२०१३-०५-०७

युईंग्ज अर्बुदे-भाग एकूण ६ पैकी ४

युईंग्ज अर्बुदांकरताची प्रारणोपचार-पद्धती

प्रारणोपचार पद्धती कर्कपेशी मारण्याकरता, उच्च-ऊर्जा प्रारणांचा उपयोग करत असते. युईंग्ज अर्बुदे असलेल्या व्यक्तींत प्रारणोपचार पद्धतीचा उपयोग शल्यक्रियेसोबतच किंवा शल्यक्रियेऐवजी केला जाऊ शकतो. विशेषतः जर शल्यक्रियेद्वारे अर्बुद संपूर्णपणे काढून टाकणे कठीण असेल तर. दोन्हीही प्रकरणांत उपचारांपूर्वी, दरम्यान आणि नंतरही रसायनोपचार दिले जातात.

बाह्य-शलाका-प्रारण-उपचार-पद्धत, शरीराबाहेरील यंत्राद्वारे, कर्कावर उच्च-ऊर्जा शलाका केंद्रित करत असते. युईंग्ज अर्बुदांच्या उपचारार्थ ह्याच प्रकारची प्रारण-उपचार-पद्धत बहुतेकदा वापरली जात असते.

उपचार सुरू होण्यापूर्वी, प्रारण-चमू चुंबकीय-अनुनाद-चित्रक चित्रांकनासारख्या चित्रक चाचण्यांची मापने काळजीपूर्वक नोंदविते, ज्यामुळे प्रारण-शलाका केंद्रित करण्याचे सुयोग्य कोन निर्धारित केले जाऊ शकतात आणि सुयोग्य प्रारणमात्रा दिली जाऊ शकते.

बाह्य-प्रारण-उपचार-पद्धत बरीचशी क्ष-किरण प्राप्त करण्यासारखीच असते, मात्र त्यातील प्रारणमात्रा खूपच जास्त असते. प्रत्येक सत्राकरता, तुमचे मूल एका विशेष टेबलावर पडून राहते. यंत्र नेमक्या कोनातून प्रारण पुरवते. हे उपचार दुःखकारक नसतात.

प्रत्येक उपचार-सत्र केवळ काही मिनिटेच चालत असते, पण उपचारार्थ मुलास स्थिर करण्याची जुळणी करण्यास लागणारा अवधी बहुधा मोठा असतो. काही मुलांना उपचारांपूर्वी झोप येणारी औषधे दिली जातात. बहुतेकदा प्रारणोपचार सप्ताहांतून पाचदा, ह्याप्रकारे अनेक सप्ताह दिले जात असतात.

काही नवीन प्रारण तंत्रे डॉक्टरांना प्रारण अधिक नेमकेपणे केंद्रित करू देतात.

त्रिमिती सारूप्य प्रारणोपचार पद्धती (३-डी.-सी.आर.टी.): त्रिमिती सारूप्य प्रारणोपचार पद्धती, चुंबकीय-अनुनादी-चित्रक चित्रांकनासारख्या चित्रक चाचणीचे निष्कर्ष आणि अर्बुदाचे स्थान नेमकेपणाने निश्चित करण्याकरता विशेष संगणक वापरत असते. अनेक प्रारण-शलाकांना मग आकार देऊन त्या अर्बुदावर निरनिराळ्या दिशांनी केंद्रित केले जाते. प्रत्येक शलाका स्वतःहून खूपच अशक्त असते, ज्यामुळे शरीरातील सामान्य ऊतींना तिच्यापासून हानी पोहोचणे कमी संभवते. मात्र, शलाका अर्बुदावर केंद्रित होत असल्याने, तिथे उच्च प्रारण-मात्रा प्राप्त होऊ शकत असते. तुमचे मूल त्याच्या शरीराच्याच आकाराच्या प्लास्टिकच्या साच्यात पडून राहत असल्याने त्याची जागा एकसारखीच राहते आणि प्रारणाचा नेम अधिक अचूकतेने धरला जाऊ शकतो.

प्रखरता-नियमित-प्रारणोपचार-पद्धती(इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी - आय.एम.आर.टी.): ही उपचारपद्धती म्हणजे त्रिमिती उपचारपद्धतीचे एक प्रगत स्वरूप आहे, जे पाठीच्या कण्यानजीकच्या अर्बुदांकरता विशेषत्वाने उपयोगी ठरत असते. शलाकांना आकार देऊन अनेक कोनांतून अर्बुदावर केंद्रित करण्याशिवाय, सर्वाधिक संवेदनाक्षम सामान्य ऊतींप्रत पोहोचणार्‍या प्रारणाची तीव्रता मर्यादित करण्यासाठी, शलाकांची प्रखरताही जुळवून घेतली जाऊ शकते. ह्यामुळे डॉक्टर अर्बुदास उच्चतर प्रारण-मात्रा पोहोचवू शकतात. अनेक प्रमुख शुश्रुषालये आणि कर्ककेंद्रे हल्ली ही पद्धत वापरतात. विशेषतः पाठीच्या कण्याच्या वा पुठ्ठ्याच्या हाडानजीक सारख्या, उपचारास अवघड जागी असलेल्या अर्बुदांकरता.

सारूप्य धनक-शलाका प्रारणोपचार पद्धतीः धनक-शलाका प्रारणोपचार पद्धत ही ३-डी.-सी.आर.टी. पद्धतीशी संबंधित असते आणि तिच्यासारखीच वाट चालत असते. मात्र क्ष-किरणे वापरण्याऐवजी ती अर्बुदांवर धनक-शलाका केंद्रित करत असते. धनक हे अणूचे धन भागधारक कण असतात. लक्ष्यात प्रवेश करण्यापूर्वी आणि नंतरही ऊर्जा-विमोचन करत असणार्‍या क्ष-किरणांच्या उलट ते ज्या ऊतींतून पार होतात त्यांना फारशी हानी पोहोचवत नाहीत आणि काही अंतर चालून गेल्यानंतर ते ऊर्जाविमोचन करत असतात. डॉक्टर ह्या गुणधर्माचा उपयोग करून घेऊन अर्बुदास अधिक ऊर्जा देतात आणि नजीकच्या सामान्य ऊतींना कमी हानी होऊ देतात.

आय.एम.आर.टी. प्रमाणेच ह्या पद्धतीतही, पाठीच्या कण्याच्या वा पुठ्ठ्याच्या हाडानजीक सारख्या, जागी असलेल्या व म्हणून उपचारास कठीण असलेल्या अर्बुदांवरही उपचार केले जाऊ शकतात. धनक तयार करण्यास लागणारे यंत्र महाग असते आणि सद्य स्थितीत अमेरिकेत तसली केवळ काही यंत्रेच अस्तित्वात आहेत.

प्रारणोपचार पद्धतीचे संभाव्य उप-प्रभाव

प्रारणोपचार पद्धतीच्या संभाव्य (विशेषतः वाढत्या वयातील मुलांतील) उप-प्रभावांमुळे, शल्यक्रिया शक्य असल्यास अनेकदा पसंत केली जाते. पण प्रारणोपचार पद्धतीच्या अंमलातील सुधारणांमुळे, युईंग्जअर्बुदे असलेल्या मुलांवर भूतकाळातल्या मानाने कमी मात्रेचे प्रारणोपचार करणे शक्य झालेले आहे. त्यामुळे ह्यांपैकी काही उप-प्रभाव कमी होण्यास मदत होत आहे.

प्रारणोपचार पद्धतीचे उप-प्रभाव प्रारणमात्रेवर आणि ते कुठे केंद्रित केले जातात ह्यावर अवलंबून असतात. काही प्रभाव अल्पकालीन असू शकतात, तर इतर दीर्घकालीन प्रभाव असू शकतात.

अल्पकालीन समस्यांत, प्रारण ग्रहण करणार्‍या भागातील त्वचेवर होणारे प्रभाव समाविष्ट असू शकतात, जे सौम्य त्वचा काळवंडण्या आणि केसगळतीपासून, तर अधिक गंभीर त्वचा प्रतिक्रियांपर्यंतच्या पल्ल्यातील कुठलेही असू शकतात. पुठ्ठ्यास मिळणार्‍या प्रारणामुळे मळमळणे, अतिसार आणि मूत्रासंबंधी समस्या उद्‌भवू शकतात.

दीर्घकालीन उप-प्रभाव अधिक गंभीर स्वरूपाचे असू शकतात. विशेषतः वाढत्या मुलांत. म्हणून डॉक्टर त्यांना शक्य तितके मर्यादित राखण्याचा प्रयत्न करत असतात.

मुलांतील प्रारणोपचार पद्धतीची एक गंभीर समस्या ही आहे, की त्यामुळे अस्थींच्या वाढीस अडथळा होऊ शकतो. प्रारणोपचारांनंतर लहान मुलांत काही अस्थी वाढत नाहीत. उदाहरणार्थ, एका पायातील अस्थीस प्रारणोपचार दिलेले असल्यास, तो दुसर्‍यापेक्षा आखूड राहू शकतो. चेहर्‍याच्या हाडांना दिलेले प्रारणोपचार असमान वाढ घडवू शकतात, ज्यामुळे मुलाचे ’दिसणं’ प्रभावित होऊ शकते. पण जर मुलाची पूर्ण वा बहुतांशी पूर्ण वाढ झालेली असेल तर, हा मुद्दा उपस्थित होण्याची संभावना कमी असते.

प्रारणाचा रोख (एम) कुठे आहे त्यावर अवलंबून, ते प्रारण इतर अवयवांसही हानी पोहोचवू शकत असते. छातीच्या भिंतींना किंवा फुफ्फुसास दिलेले प्रारण हृदयाचे कार्य प्रभावित करू शकत असते. पुठ्ठ्यास दिलेले प्रारण मूत्राशय किंवा आतड्यांस हानी पोहोचवू शकत असते. ते प्रजनन इंद्रियांनाही हानी पोहोचवू शकत असते, ज्यामुळे नंतरच्या आयुष्यात प्रजननक्षमता प्रभावित होऊ शकते. म्हणून डॉक्टर हे अवयव सुरक्षित राखण्यासाठी, त्यांना ढाल पुरवून किंवा शक्य असेल तिथे त्यांना प्रारणमार्गातून दूर करून, सर्वाधिक काळजी घेत असतात.

प्रारणोपचार पद्धतीच्या मज्जारज्जू वा मेंदूस होणार्‍या उप-प्रभावांत मज्जातंतूहानी, डोकेदुखी आणि विचार करण्यात येणार्‍या अडचणींचा समावेश होत असतो ज्या, उपचारांनंतर १ वा २ वर्षांनी सर्वात गंभीर स्वरूप धारण करतात. सुदैवाने, युईंग्ज अर्बुदे क्वचितच मेंदूत प्रसृत होत असतात, मात्र काही वेळेस, ती जवळपासच्या कवटीच्या अस्थींतून मेंदूपर्यंत विस्तारतात.

प्रारणोपचार पद्धतीसोबत आणखी एक प्रमुख चिंता असते ती म्हणजे, प्रारणोपचार दिल्या गेलेल्या शरीराच्या भागात नवा कर्क निर्माण होण्याची. हा बहुधा निराळ्या प्रकारचा अस्थीकर्क असतो ज्याला ऑस्टिओ-सार्कोमा म्हणून ओळखले जाते. जितकी प्रारणमात्रा जास्त तितकी हा कर्क होण्याची शक्यता जास्त. उपचारांची आवश्यकता असलेल्या मुलांना ह्या छोट्याशा धोक्यापायी उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागू नये. तरीही, तुमच्या मुलाच्या डॉक्टरांकडील पाठपुरावाभेटी चालूच ठेवणे महत्त्वाचे असते, ज्यामुळे समस्या उद्‍भवल्या असतील तर त्या दिसून येतात आणि लवकरात लवकर त्यांचा इलाज केला जातो.

युईंग्ज अर्बुदांकरता उच्च-मात्रा रसायनोपचार आणि मूलपेशी प्रत्यारोपण

युईंग्ज अर्बुदे असलेल्या अशा रुग्णांकरता, हे उपचार अभ्यासले जात आहेत, ज्यांना इतर उपचार देणे शक्य नसते. उदाहरणार्थ प्रसृत रोगाचे रुग्ण वा प्रमाणित उपचारांनंतर ज्यांना पुन्हा पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो असे रुग्ण. ह्यात खूप उच्च मात्रेतील रसायनोपचार दिले जात असतात, व त्यानंतर उपचारांनी मारल्या गेलेल्या, शरीरातील अस्थीमज्जा-पेशी बदलविल्या जात असतात. जेव्हा ही पद्धत वापरण्यात येते तेव्हा, रुग्णास प्रथम प्रमाणीत रसायनोपचार दिले जातात, आणि नंतर उच्च-मात्रा-रसायनोपचार व त्यानंतर त्यांचेवर मूलपेशी प्रत्यारोपण केले जात असते.

भूतकाळात अशा उपचारांना सामान्यपणे अस्थीमज्जा-प्रत्यारोपण म्हणून संदर्भिले जाई. अस्थीमज्जा म्हणजे काही अस्थींच्या आतील मऊ भाग जिथे नवीन लाल, पांढर्‍या रक्तपेशींची आणि बिंबाणूंची निर्मिती होत असते. लाल-रक्तपेशी शरीराच्या सर्व भागांत प्राणवायू वाहून नेतात. पांढर्‍या-रक्तपेशी शरीरास, संसर्गाचा सामना करण्यास मदत करतात. बिंबाणूंची, रक्त साखळून रक्तस्त्राव थांबवण्याकरता आवश्यकता असते.

रसायनौषधींच्या सामान्य मात्रा, अस्थीमज्जापेशीप्रमाणे जलदीने विभाजित होणार्‍या पेशींना प्रभावित करत असतात. जरी ह्या रसायनौषधींच्या उच्चतर मात्रा अर्बुदाच्या उपचारार्थ अधिक प्रभावी ठरत असल्या तरी, त्या दिल्या जाऊ शकत नाहीत कारण त्या अस्थीमज्जेस गंभीररीत्या हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे रक्तपेशींची प्राणघातक कमतरता निर्माण होऊ शकत असते.

ह्या समस्येचे समाधान शोधण्याकरता, डॉक्टर मुलास उच्च-मात्रा रसायनोपचार देतात आणि नंतर अस्थीमज्जेस ’मुक्त’ करण्यासाठी, परिघीय रक्त-मूल-पेशी प्रत्यारोपण करतात.

परिघीय रक्त-मूल-पेशी प्रत्यारोपणात काय होत असते

अशा प्रत्यारोपणात पहिली पायरी, मुलातील स्वतःच्या मूल-रक्त-पेशी गोळा करून नंतर वापराकरता त्यांचे उत्पादन करणे ही असते. ह्या पेशी निरनिराळ्या प्रकारच्या रक्तपेशींची निर्मिती करत असतात. अशा प्रकारचे प्रत्यारोपण, ज्यात (दुसर्‍या व्यक्तीपासूनच्या घेण्याऐवजी) रुग्णाच्याच  मूलपेशी काढून घेऊन वापरल्या जातात त्यास, स्वतनूगत-प्रत्यारोपण (ऑटोलॉगस ट्रान्सप्लँट) म्हटले जाते.

भूतकाळात मुलांच्या अस्थीमज्जेतून मूलपेशी अनेकदा काढून घेतल्या जात असत, ज्याकरता किरकोळ शल्यक्रियेची आवश्यकता भासत असे. मात्र डॉक्टरांना असे आढळून आलेले आहे की अशा पेशी रक्तप्रवाहातूनही घटक-वगळ पद्धतीने काढून घेता येऊ शकतात. हे रक्तदानासारखेच असते, मात्र रक्त गोळा करणार्‍या पिशवीत रक्त जाण्याऐवजी ते, एका यंत्रात जाते, जे त्यातून मूलपेशी गाळून घेते आणि उर्वरित रक्त परत रुग्णाच्या शरीरात पाठवले जाते. मूलपेशी मग प्रत्यारोपण करेपर्यंत गोठवल्या जातात. असे एकाहून अधिक वेळा करण्याची आवश्यकता भासू शकते.

एकदा का मूलपेशी साठवल्या, की मग मुलास उच्च-मात्रा-रसायनोपचार दिले जातात, काही वेळेस प्रारणोपचारांसोबतच ते दिले जात असतात. उपचार संपताच, रुग्णाच्या मूलपेशी पुन्हा उबदार करून सामान्यतः रक्त काढून घेतात तशाच पद्धतीने शरीरात शिरवल्या जातात. मूलपेशी रक्तप्रवाहातून प्रवास करतात आणि अस्थीमज्जेत स्थिरावतात. त्यानंतरच्या ३ ते ४ सप्ताहांपर्यंत त्या नवीन, आरोग्यपूर्ण रक्तपेशी निर्माण करू लागतात.

हे होईपर्यंत पांढर्‍या पेशी कमी असत असल्याने, मुलास संसर्गाचा धोका असतो आणि बिंबाणू कमी असत असल्याने रक्तस्त्रावाचाही धोका असतो. संसर्ग टाळण्याकरता, शुश्रुषालयातील हवेकरता विशेष गाळण्यांसारखे आणि भेटी देणार्‍यांस संरक्षक कपडे परिधान करावयास देण्यासारखे, सुरक्षिततेचे उपाय योजिले जातात. रक्त आणि बिंबाणूंचा पुनर्प्रवेश आणि शिरेतून प्रतिजैविक औषधांद्वारे उपचार यांचा वापरही, संसर्ग व रक्तस्त्रावाच्या समस्या टाळणासाठी किंवा उपचारार्थ केला जाऊ शकतो.

व्यावहारिक मुद्दे

मूलपेशी-प्रत्यारोपण हे क्लिष्ट उपचार आहेत, ज्यांचे प्राणघातक उपप्रभाव होऊ शकतात. जर डॉक्टरांना तुमच्या मुलास त्यांचा उपयोग होईल असे वाटत असेल तर, राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त असलेले कर्ककेंद्रच त्याकरता सर्वोत्तम जागा ठरेल, जिथे कर्मचार्‍यांना अशा प्रक्रियांचा अनुभव असतो आणि बरे होण्याच्या काळाचे व्यवस्थापन ते योग्य प्रकारे करू शकतात.

मूलपेशी-प्रत्यारोपणास दीर्घकाळ शुश्रुषालयात राहणे आवश्यक ठरू शकते आणि ते खर्चिकही ठरू शकते (अनेकदा ते लक्ष डॉलर्सहूनही अधिक खर्चाचे ठरत असते). ही प्रक्रिया तुमच्या मुलास संस्तुत करण्यात आल्यास, ती इतकी महाग असल्याने, तुमच्या विमादात्याकडून उपचारांपूर्वी त्यांकरता लिखित स्वरूपात संमती घ्यावी. जरी प्रत्यारोपण तुमच्या विमादात्याकडून छत्रप्राप्त असेल तरीही, तुम्हाला सोबतच करावे लागणारे व इतर खर्च सहजच हजारो डॉलर्स इतके होऊ शकतात. तुमचा विमादाता कशाकशाकरता छत्र पुरवेल, आणि कायकाय खर्च तुम्हाला स्वतःच सोसावा लागेल, हे आधीच शोधून काढणे महत्त्वाचे ठरते.

संभाव्य उपप्रभाव

सुरूवातीच्या संभाव्य गुंतागुंती आणि उप-प्रभाव मूलतः कुठल्याही उच्च-मात्रा-रसायनोपचारामुळे होऊ शकतात तसेच असतात (ह्याकरता ह्या दस्ताचा “रसायनोपचार पद्धती” हा अनुभाग पाहा) आणि गंभीरही असू शकतात. ते अस्थीमज्जेस आणि इतर जलदीने विभाजित होणार्‍या शरीरातील ऊतींना पोहोचलेल्या हानीमुळे घडून येत असतात. त्यांत खालील गोष्टींचा समावेश होत असतो.
  • निम्न रक्त-पेशी-गणना (थकवा आणि संसर्ग व रक्तस्त्रावाच्या वाढत्या धोक्यासहित)
  • मळमळणे आणि वांत्या
  • भूक कमी लागणे
  • तोंड येणे
  • अतिसार
  • केसगळती

एक सर्वात सामान्य आणि गंभीर अल्पकालीन प्रभाव म्हणजे, संसर्गाचा वाढलेला धोका. हे टाळण्याकरता अनेकदा प्रतिजैविके दिली जात असतात. निम्न-लाल-रक्त-पेशी आणि बिंबाणू गणना यांसारख्या इतर उप-प्रभावांमुळे रक्त-घटक अंतरणांची अथवा इतर उपचारांची आवश्यकता पडू शकते.

काही गुंतागुंती आणि उप-प्रभाव दीर्घकाळ टिकून राहू शकतात किंवा उपचारांनंतर अनेक वर्षांपर्यंत व्यक्तही होत नाहीत. त्यांत खालील गोष्टींचा समावेश होत असतो.
  • फुफ्फुसास होणारी प्रारणहानी
  • अवटू ग्रंथी किंवा इतर अंतर्स्त्रावजनक ग्रंथींच्या समस्या
  • प्रजनन समस्या
  • अस्थीहानी किंवा अस्थीवर्धनाच्या समस्या
  • अनेक वर्षांनंतर दुसर्‍या कर्काचा विकास (ज्यात रक्तकर्काचाही समावेश असत असतो)

प्रत्यारोपणापूर्वी संभाव्य दीर्घकालीन प्रभाव जाणून घेण्याकरता, तुमच्या मुलाच्या डॉक्टरांशी बोला.

युईंग्ज अर्बुदांकरताच्या वैद्यकीय चाचण्या

तुम्हाला कर्क आहे असे सांगण्यात आल्यानंतर तुम्हाला खूप निर्णय घ्यावे लागले असणार. एक सर्वात महत्त्वाचा निर्णय हा की, कुठले उपचार सर्वोत्तम ठरतील. तुम्ही ह्या प्रकारच्या कर्कावर केल्या जाणार्‍या वैद्यकीय चाचण्यांबाबतही ऐकलेलेच असणार. किंवा तुमच्या आरोग्य-निगा-चमूतील कुणीतरी तुम्हाला वैद्यकीय चाचण्यांबाबत सांगितले असू शकेल.

वैद्यकीय चाचण्या म्हणजे त्याकरता स्वतःहून तयार असलेल्या रुग्णांवर केलेला काळजीपूर्वक नियंत्रित संशोधन अभ्यास. हे अभ्यास आशादायी, नवीन उपचार किंवा पद्धतींचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठीच हाती घेतले जात असतात.

वैद्यकीय चाचण्यांत सहभागी होण्याकरता काही आवश्यकता पूर्ण कराव्या लागत असतात. जर तुम्ही त्या पूर्ण करत असाल तर त्या चाचणीत सहभागी व्हायचे की नाही हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. वयस्कर मुले, जी अधिक जाणत असतात, तीही बहुधा वैद्यकीय चाचण्यांत सहभागी होण्याकरता सहमत असावी लागतात. हा निर्णय, पालकांचा निर्णय स्वीकारला जाण्यापूर्वीच घेतला जातो.

वैद्यकीय चाचण्या हा अद्ययावत स्वरूपाच्या तंत्राची कर्कनिगा प्राप्त करण्याचा एक उपाय आहे. डॉक्टरांना कर्कोपचाराच्या चांगल्या पद्धती जाणून घेण्याचाही केवळ तोच एक मार्ग आहे. तरीही अशा चाचण्या प्रत्येकाकरता योग्यच ठरतील असे नाही.

युईंग्ज अर्बुदांकरताच्या पूरक आणि पर्यायी उपचारपद्धती

तुम्ही कर्कोपचाराच्या किंवा लक्षणमुक्तीच्या, अशा उपायांबाबत ऐकाल, जे मुख्य (प्रमाणित) वैद्यकीय उपचारांहून निराळे असतील. मित्र आणि कुटुंबातील प्रत्येकच जणापासून तर महाजालावरील गट आणि संकेतस्थळेही उपाय सुचवू शकतील. अशा पद्धतींत जीवनसत्त्वे, वनौषधी, विशेष आहार किंवा अक्युपंक्चर, मालिश यांसारख्या इतर पद्धतींचा समावेश असू शकेल.

पूरक आणि पर्यायी उपचारपद्धती नेमक्या काय असतात

प्रत्येकच जण ह्या परिभाषा एकाच अर्थाने वापरत नाही आणि त्यांचा अर्थ अनेक निरनिराळ्या पद्धती असा होत असतो, म्हणून हे गोंधळाचे ठरू शकते. आपण पूरक उपचारांचा अर्थ, तुमच्या नियमित वैद्यकीय निगेसोबतच घेतले जाणारे उपचार असा करत आहोत. पर्यायी उपचार म्हणजे डॉक्टरांच्या वैद्यकीय उपचारांऐवजी घेतले जाणारे उपचार असा अर्थ आपण घेत आहोत.

पूरक उपचार पद्धतीः बव्हंशी पूरक उपचार पद्धती कर्क बरा होण्याकरता दिल्या जात नाहीत. मुख्यतः ते कर्करुग्णास बरे वाटावे म्हणूनच दिले जात असतात. नियमित उपचारांसोबत दिले जाणारे काही उपचार हे, तणावमुक्तीकरता दिले जाणारे कला-उपचार किंवा क्रीडा-उपचार असतात. दुःखमुक्तीकरता अक्युपंक्चरचे उपचार दिले जातात. मळमळ नाहीशी करण्याकरता पेपरमिंट चहा दिला जातो. काही पूरक उपचार उपयोगी ठरतात असे आढळून आलेले आहे. इतर उपाय अजून तपासले गेलेले नाहीत. काही उपाय उपयुक्त ठरत नाहीत असे सिद्ध झालेले आहे आणि काही तर हानीकारकही असतात असे आढळून आलेले आहे.

पर्यायी उपचार पद्धतीः  पर्यायी उपचार पद्धती कर्क बरा करणार्‍या म्हणूनही दिल्या जातात. अशा पद्धती, वैद्यकीय चाचण्यांत, सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झालेले नाही. ह्यांपैकी काही पद्धती धोकादायक ठरू शकतात किंवा त्यांचे उप-प्रभाव प्राणघातक ठरू शकतात. पण बव्हंशी प्रकरणातील सर्वात मोठा धोका हा असतो की रुग्ण, प्रमाणित उपचार प्राप्त करण्याची संधी गमावून बसतो. वैद्यकीय उपचारांतील विलंब वा अडथळे यांमुळे कर्कास वाढण्यास वेळ मिळतो आणि त्यामुळे उपचारांची मदत होण्याचा संभव कमी राहतो.


अधिक जाणून घेणे

कर्करुग्ण (किंवा कर्क असलेली मुले असलेले लोक) पर्यायी उपचारपद्धतींचा विचार का करतात ते सहजच समजून घेण्यासारखे आहे. तुम्हाला कर्काशी लढा देण्यासाठी शक्य आहे ते सर्व करायचे असते आणि कमी किंवा अजिबात उप-प्रभाव नसलेले उपचार घेण्याची कल्पना महान वाटत असते. काही वेळेस रसायनोपचारांसारखे वैद्यकीय उपचार स्वीकारण्यास अवघड असतात किंवा ते उपयोगी ठरत नाहीत. पण सत्य हेच असते की ह्या पर्यायी उपचारपद्धतींपैकी बव्हंशी उपचार तपासले गेलेले नाहीत आणि कर्कोपचारांकरता उपयुक्त सिद्धही झालेले नाहीत.

तुम्ही तुमचे पर्याय विचारात घेत असता खालील तीन पायर्‍यांचा अवलंब करू शकता.
  • “लाल बावटा” शोधत राहा, जो घोटाळा सुचवितो.
  • विचाराधीन उपचारपद्धत सर्व किंवा बव्हंशी कर्क बरा करण्याची आशा दाखविते काय? तुम्हाला नियमित वैद्यकीय उपचार बंद करण्यास सांगण्यात आलेले आहे काय? विचाराधीन उपचारपद्धत “गुप्त” आहे काय, जिच्यात तुम्हाला तुमच्या मुलास, विशिष्ट सेवापुरवठादारांकडे किंवा दुसर्‍या देशात घेऊन जावे लागणार आहे काय?
  • विचाराधीन उपचारपद्धतीबाबत तुमच्या डॉक्टरांशी किंवा परिचारकाशी बोला.

निवड तुमचीच असते

तुमच्या उपचारपद्धतीची निवड तुमचीच असते. जर तुम्हाला प्रमाणीत नसलेली उपचार-पद्धती अवलंबायची असेल तर त्या पद्धतीबद्दल शक्य त्या सर्व गोष्टी समजून घ्या आणि त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. चांगल्या माहितीसह आणि आरोग्य-निगा-चमूच्या आधाराने, धोकादायक असलेल्या उपचारपद्धती टाळून, उपयोगी ठरू शकेल अशी उपचारपद्धत तुम्ही सुरक्षितपणे वापरून घेऊ शकाल.

युईंग्ज अर्बुदांचे अवस्थांनुरूप उपचार

युईंग्ज अर्बुदांचे उपचार मुख्यतः निदानसमयी आढळून आलेल्या अर्बुदाच्या जागेवर आणि त्या वेळच्या त्याच्या विस्तारावर आधारलेले असतात.


स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे

आधीच उल्लेख केल्यानुसार स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे असलेल्या अनेक मुलांतही शरीराच्या इतर भागांत, चित्रक-चाचण्यांत दिसून येण्याचे दृष्टीने खूपच लहान प्रमाणात असलेला कर्क फैलावलेला असू शकतो. जर ह्या मुलांना रसायनोपचार मिळाले नाहीत तर, हा लहान प्रमाणात असलेला कर्क यथावकाश मोठ्या अर्बुदांत परिणत होऊ शकतो. म्हणूनच शरीराच्या सर्व भागांत पोहोचू शकणारे रसायनोपचार, हा स्थलसीमित युईंग्ज अर्बुदे असलेल्या मुलांत, उपचारांचा महत्त्वाचा भाग असतो.

युईंग्ज अर्बुदांचे निदान झाल्यानंतर, पहिले उपचार हे रसायनोपचार असतात. ते शल्यक्रिया किंवा प्रारणोपचार यांचे पूर्वीच दिले जात असल्याने त्यांना निओऍडजुव्हंट रसायनोपचार असे संबोधले जात असते. उपचार क्षेत्र (रेजिमेन) हे बहुधा व्ही.ए.सी./आय.ई. म्हणून ओळखले जाते. त्याच औषधांचे इतर संयोगही प्रभावी ठरत असले तरीही, ते उपचारक्षेत्र व्हिन्क्रिस्टाईन, डोक्सोरुबिसिन (ऍड्रिआमायसिन) व सायक्लोफॉस्फॉमाईड आणि पर्यायाने ईफॉस्फॉमाईड आणि एटोपोसाईड यांच्या संयोगाने (व्ही.ए.सी./आय.ई.) केलेल्या उपचारांचे असते.

किमान १२ सप्ताहांच्या रसायनोपचारांनंतर, अर्बुद, शल्यक्रिया करून काढून टाकण्याचे दृष्टीने संकोचत आहे की नाही हे पाहण्याकरता; संगणित-त्रिमिती-चित्रण, चुंबकीय-अनुनादी-चित्रण, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमिती-चित्रण किंवा अस्थी-चित्रांकन अशा प्रकारच्या चाचण्या केल्या जात असतात.

जर तसे असेल तर, ह्या अवस्थेत शल्यक्रिया केली जाते. शल्यक्रियेच्या स्थळाच्या कडांवरील नमुन्यात जर कर्क आढळून आला तर (म्हणजे कर्कपेशी शिल्लक राहून गेल्या असण्याची शक्यता असल्यास), प्रारणोपचार आणि रसायनोपचार (अनेक महिन्यांकरता) उपयोगात आणले जातात. जर शल्यक्रियेच्या स्थळाच्या कडांवरील नमुन्यात कर्क आढळून आला नाही तर, प्रारणोपचार न करताही रसायनोपचार दिले जाऊ शकतात.

जर अर्बुद वाढत नसेल, पण सुरूवातीच्या रसायनोपचारांनंतर शल्यक्रियेचा पर्याय उपलब्ध नसेल तर, बहुधा त्यानंतर (रसायनोपचारांसहित) प्रारणोपचार दिले जातात. काही प्रकरणांत ह्यामुळे अर्बुद पुरेसे संकोचते आणि शल्यक्रिया केली जाऊ शकते. त्यानंतर मग प्रारणोपचार आणि रसायनोपचार दिले जातात. शल्यक्रियेचा पर्याय उपलब्ध नसेल अशा इतर प्रकरणांत, प्रारणोपचार आणि रसायनोपचार हेच मुख्य उपचारांचा भाग असतात.

जर युईंग्ज अर्बुद सुरूवातीच्या रसायनोपचारांनंतरही वाढतच राहिले तर, एका दुसर्‍या प्रकारचे (निराळी औषधे वापरून दिलेले) रसायनोपचार वापरून पाहिले जातात. अर्बुद नियंत्रणात ठेवण्याकरता, शल्यक्रिया किंवा प्रारणोपचार यांचाही उपयोग करून पाहिला जात असतो. त्यानंतर आणखीन रसायनोपचार दिले जातात.

प्रसृत युईंग्ज अर्बुदे

प्रथम-निदान-समयीच प्रसृत अवस्थेतील रोग असलेल्या रुग्णांवर उपचार करणे, स्थलसीमित रोग असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा कठीण असते. कर्कप्रसार इतर अस्थींत किंवा अस्थीमज्जेत झालेला असतो त्यापेक्षा तो केवळ फुफ्फुसांपर्यंत सीमित असेल तर, रोगनिदान चांगले होऊ शकते.

प्रसृत अवस्थेतील रोगावरील उपचार अनेक बाबतीत स्थलसीमित रोगांवरील उपचारांसारखेच असतात, मात्र ते अधिक प्रखर असू शकतात. पहिले उपचार रसायनोपचारच असतात. अनेकदा स्थलसीमित रोगांवरील उपचारांसारखेच पण त्याच उपचारक्षेत्रात प्रखर रसायनोपचार देऊन केले जातात. काही महिन्यांनंतर, कर्क उपचारांना कसा प्रतिसाद देत आहे ते समजण्यासाठी; संगणित-त्रिमिती-चित्रण, चुंबकीय-अनुनादी-चित्रण, धन-विजक-उत्सर्जक-त्रिमिती-चित्रण किंवा अस्थी-चित्रांकन अशा प्रकारच्या चाचण्या व अर्बुद-नमुना-निष्कर्षण-शल्यक्रियाही केल्या जात असतात.

जर कर्क केवळ लहान भागांवरच पसरला असेल तर, प्रमुख (प्राथमिक) अर्बुद आणि सर्व ज्ञात प्रसारक्षेत्रे ह्याच वेळी शल्यक्रियेने काढून टाकली जातात. शल्यक्रिया व प्रारणोपचार किंवा केवळ प्रारणोपचारांसारखे इतर पर्याय; फुफ्फुसासहित सर्व प्रकारच्या प्रसार-स्थळांवर वापरून पाहिले जाऊ शकतात. ह्या उपचारांदरम्यान आणि नंतरही अनेक महिन्यांपर्यंत रसायनोपचारही दिले जात असतातच.

अनेक कर्ककेंद्रांवरील डॉक्टर हल्ली, अशा रुग्णांवरील उपचारांच्या प्रभावांत सुधारणा घडवून आणण्याकरता, खूप तीव्र रसायनोपचार देऊन मग मूल-पेशी-प्रत्यारोपणाचा प्रयत्न अभ्यासत आहेत.

अशी अर्बुदे उपचारांकरता अवघड असल्याने, अनेक प्रकरणांत, नवीन उपचारांच्या वैद्यकीय चाचण्या, हा एक चांगला पर्याय असू शकतो.

उपचारांनंतर पुन्हा परतून येणारी युईंग्ज अर्बुदे

युईंग्ज अर्बुदे उपचारांनंतर पुन्हा परतून येण्याची संभावना, भूतकाळातल्यापेक्षा हल्ली कमी असते. पण असे घडू शकते. असे घडून आल्यास, उपचार अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्यात खालील घटकांचा समावेश होत असतो.
  • अर्बुदाचे स्थान आणि आकार
  • अर्बुद शरीराच्या इतर भागांत प्रसृत झालेले आहे की नाही
  • पूर्वी कोणत्या प्रकारचे उपचार दिलेले होते
  • उपचारांनंतर किती काळ लोटला आहे

रसायनोपचार, शल्यक्रिया, प्रारणोपचार किंवा यांचा कुठला संयोग, पुनरावर्ती अर्बुदांच्या उपचारार्थ वापरला जाऊ शकतो, ते परिस्थितीवर अवलंबून असते. डॉक्टर, उच्च-मात्रा रसायनोपचार व त्यानंतर मूल-पेशी-प्रत्यारोपण आणि एकव्यक्ती-प्रतिपिंडे (मोनोक्लोनल-अँटिबॉडीज) म्हणवली जाणारी लक्ष्यवेधी (टार्गेटेड) औषधे, यांचा अभ्यास करत आहेत, पण हे अजूनही स्पष्ट झालेले नाही की असे उपचार कितपत उपयोगी ठरतात. अशी अर्बुदे अवघड ठरू शकतात, म्हणून नवीन उपचारांच्या वैद्यकीय चाचण्या चांगले पर्याय ठरू शकतात.


२ टिप्पण्या:

någon म्हणाले...

Why do you use प्रारण when Wikipedia has विकिरण, किरिणोपचार, etc.?

ऊर्जस्वल म्हणाले...

प्रतिसादाखातर धन्यवाद!

प्रारण हा अवकाशीय उत्सर्जनांचा सर्वसमावेशक प्रकार आहे. ह्यात सर्व कंप्रतेची ऊर्जा उत्सर्जने तसेच कणात्मक किरणांचाही समावेश होत असतो. जी किरणे आपण साधारणपणे जाणत असतो ती दृश्यमान प्रकारची असतात आणि त्यांचा उपयोग कर्कनिवारणार्थ केला जात नाही.

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.