२०१२-०४-१०

पद्यानुवादांचा रसास्वाद


पद्यानुवादांचा रसास्वाद-  प्रेषक नरेंद्र गोळे (मंगळ., ०८/०७/२००८ - ११:५०)
मनोगत डॉट कॉम ह्या संकेतस्थळाच्या चवथ्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेला हा लेख आहे. खाली तेथील काही प्रतिसादही समाविष्ट केलेले आहेत.

मूळ लेख आपल्याला पद्द्यानुवादांचा रसास्वाद ह्या दुव्यावर पाहता येईल.

१५ ऑगस्ट २००८. मनोगताचा चवथा वर्धापनदिन. त्यानिमित्त, मनोगतचे मालक, चालक, प्रशासक, लेखक, वाचक आणि सर्वच मनोगतींना हार्दिक शुभेच्छा! मी मनोगतावर येत असल्यापासून, बरेच पद्यानुवादात्मक लेखन केलेले आहे. त्या साऱ्या लेखनाचा आढावा घेत असतांना मला जाणवले की पद्यानुवादांप्रतीचा सगळ्यांचाच दृष्टीकोन फारसा उत्साहवर्धक नाही. तसा तो असावा असे मला वाटते. मग अडचण काय आहे? तर पद्यानुवादात कशाकशाचा आस्वाद घ्यायचा याची सामान्य वाचकास पुरेशी जाण नसते. तो आवडले तर आवडले म्हणतो. पण पद्यानुवाद आणखीही होत राहावेत ह्याबाबत आग्रही नसतो. ज्यांना ते आवडत नाहीत ते मात्र पद्यानुवाद होणे थांबेल कसे ह्याबाबत अत्यंत आग्रही दिसून येतात. असे का व्हावे? पद्यानुवाद लोकांना नको असतात का? याचा शोध मला वेगळ्याच तथ्यांप्रत घेऊन गेला. या वर्धापन दिनानिमित्त त्या शोधाचे फलीत आपणाप्रत पोहोचवावे अशी उमेद धरून हे लिहीत आहे. आपल्याला आवडावे हीच प्रार्थना.

पद्यानुवादांचा रसास्वाद

अनुवादात, इतर भाषांत अभिव्यक्त झालेल्या रचनांमधील आनंद कुणीतरी आपल्या मातृभाषेत आणून देऊ इच्छित असतो. सर्वसामान्य लोकांना अनुवादांतला आनंद घेण्याची उपजत इच्छा असतेच. गद्यापेक्षा, पद्य साहित्य जास्त रुचकर असते. कदाचित त्याच्या गेयतेमुळे असेल, पण बरेचदा ते संक्षिप्त, सारमय आणि अनुभूतीच्या यथातथ्य अभिव्यक्तीमुळे आस्वादकास पद्य आवडू लागते. एकदा का आवडले की मग निसर्गतःच ते दुसऱ्याला सांगण्याची प्रवृत्ती होते. ऐकणाऱ्याची भाषा वेगळी असली तरीही सांगणाऱ्याचा हुरूप कमी होत नाही. मग जे गद्यात समजवून सांगता येत नाही किंवा अपुरे वाटते, ते मग त्या भाषेत पद्यात सांगण्याचा प्रयास होऊ लागतो. आणि पद्य अनुवाद जन्माला येतो.

पद्यानुवाद कशाकरता आस्वाद्य असू शकतात?

एक यादीच करू या!

१.  इतर भाषेतल्या पद्याचे आकलन होण्याचा आनंद. म्हणजे अर्थानुवादातील आनंद.
२.  त्या मूळ पद्यातील भाव-भावनांशी सहानुभूत होण्यातला आनंद. म्हणजे भावानुवादातील आनंद.
३.  त्या मूळ भाषेतल्या शब्दांच्या पदलालित्याच्या व शब्दरचनेच्या आस्वादातील आनंद.
४.  त्या मूळ पद्यातील नाद, लय, सूर, ताल इत्यादी. म्हणजे सांगितिक आकलनातील आनंद.
५.  त्या मूळ पद्यातील गेयता अनुवादाच्या भाषेत आणता आली तर तो अनुवाद गाण्यातील आनंद.

पद्यानुवाद कायमच विवादास्पद राहण्याचे एक कारण म्हणजे गेयतेतील आनंद त्यात शोधू पाहणाऱ्यांच्या पदरी पडणारी निराशा हेच आहे. अनुवादकर्ता अनुक्रमे अर्थ, भाव, पदलालित्य, सांगितिक अभिव्यक्ती आणि गेयता साधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पातळीवर त्याला कमी अधिक प्रमाणात ते साधते. अनुवादकाच्या मगदुराप्रमाणे, मूळ गीताच्या दर्जाप्रमाणे आणि अनुवादकाने साधलेल्या मूळ गीताप्रतीच्या तन्मयतेनुरूप अनुवाद वरील पाच पातळ्यांवर साधला जातो. तेव्हा हे उघडच आहे की सर्वोच्च पातळीवरील गेयता सर्वात अधिक क्षतिग्रस्त ठरते. आस्वादक जर तिथेच आनंद शोधू लागला तर पद्यानुवाद आस्वाद्य होत नाही. "मग साहिर लुधियानवीच्या ताजमहालाला आपली वीट जोडू नका" अशा स्वरूपाचे आक्रमक प्रतिसाद मिळू लागतात. त्यातून अनुवादकाच्या क्षमतेवर जी टिप्पणी होत असते तिची दखल तो घेतोच. पण अशा प्रतिसादातून आस्वादकाची उत्तम सांगितिक जाण व्यक्त होते. किंबहुना असे प्रतिसाद उत्तम सांगितिक जाण असणाऱ्यांकडूनच मिळत आलेले आहेत.

इथे याचा विचार करण्यासारखा आहे की जेवढे मूळ गीत अधिक लोकप्रिय, तेवढेच त्याचे रचयिते जास्त गुणाढ्य असतात. उत्तम शब्दरचना, अनुपम संगीत आणि अलौकिक गायन यांनी अलंकृत मूळ गीताचा पद्यानुवाद एक साधा अनुवादक करतो; तेव्हा तो प्रथम कवी, मग संगीतकार आणि नंतर गायकही बनण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यांना पद्यानुवाद करण्याची इच्छा असते ते बहुधा लेखक/कवी/गीतरचना अशा क्षेत्रात उमेदवारी करणारे लोक असतात. संगीत आणि गायन यांतील त्यांचे नैपुण्य यथातथाच असते. म्हणून पद्यानुवाद सामान्यतः पहिल्या तीन पायऱ्यांवर सर्वात अधिक आस्वाद्य असतात. नंतरच्या पायऱ्यांवरील यश केवळ बोनस. बहुधा ते मिळतच नाही. अपवाद वृत्तबद्ध, छंदबद्ध काव्याचा.

मूलभूत प्रेरणाः अभिव्यक्तीतील आनंद

"आई, आई पाहा जरा, गंमत नामी किती अहा!
चांदोबा खाली आला, हौदामध्ये बघ बुडला
कसा उतरला किंवा पडला, की धडपडला,
कशास उलटे चालावे, पाय नभाला लावावे? "

ह्या ओळींमध्ये काहीतरी प्रकर्षाने सांगायचे आहे. दाखवायचे आहे. कुणितरी निकटच्या माणसाने आपल्या अनुभवाशी सहमत व्हावे, सहानुभूत व्हावे ह्याची तीव्र इच्छा आहे. का? तर सहानुभूत लोकांच्या आनंदातील सहभागाने, आपलाच आनंद द्विगुणित होतो म्हणून. अगदी तशीच आदिम प्रेरणा, इतर भाषेतील पद्यांत आपल्याला आढळलेला आनंद, स्वभाषेतील सुहृदांस सादर करणाऱ्या पद्यानुवादकास असते.

अर्थानुवाद

खरे तर मूळ पद्याचा गद्य अनुवाद आणि मग अनुवादित गद्याची पद्य रचना अशा दोन पायऱ्यांनी नवे पद्यानुवाद तयार होत असतात. बाजारात अनेक सार्थ गीता मिळतात. त्या म्हणजे अर्थानुवाद. याच पहिल्या पायरीवर सार सांगून झालेले असते. अर्थानुवाद गद्य असू शकतो.

पद्यानुवाद

मग दुसऱ्या पायरीचा सोस का? तर सार म्हणजेच सर्वस्व नव्हे. त्यासोबतचे रचनासौंदर्य, गेयता इत्यादी अनेक सुसंगतींची आस्वाद्यताही अनुवादकाला वाचकास/श्रोत्यास/दर्शकास लक्षात आणून द्यायची असते. त्या अनुभूतीतला आनंद मिळवून द्यायचा असतो. ते साधते कितपत, हे अनुवादकाच्या सामर्थ्यावर अवलंबून असते. अत्यंत समर्थ अनुवादकांनाही खरे तर शंभर टक्के साधत नाहीच. सर्वसामान्य अनुवादकास ते साधावे कसे? आणि मग नसेल साधणार तर त्याने तसा प्रयत्न उगाचच का करावा? आता मला सागरमाथा (एव्हरेस्ट) चढता येत नाही म्हणून मी तो चढण्याचे स्वप्नच पाहू नये का? अशासारखाच हा प्रश्न आहे. उत्तरही तसे सोपेच आहे. हर एकाने अवश्य प्रयत्न करावा. त्याला कितपत साधला ते लोक सांगतीलच. मात्र, जितपत साधेल तितपत तो दुसऱ्यास काहीतरी आनंद मिळवून देऊ शकणार आहे. हे नक्कीच साधणार आहे.

आता प्रश्न हा आहे की कुठला आनंद? विनोबा भाव्यांनी गीता वाचली. आत्मसात केली. तिच्यावर प्रवचने दिली. मात्र गीता जीवनाचे तत्त्वज्ञान कसे व्यवस्थित समजवून सांगते हे त्यांना त्यांच्या आईलाच सांगायची पाळी जेव्हा आली, तेव्हा त्यांना समश्लोकी पद्य रचनाच जास्त समर्पक वाटली. विनोबा आईला गीता प्रवचनही देऊ शकले असते. आणि मराठीतून सांगितलेले ते तत्त्वज्ञान आईला समजलेही असते. ते समजून तिला जे कळायचे ते कळलेही असते आणि व्हायचा तो यथोचित आनंदही झाला असता. पण गीतेत केवळ प्रतिपाद्य विषयच नाही तर रचना सौंदर्य आहे. गेयता आहे. शब्दांचा नेमकेपणा आहे. शब्दांचा मोजकेपणा आहे. नाद आहे. आणि लयही आहे. ह्या साऱ्यांचा आस्वाद जसा मला संस्कृतातून गीता वाचतांना घेता आला तसा आस्वाद आईला घेताच येणार नाही का? हा सल विनोबांना पद्य रचनेसाठी प्रवृत्त करण्यास कारण ठरला असावा. त्यांना ते साधलेही मोठ्या प्रमाणात आहे व म्हणून ते आईला समाधानही अपार देऊ शकले आहेत.

स्वैर पद्यानुवादः भावार्थदीपिका, अर्थात ज्ञानेश्वरी (टीका, टिप्पणी, भावार्थदर्शन, भाष्य, समीक्षा)

ज्ञानेश्वरीचा उद्देश गीतेचा भावार्थ विशद करणे हा आहे. नावातच तसे सांगितले आहे. एक प्रश्न असाही आहे की भाष्याला अनुवाद समजावे का? भाष्य जर मूळ काव्याच्याच भाषेत असेल तर समजण्याची गरजच नाही. मात्र मूळ काव्याच्या भाषेव्यतिरिक्त भाषेत केलेल्या भाष्यासही अनुवादच म्हणायला हवे.

त्यासाठी पद्याचाच आकृतीबंध ज्ञानेश्वरांनी अवलंबला आहे. मूळ काव्यातील प्रासादिकता वाचकांप्रत पावती करावी हाच त्यापाठीचा उद्देश दिसतो. मात्र विनोबांप्रमाणे समश्लोकी आकृतीबंध निवडलेला नाही. अनुष्टुभ छंदात पुरेसे स्वातंत्र्य मिळत नसल्याने असेल किंवा ओवीच्या आकृतीबंधावर हुकुमी अधिकार सिद्ध झालेला असल्याने असेल ज्ञानेश्वरांनी ओवी हा प्रकार अभिव्यक्तीसाठी निवडला. शेवटलाच पर्याय जास्त समर्पक वाटतो. जे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत होते त्याचाही त्यांनी प्रच्छन्न वापर केला आहेच. एक एका श्लोकासाठी अनेक ओव्यांचा समुह लिहून अर्थ विशद केला. तत्कालीन मराठीच्या वाचकांना तो अपार भावला. मान्यता पावला. ह्यासाठीच ह्या अनुवादाचे वर्गीकरण करायचे तर ते स्वैर पद्यानुवाद म्हणूनच करावे लागेल.

उदाहरणार्थ पाहाः गीतेतील पहिल्या श्लोकापूर्वीच ज्ञानेश्वरीत ८४ ओव्या प्रस्तावनेत खर्ची पडल्या असून, गीतेतील पहिल्या श्लोकाच्या अर्थाकरता तीन ओव्या वेचल्या आहेत.

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किममुर्वत संजय ॥ १ ॥

तरी पुत्रस्नेहे मोहितू । धृतराष्ट्र असे पुसतू ॥ म्हणे संजया सांगे मातू । कुरुक्षेत्रींची ॥ ८५॥
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । झुंजाचेनी ॥ ८६॥
तरी तिहीं येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं । तें झडकरी कथन करी । मजप्रती ॥ ८७॥

विकिपेडीयावर ज्ञानेश्वरीबाबत पुढील माहीती दिलेली आहे. "ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात लिहीला. शके १२१२ (इ. स. १२९०) मध्ये प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्दीष्टाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरीत झाली असून त्याचे मुद्रित ग्रंथ उपलब्ध आहेत."

इथे आणखीही एक मुद्दा पद्यानुवादांच्या रसग्रहणाखातर उघड झाला आहे. जर अनुवादित काव्याचा विषयभागच केवळ महत्त्वाचा असता तर गीतेचा मराठी अनुवाद ज्ञानेश्वरीत केल्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरीचा अनुवाद संस्कृतात करण्याची गरज न भासती. आता संस्कृतातला ज्ञानेश्वरीचा अनुवाद पद्यानुवाद आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. मात्र तो तसा असल्यासही नवल वाटणार नाही. कारण पद्यानुवाद करण्यामागची मूळ प्रेरणा आपल्याला झालेल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेण्याचीच आहे.

सैल पद्यानुवाद

एका कडव्याखातर अनेक कडवी, प्रसंगी भिन्न वृत्तात, छंदात, तालात रचून पद्यात अनुवाद लिहीला तर त्यास सैल पद्यानुवाद म्हणावा लागेल. ज्ञानेश्वरीलाही सैल पद्यानुवाद म्हणता आले असते, पण त्यात भाष्य समाविष्ट असल्याने ते स्वैर म्हणावे लागेल. मेघदूत या कालीदासाच्या मूळ संस्कृत महाकाव्याचा कुसुमाग्रजांनी केलेला मराठी अनुवाद अन्य वृतात केलेला आहे. श्री. चिंतामण द्वारकानाथ देशमुख (आपल्या भारत देशाचे पहिले अर्थमंत्री. हेच पाकिस्तानचेही पहिले अर्थमंत्री होते. ) यांनी केलेला मेघदूताचा मराठी अनुवाद मात्र मूळ संस्कृत महाकाव्याप्रमाणेच मंदाक्रांता वृत्तातच लिहीलेला असून सुरस वठला आहे. त्याला  सैल पद्यानुवाद म्हणता येणार नाही.

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी ।
नीत्वा मासांकनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः॥
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥२॥ पूर्वमेघ - कालीदासाचे मूळ संस्कृत काव्य

प्रेमी कांता-विरही अचली घालवी मास काही ।
गेले खाली सरूनी वलय स्वर्ण हस्ती न राही॥
आषाढाच्या प्रथम दिनी तो मेघ शैलाग्री पाहे ।
दंताघाते तटी गज कुणी भव्यसा खेळताहे ॥२॥ पूर्वमेघ - देशमुखांचा समवृत्ती संस्कृतप्रचुर मराठी अनुवाद
(देशमुख संस्कृतचे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीधारकच होते. )

कृश हातांतून गळून पडले सोन्याचे कंकण ।
कामातुर हो हृदय, कामिनी दूर राहिली पण! ॥
आषाढाच्या प्रथम दिनी त्या दिसे पर्वतावरी ।
नयनरम्य घन, करी कड्यांवर गज वा क्रीडांगण! ॥२॥ पूर्वमेघ - कुसुमाग्रजांचा भिन्नवृत्ती मराठी अनुवाद
(चालः औदुंबर)

सम मंथ्स वेअर गॉन, द लोनली लव्हर्स पेन ।
हॅड लूज्ड हिज गोल्डन ब्रेसलेट डे बाय डे ॥
अर ही बिहेल्ड द हरबिंजर ऑफ रेन ।
अ क्लाऊड दॅट चार्ज्ड द पीक इन मिमिक फ्रे ॥
ऍज ऍन एलिफंट ऍटॅक्स अ बँक ऑफ अर्थ इन प्ले ॥२॥ पूर्वमेघ - देखमुखांचा समकालीन इंग्रजी अनुवाद

देखमुखांची समकालीन इंग्रजीवरही चांगलीच पकड होती. त्यांनी मूळ संस्कृत मेघदूताचा सरस इंग्रजी अनुवादही केला आहे. तो मात्र समवृत्त तर नाहीच, शिवाय प्रत्येक चार ओळींचे मूळ कडवे इंग्रजी अनुवादात पाच ओळींचे लिहीले आहे. म्हणून इंग्रजीतील हा अनुवाद निस्संशयपणे सैल पद्य अनुवादाचे उदाहण म्हणून सांगता येईल.

भिन्नवृत्ती पद्यानुवाद

आता वर दिलेल्या कुसुमाग्रजांच्या पद्यानुवादाकडे जर बारकाईने पाहिले, तर तो कुठल्याच अंगांनी सैल वाटणारा नाही. यथातथ्य आणि सुरस आहे. पण भिन्नवृत्ती आहे. ज्या वृत्तात तो लिहीला आहे त्या वृत्तात सुरेख बसला आहे. तरीही गाण्याच्या अंगाने आस्वाद घेणाऱ्यांना, मुळात मंदाक्रांता वृत्तात लिहीलेला मजकूर, इतर वृत्तात तेवढाच गेय राहत नाही किंवा तेवढाच आनंददायी राहत नाही. म्हणून तो कमी लोकप्रिय होतो. कुसुमाग्रजांचा मेघदूताचा अनुवादही, ह्या कारणानेच मला देशमुखांच्या अनुवादापेक्षा कधीच सरस वाटला नाही, जरी कित्येकदा देशमुखांचा अनुवाद अगदीच संस्कृतमय झालेला आहे तरी.

भिन्नवृत्ती अनुवाद करण्यात मनोगती व्यक्तीरेखा "टवाळ" यांचा हातखंडा आहे. हिंदीतील अत्यंत लोकप्रिय गीताचा; समर्थ, पण भिन्नवृत्ती पद्यानुवाद त्यांनी केला. संगीताच्या अंगाने पाहणाऱ्यांकरता, तो काही पूर्ववत रंजक राहिला नसावा. मात्र त्याच गीताचा "माफीचा साक्षीदार" यांनी व मी केलेला समवृत्ती अनुवाद, सरस नसला तरी केवळ समवृत्त असल्याने सहज स्वीकारार्ह झाला आहे.

यूँ तो हमने लाख हंसीं देखे हैं ।
तुमसा नहीं देखा, हो, तुमसा नहीं देखा ॥धृ॥  मूळ हिंदी लोकप्रिय गीत

सुंदर तरुणी फार बघितल्या होत्या।
पण असल्या नव्हत्या ॥धृ॥ - माफीचा साक्षीदार यांनी केलेला समवृत्ती अनुवाद

मी तर असल्या लाख पऱ्या पाहील्या।
तुजपरी न पाहीली ॥धृ॥ - मी केलेला समवृत्ती अनुवाद

पाहील्या आहेत लाखो, आजवर मी सुंदरी ।
पाहीली ना तुज परी ॥धृ॥ - टवाळ यांनी केलेला भिन्नवृत्ती अनुवाद

चालः कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, थांबला तो संपला

त्यांनी लिहीला त्या चालीत अनुवाद अगदी चपखल बसला आहे. सुरेख गाताही येतो आहे. मात्र नव्या चालीत. मूळ गाण्याच्या लोकप्रियतेमुळे अशा सरस अनुवादाची स्वीकारार्हता अकारणच कमी होते. असेच आणखीही एक उदाहरण देता येईल.

न मुँह छुपा के जियो, और न सर झुका के जियो ।
गमों का दौर भी आये, तो मुस्कुरा के जियो ॥ धृ ॥ - मूळ हिंदी लोकप्रिय गीत

न तोंड लपवून जगा, आणि न मान ही झुकू द्या ।
की दुःख कोसळो कितीही, तुम्ही हसून जगा ॥ धृ ॥ - मी केलेला समवृत्ती अनुवाद

घाबरूनी तू मुखाला, लपविणे नाही बरे ।
लाजुनी तू मस्तकाला, झुकविणे नाही बरे ॥
काळ हा आला समोरी, दुःख घेऊनी जरी ।
जीवनीच्या या सुखांना, हरवणे नाही बरे  ॥ धृ ॥ - "मी राधिका" यांनी केलेला भिन्नवृत्ती अनुवाद

चालः कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला, थांबला तो संपला

भावानुवाद

वृत्त सुटले तरी चालेल पण भाव घट्ट धरून ठेवायचा ह्या वृत्तीने अनुवाद केल्यास भावानुवाद होतो. वरील "मी राधिका" यांचाच अनुवाद ह्याचे एक सुरेख उदाहरण आहे. भावानुवादकांना स्वतःस अपरिमित आनंद मिळतोच. मात्र इतरांना तो तेवढा उत्कट वाटत नाही. कारण त्या आनंदाचे मूळ, मूळ गीताच्या लोकप्रिय झालेल्या चालीत असते. भावानुवादात सापडलेला आनंद, मूळ गाणे गातांना होणाऱ्या आनंदाशी तुलनीय राहत नाही.

शब्दशः अनुवाद


प्रथमतः अनुवाद हे व्हायलाच हवेत. इतर भाषांतले ज्ञान, शब्दरचनासौंदर्य, नाद, लय, माधुर्य हे आपल्यापर्यंत, आपल्या भाषेपर्यंत पोहोचायलाच हवे, तरच आपल्याला अनोख्या आनंदाचा ठेवा सापडू शकेल. आता त्या अनुवादात मूळ कवितेतील जास्तीत जास्त गुण यायचे तर मग शब्दानुवाद, अर्थानुवाद, भावानुवाद, पद्यानुवाद, गीतानुवाद या क्रमाने ते साधता येऊ शकतात. कमीत कमी गुण आस्वादास मिळावेत म्हणून किमान शब्दानुवाद ही पहिली पायरी समजायला हवी.

समारोप

पद्यानुवादाप्रती वाचकाचा दृष्टीकोन कसा असावा? तर तो बंद शिंपल्याकडे पाहण्याचा असावा. कुठल्या शिंपल्यात पाणीदार मोती सापडेल ते आपल्याला काय माहीत. जमतील तेवढी बंद शिंपली पदरात बांधून घ्यावी हाच दृष्टीकोन श्रेयस्कर ठरेल. म्हणून मला असे वाटते की पद्यानुवादकांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. पद्यानुवाद ही सहजसाध्य कला नाही. परिश्रमानेही त्वरीत साधते अशीही कला नाही. म्हणून, मूळ भाषेतील रचनेतील, मूळच्या आवडी-निवडीला, अभ्यासपूर्ण आकलन आणि कुशाग्र अभिव्यक्तीद्वारे अधिक आस्वाद्य करून, आपणास सहर्ष सादर करणाऱ्या कलाकारांची आपण योग्य ती कदर करायला हवी. त्यांच्याकडून आपणांस अनुपमेय कलाकृती, कायमच, आस्वादास मिळाव्यात अशी अपेक्षा करायला हवी. आपणही या दुर्मिळ कलेला प्रोत्साहन देऊन, उमेदवार मिळवून द्यायला हवेत. म्हणजे अन्य भाषांतील आविष्कारांच्या आस्वादाची, स्वभाषेत सोय उपलब्ध होऊ शकेल!

मनोगतावर अलीकडेच अनेकांना पद्यानुवादात रुची निर्माण होत आहे. मनोगताच्या प्रशासकांची पद्यानुवादांकडे पाहण्याची दृष्टी आणि त्यांवर त्यांनी दाखवलेला विश्वासच ह्यासाठी कारणीभूत आहे. अनेकदा राजाश्रयाने साधता येतात त्या गोष्ठी लोकाश्रयानेही साध्य होऊ शकत नाहीत. इथल्या राजाश्रयाने, पद्यानुवादांस भरभराटीचे दिवस येवोत हीच प्रार्थना. पद्यानुवादास प्रवृत्त होणाऱ्या नवोदितांसही सहर्ष आमंत्रण आणि शुभेच्छा!

------------------------------------------------------------

सुरेख आणि माहितीपूर्ण - प्रे. चक्रधर१ (सोम., ११/०८/२००८ - ०६:३५). पद्यानुवादाचे इतके पैलू उलगडून दाखवल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे पद्यानुवादात कशाकशाचा आस्वाद घ्यायचा याची सामान्य वाचकास पुरेशी जाण नसते. या लेखामुळे आता पद्यानुवादाचा आनंद आमच्यासारख्या वाचकांना अधिक चांगल्या प्रकारे घेण्यास मदत होईल.

ज्यांना ते आवडत नाहीत ते मात्र पद्यानुवाद होणे थांबेल कसे ह्याबाबत अत्यंत आग्रही दिसून येतात>>>> खेदाची बाब आहे, पण तुमचा हा लेख वाचून त्यांचा दृष्टीकोन बदलेल याची मला खात्री वाटते. एक विनंती, उत्तर जाहीर करताना (जर आधीच कुणी प्रतिसादात लिहिले नसतील तर) मूळ गीताचे शब्द (किमान दुवा तरी) द्यावा.

प्रे. मिलिंद फणसे (सोम., ११/०८/२००८ - ०८:०८). या लेखामुळे आता पद्यानुवादाचा आनंद आमच्यासारख्या वाचकांना अधिक चांगल्या प्रकारे घेण्यास मदत होईल. - हेच म्हणतो.

प्रे. नरेंद्र गोळे (सोम., ११/०८/२००८ - १३:११). चक्रधर, ताबडतोब, उत्स्फूर्त प्रतिसादाची चव पहिल्या प्रेमासारखीच असते! तेव्हा त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद. अनुवादाचे कूट उकलतांना मूळ गीताचे शब्द उपलब्ध करून द्यावेत ह्या विचाराशी मी १००% सहमत आहे. किमान दुवा देण्याचा प्रयत्न अवश्य करेन. खरे तर सारणीत एका स्तंभात मूळ तर दुसर्‍यात अनुवाद अशाप्रकारे प्रत्येक कडवे स्वतंत्र ओळीत लिहून वाचणे श्रेयस्कर. तशी काही तरी सोय असायला हवी. प्रशासक महोदय, उत्तरासोबत मूळ गीताचे सर्व शब्द देण्याची प्रथा ठेवावी, व एक दिवसानंतर ते उतरात्मक मूळ गीत नष्ट करावे, असे केल्यास मूळ गीताचा शोध लोकांना अनुवादाप्रत घेऊन येऊ शकणार नाही आणि कंप्रतापट्टीच्या अरुंदतेचा (बँडविड्थ) प्रश्न उद्भवणार नाही. अशी सूचना कराविशी वाटते. मात्र आस्वादाच्या दृष्टीने चक्रधरांची सूचना अतिशय योग्य आहे, तेव्हा ती वर सकारात्मक विचार अवश्य व्हावा ही नम्र विनंती. 

इतरभाषिक मजकुराचा दुवा द्यावा प्रे. प्रशासक (सोम., ११/०८/२००८ - १३:३८). मनोगतावर मराठी भाषेत लिहिलेल्या मजकुराचे संपादन, साठवण, प्रकाशन आणि देवघेव व्हावी आणि तसे करण्यास प्रोत्साहन मिळावे, हे धोरण ठेवलेले आहे. इतरभाषिक मजकूर १०%च्या वर जाऊ नये. अशा मजकुराचे भाषांतर (कवितेच्या बाबतीत छंदोबद्ध भाषांतर(च)) येथे द्यावे आणि सोबत मूळ मजकुराचा दुवा द्यावा.

ऊर भरून आला प्रे. टवाळ (सोम., ११/०८/२००८ - ११:११). ज्ञानेश्वर, विनोबा भावे, सी डी देशमुख, कुसुमाग्रज, नरेंद्र गोळे इत्यादी थोरांच्या पंगतीत माझे पान मांडलेले पाहून ऊर भरून आला. (आणि जेवण्याआधीच पोटही भरून आले ).

हवी तीच अभिव्यक्ती समर्थपणे साध्य होणे हेच अनुवादाचे यश असते! प्रे. नरेंद्र गोळे (सोम., ११/०८/२००८ - १३:३३). टवाळा आवडे विनोद, या उक्तीनुसारच हा विनोद समजायला हवा. ज्ञानेश्वर, विनोबा, देशमुख, कुसुमाग्रज यांचे काळी मूळ काव्याप्रती विद्यमान असणारा आदरभाव आज आपल्यांत नाही. मूळ काव्यातल्या आशयाचे संपूर्ण गांभीर्याने अनुवादात अवतरण व्हावे ह्याकरता ते जे सायास करत त्याच्या पासंगालाही आपले प्रयत्न पुरणार नाहीत. तेव्हा तुलना करणे हा माझा उद्देश नव्हताच. मी ज्याप्रकारच्या वर्गीकरणाकरता त्यांच्या अनुवादांचा उल्लेख केलेला आहे त्यासंदर्भातही त्यांचेप्रतीचा माझा आदरभाव मुळीच कमी नाही. मुळात टिंगल-टवाळीसाठी अनुवाद करता करता चुकीने/निरुपायाने तो गंभीर वठला असेही प्रकरण त्यांपैकी कुणाचेही नाही. माझेही तसे नसावे याकरता मी प्रयत्नशील असतो. आपल्याला हवी तीच अभिव्यक्ती समर्थपणे साध्य होणे हेच सशक्त अनुवादाचे यश असते. मात्र, आपले भिन्नवृत्ती अनुवाद एवढे सुंदर वठले आहेत की त्यांचे नाव घ्यावेच लागले. शिवाय, मनोगतावर पद्यानुवादांच्या लोकप्रियतेखातर तुम्ही जो सक्रिय पुढाकार घेऊन "कूटप्रश्न अनुवाद" हा प्रकार नावा-रूपास आणलात त्याखातर मनोगत आपले ऋणी राहील. महाजालीय पद्यानुवादांचा इतिहास आपले नाव घेईल.

हार्दिक शुभेच्छा प्रे. चित्त (सोम., ११/०८/२००८ - ११:३६). चिंतामण द्वारकानाथ (सीडी) देशमुख आणि कुसुमाग्रजांनी केलेले अनुवाद दिल्याबद्दल धन्यवाद. विविध साहित्यकृतींचे भाषांतर आणि अनुवाद केल्यामुळे प्रामुख्याने दोन गोष्टी साध्य होतात असे मला वाटते.
१. इतर भाषांतले साहित्य आपल्या भाषेत अनुवादित झाल्यावर वाचकांच्या जाणिवा अधिक समृद्ध आणि विस्तृत होण्यास मदत होऊ शकते.
२. भाषांतरांमुळे आपल्या भाषेत लिहिण्याची, बोलण्याची गोडी लागण्यास हातभार लागू शकतो.

बहुतेक वेळा मूळ भाषेतल्या साहित्याचा आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी भाषांतराच्या, अनुवादाच्या पल्याड असतात. विशेषतः कवितेच्या बाबतीत. त्यामुळे अनेकदा भाषांतर/अनुवाद फसला तर कधी फारच सपक व हास्यास्पद होतो तर कधी अतिशय उथळ आणि बटबटीत. असे असले तरी गोळेकाका आणि त्यांचे समानधर्मी हुरूप तसूभरही कमी होऊ न देता, सातत्याने आणि निगुतीने भाषांतराचे, अनुवादाचे काम अतिशय आवडीने करत असतात. आणि ह्या त्यांच्या कार्यामुळे नमूद केलेले २ र्‍या क्रमांकाचे कार्यास हसत-खेळत हातभार लागत असावा असे वाटते. त्यांच्या ह्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.

आपला अभिप्राय पद्यानुवादांच्या कर्त्यांस प्रत्साहनच ठरेल! प्रे. नरेंद्र गोळे (सोम., ११/०८/२००८ - १३:५३). देशमुख आणि कुसुमाग्रजांचे अनुवाद तुम्ही वाचलेच असावेत. नसल्यास अवश्य वाचावेत.

विविध साहित्यकृतींचे भाषांतर आणि अनुवाद केल्यामुळे प्रामुख्याने दोन गोष्टी साध्य होतात असे मला वाटते. १. इतर भाषांतले साहित्य आपल्या भाषेत अनुवादित झाल्यावर वाचकांच्या जाणिवा अधिक समृद्ध आणि विस्तृत होण्यास मदत होऊ शकते.  २. भाषांतरांमुळे आपल्या भाषेत लिहिण्याची, बोलण्याची गोडी लागण्यास हातभार लागू शकतो.>>>>

बहुतेक वेळा मूळ भाषेतल्या साहित्याचा आशय आणि अभिव्यक्ती ह्या दोन्ही गोष्टी भाषांतराच्या, अनुवादाच्या पल्याड असतात. विशेषतः कवितेच्या बाबतीत. त्यामुळे अनेकदा भाषांतर/अनुवाद फसला तर कधी फारच सपक व हास्यास्पद होतो तर कधी अतिशय उथळ आणि बटबटीत. असे असले तरी गोळेकाका आणि त्यांचे समानधर्मी हुरूप तसूभरही कमी होऊ न देता, सातत्याने आणि निगुतीने भाषांतराचे, अनुवादाचे काम अतिशय आवडीने करत असतात. आणि ह्या त्यांच्या कार्यामुळे नमूद केलेले २ र्‍या क्रमांकाचे कार्यास हसत-खेळत हातभार लागत असावा असे वाटते. त्यांच्या ह्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.>>>>

आपण उत्स्फूर्ततेने दिलेला वरील अभिप्राय पद्यानुवादांच्या कर्त्यांस प्रत्साहनच ठरेल ह्यात संशय नाही. त्याद्वारे आपल्या विचारांतील पद्यानुवादांप्रतीची निखळ सकारात्मक बाजू समोर आली आहे.

अनुवाद उथळ, बटबटीत, सपक वा हास्यास्पद होऊ शकतो. त्यापाठचे प्रयत्न तसे नसतात. अनुवादकही तसे नसतात. ते तुम्हाला काय द्यायचा प्रयत्न करत आहेत हे समजून घ्या. आणि न मिळाल्यासही काय मोठेसे बिघडणार आहे? मात्र मिळालाच तर तुम्ही म्हणता तसा फायदा मिळू शकेल. तेव्हा पद्यानुवादांचे स्वागत करा.

मजकूर समजला. भावना पोहोचल्या प्रे. टवाळ (सोम., ११/०८/२००८ - १२:१३). गोळेकाका आणि त्यांचे समानधर्मी हुरूप तसूभरही कमी होऊ न देता, सातत्याने आणि निगुतीने भाषांतराचे, अनुवादाचे काम अतिशय आवडीने करत असतात. आणि ह्या त्यांच्या कार्यामुळे नमूद केलेले २ र्‍या क्रमांकाचे कार्यास हसत-खेळत हातभार लागत असावा असे वाटते. त्यांच्या ह्या कार्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.>>>>

मजकूर समजला. भावना पोहोचल्या. जाणत्या लोकांच्या मार्गदर्शनाने, प्रोत्साहनाने आणि शुभेच्छेनेच माझा हुरूप आजवर टिकून राहिला आहे. (आता टाकतोच एक जबरी भाषांतर )

जालकविसंमेलनात ही गाणी द्या. प्रे. सुलेखा बेलकुणे (मंगळ., १२/०८/२००८ - १०:५७). तुमची सर्व गाणी अप्रतिम आहेत. तुम्ही ही गाणी जालकविसंमेलनाला पाठवावीत अशी मी तुम्हाला विनंती करीन. असे झाले तर त्यांच्या वेगळेपणामुळे तो तुमच्या गाण्यांचा आणि कविसंमेलनाचा दोघांचा बहुमान ठरेल असे मला वाटते.

आपण दिलेल्या बहुमानाखातर मनःपूर्वक धन्यवाद! प्रे. नरेंद्र गोळे (मंगळ., १२/०८/२००८ - १५:३८). सुरेखादेवी, आपण दिलेल्या बहुमानाखातर मनःपूर्वक धन्यवाद! आपण एवढे दिवस कुठे होतात? अप्रतिम म्हणता तेव्हा वाचत असणार. मग अभिप्राय का नोंदवत नाही? तसे केल्यास अनुवादकास आवश्यक तो हुरूप मिळू शकतो. जालकविसंमेलनाच्या संयोजकांना चालत असल्यास आपल्या सूचनेचा अवश्य विचार करता येईल. सूचनेखातरही मनःपूर्वक धन्यवाद.

मात्र, एरव्हीही कुणा जाणकार संगीतदिग्दर्शकाने नव्याने स्वरबद्ध करून सादर केली तर ती जास्त आस्वाद्य होतील असे मला वाटते. कारण मूळ चाल, मूळ गीतातील शब्दांना न्याय देत असते. अनुवादित गीतास पुरेसा न्याय मिळायचा झाला तर मूळ चालीतही अनुवादातील नव्या शब्दांना पोषक असे बदल करणे जास्त सयुक्तिक ठरेल. अर्थातच, मूळ चालीपासून नवी चाल जेवढी दूर जाईल तेवढी तिची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता जास्त राहील.

अभ्यासपूर्ण लेख प्रे. मीरा फाटक (बुध., १३/०८/२००८ - ०५:१४). आपला लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे. त्यावर आपण खूप मेहनत घेतली आहे हेही लक्षात येत आहे. अभिनंदन आणि आभार. तसेच सीडीदेशमुख आणि कुसुमाग्रज यांचे अनुवाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. मला ही माहिती नवीन आहे. आता माझे व्यक्तिगत मत. आपण म्हटले आहे. पद्यानुवाद कशाकरता आस्वाद्य असू शकतात? एक यादीच करू या!
 १. इतर भाषेतल्या पद्याचे आकलन होण्याचा आनंद. म्हणजे अर्थानुवादातील आनंद.
 २. त्या मूळ पद्यातील भाव-भावनांशी सहानुभूत होण्यातला आनंद. म्हणजे भावानुवादातील आनंद.
 ३. त्या मूळ भाषेतल्या शब्दांच्या पदलालित्याच्या व शब्दरचनेच्या आस्वादातील आनंद.
 ४. त्या मूळ पद्यातील नाद, लय, सूर, ताल इत्यादी. म्हणजे सांगितिक आकलनातील आनंद.
 ५. त्या मूळ पद्यातील गेयता अनुवादाच्या भाषेत आणता आली तर तो अनुवाद गाण्यातील आनंद.

वरील ५ कारणांपैकी कोणते जास्त महत्त्वाचे वाटणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. कोणतेही लेखन -गद्य वा पद्य- वाचल्यावर माझ्यासारख्या साहित्याच्या क्षेत्रातील 'ले वूमन' च्या प्रतिक्रिया 'छान लिहिलंय हं', किंवा 'ठीक आहे.' किंवा 'छे, नाही बुवा आवडलं.' अशा प्रकारच्याच असतात. म्हणजे माझी भूमिका केवळ आस्वादकाची असते, परीक्षकाची नसते. त्यामुळे मी निरनिराळ्या निकषांवर ते साहित्य घासून बघण्याच्या भानगडीत पडत नाही. आनंद मिळतो की नाही एवढेच मी पाहाते, तो त्यातील कोणत्या गुणांमुळे मिळाला ह्याच्याशी मला फारसे कर्तव्य नसते. कधी कधी अनुवाद वाचून मूळ गाणे ओळखता आले इथेच माझ्या आनंदाची सुरुवात आणि शेवटही होतो. असो. लेख अभ्यासपूर्ण आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करत आहे. वरील काही प्रतिसादांनुसार वाचकांना त्याचा उपयोग होईलच. मनोगतावर अनुवाद अधिकाधिक लोकप्रिय होतील. (आताच तशी लक्षणे दिसू लागली आहेत.) तेव्हा ह्या उपक्रमासाठी आपण आणि इतर अनुवादकर्त्यांना माझ्या सर्व शुभेच्छा.

आस्वादासाठी अभ्यासाची गरजच नसते! प्रे. नरेंद्र गोळे (बुध., १३/०८/२००८ - ०६:०६). मीराताई, अभिप्रायाखातर मनःपूर्वक धन्यवाद. आस्वादासाठी अभ्यासाची गरजच नसते. त्या अनुवादातील गुणांचा शोध घेण्याचीही गरज नसते. आपल्या जाणीवा जसजशा समृद्ध होत जातात तसतसे अनुवादातील गुण आपल्यासमोर आपणहून प्रकट होऊ लागतात. अनुवादात, उपरोल्लेखित गुणांचा आस्वाद मिळण्याची शक्यता माहीत असलेला आस्वादक जास्त बारकाईने, जास्त आनंद मिळवू शकेल. त्याकरता अनुवादाचे सखोल परीक्षण/रसग्रहण करण्याची आवश्यकताच नाही. पहिल्या वाचनातच त्याला आस्वाद्य असणार्‍या सर्व गुणांचा तो ग्राहक होत असतो.

ताबडतोब, उत्स्फूर्त प्रतिसादाची चव पहिल्या प्रेमासारखीच असते! प्रे. हेमंत पाटील (शुक्र., १५/०८/२००८ - ०७:४२). १००% सहमत.

सामान्य वाचक पद्यानुवाद आणखीही होत राहावेत ह्याबाबत आग्रही नसतो. ज्यांना ते आवडत नाहीत ते मात्र पद्यानुवाद होणे थांबेल कसे ह्याबाबत अत्यंत आग्रही दिसून येतात. असे का व्हावे? पद्यानुवाद लोकांना नको असतात का?>>>>>

नाही बुवा एक वाचक म्हणून असे मला तरी वाटत नाही. बरेचदा अनुवादासाठी निवडलेली गाणी ओळखीची नसल्याने कदाचीत अनुवाद ओळखता येत नसावा म्हणुनच उत्तरा दाखल प्रतिसाद मिळत नसावा. आता प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या आहेत. गद्य-पद्य, कुट, चर्चा यात कुणाला कितपत रस आहे त्यानुसार त्याचा आस्वाद कसा घ्यावा हे वाचक आपल्यापरीने ठरवतो. आम्हाला मात्र अनुवादात देखिल तितकाच आंनद मिळतो. मंद आवाजात शिट्टीवर गाणे गुणगुणण्यात काय मजा आहे काय सांगु. नेमके तसेच ह्या पद्य अनुवादाचे आहे. ही अनुवादीत कडवी मुळ गाण्याच्या चालीत कधी कुणासमोर गुणगुणल्या आहात का? .......त्याच्या चेहर्‍यावरच तुम्हाला दाद मिळेल. आपल्या ह्या उपक्रमानेच तर नवोदीताना स्फूर्ती मिळते आणि हातच्या कंकणाला आरसा कशाला? ... अनुवादकांची यादी वाढत चालली आहे. हे ही नसे थोडके.

आवडला प्रे. छिद्रान्वेषी (शुक्र., १५/०८/२००८ - ११:५९).लेख आवडला. विचार, भावना पोहोचल्या. अनुवादात मूळ कवितेतील जास्तीत जास्त गुण यायचे तर मग शब्दानुवाद, अर्थानुवाद, भावानुवाद, पद्यानुवाद, गीतानुवाद या क्रमाने ते साधता येऊ शकतात. कमीत कमी गुण आस्वादास मिळावेत म्हणून किमान शब्दानुवाद ही पहिली पायरी समजायला हवी.>>>> - सहमत.

अभ्यासपूर्ण लेख प्रे. मृदुला (रवि., २१/०९/२००८ - १७:३३). लेख उत्तम लिहिला आहे. अगदी मुद्देसूद व मूळ विषयापासून अजिबात न ढळता. असेच विविध विषयांवर लिहावे. पद्यानुवाद लोकांना नको असतात का? याचे ढोबळ उत्तर देणे कठीण आहे. संस्कृत तसेच इतर सहसा न समजणार्‍या भाषेतल्या पद्याचे, कवितांचे अनुवाद कवितेच्या रसिकांना जास्त आवडण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेतील गाणी, कविता सहसा थेट आस्वादता येतात, त्यामुळे त्यांच्या मराठी अनुवादाबद्दल निरुत्साह दिसत असावा. बाकी विनोद म्हणून भाषांतरे लोकप्रिय आहेतच.

मी काही दिवसांपूर्वी पुलंनी अनुवादलेली रविंद्रनाथांची काही गीते, कविता वाचल्या. अगदी १/ २ मस्त वाटल्या. बाकी 'यात काय कविता' अशी भावना झाली. रविंद्रनाथ व पुलं आपापल्या क्षेत्रात दिग्गज खरे, पण कविता, पद्ये हे असे नाजूक क्षेत्र आहे की भट्टी बिघडण्याचीच शक्यता ९९%.

मला वाटते की लेखाने काम व्यवस्थित पार पाडले आहे. प्रे. नरेंद्र गोळे (बुध., २४/०९/२००८ - १४:३७). हे असे नाजूक क्षेत्र आहे की भट्टी बिघडण्याचीच शक्यता ९९%. >> सहमत! नावावरून एवढा क्लिष्ट वाटणारा लेख पूर्ण वाचून, आवर्जून प्रतिसाद दिलात म्हणून मनःपूर्वक धन्यवाद.

असे आहे, म्हणूनच आस्वादकाने अनुवादकाला झुकते माप द्यावे हे सुचवण्यासाठीच तर हा लेख लिहावासा वाटला. मला वाटते की लेखाने काम व्यवस्थित पार पाडले आहे.

तुमच्या लेखामुळे टवाळांची ओळख झाली - धन्यवाद प्रे. फुकट फौजदार (बुध., २४/०९/२००८ - १५:०३). लेखाने काम व्यवस्थित पार पाडले आहे. बाकी काही असो. तुमच्या लेखामुळे टवाळ ही काय चीज आहे ते कळले ही जमेची बाजू. कोणी काही म्हणा टवाळ ह्यांच्या लेखनाबद्दलही कुणीतरी रसग्रहणात्मक लिहायलाच हवे असे मला वाटते. धन्यवाद.

मी आपल्याशी सहमत आहे. आपणच का लिहीत नाही? अवश्य लिहा. प्रे. नरेंद्र गोळे (शुक्र., २६/०९/२००८ - ०८:१२).

चांगला प्रे. हॅम्लेट (सोम., २२/०९/२००८ - १२:१६). चांगला लेख आहे. वर म्हटल्याप्रमाणे पद्याचा अनुवाद अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि भल्या-भल्यांनाही यात अडचणी येतात. बरेचदा मूळ भाषेची गोडी दुसर्‍या भाषेत नसल्यानेही असे होऊ शकते. उदा. "रे मना, तुला झालय तरी काय?" अशा प्रकारचा अनुवाद करायला खूप सोपा आहे पण मूळ ओळी अत्यंत सोप्या असूनही त्यांची लज्जत अनुवादात येणे अशक्य वाटते. हॅम्लेट
पद्यानुवादकास आस्वादकाने झुकते माप द्यावे! प्रे. नरेंद्र गोळे (बुध., २४/०९/२००८ - १४:४४). हम्लेट महाशय, प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद. प्रतिसादावरून, पद्यानुवाद ही अवघड कला आहे हे तर तुम्ही मानता आहात असे दिसते! ह्यास्तव पद्यानुवादकास आस्वादकाने झुकते माप द्यावे एवढेच काय ते मला म्हणायचे आहे.

झुकते माप प्रे. हॅम्लेट (शुक्र., २६/०९/२००८ - ११:५७). आपले म्हणणे अनुवादकांना उत्तेजन द्यायचे या अर्थाने ठीक आहे. पण अशाने अनुवादांचा दर्जा ठरवण्याचे काम अजून अवघड होऊन बसेल. (अमवा)हॅम्लेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.