२०१३-०६-२७

कर्करोगाबाबत आपल्याला काय माहीत असायला हवे-भाग एकूण ४ पैकी १

E-53 What you need to know about Cancer,
ह्या जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंटस ह्या अशासकीय संस्थेने,
ऑक्टोंबर २०११ मध्ये प्रकाशित केलेल्या मूळ इंग्रजी पुस्तिकेचा मराठी अनुवाद,
पारिभाषिक शब्दसंग्रहासहित, मूळ इंग्रजी मजकुराच्या एकूण ए-४ पृष्ठांची संख्या ३५,

अनुवादकः नरेंद्र गोळे २०१३०५२२

********************************************************************************

अनुक्रमणिका

कर्काचे आकलन
            कर्काचे प्रकार
            कर्काची कारणे
धोके घटक
            चित्रांकन
कर्काची लक्षणे
कर्काचे निदान
            अवस्थांकन
कर्काचे उपचार
कर्कोपचारपद्धती
            शल्यक्रिया
            प्रारणोपचार
            रसायनोपचार       
            अंतर्प्रेरकोपचार            
            जैवोपचार                                                        
मूलपेशी प्रत्यारोपण
पूरक आणि पर्यायी उपचार
            आहार आणि शारीरिक सक्रियता
            पाठपुरावा निगा
            आधारांचे स्त्रोत
कर्क-संशोधनातील आशा
शब्दकोश

********************************************************************************

कर्काचे आकलन

ऊती ज्या घटकांपासून निर्माण होत असतात त्या पेशींत कर्क सुरू होतो. उतींपासून शरीराचे अवयव घडत असतात.

सामान्यतः शरीरास नव्या पेशींची आवश्यकता असते तेव्हा, पेशी वाढतात आणि विभागतात. जेव्हा पेशी जुन्या होतात, तेव्हा त्या मरतात, आणि नवीन पेशी त्यांची जागा घेत असतात.

काही वेळेला, ही व्यवस्थित प्रक्रिया बिघडते. शरीरास आवश्यक नसतांनाही नवीन पेशी निर्माण होतात आणि मरायला हव्यात तेव्हा जुन्या पेशी मरतही नाहीत. अशा प्रकारे अतिरिक्त ठरलेल्या पेशी ऊतींचे एक वस्तुमान निर्माण करतात, ज्याला वृद्धी अथवा अर्बुद म्हटले जाते.

अर्बुदे, सौम्य किंवा मारक असू शकतात

सौम्य अर्बुदे कर्क नसतात:

१.      सौम्य अर्बुदे क्वचितच प्राणघातक असतात.
२.      सामान्यतः सौम्य अर्बुदे काढून टाकली जाऊ शकतात आणि ती बहुधा पुन्हा वाढत नाहीत.
३.      सौम्य अर्बुदांतील पेशी त्यांच्या आसपासच्या ऊतींत आक्रमण करत नाहीत.
४.      सौम्य अर्बुदांतील पेशी शरीरातील इतर भागांत पसरत नाहीत.

मारक अर्बुदे कर्क असतात:

१.      मारक अर्बुदे सौम्य अर्बुदांहून सामान्यतः अधिक गंभीर असतात. ती प्राणघातकही ठरू शकतात.
२.      मारक अर्बुदे अनेकदा काढून टाकता येतात, पण काही वेळेस ती पुन्हा वाढतात.
३.      मारक अर्बुदांतील पेशी आसपासच्या ऊती आणि अवयवांत अतिक्रमण करून त्यांना हानी पोहोचवू शकतात.
४.      मारक अर्बुदांतील पेशी शरीराच्या इतर भागांत पसरू शकतात. मूळ (प्राथमिक) अर्बुदातून फुटून कर्कपेशी रक्तप्रवाहात किंवा लसिकाप्रणालीत प्रवेश करतात. ह्या पेशी इतर अवयवांवरही आक्रमण करू शकतात, ज्यामुळे नवीन अर्बुदे निर्माण होऊन ह्या अवयवांना हानी पोहोचवू शकतात. कर्काच्या ह्या प्रसारास कर्कप्रसार असे म्हणतात.

कर्काचे प्रकार

बव्हंशी कर्क जिथे उद्‌भवतात त्या जागेवरून त्यांचे नामकरण केले जाते. उदाहरणार्थ, फुफ्फुसाचा कर्क फुफ्फुसात उद्‌भवतो आणि स्तनांचा कर्क स्तनांत. लसिकाकर्क (लिम्फोमा) हा कर्क लसिका-प्रणालीत उद्‌भवत असतो आणि श्वेतपेशीकर्क (ल्युकेमिया) हा पांढर्‍या रक्तपेशींत (ल्युकोसाईटस मध्ये) उद्‌भवत असतो.

जेव्हा कर्क पसरतो आणि नवे अर्बुद शरीराच्या दुसर्‍या भागात निर्माण होते, तेव्हा नव्या अर्बुदात त्याच प्रकारच्या अपसामान्य पेशी असतात आणि त्याचे नावही प्राथमिक अर्बुदाचे जे असते तेच असते. उदाहरणार्थ, जर पुरस्थग्रंथीचा कर्क अस्थींत पसरला, तर अस्थीतील कर्कपेशी प्रत्यक्षात पुरस्थग्रंथीतील कर्कपेशीच असतात. हा रोग पुरस्थग्रंथीचा प्रसारित कर्कच असतो, अस्थीकर्क नव्हे. ह्याकरता, त्याचे उपचार पुरस्थग्रंथीच्या कर्काप्रमाणेच केले जातात, अस्थीकर्काप्रमाणे नव्हे. डॉक्टर्स काही वेळेस, अशा नव्या अर्बुदास ’दूरस्थ’ (डिस्टंट) किंवा ’प्रसारित’ अर्बुद म्हणत असतात.

कर्क शरीरात बहुतेक कुठेही उद्‌भवू शकत असतो.

मांसकर्क (कार्सिनोमा) हे सर्वात सामान्य प्रकारचे कर्क असून, शरीराच्या बाह्य व अंतर्गत पृष्ठभागांना झाकणार्‍या पेशींपासून उद्‌भवत असतात. अमेरिकेत ह्या प्रकारचे कर्क; फुफ्फुस, स्तन आणि आतडी ह्यांत सर्वात वारंवार होत असतात. शरीरातील अस्थी, अस्थीबंध, मेद, जोडऊती आणि स्नायू इत्यादी आधार-ऊतींत आढळून येणार्‍या पेशींत उद्‌भवणारे कर्क अस्थीबंधकर्क (सार्कोमा) असतात.

लसिकाकर्क (लिम्फोमा) हे लसिकाजोडांत अणि शरीराच्या प्रतिरक्षा-प्रणालीतील ऊतींत उद्‌भवणारे कर्क असतात. रक्तकर्क (ल्युकेमिया) हे अस्थीमज्जेत वाढणार्‍या अपरिपक्व रक्तपेशींत उद्‌भवणारे कर्क असून मोठ्या संख्येत रक्तप्रवाहात साचत जाण्याचा त्यांचा कल असतो.

अनेक निरनिराळ्या प्रकारचे मांसकर्क, अस्थीबंधकर्क, लसिकाकर्क आणि रक्तकर्क यांत फरक करण्यासाठी, शास्त्रज्ञ निरनिराळी तांत्रिक नावे वापरत असतात. सामान्यतः ही नावे लॅटीन भाषेतील निरनिराळे पूर्व-उपसर्ग वापरून घडवली जात असतात आणि कर्काची अनिर्बंध वाढ ज्या स्थानापासून सुरू होते त्या स्थानाचा संदर्भ ती नावे देत असतात. उदाहरणार्थ लॅटीन भाषेत ’ऑस्टिओ’ म्हणजे ’अस्थी’. म्हणून अस्थींत उद्‌भवणारा कर्क लॅटीन भाषेत ऑस्टिओ-सार्कोमा म्हणवला जातो. आपण मराठीत त्याला अस्थी-बंध-कर्क म्हणू. तसेच, लॅटीन भाषेत पूर्व-उपसर्ग ’अडेनो’ म्हणजे ’ग्रंथी’. म्हणून ग्रंथीपेशींचा कर्क, लॅटीन भाषेत ’अडेनो-कार्सिनोमा’ म्हणवला जातो. आपण मराठीत त्याला ग्रंथी-मांस-कर्क म्हणू.

कर्क ऊती सूक्ष्मदर्शकाखाली विभेदनक्षम दिसतात. डॉक्टर जी विशेष लक्षणे शोधत असतात त्यात ते मोठ्या संख्येतील अनियमित आकाराच्या विभागत्या पेशी शोधत असतात, पेशीकेंद्रीय आकार आणि आकारमानांतील बदल हुडकत असतात, पेशीच्या आकार आणि आकारमानांतील बदल हुडकत असतात, विशेष पेशी लक्षणांचा र्‍हास शोधत असतात, सामान्य ऊतींच्या संघटनातील र्‍हास शोधत असतात, आणि अर्बुदाची अस्पष्ट सीमा हुडकत असतात.

कर्काची कारणे

कर्कविकासार्थ निर्देशित जनुकांचा एक गट असतो हानीग्रस्त जनुकांचा, ज्या अर्बुद-कारक-जनुका म्हणवल्या जातात. ह्या अशा जनुका असतात, ज्यांची काही विशिष्ट स्वरूपातील उपस्थिती किंवा अतिसक्रियता कर्कविकासास उत्तेजना देऊ शकत असते. जेव्हा सामान्य पेशींत अर्बुद-कारक-जनुका उद्‌भवतात, तेव्हा त्या पेशीस अतिवृद्धी व अतिविभाजन उत्तेजित करणारी प्रथिने तयार करण्याच्या सूचना देत असतात.

कर्काकरता निर्देशित असलेला, जनुकांचा दुसरा गट हा ’अर्बुद-दमनक-जनुकांचा’ असतो. ह्या अशा सामान्य जनुका असतात, ज्यांची अनुपस्थिती कर्काप्रत नेऊ शकत असते. दुसर्‍या शब्दांत, जर अर्बुद-दमनक-जनुकांची एक जोडी पेशीतून नाहीशी झाली असेल किंवा परस्परस्वभावांतरणांद्वारे निष्क्रिय करण्यात आलेली असेल तर, त्यांच्या कार्याची अनुपस्थिती, कर्कविकासास वाव देऊ शकते. कर्कविकासाच्या वाढलेल्या धोक्याचा वारसा लाभलेल्या व्यक्ती अनेकदा, अर्बुद-दमनक-जनुकेची एक बिघडलेली प्रत घेऊनच जन्माला येत असतात. जनुका (प्रत्येक पालकाकडून एक यांनुसार) जोडी-जोडीनेच राहत असल्याने, एका प्रतीतील जन्मजात बिघाड कर्काप्रत नेत नाही कारण, इतर सामान्य प्रत अजूनही कार्य करत असते. पण जर दुसर्‍या प्रतीतही स्वभावांतरण घडून आले तर, अशा व्यक्तीत मग कर्कविकास होऊ शकतो, कारण मग कार्यरत अशी एकही जनुकाप्रत शिल्लक राहिलेली नसते.

अर्बुद-दमनक-जनुका, पेशींची वृद्धी व विभाजन यांवर आवर घालणारी प्रथिने तयार करण्याच्या सूचना देणार्‍या सामान्य जनुकांच्या एका कुटुंबाचा भाग असतात. पेशींची वृद्धी व विभाजन मंदावणार्‍या प्रथिनांकरताचे संकेत, अर्बुद-दमनक-जनुका देत असल्यामुळे, अशा प्रथिनांतील घट, पेशींची वृद्धी व विभाजन अनियंत्रितपणे होऊ देत असते. अर्बुद-दमनक-जनुका जणू काय स्वयंचलित वाहनाच्या गतीरोधकाप्रमाणेच असतात. अर्बुद-दमनक-जनुकांच्या कार्यात घट येण्याने, गतीरोधक बरोबर कार्य करत नसल्यासारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकत असते, ज्यामुळे पेशी निरंतर वाढत आणि विभागत जाऊ शकते.

कर्कासाठी निर्देशित असलेल्या, एक तिसर्‍या प्रकारच्या जनुका असतात, त्यांना ’अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरूस्ती-जनुका’ असे म्हटले जाते. ह्या जनुका अशा प्रथिनांचे संकेत देतात ज्यांचे सामान्य कार्य, पेशीविभाजनापूर्वी जेव्हा पेशी त्यांची अपान-शर्करा-गर्भकाम्ले दुप्पट करत असतात तेव्हा, उद्‌भवणार्‍या चुकांची दुरूस्ती करण्याचे असते. ह्या जनुकांत होणारी अंतरणे दुरूस्ती अपयशी ठरवण्याप्रत पोहोचवू शकतात, ज्यामुळे त्यानंतर होणारी अंतरणे साचत जाऊ शकतात. ’झेरोडर्मा पिग्मेंटोसम’ म्हटली जाणारी अवस्था असलेल्या रुग्णांत, एका अशा जनुकेत आनुवांशिक बिघाड असतो. परिणामी, सूर्यप्रकाशास खुल्या राहिलेल्या त्वचापेशीत सामान्यतः घडून येणारी, अपान-शर्करा-गर्भकाम्लाची हानी, त्या प्रभावीपणे दुरूस्त करू शकत नाहीत आणि त्यामुळे अशा रुग्णांत त्वचाकर्काचा आढळ अपसामान्यपणे उच्च असतो. आतड्याच्या कर्काच्या काही प्रकारांतही, अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्तीतील बिघाड, समाविष्ट असतात.

अर्बुद-कारक-जनुका, अर्बुद-दमनक-जनुका आणि अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्ती-जनुका यांचा समावेश असलेली स्वभावांतरणे साचत जाऊन कर्क उद्‌भवू शकतो. उदाहरणार्थ, आतड्याचा कर्क, अर्बुद-दमनक-जनुकेत असलेल्या बिघाडामुळे सुरू होऊ शकतो, ज्यामुळे अतिरिक्त पेशी प्रसार शक्य होत असतो. पसरणार्‍या पेशींचा कल मग,  अपान-शर्करा-गर्भकाम्ल-दुरुस्ती-जनुकांचा, इतर-अर्बुद-दमनक-जनुकांचा आणि अनेक इतर वाढ-संबंधित-जनुकांचा समावेश असलेली आणखीही स्वभावांतरणे ग्रहण करण्याचा असतो. दुसर्‍या शब्दांत, एक कर्कपेशी निर्माण करण्यासाठी, पेशी-वर्धन-त्वरण (अर्बुद-कारक-जनुका) सक्रिय होत असताना, पेशीवर्धनावरील रोध (ब्रेक; अर्बुद-दमनक-जनुकांचे प्रतिरोध) त्याच वेळी मुक्त व्हावे लागत असतात.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.