्यांच्या खगोलशास्त्रीय संशोधनावरील चार शोधनिबंध त्यांनी १९२० च्या पूर्वार्धातच फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये प्रकाशित केले. “आयोनायझेशन ऑफ द सोलर क्रोमोस्पिअर” (०४ मार्च १९२०), “ऑन द हार्वर्ड क्लासिफिकेशन ऑफ स्टार्स” (मे १९२०), “ऑन एलिमेंटस इन द सन” (२२ मे १९२०), आणि “ऑन द प्रॉब्लेम्स ऑफ टेंपरेचर-रेडिएशन ऑफ गॅसेस” (२५ मे १९२०), हे ते शोधनिबंध होत. ह्यांत साहांनी त्यांचा औष्णिक मूलकीकरणाचा सिद्धांत सूत्रबद्ध केलेला होता (फॉर्म्युलेटेड). त्यांच्या “ओरिजिन ऑफ लाईन्स इन स्टेलर स्पेक्ट्रा” ह्या शोधनिबंधाखातर त्यांना कलकत्ता विद्यापीठाचे ग्रिफिथ प्राईझही प्राप्त झालेले होते.

इथे हे सांगणे सुरस ठरेल की, साहांनी एस.एन.बोस ह्यांचेसोबत मिळूनच आईन्स्टाईन ह्यांच्या सापेक्षता सिद्धांतावरील शोधनिबंधाचा इंग्लिश अनुवाद तयार केला होता आणि मग तो पुस्तकरूपाने प्रकाशित केला. योगायोगाने सापेक्षता सिद्धांतावरील त्यांच्या अनुवादाचीच नोंद प्रथम झालेली आहे. चंद्रशेखर लिहितात, “... सामान्य सापेक्षता सिद्धांत प्रस्थापित झाल्यानंतर केवळ तीन वर्षांनी म्हणजे १९१९ मध्ये, साहा आणि एस.एन.बोस ह्यांनी आईन्स्टाईन ह्यांच्या सापेक्षता सिद्धांतावरील शोधनिबंधाचा इंग्लिश अनुवाद प्रकाशित केला. त्या मूळ कामाचा ठसा काळावर उमटणार होता हे लक्षात घेता, त्यांनी अधिक वेळ घेऊन आणि अधिक प्रयासांनी अनुवाद करायला हवा होता असे वाटते. मात्र, तीन वर्षांपूर्वी प्रिन्सेस्टन विद्यापीठात साजरा करण्यात आलेल्या आईन्स्टाईन ह्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात, आईन्स्टाईन ह्यांच्या शोधनिबंधाच्या जपानी अनुवादाचा उल्लेख पहिली नोंद म्हणून करण्यात आला; त्यावेळी मी त्या उल्लेखास दुरूस्त करू शकलो ह्याचा मला आनंद आहे. साहा-बोस अनुवादाची एक झेरॉक्स प्रत आता आईन्स्टाईन ह्यांच्यावरील प्रिन्सेस्टनमधील संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे.”

१९१९ साली कलकत्ता विद्यापीठाकडून मिळालेल्या प्रेमचंद रायचंद शिष्यवृत्तीमुळे, साहांना युरोपात दोन वर्षे राहणे शक्य झाले. प्रथम ते लंडन येथे गेले. तिथे आल्फ्रेड फाऊलर (१८६८-१९४०) प्रयोगशाळेत सुमारे पाच महिने राहिले. तिथून ते बर्लिनला गेले आणि तिथे त्यांनी वॉल्थर नेर्नेस्ट प्रयोगशाळेत काम केले. साहा ह्यांनी औष्णिक मूलकीकरणावरील त्यांच्या सिद्धांताचे काम प्रकाशित केल्यानंतर दीर्घकाळपर्यंत, युरोपिअन सायंटिफिक कम्युनिटी असे मानत असे की साहा ह्यांनी ते काम आल्फ्रेड फाऊलर ह्यांच्या देखरेखीखाली केलेले होते. उदाहरणार्थ १९७२ मध्ये, सर नॉर्मन लॉकियर ह्यांचे चरित्र लिहित असता, सौर वर्णांबरातील (सोलर क्रोमोस्पिअर) मूलकीकरणावरील साहा ह्यांच्या शोधनिबंधावर भाष्य करत असता ए.जे.मिडोज लिहितात, “लॉकियर ह्यांच्या निधनानंतर लवकरच एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ एम.एन.साहा फाऊलर ह्यांच्या देखरेखीखाली काम करण्यासाठी इंपिरिअल कॉलेजात आले. ह्या त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी लिहिलेला शोधनिबंध …. तार्‍यांचा वर्णपट नवीन पुंज सिद्धांताचे आणि विघटन गृहितका (डिस्सोसिएशन हायपोथेसिस) चे आधारे कसा समजून घेता येईल, ते दाखवतो. सुरूवातीच्या काहीशा विरोधानंतर, त्यांचे निष्कर्ष झपाट्याने स्वीकारले गेले. सिद्धांताने असे दाखवून दिले की, तापमान आणि दाब दोन्हींचाही प्रभाव तार्‍यांच्या वातावरणातील अणूंच्या विघटनावर पडत असतो. म्हणून लॉकियर आणि त्यांचे विरोधक दोघेही अंशतः बरोबरच होते. मात्र दाबापेक्षाही तापमानाचा तार्‍यांतील वर्णपटावर खूप अधिक प्रभाव पडत असतो असे म्हटल्यास लॉकियर ह्यांना न्याय दिल्यासारखे होईल.”

मिडोज ह्यांचे निरीक्षण सत्यापासून खूपच दूर होते. डी.एस.कोठारी ह्यांनाच उधृत करायचे तर, “अशी नोंद करणे इष्ट ठरेल की, मूलकीकरणाचा सिद्धांत साहा ह्यांनी कलकत्ता येथे काम करत असता स्वतःच मांडला, आणि उपरोल्लेखित शोधनिबंध मग कलकत्त्याहून त्यांनी फिलॉसॉफिकल मॅगझिनला पाठवला. याविरुद्ध विधानेही काही वेळेस केली गेलेली आहेत. (साहा ह्यांची पहिली युरोप भेट त्यानंतर दोन महिन्यांनी घडून आलेली होती.) पुढील शोधनिबंध मग लगेचच आले. औष्णिक मूलकीकरण सिद्धांताने खगोलशास्त्रात एक नवी महत्त्वपूर्ण घटना घडवली, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण त्या सिद्धांतामुळे, साध्या उष्मागतिकीय अंगाने आणि पुंज सिद्धांताच्या प्राथमिक संकल्पनांच्या आधारे, तार्‍यांच्या वातावरणात अस्तित्वात असणार्‍या निरनिराळ्या भौतिक अवस्थां (तापमान आणि काहीशा कमी प्रमाणात दाब) च्या परिभाषेत, वेगवेगळ्या वर्गांतील तार्‍यांच्या वर्णपटांचे एक सरळसोपे समाकलन पहिल्यांदाच पुरविण्यात आलेले होते.”

साहा ह्यांना ह्या विषयावर काम करण्याचे कसे सुचले आणि मग त्यांनी हे काम कसे पूर्णत्वास नेले हे सांगायचे झाले तर साहा ह्यांचेच खालील विस्तृत उद्धृत सादर करावे लागेल.

“१९१९ मध्ये, खगोलशास्त्रातील समस्यांचा विचार करत असता आणि एम.एस.सी.च्या वर्गांना उष्मागतिकी व वर्णपटशास्त्र शिकवत असतांना, औष्णिक मूलकीकरणाचा सिद्धांत माझ्या मनात साकारला. पहिल्या महायुद्धानंतर चार वर्षांनी निघू लागलेल्या जर्मन नियतकालिकांचा मी नियमित वाचक होतो. ह्या अभ्यासांदरम्यानच मी जे.एग्गर्ट ह्यांच्या ’फिसिकालिश्चे झित्श्रीफ्टस’ (पृ.५७३) डिसेंबर १९१९, मधील ’उबेर देन डिस्सोसिएशनझुस्टँड दर फिक्सटर्नगेस’ ह्या शोधनिबंधाप्रत पोहोचलो होतो. त्यात नर्नेस्ट उष्णता सिद्धांत, तार्‍यांतील उच्च तापमानामुळे होणार्‍या उच्च मूलकीकरणाचे स्पष्टीकरण देण्याकरता, वापरलेला होता. तार्‍यांच्या घडणीबाबत अभ्यास करत असता एड्डिन्ग्टन ह्यांनी तसे गृहितक मांडलेले होते.”

नेर्नेस्ट ह्यांचे विद्यार्थी आणि त्याकाळी सहाय्यक असलेल्या एग्गर्ट ह्यांनी औष्णिक मूलकीकरणासाठी एक सूत्र दिलेले होते. पण आश्चर्य ह्याचेच आहे की, अणूंच्या मूलकीकारक सामर्थ्याचे महत्त्व त्यांच्या कसे लक्षात आले नाही. बोहर ह्यांच्या सैद्धांतिक कामामुळे आणि फ्रँक व हर्टझ ह्यांच्या प्रत्यक्षिक कामामुळे, खरे तर त्याचे महत्त्व स्पष्ट झालेले होते. त्या काळात ते काम लक्ष वेधत होते. एग्गर्ट ह्यांनी विजकाचा स्थिरांक काढण्याकरता सक्कुर ह्यांचे रासायनिक स्थिरांकाचे सूत्र वापरले होते, पण ह्या आधारे तार्‍यांच्या अंतरंगातील लोहाच्या अणूंच्या बहु-मूलकीकरणाचे स्पष्टीकरण देतांना, त्यांनी मूलकीकारक विभवाची अतिकृत्रिम मूल्ये वापरलेली होती. एग्गर्ट ह्यांचा शोधनिबंध वाचत असता, कुठल्याही विशिष्ट मूलद्रव्याचे, कुठल्याही तापमान व दाब संयोगांच्या परिस्थितींत, होणारे एकल वा बहुल मूलकीकरण अचुकतेने शोधून काढण्यासाठी, त्यांच्या सूत्रात मूलकीकारक विभवाचे मूल्य घालण्याचे महत्त्व, मला लगेचच लक्षात आले. अशाप्रकारे मला ते सूत्र मिळाले जे आज माझ्या नावे ओळखले जाते. मला वर्णांबर (क्रोमोस्पिअर) आणि तार्‍यांच्या (स्टेलर) समस्यांबाबत पूर्वकल्पना असल्याने, लगेचच मला त्याचे उपायोजनही लक्षात आले. १९१९ च्या फेब्रुवारी ते सप्टेंबर ह्यादरम्यानच्या सहा महिन्यांत मी चार शोधनिबंध तयार केले आणि भारतातून फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान प्रकाशनार्थ पाठवून दिले. प्रोफेसर ए.फाऊलर ह्यांचेशी माझी व्यक्तिगत ओळख नव्हती. मूलकीकृत हेलियमच्या वर्णपटावरील त्यांचा शोधनिबंध मी वाचलेला होता, तेवढीच काय ती ओळख. मी इंग्लंडमध्ये येताच, प्रोफेसर अल्बर्ट फाऊलर ह्यांची भेट घेतली. प्रथमतः त्यांना असे वाटले की, त्यांच्या देखरेखीखाली काम करत असलेल्या इतर भारतीय विद्यार्थ्यांप्रमाणेच, मीही लंडन विद्यापीठातील डी.एस.सी प्राप्त करण्याच्या उद्देशाने आलेलो आहे. पण जेव्हा मी त्यांना स्पष्ट केले की मला तेथे केवळ माझ्या सिद्धांताच्या पडताळणीपुरते अल्प काळच काम करायचे आहे, तेव्हा त्यांनी ते स्वतः फारसे उत्सुक आहेत असे काही दाखवले नव्हते, तरीही त्यांनी मला त्यांच्या प्रयोगशाळेत काम करू दिले. बहुधा त्या पहिल्या भेटीत, माझे ऐकून घेण्यासाठी त्यांच्यापाशी फारसा वेळ नसावा. ही घटना नोव्हेंबर १९२० मधली. जर तुम्ही इंपिरिअल कॉलेजातील नोंदी पाहाल तर, तुमच्या असे लक्षात येईल की, मी पदवी अभ्यासक्रमाकरता माझे नाव कधीच नोंदवलेले नव्हते. दरम्यान, माझा भारतातून पाठवलेला पहिला शोधनिबंध, “सौर वर्णांबरातील मूलकीकरण” हा फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये प्रकट झालेला होता. त्या जर्नलचे प्रकाशक मिस्टर फ्रान्सिस, ह्यांच्याशी मी फोनवर बोललो होतो त्याचाच हा परिणाम म्हणायचा. तो प्रकाशित झाल्यानंतर प्रोफेसर फाऊलर माझ्या कामात आणि माझ्या दृष्टीकोनांत अधिक जागरूकतेने स्वारस्य घेऊ लागले होते.”

नोव्हेंबर १९२१ मध्ये साहा भारतात परत आले. खैरा-प्रोफेसर ऑफ फिजिक्स म्हणून ते कलकत्ता विद्यापीठात रुजू झाले. खैरातील कुमार गुरूप्रसाद सिंग ह्यांच्या मदतीतून निर्माण केलेले हे नवेच अध्यासन (सीट) होते. मात्र साहा दीर्घकाळ कलकत्त्यात राहिले नाहीत. १९२३ मध्ये ते भौतिकशास्त्र विभागप्रमुख म्हणून अलाहाबादमध्ये गेले. कलकत्त्यातून बाहेर जाण्याचा साहा ह्यांचा निर्णय, मुख्यत्वे संशोधनाकरता आर्थिक अनुदान मिळत नव्हते त्यामुळेच घेतलेला होता. देणग्यांद्वारे आशुतोष मुखर्जी आणखीही अध्यासने निर्माण करू शकत असले, तरीही सरकारने त्यांच्या विस्तारयोजनांना संमती दिली नाही. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड रोनाल्डशाय कलकत्ता विद्यापीठातील पदव्यूत्तर विभागांतून केल्या जात असलेल्या कामांची प्रशंसा करत असता असे म्हणाले की, “गरीब देशात सार्वजनिक पैशातून अशा अभ्यासांना किती अर्थपुरवठा करता येईल ह्याला मर्यादा असतात. विद्यापीठास विद्यमान अडचणींत आणखी सहभाग देण्यास कायदेमंडळ तयार असेल अशी मी आशा करतो. मात्र कायदेमंडळासही तुटपुंज्या संसाधनांतून अनेक निकडीच्या गरजा पुरवायच्या होत्या. अशा परिस्थितीत मला असे दिसते की, विद्यापीठाला ह्याचा विचार करावा लागेल की ते ज्या ज्या विषयांत पदव्यूत्तर वर्ग चालवू इच्छित आहे आणि ज्या विषयांत परीक्षा घेऊन बक्षिसे वाटू इच्छित आहे, त्या त्या विषयांत पदव्युत्तर वर्ग चालविण्यास ते बांधिल आहे काय?” गव्हर्नरांच्या आश्वासनानिरपेक्ष, कलकत्ता विद्यापीठाच्या अनुदानात वाढ झाली नाही. १९२२ मध्ये सरकार अडीच लाखाचे अतिरिक्त अनुदान देण्यास तयार होते. पण काही शर्तींसकट. ह्या शर्ती आशुतोष मुखर्जींना मान्य नव्हत्या. हा देकार नाकारतांना ते म्हणतात, “आम्ही हा पैसा घेणार नाही. आम्ही आमच्या संसाधनांतच सीमित राहू. दारोदार जाऊन बंगालातील लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊ. आमचे पदव्यूत्तर शिक्षक, स्वातंत्र्य गमावण्यापेक्षा, उपाशी राहणे पसंत करतील.”

अशा परिस्थितीत साहांच्या कलकत्ता सोडून जाण्याच्या निर्णयाने विपरीत भावना उत्पन्न झाल्या. कलकत्ता रिव्ह्यूने त्या निर्णयावर कठोर टीका केली. मात्र ह्याची नोंद करावी लागेल की, साहांनी कलकत्ता सोडण्यापूर्वी, सिंडिकेटला असे लिहिले की, “विद्यापीठ माझ्या दर्जाचे वेतन म्हणजेच रु.६५०-५०-१००० अधिक संशोधन अनुदान म्हणून हातखर्चाला रु.१५,००० मला देण्यास तयार असेल तर, मी माझ्या पूर्व-शिक्षण-संस्थेची सेवा करतच राहीन.” सिंडिकेटने हा प्रस्ताव फेटाळून लावला. ते म्हणतात, “विद्यापीठाची सद्य आर्थिक परिस्थिती पाहता आणि विद्यापीठातील इतर शिक्षकांचे दावे पाहता, ही विनंती मान्य करता येत नाही.” म्हणून अंतिमतः साहा अलाहाबाद विद्यापीठात गेले. तिथे संशोधन सुरू करण्यापूर्वी त्यांना कार्यशाळा (वर्कशॉप), प्रयोगशाळा आणि वाचनालय सुधारावे लागले. त्याशिवाय, सज्जड प्रशिक्षण कर्तव्ये पार पाडल्यानंतर त्यांचेपाशी फारसा वेळच शिल्लक राहिना. मात्र ह्या अवघड परिस्थितीतही साहा विचलित झाले नाहीत. लवकरच त्यांचे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंध बाहेर येऊ लागले. अलाहाबादमधील त्यांच्या सहकार्‍यांत एन.के.सूर, पी.के.किचलू, डी.एस.कोठारी, आर.सी.मजूमदार, आत्माराम, के.बी.माथूर आणि बी.डी.नाग चौधरी इत्यादी लोक होते. साहा १९२७ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो झाल्यानंतर युनायटेड प्रॉव्हिन्सचे गव्हर्नर सर विल्यम मॉरीस ह्यांनी साहांच्या विभागास दरसाल रु.५,०००/- चे संशोधन अनुदान सुरू केले.

अलाहाबादमध्ये खगोलशास्त्रीय समस्यांवरील संशोधनाव्यतिरिक्त, त्यांनी भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांत संशोधन सुरू केले आणि संघटितही केले. सांख्यिकीय यांत्रिकी (स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स), आण्विक आणि रेण्वीय वर्णपटदर्शनशास्त्र (ऍटॉमिक अँड मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी), विद्युत्‌-ऋण-मूलद्रव्यांचे विजक आकर्षण (एलेक्ट्रॉन ऍफिनिटी ऑफ एलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटस), सक्रिय नत्रबदल (ऍक्टिव्ह मॉडिफिकेशन ऑफ नायट्रोजन), उच्च तापमानावरील रेण्वीय विघटन (हाय टेंपरेचर डिस्सोसिएशन ऑफ मॉलिक्यूल्स), मूलकांबरातील प्रारणलहरींचा प्रसार (प्रपोगेशन ऑफ रेडिओवेव्हज इन आयोनोस्पिअर) आणि वरिष्ठ वातावरणाचे भौतिकशास्त्र (फिजिक्स ऑफ द अप्पर ऍटमोस्पिअर). ह्याच वेळी साहांनी त्यांचे विख्यात पाठ्यपुस्तक ’अ ट्रिटीज ऑन हीट’ लिहिले. हेच पुस्तक पहिल्यांदा १९३१ साली ’ए टेक्स्टबुक ऑफ हीट’ ह्या शीर्षकाने प्रकाशित झालेले होते. बी.एन.श्रीवास्तव ह्यांच्या सोबतीने हे पुस्तक लिहिलेले होते. ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहित असता सी.व्ही.रामन लिहितात, ’उष्णतेवरील प्रणालीबद्ध आणि अद्ययावत संहिता (ट्रिटीज) तयार करण्यासाठीचे कष्टप्रद कार्य हाती घेऊन प्राध्यापक साहा, देशातील आणि देशाबाहेरील विस्तृत वर्तुळातील वाचकांच्या धन्यवादांस पात्र ठरले आहेत. ते नक्कीच हे पुस्तक अभ्यासतील आणि त्याच्या गुणवत्तेचा आस्वाद घेतील.’ ह्या पुस्तकाची एक सारांशरूप आवृत्ती विज्ञान स्नातकांकरता प्रकाशित करण्यात आलेली होती. तिचे शीर्षक ’ज्युनिअर टेक्स्टबुक ऑफ हीट’ असे होते. त्यांनी एन.के.साहा ह्यांचेसोबतीने ’ट्रिटीज ऑन मॉडर्न फिजिक्स’ शीर्षकाचे आणखीही एक पुस्तक लिहिले होते.

अलाहाबाद येथे साहांनी १९३० मध्ये, युनायटेड प्रॉव्हिन्स ऍकॅडमी ऑफ सायन्सेस स्थापन केली. अशी ऍकॅडमी स्थापन करण्याची सूचना युनायटेड प्रॉव्हिन्सचे गव्हर्नर सर माल्कम हेले ह्यांच्याकडूनच आलेली होती, हे विशेष. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या समारंभप्रसंगी अलाहाबाद येथे, युनायटेड प्रॉव्हिन्समधील गोळा झालेल्या सर्व शास्त्रज्ञांना उद्देशून बोलत असता माल्कम म्हणाले होते की, ’मला पूर्ण कल्पना आहे की, आमच्या संशोधकांच्या अथवा विद्यार्थ्यांच्या प्रयासांना (आर्थिक व्यय आणि उपयोगिता) ह्या दिशेने वळवण्यास निश्चित स्वरूपाच्या मर्यादा आहेत. मला हेही पूर्णपणे ठाऊक आहे की, त्यांच्या कष्टांचे समन्वयन बाहेरून करताही येणार नाही. असे प्रयास स्वयंस्फूर्ततेने, न पेक्षा कुठल्याशा सायन्स ऍकॅडमीच्या सल्ल्यानुरूप केले जाऊ शकतील. अशा सायन्स ऍकॅडमीत, प्रांतात सद्य परिस्थितीत कार्यरत असलेले, वैज्ञानिक कार्याच्या सर्व विशेष शाखांचे अधिकारी प्रतिनिधी असतील. मात्र जर कुठल्याशा स्वरूपातील दृश्यमान समन्वयन घडवता आले, लोकांना हे सिद्ध करून दाखवता आले की वैज्ञानिक कार्यकर्ते, त्यांच्या काही ऊर्जा, मी सुचवलेल्या दिशेने वळवत आहेत; तर मला विश्वास वाटतो की, आपण वैज्ञानिक कार्याने ज्यावर विसंबून राहावे अशा सार्वजनिक पाठिंब्याची आणि खासगी मुक्ततेची मागणी प्रभावीरीत्या करू शकू.’

साहा जुलै १९३८ मध्ये कलकत्ता विद्यापीठात परत आले. ते पलित-प्रोफेसर आणि भौतिकशास्त्र विभागप्रमुख झाले. त्या वेळी श्यामाप्रसाद मुखर्जी विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्या पश्चात लगेचच सर महम्मद अझिझुल हक विद्यापीठाचे कुलगुरू झाले. रुजू झाल्यावर लगेचच पलित- प्रयोगशाळेतील संशोधन संघटित करण्यात ते व्यस्त झाले. भौतिकशास्त्रातील एम.एस.सी.च्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले. १९४० मध्ये साहा ह्यांनी अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रातील एक सामान्य आणि एक विशेष असे दोन अभ्यासक्रमही सुरू केले. इथे ह्याची नोंद करायला हवी की, विदलन आविष्कार (फिजन फिनॉमिना) १९३९ मध्ये ऑट्टो हान (१८७९-१९६८) आणि फिर्टझ स्ट्रास्समन (१९०२-८०) ह्यांनी शोधून काढला होता. साहांनी पुंज यांत्रिकीवर एक अभ्यासक्रमही सुरू केला. कलकत्ता विद्यापीठातील साहा ह्यांच्या संशोधन कार्याबद्दल डी.एस.कोठारी लिहितात, ’कलकत्त्यातील त्यांचे संशोधन बहुतांशी अणुकेंद्रकीय प्रणालींशी संबंधित राहिले, विशेषतः बीटा-सक्रियता, विद्युत्‌चुंबकीय लहरींचा मूलकांबरातील प्रसार आणि सौर प्रभावळीच्या (कोरोना) समस्या ह्यांचेशी.’

साहा हे एक थोर संस्था-संस्थापक होते. जिथे ते रुजू झाले होते तो अलाहाबाद विद्यापीठामधील भौतिकशास्त्र विभाग, त्यांनी देशातील सर्वात सक्रिय केंद्र म्हणून नावारूपास आणला. विशेषतः वर्णपटदर्शनशास्त्राच्या क्षेत्रात. विभाग, देशभरातून विद्यार्थ्यांना आकर्षित करत असे.

१९११ मध्ये साहांनी अलाहाबाद येथे उत्तरप्रदेश ऍकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना केली, जिचे पुढे जाऊन नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया असे पुनर्नामांकन झाले. हिचे उद्‌घाटन १ मार्च १९३२ रोजी झाले. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालच्या धर्तीवरच हिचे प्रारूप करण्यात आलेले होते. साहा तिचे पहिले अध्यक्ष होते. १९३३ मध्ये साहांनी कलकत्त्यास इंडियन फिजिकल सोसायटीची स्थापना केली. इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स, हीच सोसायटी प्रकाशित करते. रामन, साहा आणि कृष्णन ह्यांच्यासारखे विख्यात शास्त्रज्ञ इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स मध्ये आपले शोधनिबंध नियमितपणे प्रकाशित करत असत. साहा ह्यांच्याच पुढाकाराने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया ह्या संस्थेची स्थापना कलकत्ता येथे झाली. ७ जानेवारी १९३५ रोजी तिची अधिकृत घोषणा, कलकत्ता विद्वत्‌सभा सभागृहात करण्यात आली. अध्यक्षपदी जे.एच.हटन होते. एल.एल.फर्मोर ह्या संस्थेचे पहिले निर्वाचित अध्यक्ष झाले होते. १९३४ मध्ये मुंबईत झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणात, अशा ऑल इंडिया ऍकॅडमी ऑफ सायन्सेसची प्रथम साहा ह्यांनीच प्रस्तुत केलेली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचेच पुनर्नामांकन पुढे इंडियन नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस असे करण्यात आले आणि तिचे मुख्यालय नवी दिल्लीत हलविण्यात आले. केंद्रीय काच आणि चीनीमाती संशोधन संस्थेचे (सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट) नियोजन आणि स्थापना करण्यातही साहा ह्यांचा हातभार लागलेला आहे. ही संस्था कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च ह्या संस्थेची कलकत्ता येथील सहयोगी संस्था आहे. १९४४ मध्ये साहा ह्यांची इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सच्या ऑनररी सेक्रेटरीपदी निवड झाली. १९४६ ते १९५० दरम्यान ते तिचे अध्यक्षही राहिले. १९५२ मध्ये ते असोसिएशनच्या प्रयोगशाळांचे पूर्णवेळ संचालकही झाले आणि तहहयात त्या पदावर राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली असोसिएशनच्या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी असोसिएशनच्या आधुनिक प्रयोगशाळांची उभारणी केली.

साहा ह्यांनी कलकत्ता विद्यापीठात; प्रारण भौतिकशास्त्र (रेडिओ फिजिक्स), विजकविद्या (इलेक्ट्रॉनिक्स) आणि उपायोजित भौतिकशास्त्र (अप्लाईड फिजिक्स) हे विभाग; स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. १९५० मध्ये साहांनी इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्सची स्थापना केली. संस्थेची कोनशिला डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांचे हस्ते बसविण्यात आली. ते त्यावेळी भारत सरकारचे नागरी पुरवठा मंत्री होते. संस्थेचे औपचारिक उद्‌घाटन इरीन जोलिएट क्युरी ह्यांच्या हस्ते, ११ जानेवारी १९५० रोजी करण्यात आले होते. ही संस्था मुळात कलकत्ता विद्यापीठाच्या आवारातच होती. उद्‌घाटन सोहळ्यास उपस्थित असणार्‍यांत रॉबर्ट रॉबिन्सन आणि जे.डी.बर्नाल हेही होते. १९४० साली कलकत्ता विद्यापीठातील एम.एस.सी.फिजिक्सच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदा अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्राचा समावेशही साहा ह्यांनीच केला होता. त्याशिवाय त्यांनी एम.एस.सी.पश्चातचा अणुकेंद्रकीय विज्ञानावरील एक अभ्यासक्रमही देशात पहिल्यांदाच सुरू केला होता. देशातील पहिला आवर्तनक (सायक्लॉट्रॉन) उभारण्यासाठीची पावलेही त्यांनी उचललेली होती.

शास्त्रीय कार्यकर्त्यांच्या, जुलै १९४६ मध्ये ब्रिटनमध्ये भरवण्यात आलेल्या परिषदेचे पर्यवसान, “वर्ल्ड फेडरेशन ऑफ सायंटिफिक वर्कर्स” ची स्थापना होण्यात झाले. ह्या परिषदेत साहा सहभागी झालेले होते. भारतात परत आल्यावर त्यांनी भारतातील शास्त्रीय कार्यकर्त्यांना, तत्सम संस्था भारतात उभी करण्याबाबत, “सायन्स अँड कल्चर” मध्ये संपादकीय लिहिले. अशा प्रकारच्या संघटनेचे उद्दिष्ट स्पष्ट करत असतांना ते लिहितात, “अशा प्रकारच्या संघटनेची ध्येये आणि उद्दिष्टे; परिषदांतून प्रशिक्षण आणि सार्वजनिक क्षेत्रात प्रत्यक्ष कृती घडवून राष्ट्रजीवनात विज्ञानाचा पूर्णत्वाने उपयोग व्हावा; ह्याकरता निश्चित केलेली असावीत.” आणखीही एका प्रसंगी ते लिहितात, “भारतातील शास्त्रीय कार्यकर्त्यांनी, सन्माननीय नागरिक म्हणून जगण्याचा अनुस्यूत हक्क आणि मातृभूमीच्या उद्धाराप्रतीची कर्तव्ये बजावावीत अशी वेळ येऊन ठेपलेली आहे.” यथावकाश ७ जुलै १९४७ रोजी असोसिएशन फॉर सायंटिफिक वर्कर्स (इंडिया) ची स्थापना झाली.

साहा ह्यांनी कलकत्ता येथे १९३५ साली इंडियन सायन्स न्यूज असोसिएशनची स्थापना केली. जनसामान्यांत विज्ञानाचा प्रसार करणे हेच तिचे प्रमुख उद्दिष्ट होते. “सायन्स अँड कल्चर” हे संस्थेचे मुखपत्र प्रकाशित करणे सुरू झाले. पत्रिकेच्या पहिल्या आवृत्तीची प्रत प्राप्त झाल्यावर नेताजी सुभासचंद्र बोस लिहितात, “सायन्स अँड कल्चरच्या अवतरणाचे स्वागत, केवळ अमूर्त विज्ञानात रस असलेल्यांनीच नव्हे, तर व्यवहारात राष्ट्र-उभारणीत रुची असणार्‍यांनीही केले पाहिजे. जुन्या राष्ट्र घडविणार्‍यांचे दृष्टीकोन काय असतील ते असोत, आपण तरूणांनी राष्ट्र उभारणीचे कार्य पूर्णतः वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन करायला हवे आणि आधुनिक विज्ञान आणि संस्कृती आपल्याला जे जे देऊ शकत असेल त्या सर्व ज्ञानाने आपण सुसज्ज असायला हवे अशीच आमची इच्छा आहे. मात्र राजकीय कार्यकर्त्यांना त्यांच्या न संपणार्‍या  व्यस्ततेपायी स्वतः असे ज्ञानार्जन शक्य होत नाही. म्हणून वैज्ञानिक आणि वैज्ञानिक तपासकांनी त्यांना मदत करण्यास पुढे यावे.” साहांनी स्वतः २०० हून अधिक लेख सायन्स अँड कल्चर मध्ये लिहिले. त्यात शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधनाच्या संघटनापासून  तर, अणुऊर्जा व तिचे औद्योगिक उपयोग, नदीखोरेविकास प्रकल्प, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे नियोजन, शैक्षणिक सुधारणा, भारतीय दिनदर्शिका इत्यादींपर्यंत विविध विषयांचा समावेश होता. वर्तमानात पत्रिकेचे ६८ वे वर्ष सुरू आहे.

भारतातील वैज्ञानिक अर्थव्यवथेच्या नियोजनाबाबतच्या आपल्या दृष्टीविषयी साहा ह्यांनी विस्ताराने लिहून ठेवलेले आहे. साहांनीच राष्टीय नियोजन समितीच्या स्थापनेकरता, तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असलेले नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांचे मन वळवले होते. सुरूवातीस, सर्वाधिक ख्यातीप्राप्त भारतीय अभियंता एम. विश्वेश्वरय्या हे त्या समितीचे अध्यक्ष राहिले. मात्र, समितीचा प्रभाव पडण्याचे दृष्टीने साहांना असे वाटत होते की, तिचे अध्यक्षपद काँग्रेसच्या एखाद्या शक्तीशाली नेत्याकडे असावे. त्यासाठी समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास जवाहरलाल नेहरूंना राजी करण्यासाठी त्यांचे मन वळवण्यास, साहांनी रविंद्रनाथ टागोरांना गळ घातली होती.

साहा हे अणुऊर्जेच्या शांततामय विनियोगाचे समर्थक होते. १० मे १९५४ रोजी त्यांनीच ह्या विषयावरला प्रथम सांसदीय वाद सुरू केला होता. साहा ह्यांचा, ऍटॉमिक एनर्जी कमिशनच्या स्थापनेस विरोध होता. त्यांना असे वाटत होते की, अणुऊर्जेबाबतचे संशोधन विद्यापीठ पातळीवर केले जावे. वस्तुतः त्यांना “इंडियन ऍटॉमिक एनर्जी ऍक्ट” पूर्णतः मोडीत काढण्याची इच्छा होती. त्यांना असे वाटत होते की, असा कार्यक्रम हाती घेण्यापूर्वी, सरकारने प्रथम आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करावे. मात्र, साहा ह्यांचा विरोध असूनही १९४८ मध्ये, होमी जे. भाभा ह्यांच्या अध्यक्षतेखाली “ऍटॉमिक एनर्जी कमिशन” ची स्थापना करण्यात आली. डी.एम.बोस ह्यांनी १९६७ साली असे म्हटले होते की, “अणुऊर्जाविभागाचे स्थानांतर, तसेच अणुऊर्जाविभागाचे सचिव म्हणून आणि अणुऊर्जाआयोगाचे अध्यक्ष म्हणून भाभा ह्यांची केलेली नियुक्ती, ह्या पंतप्रधानांच्या (जवाहरलाल नेहरूं ह्यांच्या) निर्णयांमुळे साहा ह्यांची काहीशी निराशा झाली असणार. कारण १९३५ पासून नेहरू आणि साहा ह्यांनी समान स्वारस्याच्या अनेक क्षेत्रांत सहकार्य केलेले होते. त्यात सुभाषचंद्र बोस ह्यांनी १९३८ साली नियुक्त केलेल्या नियोजन समितीचा समावेश होतो, जिच्या अध्यक्षपदी नेहरू होते, आणि जिचे साहा हे महत्त्वपूर्ण सदस्य होते. त्यानंतरच्या काही निर्णयांबाबत पंतप्रधानांसोबतच्या संबंधातील वाढता अवघडलेपणा, पुढे १९५२ मध्ये मग साहा ह्यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यापाठीमागच्या कारणांतील एक घटक असू शकेल. मात्र ह्यात मुळीच शंका नाही की, अणुऊर्जेच्या उपयोगाबाबतच्या भारतीय नियोजनाचा विकास भाभांच्या सुपूर्त करण्याचा पंतप्रधान नेहरूंचा निर्णय योग्यच होता. भारतातील अणुऊर्जेच्या विकासासोबत भाभांनी स्वतःची ओळख निर्माण केली. साहा ह्यांची स्वारस्ये अनेक आणि विविध स्वरुपांची होती.” त्यांच्या ह्या मताशी, अनेक लोक सहमत होतील.

अनेक भारतीय नदीखोर्‍यांत वारंवार घडून येणार्‍या विध्वंसक पुरांबाबतही साहांना अत्यंत काळजी वाटत असे. १९२३ मध्ये उत्तर बंगालात सर्वदूर पुरामुळे घडून आलेल्या हानीमुळे, आचार्य प्रफुल्लचंद्र रे ह्यांना, नॉर्थ बंगाल रिलीफ कमिटीच्या विद्यमाने, पूरग्रस्तांसाठी मदतकार्य हाती घ्यावे लागलेले होते. मदतकार्यासाठी, सर्वसामान्य लोकांकडून मोठा निधी गोळा करणे, रे ह्यांना शक्य झालेले होते. त्यांना सुभाषचंद्र बोस, मेघनाद साहा आणि सतिशचंद्र दासगुप्ता ह्यांनीही मदत केलेली होती. हे मदतकार्य करत असतांनाच साहांना, पुरांच्या विध्वंसक शक्तीची प्रत्यक्ष कल्पना आलेली होती. ह्या अनुभवाबाबत साहा ह्यांनी वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत लिहून ठेवलेले आहे. १९३४ साली मुंबई येथे भरलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोलत असता, पुरांमुळे उद्भवलेल्या ह्या गंभीर समस्यांकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले होते. नदीसंशोधन प्रयोगशाळा स्थापन करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केलेली होती. १९३८ मध्ये पुन्हा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या आपल्या भाषणात, त्यांनी भारतीय नद्यांत पुन्हापुन्हा उद्भवणारी पूरपरिस्थिती, विशेषतः  त्रिभूज प्रदेशांतील पूरपरिस्थिती, अधोरेखित केली होती. १९४३ मध्ये बंगालात आलेल्या पुराने कलकत्त्यास उर्वरित भारतापासून विलग केले होते. साहांनीही ह्याबाबत विस्ताराने लिहिलेले आहे. साहा ह्यांच्या लिखाणामुळेच सरकारला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. परिणामी १९४३ मध्येच दामोदर खोरे चौकशी समिती अस्तित्वात आली. बरद्वानचे महाराज तिचे अध्यक्ष होते. साहा तिचे सदस्य होते. दामोदर खोरे प्रणाली हाताळण्याकरताची योजना साहा ह्यांनी तयार करून समितीपुढे प्रस्तुत केली. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे आधारे पूरनियंत्रण करण्याबाबतही त्यांनी विस्ताराने लिहिले. त्यांनी असा मुद्दा मांडला की, अमेरिकेतील टेन्नेस्सी व्हॅली ऍथॉरिटीच्या (टी.व्ही.ए.) अधिपत्याखाली टेन्नेस्सी व्हॅली सिस्टिममध्ये राबविण्यात आलेले प्रारूप (मॉडेल) दामोदर खोर्‍यात अंमलात आणता येऊ शकेल. त्यावेळच्या वाईसराय ह्यांच्या मंत्रिमंडळातील ऊर्जा आणि कार्ये विषयाकरताचे प्रभारी मंत्रिमंडसदस्य असलेले डॉ.बी.आर.आंबेडकर, ह्यांच्या सांगण्यावरून सरकारने, टी.व्ही.ए. प्रारूपावर आधारित, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (डी.व्ही.सी.) स्थापन करावी असा निर्णय घेतला. डी.व्ही.सी.ची स्थापना मार्च १९४८ मध्ये करण्यात आली. साहा ह्यांचे स्वारस्य केवळ बंगालातील नद्यांपुरतेच सीमित नव्हते.

भारतीय दिनदर्शिकेतील सुधारणांबाबतचे साहा ह्यांचे काम खूप महत्त्वाचे आहे. भारत सरकारने १९५२ साली, कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चच्या विद्यमाने नियुक्त केलेल्या दिनदर्शिका सुधार समितीचे ते अध्यक्ष होते. ह्या समितीचे इतर सदस्य पुढीलप्रमाणे होते. ए.सी.बॅनर्जी, के.के.दफ्तरी, जे.एस.करंदीकर, गोरखप्रसाद, आर.व्ही.वैद्य आणि एन.सी.लाहिरी. साहा ह्यांच्या प्रयत्नांमुळेच समिती स्थापन होऊ शकली होती. समितीसमोरील कर्तव्य, वैज्ञानिक अभ्यासाचे आधारे असे अचूक दिनदर्शिका तयार करण्याचे होते, जे भारतभर एकरूपतेने उपयोगात आणले जाऊ शकेल. हे काम प्रचंडच होते. समितीस देशाच्या निरनिराळ्या भागांत प्रचलित असलेल्या विविध दिनदर्शिकेचा तपशीलवार अभ्यास हाती घ्यावा लागला. अशा तीस निरनिराळ्या दिनदर्शिका अस्तित्वात होत्या. दिनदर्शिकेसोबत धार्मिक आणि स्थानिक भावना गुंतलेल्या असल्याने हे काम अधिकच गुंतागुंतीचे झालेले होते. १९५५ साली प्रकाशित झालेल्या समितीच्या अहवालास लिहिलेल्या प्रस्तावनेत नेहरू म्हणतात, “त्या दिनदर्शिका देशातील भूतपूर्व राजकीय विभागांचे प्रतिनिधित्व करतात. आता आपल्याला स्वातंत्र्य लाभलेले आहे. त्यामुळे हे वांछनीय आहे की, आपल्या नागरी, सामाजिक आणि इतर उपयोगांकरताच्या दिनदर्शिकांत काहीशी एकरूपता असावी. हे ह्या समस्येस वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहून साध्य केले जावे.” ह्या समितीच्या काही महत्त्वपूर्ण शिफारसी खालीलप्रमाणे आहेत.

एकीकृत राष्ट्रीय दिनदर्शिकेत (युनिफाईड नॅशनल कॅलेंडर) शक युग (सक इरा) उपयोगात आणले जावे. (इसवी सन २००२ म्हणजे शके १९२३-२४.)
१. वर्ष वसंत संपातानंतरच्या दिवशी  सुरू होईल. (हा दिवस २१ मार्चच्या सुमारास येतो.)
२. सामान्य वर्षात ३६५ दिवस असावेत. लीप वर्षात ३६६ दिवस असावेत. शक युगात ७८ वर्षे मिळवून बेरीजेस जर चारने भाग जात असेल तर ते लीप वर्ष धरण्यात यावे. पण जेव्हा विचाराधीन वर्ष १०० च्या पटीत येईल तेव्हा, जर त्या वर्षाच्या आकड्यास ४०० ने भाग जात असेल तरच ते लीप वर्ष ठरेल. एरव्ही ते सामान्य वर्ष ठरेल.
३. वर्षाचा पहिला महिना चैत्र असेल. चैत्र ते भाद्रपद प्रत्येक महिन्यास एकतीस दिवस असतील आणि उर्वरित महिन्यांना प्रत्येकी तीस दिवस असतील.

साहा ह्यांच्यानुसार, आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याचा एकमेव उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणातील औद्योगिकरण होय. ते असा विचार करत की, भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात अपयशी ठरल्यास, भारतास काहीच आशा उरणार नाही. ते लिहितात, “सर्व थोर धर्मांच्या संस्थापकांनी इतरांशी सहृदयतेने आणि सेवाभावाने व्यवहार करण्यासच शिकवले आहे, आणि हे (आदर्शवादी) तत्त्वज्ञान अंमलात आणण्यास सर्व काळांतील, प्रत्येक देशातील काही महान राजे आणि धर्माधिकार्‍यांनी प्रयास केलेले आहेत, ह्यात मुळीच संशय नाही. पण असे प्रयास यशस्वी झाले नाहीत. व्यवहारात आदर्श प्रस्थापित करण्यासाठी; वस्तू-निर्माण-पद्धती सर्वांना विपूल प्रमाणात पुरेशा वस्तू निर्माण करतील ही शर्त अनिवार्य असते. तसे करण्याबाबत वस्तू-निर्माण-पद्धती उदासिन असत, ह्या साध्या कारणानेच ते प्रयास यशस्वी होऊ शकले नाहीत. आपण असे म्हणू या की जगातील प्रगत देशांत, व्यक्तीगत आयुष्यांचा विचार करता, विज्ञानाने आजवर, थोर धर्मसंस्थापकांनी ठरवलेले लक्ष्य साध्य केले आहे. ऐतिहासिक कारणांनी निर्माण झालेले, संपत्तीच्या विषम विभाजनाचे परिणाम, सामाजिक कायद्यांच्या प्रवेशामुळे झपाट्याने निरस्त होत आहेत.”

१९५२ साली, साहा स्वतंत्र उमेदवार म्हणून कलकत्ता वायव्य सांसदीय मतदारसंघातून निर्वाचित संसदसदस्य झाले होते. ह्या निवडीचे स्वागत करत असता जे.बी.एस.हल्दाने म्हणतात, “मलाही त्यांच्या अलीकडील राजकारणातील पुनर्प्रवेशाप्रित्यर्थ त्यांचे अभिनंदन करण्याची अनुमती असावी. भारतास (आणि ब्रिटनलाही) देशाच्या सरकारात शास्त्रीय समज आणणार्‍या लोकांची गरज आहे. अगदी ज्यांना त्यांचे राजकीय दृष्टीकोन मान्य नाहीत, तेही ह्याचा आनंद व्यक्त करतील की, लोकप्रतिनिधींच्या सभागृहात ते (साहा) आपला आवाज ऐकवू शकतील.” अनेकांना ह्याचे आश्चर्य वाटते की, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक असूनही साहा ह्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला.

१६ फेब्रुवारी १९५६ रोजी आपल्या योजना आयोगातील कार्यालयात जात असता, हृदयविकाराचा मोठा झटका येऊन साहा अचानकच वारले. त्यांचे एक उद्यमी विद्यार्थी असलेले डी.एस.कोठारी म्हणतात त्यानुसार, “साहांचे आयुष्य एका अर्थाने भारतातील वैज्ञानिक संशोधनाच्या वाढीचा आणि प्रगतीचा एक अविभाज्य भागच होते. त्यांच्या दृष्टीचा आणि व्यक्तिमत्वाचा परिणाम, भावी काळातील देशातील जवळपास प्रत्येक शास्त्रीय कार्यातील प्रत्येक पैलूवर दीर्घ काळ पडलेला दिसून येईल. त्यांची विज्ञानाप्रतीची निष्ठा, सरळसाधेपणा आणि निवडलेल्या कार्यादरम्यान व्यक्तिगत सोयींप्रतीची अनास्था; एक प्रेरणा आणि उदाहरण बनून राहील.”

मेघनाद साहा ह्यांनी लिहिलेली पुस्तके

१. प्रिन्सिपल्स ऑफ रिलेटिव्हिटी (एस.एन.बोस ह्यांचे सोबत मिळून), कलकत्ता विद्यापीठ, कलकत्ता १९२०. हे पुस्तक म्हणजे, आईन्स्टाईन ह्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांवरील शोधनिबंधांचा अनुवाद आहे.
२. ट्रिटीज ऑन हीट (बी.एन.श्रीवास्तव ह्यांचेसोबत मिळून), इंडियन प्रेस, अलाहाबाद, १९३१.
३. ज्युनिअर टेक्स्टबुक ऑन हीट (बी.एन.श्रीवास्तव ह्यांचेसोबत मिळून), इंडियन प्रेस, अलाहाबाद, १९३२.
४. ट्रिटीज ऑन मॉडर्न फिजिक्स, व्हॉल्यूम-१ (एन.के.साहा ह्यांचेसोबत मिळून), इंडियन प्रेस, अलाहाबाद, १९३४.
५. माय एक्सपिरिअन्स इन सोव्हिएत रशिया, बुकमन इन्कार्पोरेटेड, कलकत्ता, १९४७.

अधिक वाचनासाठी

१. मेघनाद साहा, लेखकः सान्तिमय चटर्जी आणि एनक्षी चटर्जी, नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली १९८४.
२. मेघनाद साहा, लेखकः एस.बी.कर्मोहपात्रा, प्रकाशनविभाग, भारत सरकार, नवी दिल्ली-१९९७.
३. मेघनाद साहा, लेखकः डी.एस.कोठारी, बायोग्राफिकल मेमॉईर्स ऑफ फेलोज ऑफ द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया, व्हॉल्यूम-२, नवी दिल्ली, १९७०.
४. प्रोफेसर मेघनाद साहा, हीज लाईफ, वर्क अँड फिलॉसॉफी, संपादनः समरेंद्रनाथ सेन, मेघनाद साहा ह्यांचा साठावा वाढदिवस समिती, कलकत्ता-१९५४.
५. थर्टी इयर्स ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, १९८१.
६. कलेक्टेड सायंटिफिक पेपर्स ऑफ मेघनाद साहा, संपादनः सान्तिमय चटर्जी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, नवी दिल्ली-१९६९.
७. कलेक्टेड वर्क्स ऑफ मेघनाद साहा, संपादनः सान्तिमय चटर्जी, ओरिएंट लाँगमन लिमिटेड, कलकत्ता, १९८२-१९९३.
८. सायन्स अँड कल्चर, गोल्डन ज्युबिली व्हॉल्यूम, इंडियन सायन्स न्यूज असोसिएशन, कलकत्ता, १९८५.
९. सायन्स अँड कल्चर, व्हॉल्यूम १-२१, इंडियन सायन्स न्यूज असोसिएशन, कलकत्ता, १९३६-५५.
१०. जवाहरलाल नेहरू ऑन सायन्स, संपादनः बलदेव सिंग, नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी, नवी दिल्ली-१९८६.

२०१५-१२-१९

गीतानुवाद-०६७: लहरों से डरकर नौका पार नहीं होती

लहरों से डरकर नौका पार नहीं होती

- सोहनलाल द्विवेदी

कई लोग इस रचना को हरिवंशराय बच्चन जी द्वारा रचित मानते हैं। लेकिन श्री अमिताभ बच्चन ने अपनी एक फ़ेसबुक पोस्ट में स्पष्ट किया है कि यह रचना सोहनलाल द्विवेदी जी की है।

http://kavitakosh.org/.../_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0

http://www.hindisahityadarpan.in/2012/07/motivational-poem.html


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५१२१९



धृ
लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
लाटांना घाबरून नौका पार होत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही

नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारों पर सौ सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना नहीं अखरता है
आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
छोटीशी मुंगी दाणा घेऊन चालत असते
चढते भींतींवर, शत शतदा घसरत असते
मनातील विश्वास नसांत साहस भरतो
चढून पडणे, पडून चढणे, व्यर्थ होत नाही
अखेरीस तिची मेहनत वाया जात नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाते हैं
जा जा कर गहरे पानी में खाली लौट आते हैं
मिलते ना मोती सहज ही गहरे पानी में
बढ़ता दूना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
पाणबुडे समुद्रात डुबकी घेत असतात
खोलवर बुडी घेऊनही रिकामे परततात
तिथे मोती सहज का सापडत नाहीत
ह्या आश्चर्यानेच उत्साह दुप्पट होतो
मूठ नेहमीच काही रिकामी राहत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही

असफलता एक चुनौती है स्वीकार करो
कहां कमी रह गई देखो और सुधार करो
जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम
संघर्षो का मैदान छोड़ मत भागो तुम
किए कुछ बिना जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
अपयश आव्हान आहे, स्वीकार करा
काय कमी राहिली शोधा, सुधार करा
यश मिळत नाही, तोवर झोप सोडा
संघर्षाचे क्षेत्र सोडून, तुम्ही पळू नका
काही केल्याविनाच जयकार होत नाही
यत्नशीलांची कधीही हार होत नाही