२०१५-०९-३०

आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन१९९१ पासून दरसाल, ३० सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन साजरा केला जात असतो. बायबलचे हिब्रू भाषेतून लॅटीन भाषेत भाषांतर करणारे संत जेरोम, ह्यांना आद्य भाषांतरकार म्हटले जाते. त्यांच्या स्मृतीदिनी (फिस्ट ऑफ द सेंट), म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी, हा जागतिक भाषांतर दिन साजरा केला जात असतो. भाषांतरकारांची आंतरराष्ट्रीय संघटना (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्स्लेटर्स), १९५३ साली झालेल्या तिच्या स्थापनेपासून, केवळ ख्रिश्चनच नव्हे तर सर्वच देशांतील भाषांतर व्यवसायाच्या प्रगतीस सहसंवेदना व्यक्त करण्यासाठी, हा दिवस साजरा करत असते. वाढत्या जागतिकीकरणाच्या युगात वाढते महत्त्व प्राप्त करत असणार्‍या ह्या व्यवसायास, अभिमान अभिव्यक्त करण्याची ही एक संधीच असते.

’अमृताते पैजा जिंके”’ असे जिचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केलेले आहे, त्या मराठी भाषेसही भाषांतरकौशल्याचा खूप संपन्न वारसा लाभलेला आहे.  श्रीमद्‌ भगवद्‌ गीतेचा विनोबाजींनी (विनायक भावे ह्यांनी) केलेला ’गीताई” हा अनुवाद तर ह्या सार्‍या अनुवादांत शीर्षस्थ आहे. हरी नारायण आपटे ह्यांनी केलेला ’साम ऑफ लाईफ’ ह्या हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो ह्या प्रख्यात इंग्लिश कवीच्या कवितेचा मराठी अनुवाद ’जीवित महिमा' अत्यंत वाचनीय आहे.

दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीने हिंदी गीतांच्या संस्कृत भाषांतराची एक स्पर्धा आयोजित केलेली होती. त्यात श्री.राजेंद्र भावे ह्या मुंबईस्थित संस्कृत पंडितांनी राश्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत, “आजा सनम, मधुर चाँदनी में हम” ह्या सुमधुर गीताचा संस्कृत अनुवाद केला होता. त्यांचेच सुपूत्र आणि विख्यात गायक श्री. श्रीरंग भावे ह्यांनी तो गायिलेलाही आहे. त्याच गीताचा मराठी अनुवादही ह्यासोबतच इथे ह्याच अनुदिनीवर सादर करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.